"सहस्त्र पदाती सरदार वाघोजी तुपे"
.
कारीचे वतनदार कान्होजी जेधे यांचे कडे पिढीजात नोकरीला असलेले पिलाजी आणि रामजी तुपे यांनी जेधेंच्या वतनाच्या भावकीच्या युद्धात ( सोमजी व भिवजी यांच्या बरोबर) आणि बांदलां बरोबर झालेल्या खासारखिंडीच्या लढाईत अतुलनिय पराक्रम गाजवला. यांच्या नंतरची तुपेंची पिढी म्हणजेच वाघोजी तुपे.
वाघोजी पण परम पराक्रमी होते. माहुलीचा जो शहाजी राजे आणि आदिलशहा यांच्यात तह झाला त्या तहाच्या वेळी शहाजी राजां सह कर्नाटकात गेलेल्या जिवलग माणसां मधे वाघोजी तुपे पण होते. आणि शहाजी राजांच्या आज्ञेनुसार शिवरायांना मदत करायला परत मावळात आलेल्या स्वामिनिष्ठां मधे पण वाघोजी होते.
अफजलखान वधाच्या वेळी प्रतापगडावर झालेल्या रणसंग्रामात जेध्यांच्या वतीने वाघोजी तुपे यांनी घोर पराक्रम करुन आपली तलवार गाजवली. त्यावेळी त्यांच्या मर्दुमकीवर खुश होऊन शिवरायांनी जेध्यांकडुन दोन रत्ने मागुन घेतली, संभाजी कावजी कोंढाळकर आणि वाघोजी तुपे! ज्यावेळी वाघोजी स्वराज्य सेवेत दाखल झाले त्यावेळेस शिवरायांनी त्यांना १००० पायदळाची सरदारकी बहाल केली.
नंतरच्या ब-याचश्या युद्धात वाघोजींनी आपल्या तलवारीचं पाणि शत्रुसैन्याला पाजुन शिवरायांची निवड सार्थ ठरविली. परंतु वाघोजींच नाव गाजलं ते १६६२ च्या पेणच्या युद्धाच्या वेळी.
पेण ही त्याकाळातील सुप्रसिद्ध असे व्यापारी शहर होतं. आणि पेण येथे मोठी बाजारपेठ होती.
शाहिस्तेखान पुण्याला आला असताना नामदार ताहेरखान नावाचा सरदार मिऱ्या डोंगरावर आपली छावणी टाकून मुक्कामला होता. ताहेरखानाने पेणवर छापा घातला त्यात त्याने तेथील प्रसिद्ध असे शिवमंदिर उध्वस्त केले. शिवाजी महाराजांनी पेणवर छापा घालण्यापूर्वी २७ फेब्रुवारी१६६२ चे सुमारास मिऱ्या डोंगरावर छावणी टाकलेल्या खानास व रतनगडावरील बलाकी सरदारास वेढा घातला. कावजी कोंढाळकरांनी रतनगड जिंकून बलाकी सरदारास पळविले. बारा हजार घोडदळ व सातशे पायदळासह नेताजी पालकरांनी मिऱ्या डोंगराला वेढा दिला. त्याच वेळी वाघोजी तुपे यांची कुमक येताच नामदार खानाचा पराभव होऊन खान पळून गेला. दुस-याच दिवशी२८फेब्रुवारी १६६२ रोजी सकाळीच शिवाजी महाराजांचे हे सैन्य वाघोजी तुपेंच्या नेतृत्वाखाली पेणच्या गढीवर चालून गेले. पेणच्या गढीला वेढा पडला. (पेणच्या मामलेदार कचेरीची जागा हीच त्यावेळी पेणची जुनी गढी होती.) गढीच्या उत्तर बाजुकडील तटाच्या भिंतीला शिड्या लाऊन स्वराज्याचे सैन्य गढीच्या आत उतरले. गढीचा संरक्षक खानही त्वरित पुर्ण तयारीनिशी वाघोजी तुपें समोर तलवारीनिशी उभा राहिला. समबल असलेले दोन्ही वीर लढत होते. दोन्ही वीर जखमांनी बेजार झाले. शेवटी एका योग्य क्षणी वाघोजी तुपे यांनी खानावर जबरदस्त प्रहार करून त्यास यमसदनास पाठविले. या लढाईत वाघोजी तुपेंना २७ जखमा झाल्या. या युद्धात मरण पावलेल्या मराठा सरदारांच्या समाध्या आजही मामलेदार कचेरीच्या प्रांगणात दिसतात. यानंतर, पेण शेवटपर्यंत मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात राहिले.
तर अशा वीर पराक्रमी शिवरायांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सरदार वाघोजी तुपे आणि त्यांच्या सारख्या असंख्य अल्पपरिचीत आणि अपरिचित मावळ्यांना मानाचा मुजरा- जय शिवराय
लेख खलिल जी शेख
No comments:
Post a Comment