विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 February 2024

गजापुरची खिंड पावन करायला इतिहासाच्या पानात हरवलेले छत्रपती शिवरायांचे बालमित्र म्हणजे मराठा वीर संभाजी जाधव...

 


गजापुरची खिंड पावन करायला इतिहासाच्या पानात हरवलेले छत्रपती शिवरायांचे बालमित्र म्हणजे मराठा वीर संभाजी जाधव...🙏🚩
संभाजी जाधवांचे स्वराज्यासाठी बलिदान सन १६६० :
संभाजी ऊर्फ शंभुसिंग जाधव हा शिवरायांचा बालमित्र. या दोघांनाही जिजाऊंच्या देखरेखीखाली युध्दविषयक शिक्षण मिळत होते. जिजामातेचे संभाजी जाधवावर विशेष लक्ष व मर्जी होती, जिजाऊंच्या प्रेमळ छायेखाली तो वाढला. लखुजी राजे व शहाजी राजे यांच्या काळातील राजकीय उलाढाली, मुस्लिम सत्ताधीशांचे अन्याय, अत्याचार जिजाऊंने पाहिले होते. त्यांची ध्येय, धोरणे त्यांना माहीत होती. या दोन्ही बालकांच्या मनावर योग्य संस्कार होतील, योग्य ठसा उमटेल अशा तऱ्हेच्या पूर्वजांच्या शौर्याच्या व वैभवाच्या गोष्टी ती त्यांना सांगत होती. त्यांचा योग्य तोच परिणाम त्या बालमनावर झाला. मोठ्यात मोठे कोणतेही कार्य करण्यास त्यांच्या मनाची तयारी झाली होती. जिजाऊंनीं महत्त्वाकांक्षी असून स्वतः शूर होते. या सर्व गोष्टी शिवाजीराजे व संभाजी जाधवाच्या मनावर ठसल्या होत्या..
संभाजी जाधव शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत वेळोवेळी मदत करीत होते. त्यांनी शिवरायांसोबत अनेक मोहिमात भाग घेवुन पराक्रम गाजविले. अफजलखान वधात संभाजीची मदत शिवरायांना झाली होती. म्हणून तेव्हापासून जिजाऊंने शिवरायांच्या संरक्षणाची जबाबदारी संभाजी जाधवांवर सोपविली व ती त्याने तेवढ्याच एकनिष्ठपणे पार पाडली..
सन १६६० च्या सुमारास शिवराय पन्हाळगडावर वास्तव्य करून होते. त्यावेळी संभाजी जाधवही त्यांच्यासोबत होते. विजापूरचा सरदार सिद्दी जोहरने ज्यावेळी पन्हाळगडास वेढा दिला त्यावेळेस शिवरायांचे सर्व दळणवळण बंद पडल्याने शिवरायांनी सिद्दीशी तहाची बोलणी सुरू केली. त्यामुळे विजापूरचे सैन्य बेसावध राहिले. नेमक्या या परिस्थितीचा फायदा शिवरायांनी घेऊन एका मध्यरात्री संभाजी जाधव व निवडक मावळे टोळीनिशी अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन विशाळगडाकडे प्रयाण केले..
जेव्हा ही बातमी महंमद फाजल व सिद्दीचा मुलगा सिद्दी अजीज यांना समजली तेव्हा यांनी शिवरायांचा पाठलाग सुरू केला. शत्रुसैन्य आपला पाठलाग करीत असलेले पाहून शिवरायांनी बाजीप्रभु देशपांडे यांच्या मदतीस संभाजी जाधव व मावळे देऊन गजापूरच्या खिंडीत ठेवले व आदेश दिला की...,
“आपण किल्ल्यावर सुखरूप पोहोचल्याचा तोफांचा आवाज ऐकू येईपर्यंत शत्रुस पुढे न येऊ देता तेथेच अडवून धरावे..” या प्रमाणे त्या खिंडीत ते दोघेही आपल्या सहकारी मावळंयासह शत्रुशी संघर्ष देण्याच्या पवित्र्यात उभे राहिले. तर तिकडे शिवरायांची घोडदौड विशाळगडाच्या दिशेने सुरू झाली. तितक्यात पाठलाग करणारा शत्रु खिंडीजवळ येऊन भिडला. वीर बाजीप्रभु व संभाजी जाधवांनी मावळ्यांच्या साहाय्याने शत्रुशी संघर्ष सुरू केला. शत्रुसैन्यात फाजलखानाच्या ताज्या दमाचे सैन्य येऊन मिळाले. झालेल्या संघर्षात वीर बाजीप्रभु व संभाजी जाधव दोघेही जखमी होऊन पडले. काही वेळाने शिवराय किल्ल्यावर सुखरूप पोहोचल्याच्या तोफांचा आवाज ऐकून त्यांनी समाधानाने प्राण सोडला..
● या घटनेबाबत इतिहासकार वा.सी.बेंद्रेनी आपले मत पुढील प्रमाणे मांडलेले दिसते :
“वीर बाजीप्रभु देशपांडे सरनौबत व लोक साहेब कामावर खर्च झाले. (अफझलखानाचा लेख) फाजलखान सर्जाखान कुलसरदार येऊन खिंडीसानिध येऊन भांडो लागले. २० हजार मावळे व बाजीप्रभु यांनी बहुत युध्द केले. प्रहर दीड प्रहर पावेतो फौज खिंड चढो दिधली नाही. तो राजे गडावर जाऊन तोफ मोठी सोडून आवाज दोन तीन करीता बाजीप्रभु म्हणो लागले जे याउपर जीव गेला तर काही धोका नाही. याउपर फौजेचे प्यादे कानडे मागुन आले. त्यांनी मोड केला. मावळे खिंडीतून मारून काढीले पळू लागले. ते समयी भांडण बहुत जाले. बाजीप्रभुस जखमा जोरावर लागल्या त्या स्थली पडिले. सरनौबत व लोक साहेब कामावरी खर्च झाले त्या संघर्षात बाजीप्रभु सोबत संभाजी जाधवही होता. परंतु २० हजार मावळ्यांचा विजापुरी सैन्यासमोर निभाव लागला नाही. मराठ्यांचा पराभव झाला. बाजीप्रभु व संभाजी जाधव आणि असंख्य मावळे या गजापूर खिंडीत हुतात्मे बनले. पण त्यांनी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांचे प्राणपणाने संरक्षण केले..
हीच ती प्रखर स्वामीनिष्ठा संभाजी जाधव व त्यांचे वडील संताजी जाधव यांनी मराठ्यांच्या स्वराज्य स्थापन्यात आपले प्राण पणास लावून क्षात्रतेज सिद्ध करून दाखविले. याच संभाजी जाधवांचा मुलगा धनाजी ऊर्फ धनसिंग जाधवराव यावेळी १०/१२ वर्षाचा होता. जाधवांचे कुटुंब आता स्वतंत्रपणे राहू लागले होते. शिवरायांनी बाल धनाजी जाधवास युध्द कलेत तरबेज करण्याकरिता मराठ्यांचा सेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्वाधीन केले. तेथेच तो लहानाचा जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्यांच्या अनुभवात व युध्दकलेतही मोलाची भर पडत गेली..
――――――――――――
🎨 Ram Deshmukh 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...