विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

मराठ्यांची इतिहासातील सेनापती धनाजी जाधव यांचे सन १७०३ व १७०६ मोगल-मराठा संघर्ष

 


मराठ्यांची इतिहासातील सेनापती धनाजी जाधव यांचे सन १७०३ व १७०६ मोगल-मराठा संघर्ष...🚩
मोगल-मराठा संघर्षात सतत विजेसारखा चमकणारा व ठिकठिकाणी मोगलांना पराभूत करणारा धनाजी जाधव हा मराठ्यांच्या बाजूचा एकमेव सेनानायक होय...!
छत्रपती शिवरायांपासून ते महाराणी ताराबाईसाहेब यांच्या काळापर्यंत धनाजीने मोगलांशी शेकडो लढाया दिल्या. औरंगजेब अगदी हताश अवस्थेत अहमदनगरला २० फेब्रुवारी १७०७ मध्ये मृत्यू पावला, तेव्हा मराठ्यांचे गेलेले सर्व किल्ले त्यांनी परत जिंकून घेतले. लोदीखानाचा पराभव करून पुणे-चाकण मुक्त केले. नर्मदेपासून कर्नाटकापर्यंतचा सर्व मुलूख काबीज करून मराठेशाहीची पुन्हा स्थापना केली. मोगल-मराठा संघर्ष औरंगजेबाच्या मृत्यूने संपला. मराठ्यांना हा शेवट फायदेशीर ठरला. या काळात मराठ्यांचे नेतृत्व धनाजी जाधवाने करून अंतिमतः मराठ्यांना विजय मिळवून दिला. मोगल सैन्य निमूटपणे उत्तरेची वाटचाल करू लागले. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वी झाले. याचे सर्व श्रेय धनाजी जाधव यांच्याकडे जाते..
पंचवीस वर्षे, जवळ जवळ पावशतक औरंगजेब मराठ्यांशी लढाया करीत होता. त्यात त्याला काय मिळाले या बाबत स्मिथ म्हणतो, “महाराष्ट्राने औरंगजेबाच्या देहावरच थडगे रचले नाही तर त्याच्या साम्राज्यावरही...”
◆ तर यदुनाथ सरकार म्हणतात..,
“महाराष्ट्राने केवळ औरंगजेबाचेच कार्य नव्हे, तर त्याच्या पूर्वजांचे कार्यही शून्यवत करून टाकले...” या पाठीमागे धनाजी जाधवांची तडफदार कामगिरी होती. तसेच धनाजी जाधव मराठ्यांच्या इतिहासातील एक मुरब्बी राजकारणी होता. मोगल-मराठा संघर्षात धनाजी जाधवांनी बादशहाशी लढताना कधीही शरणागतीचा विचार मनात येऊ न देता मोगलांवर धाडसी हल्ले केले. मोगलांच्या अफाट सैन्याशी धनाजीने शेकडो लढाया दिल्या. त्यातील बहुतेक लढाया मैदानात दिल्या. यावरून तो केवळ असामान्य सेनानीच नव्हता तो मुरब्बी राजकारणी होता हे स्पष्ट होते. सन १७०३ व १७०६ मध्ये बादशहाने धनाजी जाधवांशी कामबक्ष व जुल्फिकारखानाच्या पुढाकाराने तहाचा प्रस्ताव मांडला पण दोन्ही वेळा वेळकाढूपणाने बादशहास झुलवीत ठेवण्यात त्याने मोठी मुत्सद्देगिरी दाखविली आणि मोगलांचे अंकित होण्याचे नाकारून आपला वेगळाच ठसा मराठ्यांच्या इतिहासात उमटविला...
✍🏽 @sachinpokharkar_

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...