संयुक्त राष्ट्र संघ या जागतिक संघटनेकडून दिनांक १३ ऑक्टोबर सन १९८९ सालापासून १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण दिन म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस जाहीर होण्याच्या ३१७ वर्षांपूर्वी म्हणजेच सन १६७२ सालीच ही गरज छत्रपती शिवाजी माहाराजांनी जाणली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन योजना छत्रपती शिवाजी माहाराजांनी आखली. नुसती योजना आखून माहाराज शांत बसले नाहीत. तर आपत्ती व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणीही यशस्वीपणे केली.
राज्याभिषेकापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या अनुभवी राजाप्रमाणे दूरदृष्टिने स्वराज्याबाबत निर्णय घेत होते ते खालील उदाहरणांवरून स्पष्ट होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची आपत्ती व्यवस्थापनची आर्थिक तरतूद व त्या बद्दल स्पष्ट नियम -
दुष्काळ पडला अथवा शत्रुचा हल्ला झाल्यास तजवीज असावी म्हणून सर्व किल्यांवर धान्यांचा भरपूर साठा करून ठेवणे.
शत्रुने किल्यास वेढा दिला आणि जर खर्चास पैसे उपलब्ध नसतील तर काय करावे लागेल याचा विचार शिवाजी महाराजांनी सन १६७२ च्या सुमारास करून ठेवला होता. त्यासाठी रायगडावरील खर्च पन्नास हजार होन व इतर गडकोटकिल्ले यांसाठी एक लाख पंचवीस हजार होनांची तरतूद करण्यात आली होती. हा निधी कोणत्या महालातून , कोणाकडून जमा करायचा याचीही यादी दिली आहे.
ती यादी पुढील प्रमाणे -
१. कुडाळ - २०,००० होन
२. राजापूर - २०,००० होन
३. कोलन - २०,००० होन
४. दाभोळ - १५,००० होन
५. पुणे - १३,००० होन
६. नागोजी (गोविंद) - १०,००० होन
७. जावळी - ५००० होन
८. भिवंडी - ५००० होन
९. कल्याण - ५००० होन
१०. इंदापूर - ५००० होन
११. कृष्णाजी भास्कर - ५००० होन
१२. सुपे - २००० होन
मात्र या धनाचा उपयोग इतर कोणत्याही बाबी साठी करण्यात येऊ नये असेही स्पष्ट बजावले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी कुटुंबातील व्यक्तींसाठी मोठा खर्च करून राजवाडे, हवेल्या, संगमरवरी महाल, समाध्या बांधलेल्या आढळत नाहीत. बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर खर्च जरूर केला गेला परंतु तो गड, कोट, किल्यांच्या! गड, कोट सुरक्षित तर स्वराज्य सुरक्षित!
महत्वाच्या किल्यांच्या डागडुजी करीता एक लाख पंच्याहत्तर होनांची तरतूद करून ठेवली. कोणत्या किल्यावर किती खर्च करायचा ते ही निश्चित केले.
ती यादी पुढील प्रमाणे -
१. सिंहगड - १०,००० होन
२. सिंधुदुर्ग - १०,००० होन
३. पुरंदर - १०,००० होन
४. विजयदुर्ग- १०,००० होन
५. सुवर्णदुर्ग - १०,००० होन
६. राजगड - १०,००० होन
७. प्रतापगड - १०,००० होन
८. मनरंजनगड - १००० होन
९. सारसगड - २००० होन
१०. लोहगड - ५००० होन
११. महिपतगड - ५००० होन
१२. प्रसिद्धगड - ५००० होन
१३. प्रचंडगड - ५००० होन
१४. सुधागड - ५००० होन
१५. विशाळगड - ५००० होन
१६. साबलगड - ५००० होन
१७. कोरीगड - ३००० होन
१८. महिधरगड - २००० होन
इतर किरकोळ दुरूस्त्यांकरीता ७००० होन असे एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार.
ही सर्व छत्रपती शिवाजी माहाराजांची आपत्ती व्यवस्थापनाची गुंतवणूक होती.
हे झाले एक उदाहरण. दुसरे उदाहरण म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते करून ताब्यात घेतलेला जिंजीचा किल्ला. जिंजीच्या किल्यामुळे स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांना भरपूर वेळ उपलब्ध झाला. स्वराज्य आणि राजा दोन्हीही सुरक्षित राहिले. अशी एक नादोन अनेक उदाहरणे आहेत आपल्याकडे इतिहासात..
आपण आज काय करतो? का नाही करत एवढा दिर्घ दूरदृष्टीचा, आपत्तीचा विचार? निश्चितच करायला हवा.. कोणतेही महान कार्य सिद्धीस न्यायचे असल्यास त्यासाठी फार मोठी पुर्वतयारी करावी लागते. ती कशी करायची याचा विचार करावा लागतो. काल, आज आणि केवळ उद्याचा नाही तर पुढील हजार वर्षांचा विचार करून योजना आखायला हव्यात. माहाराजांनी हा विचार केला होता.. एक एक किल्ला एक वर्ष लढवीला तरी मोगलांशी ३५० वर्ष लढता येईल इतका विचार त्यांनी केला होता. म्हणून घडविला त्यांनी इतिहास!
मी काय करू शकणार? पेक्षा मी काय करू शकतो असा विचार करायला हवा..
नक्कीच जमेल... नक्कीच घडेल इतिहास !
No comments:
Post a Comment