विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

हिंदवी स्वराज्याचे एकनिष्ठ सप्तसहस्त्री सरदार श्री.गणोजी बाबा जाधव (परिंचेकर)

 

हिंदवी स्वराज्याचे एकनिष्ठ सप्तसहस्त्री सरदार
श्री.गणोजी बाबा जाधव (परिंचेकर)

( १२ ऑक्टोबर १७०७ )
*"

सप्तसहस्त्री गणोजी जाधव परिंचेकर"*
आज अश्विन कृ।। तृतिया अर्थांत "सप्तसहस्त्री" परिंचेकर गणोजी बाबा जाधव यांची ३१६ वी पुण्यतिथी !
इतिहासात स्वराज्याचे अग्निकुंड तेवत ठेवण्यासाठी अनेक पराक्रमी घराण्यांनी आपला पराक्रम गाजवल्याचे दिसून येते. ते आपण अभ्यासले देखिल आहे. त्यापैकीच एक म्हणजे परिंचेकर जाधव घराणे होय! परिंचेकर जाधव हे केवढे थोर ! हे त्यांचे पराक्रमी कर्तुत्व इतिहासातुन आजही आपणस दिसून येते.
मराठ्यांच्या इतिहासात सर्वात संघर्षाचा कालखंड म्हणून ज्या काळाची नोंद होते, तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचा कालखंड होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत स्वराज्यनिष्ठेसाठी पराक्रम करून परिंचे गावाचे नावलौकिक करणारे थोर महापुरुष म्हणजे "सप्तसहस्त्री गणोजी बाबा" होय. विशेष करून या संघर्षाच्या काळात इस्लामी फौजांशी झुंजत राहून स्वराज्य सेवा एकनिष्ठपणे करणारे परिंचेकर सप्तसहस्त्री गणोजी बावा व त्यांचे पुतणे जनाजी जाधव होय. गणोजी बावांचे राष्ट्रप्रेम व धर्मप्रेम हे अलौकिक असे होते. गणोजी बाबा हाडाचे लढवय्ये असल्याने त्यांनी अनेख लष्करस्वाऱ्या केल्या असाव्या यात शंका नाही. मात्र जिंजीचा आठ वर्षाचा रणसंग्राम हा विशेष पराक्रम त्यांचा ठरतो. या जिंजीच्या संग्रामातूनच गाणोजींची झुंजार वृत्ती लक्षात येते. जिंजीच्या लढ्याचा आठ वर्षाचा काळ हे एक प्रकारचे धाडसच होते. हे धाडस गणोजी रावांनी यशस्वीपणे पूर्ण केले होते.
सेनापती संताजी घोरपडे व सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांची फौज ज्या मोगली प्रदेशावर जात त्या भागावर गणोजी बावा व जनाजीराव तुटून पडत. या चुलत्या पुतण्याच्या कामगिरीचे वर्तमान ऐकून राजाराम महाराजांनी यांचा बहुमान केला. संताजी घोरपडे यांच्या सांगण्यावरून परिंचेकर गणोजी जाधव यांना इ. सन. १७ फेब्रुवारी १६९३ रोजीच्या आसपास त्यांच्या स्वामीनिष्ठेचे फलित म्हणून "सप्तसहस्त्री" हा किताब दिला. ही गोष्ट सामान्य नाही झाली. तसेच सातारा प्रांतातील मौजे कुसवडे हे गाव इ. सन. १७ फेब्रुवारी १६९३ रोजी इनाम करून दिले. तसेच गणोजीबावा यांचे पुतणे जनाजी जाधव यांनाही यांच्या पराक्रमाबाबत मौजे चिंचनेर, प्रांत तारगाव हा गाव इनाम करुन दिला.
महाराष्ट्रातून मरहट्टे कर्नाटक प्रांतात जाऊन कडव्या मोगली सेनेशी लढून गनिमांना जेरीस आणून व त्यातून सुखरुप आपला व आपल्या राजाचा बचाव करून मायदेशी परतणे ही गोष्ट सामान्य नाही. समरांगणात मोगली फौजांना हटकून कबज्यात आणणे ही कसब गणोजीरावांच्यात प्रकट झालेली होती.
पुढे सन १७०० रोजी राजाराम महाराजांच्या मृत्यूमुळे मराठी राज्याची जणू खिळच निघाली, अशी अवस्था सगळीकडे निर्माण झाली. त्यात औरंगजेबाने किल्ले जिंकण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे हे हिंदवीराज्य राखण्यासाठी राजाराम महाराजांची पत्नी ताराराणीसाहेब यांनी आपला मुलगा दुसरे शिवाजीराजे यांना गादीवर बसवले. हे शिवाजीराजे लहान असल्याने राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी विशाळगडावर राहून तिथून आपला राज्यकारभार चालू केला. त्यावेळी त्यांच्याकडील रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, परशुरामपंत प्रतिनिधी, शंकराजी नारायण सचिव हे मुत्सदी औरंगजेबास तोंड देत होते. या धामधुमीच्या काळातही गणोजी बावांनी धनाजी जाधवांच्या सोबत राहून आपला पराक्रम यथोच्य गाजवला. म्हणून ताराराणी साहेबांनीही गणोजी बावांचा बहुमान करून त्यांना परिंचे गाव इनाम करून दिला. त्या संदर्भात शंकराजी नारायण पंतसचिवांचे ई. सन. बुधवार १३ नोव्हेंबर १७०० रोजीच्या पत्रावरुन लक्षात येते.
पुढेही छत्रपती थोरले शाहु महाराज मोगल्यांच्या कैदेतुन सुटुन आल्यावर गणोजी बाबांनी महाराजांच्या प्रति आपली असलेली स्वामिनिष्ठा दाखवली.
अखेर १२ ऑक्टोंबर १७०७ च्या सुमारास भिमानदीच्या तीरी खेड येथे एका लढाईत गणोजी जाधव यांची निकराईची झुंज झाली. अखेर गणोजी बावा लढता लढता आपले येथोच्छ कर्तव्य बाजाबत असताना धारातीर्थी पडून त्यांचा त्यात मृत्यू झाला. एक धगधगती ज्वलंत आग तप्त ज्वालामुखी अखेर या लढाईत विझला गेला. मात्र या लढाईत शाहू महाराजांना विजय मिळाला.
स्वराज्याच्या कार्यासाठी गणोजी बाबांनी त्यांच्या आयुष्यात मिळवलेले यश हे अभूतपूर्व होते. त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांच्यात असलेली अंगभूत गुणांची, मुत्सदेगिरीची, सप्तसहस्त्री नेतृत्वाची, धीरगंभीर स्वभावाची, धाडसाची, पराक्रमाची व स्वामीनिष्ठेची जी ओळख परिंचे गावाला आज घडली त्याला तुलनाच नाही. सप्तसहस्त्री गणोजी जाधव या व्यक्तिमहत्वाचा अभिमान गावाला नेहमीच वाटल राहील. अद्भूत यशाचे ते धनी झाले यात तीळमात्र शंका नाही. अशा या पराक्रमी योद्ध्यास कोटी कोटी प्रणाम.
🙏🏼💐🙏🏼
साभार : राम वाघोले .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...