विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 February 2024

१७ डिसेंबर १७४०.चिमाजी अप्पांचे निधन.

 १७ डिसेंबर १७४०.चिमाजी अप्पांचे निधन.


२८३ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला थोरल्या बाजीराव पेशव्यांचे कनिष्ट बंधू चिमाजी अप्पा यांचे निधन झाले. भट पेशवे घराण्याचे आद्य पुरुष बाळाजी विश्वनाथ यांस दोन मुलगे,थोरला विसाजी उर्फ बाजीराव,धाकटा चिमणाजी
(चिमाजी म्हणून जास्त ओळखले जाते) व भिउबाई, अनुबाई अशी संतती होती. बाजीरावांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. चिमाजी अप्पांची नक्की जन्मतारीख उपलब्ध नाही. रीयासत्कार सरदेसाई नी बाजीराव पेक्षा ‘धाकटा चिमणाजी आपा चार पाच वर्षांनी लहान होता’ असे म्हटले आहे तर श्रीराम साठेनी अप्पांचा जन्म इ.स.१७०७ मध्ये झाल्याचे भट(पेशवे)घराण्याच्या वंशावळीत म्हटले आहे. चिमाजी अप्पांचे पाळण्यातील नाव अंताजी असे होते. दिनांक सोळा नोवेंबर १७१३ रोजी छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट ह्यांना आपले पेशवे म्हणून नियुक्त केले.छ.शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून मुक्त होऊन महाराष्ट्रात आले त्यावेळी त्यांना साथ देणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये पुण्याजवळील वाघोली गावच्या पिलाजीराव जाधव हे एक होते.बाळाजी विश्वनाथ पण त्यावेळी शाहू महाराजांसाठी पाठीराखे जमविण्याच्या उद्योगात होते. यादरम्यान त्यांची पिलाजीराव जाधवांशीशी भेट होऊन ते दोघे एकमेकांचे जिवलग मित्र बनले.बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांनी युद्धशास्त्राचे शिक्षण पिलाजीरावांकडेच घेतले. पुढे विविध लष्करी मोहिमात उभय बंधूनी गाजविलेले पराक्रम, मिळविलेले यश यांत त्यांनी पिलाजीराव यांचेकडे घेतलेल्या प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे.
चिमाजी अप्पांचा प्रथम विवाह इ.स.१७१६ मध्ये त्रिंबकराव पेठे यांच्या रखमाबाई ह्या बहिणीशी झाला.या विवाहासाठी बाळाजी विश्वनाथांनी ब्रह्मेंद्र स्वामिंकडून सातशे रुपये कर्ज काढले होते ज्याच्या परतफेडीसाठी वडील मुलगा बाजीराव जामीन राहिला होता. बाळाजींचा सासवड मुक्कामी दोन एप्रिल १७२० रोजी अचानक मृत्यू झाला. बाळाजींच्या मृत्यू नंतर पंधराच दिवसांनी म्हणजे १७ एप्रिल १७२० रोजी शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे दिली.ह्या वेळी शाहू महाराजांनी चिमाजी अप्पाना ‘पंडित‘ असा किताब व दमाजी थोरातांचा जप्त केलेला सरंजाम आणि सरदारी दिली.अशा प्रकारे चिमाजी अप्पांचा उत्तर मराठेशाहीतील सत्ता वर्तुळात प्रवेश झाला.
सदाशिवराव ह्या मुलास २९ ऑगस्ट १७३० रोजी जन्म दिल्यानंतर वर्षभराने म्हणजे २७ सप्टेंबर १७३० रोजी रखमाबाईनचे निधन झाले.चिमाजी अप्पांचा द्वितीय विवाह कोकणातील थत्ते घराण्यातील अन्नापुर्णाबाई यांचेबरोबर ९ डिसेंबर १७३१ रोजी झाला. ह्या विवाहातून सप्टेंबर १७४० मध्ये त्यांना बयाबाई म्हणून कन्या झाली.बयाबाईचा विवाह गंगाधर नाईक ओंकार यांजबरोबर मे १७४५ मध्ये झाला.बयाबाई एप्रिल १७५९ मध्ये मृत्यू पावली.
बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सत्तेच्या उत्तर हिंदुस्थान तसेच कोंकण प्रांतात्तील झंझावातात चिमाजी अप्पांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष भरपूर योगदान होते. ते स्वतः उत्कृष्ट तलवारबहद्दार होते. माळवा, भोपाल, गुजरात, कोकण, वसई, जंजिरा आदी ठिकाणच्या मराठ्यांच्या मोहिमात अप्पांनी मराठ्यांच्या शत्रूंना आपल्या तलवारीचे पाणी दाखविले.चिमाजी अप्पांचा सहभाग असलेल्या मोहिमांचा तपशील दिला तर लेखाची लांबी वाढण्याची भीती आहे.त्यामुळे पोस्टमध्ये त्यांचा तपशील देणे टाळले आहे. वसईची मोहीम फत्ते करून (सन १७३९) आल्यानंतर पुण्याला परतल्यावर अप्पांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली होती. तब्बेत इतकी बिघडली कि साताऱ्याला शाहू महाराजांना भेटण्यासाठी जाण्याचे त्राणही अंगात राहिले नाही. दिवसें दिवस प्रकृती बिघडत जाऊन १७ डिसेंबर १७४० रोजी त्यांचे पुणे मुक्कामी निधन झाले. चिमाजींचे शरीर आजन्म कष्ट सोसून झिजून गेले होते. बहुदा त्यांना क्षयाची बाधा झाली असावी.अप्पांच्या मृत्यू समयी कन्या बयाबाई केवळ तीन महिन्यांची होती तर सदाशिवराव दहा वर्षांचे होते.हि दोन्ही मुले लहान वयाची असूनही अन्नापुर्णाबाईनी सती जाण्याचा निश्चय केला होता. पेशवे घराण्यातील सती जाणाऱ्या त्या प्रथम महिला होत्या. पुण्यातील ओंकारेश्वर ह्या ठिकाणी अप्पांचा अग्निसंस्कार झाला आणि त्यावेळी अन्नापुर्णाबाईनी पण सहगमन केले.
गेल्या पिढीतील प्रख्यात इतिहास संशोधक,इतिहासकार गो.स.सरदेसाई यांनी चिमाजी अप्पांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन अत्यंत समर्पक शब्दात केले आहे.त्याचा काही भाग इथे देत आहे...’’ बाजीरावाच्या कीर्तीमुळे चिमाजी अप्पांचे नाव पुष्कळसे लोपून गेले आहे.योग्यतेच्या मानाने पहिले असता चिमाजी बाजीरावाहून कमी नव्हता. उलट, काही काही बाबतीत तर बाजीरावाहून जास्त होता. बाजीरावाच्या दोषांवर पांघरून घालून चिमाजीने मोठ्या प्रेमाने व आस्थेने त्याचा चांगला पाठपुरावा केला. आपलाच हेका चालविण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही.त्याचा स्वभाव विचारी,मनमिळाऊ व धोरणी होता. दुसर्याचे मन न दुखविता युक्तीने व निश्चयाने काम करून घेण्याची हातोटी त्यास होती.प्रत्यक्ष बाजीरावावरही त्याचा दाब असून या दाबामुळे राष्ट्राचे काम बरेचसे चांगले झाले.मस्तानीच्या बाबतीत चिमाजीच्या धाकामुळे बाजीराव बराचसा मर्यादेत राहिला. शाहू व सरदारही बाजीरावाकडे एखाद्या बाबतीत परभारे बोलणे न करता चिमाजीच्या तंत्राने कार्यभाग करून घेत. कुटुंबातील व बाहेरच्या मंडळींचे बरे वाईट व्यवहार चिमाजी परभारे उलगडीत असे; जरूर तेव्हाच बाजीरावास विचारी. बाजीरावाची मुले तर बहुदा चिमाजी जवळ असत.नानासाहेबास लहानपणचे शिक्षण चिमाजी कडून मिळाले. कित्येक स्वाऱ्यात तो चिमाजी बरोबर हजर असे. कुटुंबातील लग्नकार्ये, घरातील लढे, आप्त सोयऱ्यांचा परामर्श, तीर्थयात्रा, दानधर्म, इत्यादी घरगुती मामले चिमाजीच सोडवीत. शाहू महाराजांचे मन तर चिमाजीने विशेषतः नानासाहेबाने अंकित करून घेतले होते. चिमाजी व नानासाहेबाच्या आग्रहास्तव शाहू रघुनाथरावच्या मुंजीला तसेच सदाशिवरावच्या विवाहास पुण्याला आले होते. हि दोन्ही कार्ये फेबुवारी १७४० मध्ये बाजीरावांच्या गैर हजेरीत झाली होती. कित्येकदा बाजीरावाशी सरदारांचे खटके उडत, त्यांची समजूत चिमाजी करी.बाजीराव स्वारीत व राजकारणात मग्न असल्यामुळे फडावरचे व्यवहार चिमाजीच पाहत असे. हब्शावरील मोहीम बाजीरावाने अर्धवट टाकली ती चिमाजीने सिद्धी सातास ठार मारून यशस्वी केली. गिरीधर बहादूर व दयाबहादूर यास चीत करून माळवा प्रांत काबीज केला. गुजरातचे व्यवहार बहुतेक त्यानेच उलगडले. सन १७३७ मधली पोर्तुगीजांवरील मोहीम अर्धवट राहिली होती ती चिमाजीने सन १७३९ मध्ये पुरी केली.बाजीराव-चिमाजी सारखे पुरुष अल्पायुषी व्हावेत हे मराठेशाहीचे मोठे दुदैव होय...’’
#प्रकाश लोणकर.
संदर्भ १-:मराठी रियासत.खंड तीन आणि चार.लेखक गो.स.सरदेसाई
२-पेशवाई-ले.कौस्तुभ कस्तुरे
३- पेशवे-ले.श्रीराम साठे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...