विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 February 2024

मराठ्यांच्या इतिहासात ऐन सणा सुदीच्या काळात काही दुर्दैवी घटना

 मराठ्यांच्या इतिहासात ऐन सणा सुदीच्या काळात काही दुर्दैवी घटना 

 लेखन :प्रकाश लोणकर



दिनविशेष--आश्विन वद्य १४, शके १७२४ म्हणजे २५ ऑक्टोबर १८०२. नरक चतुर्दशी-दिवाळीचा प्रथम दिवस.
मराठ्यांच्या इतिहासात ऐन सणा सुदीच्या काळात काही दुर्दैवी घटना घडून त्यांचा तत्कालीन राज/सत्ताकारणावर दूरवर अनिष्ठ परिणाम झाल्याचे दिसते. छत्रपती संभाजी महाराजांची औरंग्जेब्कडून हिंदू नववर्षाच्या आदल्या दिवशी करण्यात आलेली निर्मम हत्त्या, संक्रांतीच्या आसपास पानिपत येथे मराठे-अफगाण यांच्यातील भयानक रणसंग्रामात मराठ्यांची झालेली हानी, चंपाषष्ठीच्या दिवशी धाकट्या शाहू महाराजांना ताराराणींकडून झालेली अटक, ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत शनिवारवाड्यात पेशवा नारायणरावांची काका रघुनाथरावच्या सांगण्यावरून हत्त्या, ह्या काही घटना. आजचा लेख अशाच एका-२२१ वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी घडलेल्या अशा घटने विषयी आहे जिच्यामुळे इंग्रजांना मराठ्यांचे राज्य गिळंकृत करणे सुलभ झाले.
२५ ऑक्टोबर १८०२ रोजी हडपसर-पुणे इथे मराठेशाहीच्या शिंदे, होळकर ह्या दोन प्रबळ सरदारांच्या तसेच पेशव्यांच्या सेना आपापसात भिडल्या. पानिपत युद्धात अब्दालीच्या सैन्याला दे माय धरणी ठाय करून सोडलेल्या मराठा सेनानींच्या वंशजांनी पानिपत युद्धा नंतर अवघ्या ४१ वर्षांनी एकमेकांच्या रक्ताचे पाट वाहिले,हाडामांसाचा चिखल केला! छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या, छ.संभाजी महाराजांच्या बलिदानाने सिंचलेल्या आणि छ.शाहू महाराजांच्या कुशल नेतृत्वाखाली हिंदुस्थानभर फैलावलेल्या मराठा साम्राज्याची इतिश्री शिवराज्याभिषेक झाल्यानंतर (इ.स.१६७४) १२८ वर्षांनी (इ.स.१८०२) मराठा सरदारांच्या आपसातील वैरामुळे झाली.
सवाई माधवराव पेशव्याच्या अपघाती मृत्यू (ऑक्टोबर १७९५) नंतर पेशवाईला नवीन वारस शोधण्यासाठी नाना फडणवीस,दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर यांच्यात कमालीची रस्सीखेच सुरु झाली.नवीन पेशवा आपल्या ताब्यात राहून त्याच्या आडून सत्ता बळकावण्याचे प्रयत्न सुरु झाले.यासाठी सगळ्यांनी कुठल्याही बाबींचा विधिनिषेध बाळगला नाही. इप्सित साध्य करण्यासाठी आवश्यकता भासली तर निजाम आणि इंग्रज ह्या मराठ्यांच्या शत्रूंकडून साह्य मिळेल अशी व्यवस्था पण करून ठेवली. नानांनी आधी राघोबा दादा पुत्र द्वितीय बाजीरावला विरोध करून नंतर दौलतराव शिंद्यांवर कुरघोडी करून बाजीराव द्वितीयला दौलतरावच्या हस्तक्षेपाशिवाय पेशवेपदी बसविण्यात बाजी मारली.यासाठी नानांनी शिंदेना बऱ्याच लाभांचे package पण कबुल केले. जरी बाजीराव द्वितीय पेशवेपदी स्थापित झाले तरी त्यास राज्यकारभाराचा काहीच अनुभव नव्हता.पैसा आणि राज्यकारभाराची सूत्रे नानांकडे तर लष्करी सामर्थ्य दौलतराव शिंद्यांकडे होते.तसेच राघोबा दादांचा दत्तक पुत्र आणि बाजीराव द्वितीयचा भाऊ अमृतराव याची पेशवाईच्या कारभाराची सूत्रे आपली हातात राहावी अशी महत्वाकांक्षा होती.बाजीराव द्वितीय आपल्या हातचे बाहुले बनून राहणार नाही हे उमगल्यावर त्याच्या जागी त्याचा अल्पवयीन भाऊ चिमणाजी यास किंवा अमृतरावच्या विनायकराव ह्या मुलास पेशवेपदी बसविण्याची कारस्थाने पुणे दरबारात सुरु झाली.
होळकर आणि शिंदे ह्या मराठेशाहीतील अव्वल सरदारांचे कार्यक्षेत्र एकच असल्याने उभयतात बऱ्याचदा अनेक बाबींवरून मतभेद, संघर्ष होत असत.पण पुण्यात जोपर्यंत सशक्त,समर्थ पेशवे होते तोपर्यंत असे मतभेद विशिष्ठ मर्यादेपलीकडे ताणले जात नसत.महादजी शिंदे फेब्रुवारी १७९४ मध्ये,अहिल्याबाई होळकर ऑगस्ट १७९५, तुकोजी होळकर ऑगस्ट १७९७ मध्ये मृत्यु पावले.महाद्जींच्या जागी त्यांच्या भावाचा नातू दौलतराव नियुक्त झाला तर तुकोजींच्या जागी त्यांचा ज्येष्ठ पुत्र काशिरावची नियुक्ती झाली.तुकोजींचा द्वितीय पुत्र मल्हारराव हा पण होळकर घराण्याची सुभेदारी मिळण्यासाठी इच्छुक होता.दौलतराव आणि बाजीराव द्वितीय यांच्या विरोधात शिंद्यांचा जुना विरोधक असलेल्या होळकर घराण्याचा उपयोग करून घेण्याचे राजकारण नानांनी खेळले.त्यांनी मल्हारराव याचा पक्ष उचलून धरला.तुकोजींच्या विठोजी आणि यशवंतराव ह्या दोघा अनौरस पुत्रांचा मल्हारराव ह्यास पाठींबा होता.मल्हारराव सप्टेंबर १७९७ मध्ये दौलतराव आणि काशिराव यांनी त्याच्या गोटावर घातलेल्या छाप्याच्या वेळी मारला गेला. ह्यावेळी विठोजी आणि यशवंतराव निसटले पण मनात सुडाची भावना ठेवून.नाना फडणवीस आपल्या विरुद्ध कारस्थाने रचत असल्याने दौलतरावने नानांना भेटीस बोलावून दगाबाजी करून ३१ डिसेंबर १७९७ ला अटक करून त्यांची रवानगी अहमदनगरच्या किल्ल्यात केली.बाजीरावचा भाऊ अमृतराव महादजी शिंदे यांच्या पत्नींना दौलतराव विरुद्ध फितवत असल्याचा संशय दौलतरावास होता.म्हणून त्याने बाजीरावावर सूड उगविण्यासाठी सातारकर छत्रपतीना उठाव करण्यास उद्युक्त केले. नाना फडणवीस मार्च १८०० मध्ये मृत्यू पावले. दौलतरावच्या भीतीने अमृतराव वसई इथे येऊन राहिला.
सन १८०० च्या अखेरीस दक्षिण सोडून उत्तरेकडे जाणे दौलतरावास भाग पडले.महाद्जींच्या स्त्रिया आणि यशवंतराव होळकर ह्यांनी शिंद्यांच्या मुलुखात मोठी गडबड सुरु केली होती. ह्या दोन्हीतून यशवंतराव दौलतरावला खूपच घातक ठरला.होळकरांचे काही जुने निष्ठावान अधिकारी अनेक शिपाई यांनी यशवंतरावला पाठींबा दिला.नाना फडणीस यांनी पण यशवंतरावास भरपूर मदत केली होती. यशवंतरावने दक्षिणेकडे मोर्चा वळविला होता.खानदेशात येयीपर्यंत नाना मरण पावले होते.म्हणून त्यावेळी दक्षिण मोहीम काही काळ स्थगित ठेवण्यात आली.यशवंतरावच्या हल्ल्यांना तोंड देत दौलतराव १८०१ मध्ये उत्तरेकडे येते झाले.शिंदे होळकर संघर्षात उभय पक्षांनी वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांनी उभारलेल्या कवायती फौजांची अतोनात हानी झाली. दौलतराव त्यामुळे यशवंतरावच्या प्रतिकारासाठी उज्जैन सोडून बाहेर पडला नाही.शिंदे कमकुवत झाल्याचे दिसून आल्यावर पुणे दरबारातून शिंदे गटाची हकालपट्टी करून तिथे आपले नियंत्रण स्थापन करण्याच्या जुन्या योजनेस कार्यान्वित करण्यासाठी यशवंतरावनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला.नानांच्या मृत्यू नंतर दक्षिणेतील असंतुष्ट व बंडखोर गटाचे नेतृत्व वसईला निघून गेलेल्या अमृतरावकडे होते तर लष्करी गटाचे विठोजी होळकर याचेकडे होते. १८०० च्या उत्तरार्धापासून बारभाईनच्या हजारो सैनिकांनी दक्षिणेत हल्ले, जाळपोळ, लुटालूट यांचा कहर केला.विठोजीने तर जणू सबंध महाराष्ट्रात आगच लावून दिली. बाजीरावने केंद्रासत्ता न जुमानणाऱ्या बंडखोर जहागीरदार व त्यांच्या पाठीराख्यांचा बंदोबस्त करण्यासाठी १८०१ मध्ये यशस्वी लष्करी कारवाई केली.ह्यात विठोजी पकडला जाऊन त्यास एप्रिल १८०१ मध्ये शनिवारवाड्याच्या समोरील चौकात हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.
दरम्यान अमृतरावाने यशवंतराव बरोबर एक करार केला होता.त्यानुसार यशवंतरावने बाजीरावच्या जागी अमृतरावच्या हाती सूत्रे द्यावीत, शिंद्यांचे दक्षिणेच्या राजकारणातून समूळ उच्चाटन करावे, मल्हारराव पुत्र खंडेराव यास होळकर घराण्याचा प्रमुख आणि यशवंतराव त्याचा प्रतिनिधी म्हणून मान्यता देणे, यशवंतरावास अमृतरावने एक कोटी रुपये देणे,इत्यादी अमृतरावने मान्य केले.
१८०२ च्या प्रारंभी यशवंतरावने आपल्या मागण्यांची भली मोठी यादी बाजीरावला पाठविली.ती मान्य करणे शिंद्यांच्या हाती होते.आपल्या मागण्या मान्य होत नसल्याचे बघून यशवंतराव मे १८०२ मध्ये दक्षिणेत मोठी फौज घेऊन उतरले. सबंध मुलुखात लुटालूट,जाळपोळीचे भयानक सत्र सुरु झाले.जून ते ऑगस्ट ह्या काळात संपूर्ण उद्वस्त झाला. जुलै ऑगस्ट मध्ये होळकरांनी सुमारे चार हजारांची पेशव्यांची फौज कापून काढली/गारद केली.बाजीरावने मदतीसाठी शिंद्यांना निरोप पाठविले होते. तिकडून सदाशिव बक्षी मोठे घोडदळ घेऊन सप्टेंबर मध्ये पुण्यास पोहचला.दक्षिण मोहिमेसाठी होळकर गटाने जय्यत तयारी केली होती.२८ कवायती पलटणी, २५००० रोहिले पठाण,लाखावर घोडदळ आणि १०० उत्तम तोफा त्यांच्याकडे होत्या.यादवी युद्ध टाळून वाटाघाटी करून मार्ग काढण्यासाठी २४ ऑक्टोबर १८०२ रोजी बाजीरावने आपला मेहुणा रघुनाथ भागवत,भोसल्यांचा वकील नारायणराव वैद्य,आपला दिवाण बाळोबा कुंजर याचा सहाय्यक आबाजी शंकर ह्यांस होळकरांकडे बोलणी करण्यास पाठविले पण होळकरांनी त्यांना धुडकावून लावले. तसेच शिंद्यांचे अधिकारी पण होळकरांशी असलेल्या वादाचा सोक्षमोक्ष रणांगणावर लावण्यास जास्त उत्सुक होते.अखेरीस २५ ऑक्टोबर १८०२ रोजी दिवाळीच्या पहिल्या दिवशी मराठेशाहीच्या दोन मजबूत आधारस्तंभांची भयानक लढत हडपसरच्या मैदानावर झाली.लष्करी नेतृत्व, शस्त्रास्त्रे, संख्याबळ ह्या सर्वच दृष्टीनी होळकरांची फौज शिंदे पेशवे फौजेपेक्षा वरचढ होती. त्यामुळे अल्पावधीतच होळकर फौजेने शिंदे पेशवे फौजेचा धुव्वा उडवला.ह्या लढाईत उभय पक्षांच्या फौजेची न भूतो न भविष्यती अशी प्राणहानी झाली.
हडपसर लढाईचा रागरंग पाहून बाजीराव पुणे सोडून कोकणच्या दिशेने निघून गेला.जाताना पुणे स्थित इंग्रज वकील क्लोस याला एक खलिता पाठवला ज्यात होळकर फौजांपासून आपले संरक्षण करण्याची विनंती केली होती.क्लोज ३ डिसेंबरला मुंबई इथे आला. अमृतराव आणि यशवंतराव त्यांनी पुणे इथे स्थापन केलेल्या नव्या सरकारला इंग्रजांनी मान्यता द्यावी म्हणून प्रयत्नशील होते.बाजीरावने दौलतरावास मदतीस येण्यासाठी तातडीचे निरोप पाठविले होते.दौलतराव येई पर्यंत इंग्रजांना झुलवत ठेवण्याचे बाजीरावचे ठरले होते.जर बाजीरावने इंग्रजांशी करार केला नाही तर ते अमृतराव व होळकर यांच्याशी करार करतील असा धाक इंग्रजांनी घातला.शेवटी बाजीरावनी ३१ डिसेंबर १८०२ रोजी वसई इथे इंग्रजांबरोबर करारावर सही केली.
संदर्भ:१-मराठी रियासत-खंड ८ ले.गो.स.सरदेसाई
२-मराठ्यांचा इतिहास-खंड तिसरा.संपादक अ.रा.कुलकर्णी,ग.ह.खरे
३-भवानीशंकर बक्षी यांची रोजनिशी.संपादक रामभाऊ लांडे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...