विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 2 March 2024

#लखमु_शिंदे #स्वराज्याच्या_अग्निकुंडातील_एक_अज्ञात_समिधा

 




#लखमु_शिंदे
काळ १६९०-९१,अतिशय धामधुमी चा काळ. कोणाचाच पायपोस कोणाला न्हवता.काही इमानी रक्त सोडले तर बरेच जण आज स्वराज्यात तर उद्या मोघलाइत आपापली घोडी नाचवत होती.
तरीही अशांची पर्वा न करता छत्रपती राजाराम महाराजांनी सर्व कौशल्य पणाला लावून स्वतः स्वराज्याचा रथ हाकण्यास सुरवात केली होती.
त्यांचे धोरणी मनसुबे पाहून बरेच जुने जाणते आसामी पुन्हा एकत्र येत होते.नवे डाव आखत होते.गेलेले गड कोट पुन्हा हस्तगत करत होते.राजगड प्रतापगड सारखे बेलाग दुर्ग पुन्हा स्वराज्यात आणण्यात यश आले होते.
परंतू औरंगजेब ही शांत बसला न्हवता.छत्रपती राजाराम महाराज जिंजी ला गेल्याने त्याने ही आता त्याची छावणी सोलापूरस टाकली होती.त्याचे सगळे मनसुबे गळाले होते.संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर मराठे शरण येथील असा औरंगजेबाचा कयास होता.परंतू मराठे आग्या-म्होळं उठावा तसे चवताळून सबधं दक्षिणेत पसरले पाक तुंगभद्रा-कावेरी पासून तापी नर्मदे पर्यंत.
वाट्टेल ती शक्कल लावून मराठ्यांनी मोघलांना त्रस्त करून सोडले होते.मराठे शक्यतो सरळ भिडतच नसत कधी गाढ झोपलेल्या छावणीवर रात्री छापा घालत. उत्तरेतून येणारा खजिना लुटत तर कधी व्यापारी तांड्यावर किंवा रसद घेऊन येणाऱ्या मुघल तुकडीस लक्ष करीत त्यामुळे रसदे बरोबर इतर महत्वाचे मुलकी अधिकारी, देशो देशी चे वकील ही अडकून पडत असे. त्यामुळे औरंगजेब चिडत असे.कारण विविध प्रदेशातून येनारे अधिकारी अडकले की बादशहाचा छावणीतून चालणारा काबुल पासून ढाका पर्यंत व कश्मीर पासून कावेरी पर्यंत च्या सम्पूर्ण मुघल सल्तनतीचा कारभार ठप्प पडत असे.
आणि आता ह्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली होती.कारण औरंगाबाद पासून मोघल छावणी पर्यंतचा राजमार्ग आता मराठ्यांनी लक्ष केला होता.मराठे ह्या प्रदेशात वारंवार उपद्रव देत होते. लखमु शिंदे व त्याचे तीन हजार घोडदळाची सेना इतर काही मराठा पथकांना घेऊन ह्या प्रदेशात सतत मोघली सैन्यावर छापेमरी करत असे.
असाच गोंधळ मराठ्यांनी औरंगाबाद च्या सुभ्यात पुन्हा घातला होता.औरंगाबाद पासून सोलापूर येथील मुघल छावणीत येणारी वाट मराठ्यांनी अडऊन ठेवली होती.बृहानपूर नंतर औरंगाबाद हे मुघलांचे महत्वाचे ठाणे. त्यामुळे त्यांची वाहतूक ही ह्याच मार्गावरून पुढे जात असे.संपुर्ण राजमार्ग ठप्प झाला होता.एवढेच काय नुकतेच उत्तरेतील जाठांचे बंड मोडून दक्षिणेत आलेला खुद्द शेहजादा बेदरबखत्त् (बादशहाचा नातू) ह्याला ही पुढे सरकता येत न्हवते.त्यामुळे मोघलांची मोठी नामुषक्की होऊ लागली.अनेक व्यापारी,रसद,देशी विदेशी वकील ही औरंगाबाद ला खोळंम्बुन राहिले होते. त्यात तुर्रानी वकीलाचा ही समावेश होता.हिथे शहजादा पुढे सरकत न्हवता तर इतर वकील व व्यापारी तांड्यांची मराठयांना अंगावर घ्यायची काय बिशाद.
शहजाद्याच्या तळा बरोबर आपण ही पुढे निघून जावे ह्या प्रयत्नात सगळे होते.परंतू शेहजादा काही पुढे पाऊल टाकण्यास तयार होईना.शेवटी बादशाहने त्याच्या खास मर्जीतील राव दलपत बुंदेला (दतीया नरेश) ह्यास नादान शेहजादा ला छावणीत घेऊन येण्याचा आदेश दिला.पण शेहजादा आपल्या बरोबर इतर कोणतेही लटांबर सोबत घेण्यास तयार होत न्हवता. हा सगळा गोतावळा संगत न्हेऊन मराठ्यांना आयते कोलीत देण्यास तो तयार होईना.
शेवटी इतर सर्वांस मागे ठेऊन राव दलपत आधी शेहजादा बेदरबखत व नंतर दुसऱ्या फेरीस तुर्रानी वकीलास औरंगजेबा पाशी मुघल छावणीत सोडून परत औरंगाबादला आला.
आदि च्या दोन फेर्यातच त्याची बरीच दमछाक झाली होती.मार्गात भूम (उस्मानाबाद) येथे मुक्कामास असताना मराठ्यांनी माणेगाव मध्ये घातलेल्या धुमकुळाच्या वार्तेने त्यास तिकडे जावे लागले.
परंतू राव दलपत ची सैन्य तुकडी येताच आपला कार्यभाग साधून व हलकीशी झुंज देऊन मराठे तेथून पसार झाले.व शेवटी मराठ्यांच्या भक्ष्य स्थानी पडलेल्या विस्कळीत आशा माणेगाव ची व्यवस्था लावून राव दलपत बुंदेला पुन्हा भूम ला आला व पुढे सोलापूर ला निघून गेला.परंतू पुढे मार्गात तुळजापूरला पुन्हा मराठे व राव दलपत मध्ये पुन्हा हातघाईची लढाई झाली.एन वख्ताला सरदार मामुरखान मदतीस आल्याने मराठ्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.
पुढें मार्गात राव दलपत ह्यास मराठ्यांनी जागोजागी असेच छळले होते.शेहजाद्याला मुघल छावणीकडे न्हेताना शेवटी त्याची अठराशे सैन्याची तुकडी कोण कोणाला तोंड देणार. कारण इकडे जवळ जवळ बारा हजार मराठी सैन्य औरंगाबाद सोलापूर राजमार्गावर दबा धरून बसल्याचा बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या.त्यात लखमु शिंदे व त्याचे भाई बंद चे नाव मुघल खबरबाज सातत्याने बादशाही छावणी पर्यंत पोहचवत होते.
नाईलाज होऊन बादशहाने शेवटी त्याच्या मदतीस
बहरामंद बक्षी,रस्तुंमखांन दख्खनी, बहादूरखान पण्णी, सययद अब्दुल्ला खान बाहरा इत्यादी मतबरांना फौजबंद होऊन राजमार्गा वरील लखमु शिंदेच्या नेतृत्वातील मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धाडले.हीच वेळ साधून राव दलपत बुंदेलाने तब्बल दोन वेळा खजिना औरंगाबाद हुन सोलापूर च्या छावणी कडे न्हेला. परंतू मराठे कायम मार्गातील खजिना व रसदेचा पिच्छा पुरवत.अनेक ठिकाणी त्याला मराठ्यांचा तिखट मारा ही सहन करावा लागला होता.
ह्या वेळेस ही औरंगाबाद हुन सोलापूर च्या मुघल छावणी कडे व्यापारी तांड्यास राव दलपत बुंदेला घेऊन जात असताना देवराई गाव जवळ पुन्हा लखमु शिंदे राव दलपतास आडवा आला.ह्या म्हराठा सरदाराने बघता बघता मुघलांवरती झडप घातली.अचानक आलेल्या ह्या वावटळीने मुघल गांगरून गेले.कारण मराठ्यांच्या ह्या भूतखान्याने आजवर मुघलांच्या कैक चांद राती खराब केल्या होत्या.पण आडमार्गावर गाठणारे मराठे शक्यतो दिवसा ढवळ्या मुक्कामास पडलेल्या छावणी कडे सहसा वळत नसत.
परंतू ह्या वेळेस एक वेगळ्याच प्रसंगाला तोंड देण्याची पाळी मोगलांवर आली होती. हर हर महादेव च्या ललकरिस ताल धरून आकाशात उठणाऱ्या मातीच्या लोळा पलीकडील प्रचंड भगवे निशान पाहून जणू आकाशातील आफताब च आपल्यावर रुष्ठ होऊन त्याची किरणे ह्या भिक्कार मराठ्यांच्या निशाणा च्या काठीवर पाडत असल्याचा भास त्यांना होत होता.परंतू त्यांस आता लढण्या शिवाय पर्याय न्हवता.कारणं पळून जावे तर मराठे लंगडतोड करण्यास मुघलांना सवाई होते. ह्याच मराठ्यांमुळे बादशाही छावणी सोडून असे रानोमाळ दिवस रात्र डोळयात तेल घालून भटकावे लागत असल्याने राव दलपत ही आज इरेला पेटला होता.परंतू लखमु शिंदेच्या व त्याच्या सैन्याचा त्वेष च इतका भयंकर होता की बंदुका व तोफा सह सुसज्ज असलेली राव दलपत च्या नेतृत्वातील मुघली सैन्याचे घेरबंदी चे डाव कुचकामी ठरत होते.आता रुस्तमखान व इतर नामजात सरदारांन प्रमाणे आपण ही कैद होतो की काय ह्या भीतीने राव दलपत गंगारून गेला.
प्रहर भर झालेल्या तुंबळ हाणामारी नंतर हवे ते सामान व इतर लूट मिळवत आता मराठे शेवटचा घाव घालून मोगलांचा फडशा पडण्याच्या तयारीत असतानाच देवराई च्या मैदानावर अचानक पणे एक अनामिक प्रकार घडू लागला.माघे नजर राखण्यास ठेवलेले स्वार इशारतीचे आवाज करत मुख्य सैन्याकडे दौड करू लागले.व संपूर्ण पथक सावध करून निघण्याची घाई करू लागले.
हा नक्की काय प्रकार आहे म्हणून लखमु शिंदे व त्यांचे इतर साथीदार सावध कानोसा घेण्याचा प्रयत्न करत असताना अचानक मागाहून गलका सुरू झाला.प्रचंड जमाव नंग्या तलवारी घेऊन चालून येताना दिसू लागला.आघाडीचा हिरवा बावटा पाहून लखमु शिंदे जे काही समजायचे ते समजून गेले.हा सैतानी थवा जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा दीन दीन चा आवाज ही स्पष्ट पणे ऐकू येत होता.सरदार मामुरखान ह्या सैन्याचे नेतृत्व करत होता.पण मराठे निर्भीड होते.असे कैक रानटी थवे मराठ्यांनी निव्वळ गोफणीच्या दगडांनी हुल देऊन पळऊन लावले होते.परंतू राव दलपत ची तोफा व बंदुकांसह सुसज्ज सेना त्यात हा नव्या दमाचा मामुरखानाचा कडवट मोघली थवा आपल्यास जड जाईल ह्याचा अंदाज घेऊन मिळालेल्या लुटी सह जमेल तेवढे नुकसान करून लखमु शिंदेंनी रणातून काढता पाय घेण्यासाठी सगळ्यांना इशरत केली.
तसे एक एक पथक हुल देऊन देवराई च्या माळराणातून लांब निघू लागले.मोघल पाठलाग करणार ह्या अंदेशाने लखमु शिंद्यांचे बंधू व इतर काही प्रमुख इसम सर्वांच्या मागाहून प्रतिकार करत करत निघाले.मूळ सैन्य पुढे निघून गेल्याने मोघलांचा ही काहीसा हिरमोड झाला. परंतू झालेल्या नुकसानीचे भरपाई करण्यासाठी मराठे घोडस्वरांच्या मागे तंगडतोड करण्यासाठी त्यांना आता जावेच लागणार होते.
लखमु शिंदेंचे बंधू ही त्यांनाच जमेल तेवढे थोपवून पसार होण्याच्या बेतात होते.मागे राहिलेल्या मराठा तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या इसमा भोवती इतर खाशा शिलेदारांचा गराडा पाहून लखमु शिंदेंचे भाऊच नेतृत्व करत असल्याचे मोघलांनीही पक्के हेरले होते.त्यामुळे इतरत्र रानावनात पसार झालेल्या मराठ्यांच्या मागे न जाता सर्वांनी एकत्र पणे ह्याच तुकडी ला घेरले.
लखमु शिंदें च्या बंधू भोवती फास अवळल्याचे पाहून काही इतर तुकडया ज्यांचे नेतृत्व शिंद्यांचेच नातलग करत होते ते ही परत फिरले.परंतू आता परिस्थिती पूर्ण पणे वेगळी होती.सुरवातीच्या हल्ल्या वेळेस विश्रांतीच्या अवस्थेतील राव दलपत ची सेना आता बंदुकाचे चाफ ओढून एक एक बारगीर घोड्या वरून खाली पाडत होती. ते पाहून लखमु शिंदेंनी ही नाइलाजाने पुन्हा देवराई कडे मोर्चा वळवला.
परंतू मूळ तीन हजार स्वार पैकी अर्ध्याहून जास्त सैन्य बरेच पुढे निघून गेले होते व आता राव दलपत च्या अठराशे सैनिकांबरोबर मामुर खानाचे ही सैन्य बळ होते.
गराड्यात अडकलेल्या आपल्या बंधू व इतर सरदारांसाठी
हा संख्येने जास्त व हत्यारांशी सुसज्ज असा मोघली थवा आता त्यांनी अंगावर घेतला होता.मोजक्याच तुकड्या मोघली वेड्यात घुसल्याने एक एक मराठा घोडेस्वारास आता ३-४ हशमांनी घेरले होते.
काही केल्याने लखमुंना त्यांच्या भावा पर्यंत पोहचता येत न्हवते.तिकडे मोघलांनी मात्र डाव साधला होता.गेल्या कित्येक दिवसांचा पाठशिवणीच्या खेळाचा,उघड्या माळावरील दमछाकीचा राग त्यांनी शिंदयांच्या माणसांवर पुरेपूर काढला होता.मोगली गराड्यात अडकलेली शिंद्यांची माणसे ही प्रतिकारास आता कमी पडू लागली होती.अंगावर झालेल्या तलवारीच्या वाराने डोळ्यातील नजर धुंदळी झाली होती.शेवटी त्यांच्या हातातील खडग जे निसटले ते कायमचेच.मोगलांनी एक एक शिंदे पुरुषास पकडून ठार केले.अनेक खासे सरदार, लखमु शिंदेंचे बंधू ही ह्या मोघली चिखलात रुतून गतप्राण झाले.
आता पाळी लखमुंची होती.मोजक्या सैन्यासह मोघली पाशात हाती समशेर घेऊन स्वार असलेल्या लखमुंवर आता मोघल गोळा होऊ लागले होते.शेवटी हशमांचा गराडा पडल्याने लखमु शिंदे ही जखमी अवस्थेत मोघलांच्या हाती लागले.राव दलपत ने ही क्षना चा ही विलंब न लावता त्यांस कैद केले.
तिकडे पुढे गेलेल्या तुकड्या ही धन्याच्या मदतीस मागे फिरल्या होत्या. परंतू नेतृत्व अभावी एकसूत्रता नसल्याने त्यांना एकसंध पणे एकदम वेगवान झडप घालण्यास जमले नाही. ज्याला लढाई बिघडल्याची बातमी कळली तसा तो माघे फिरला व स्वतः च्या तुकडी सह मोघलांवर चालून गेला. संख्येने जास्त असलेल्या मोघलांनी ही जसे एखादया सशावर शिकारी कुत्रे तुटून पडतात.तसा घोडदळाच्या एक एक तुकडीचा पडशा पडला.
एवढया दिवसांपासून कसून सराव केलेली,वेगवान लढाईचा अनुभव असलेली.तोफा व बंदुकांसह सुसज्ज सेनेला अंगावर घेण्याची सवय असलेली ही तीन हजार मराठी अश्वसेना अवघ्या प्रहर भरात कायमची उधळली गेली होती. ह्या धुमचक्रीत शिंद्यांची बरेच माणसे (अर्ध्याहून जास्त) कापली गेली.त्यात प्रमुख सरदारां सह लखमुंचे भाऊ ही होते.
रण शांत झाल्यावर देवराई च्या माळ रानावर पडलेल्या प्रेतांनाही मोगलांनी सोडले नाही. त्यांचे तसेच तिथे ढिगारे रचण्यात आले.
ह्या राजमार्गावर मराठ्यांनी इतका उच्छाद मांडला होता की ह्या सेनेच्या नाईनाटाची बातमी बादशाह पर्यंत पोहचताच औरंगजेब बादशाहने राव दलपत बुंदेला ची मनसब तब्बल ५०० ने वाढवली.ह्या वरूनच लखमु शिंदेंच्या घोडेस्वार पथकाने राजमार्गावर घातलेल्या विविध झडपेतून केलेल्या पराक्रमाची कल्पना येते.
पुढे कैदेत पडलेल्या लखमुंची काय झाले हे मात्र अजून तरी उजेडात आले नाही. परंतू मोगलांचा कैद्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीच्या इतिहास वरून तरी आपन त्याचा अंदाज घेऊ शकतो.
कैद झालेले लखमु शिंदे न बद्दल इतिहास आज पूर्णपणे मौन बाळगून आहे.मराठ्यांच्या इतर कुठल्याही कागत पत्रात किंवा ऐतिहासिक ग्रंथात अजून तरीही ह्या विराचा व त्याने वर्षभर केलेल्या वीरश्री चा उल्लेख आलेला नाही. एक भीमसेन सक्सेना सोडल्यास इतर दरबारी (मोघली) इतिहास कारांनी ही ह्या लढाईची नोंद केलेली नाही.
इतिहासाच्या पानांनी ह्या घोडदळाच्या सेनानायकाची पर्शवभूमी, त्याचे कुळ, त्याचा वंश,वतन व त्याच बरोबर ह्या विराचे व त्याच्या पथकाची नोंद घेण्यात अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
परंतू तरीही त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कुचराई केली नाही.स्वामींनी जिंजीहून दिलेले कार्य अमात्य पंत व पंत सचिवांच्या आशीर्वादाने,सेनापतींच्या सावलीत राहून शेवट पर्यंत चोख बजावले त्यात कसूर केला नाही. शेवटी जय पराजय हा नियतीच्या अख्यारितील विषय.
शिवछत्रपतींनी स्वराज्याचा दिलेला मंत्र कायम उराशी बाळगुण ते झुंजले,कैक वेळेस जिंकले,शेवटी पराभूत झाले परंतु थांबले नाही.कारण ध्यास एकच स्वराज्य रक्षिणे.
औरंगजेब दक्षिणेत उतरल्या नंतर त्याला थोपवून धरताना लखमु शिंदे व ह्या मातीतील अशा असंख्य ओजस्वी मावळ्यांचे बलिदान आज इतिहासाच्या पानातून गहाळ झाले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी बलिदाना नंतर जवळ जवळ दीड तपा हुन जास्त काळ तेवत राहिलेल्या ह्या स्वराज्याच्या अग्निकुंडात लखमु शिंदे,त्यांचे बंधू, साथीदार व त्यांस प्रमाणे असंख्य ज्ञात अज्ञात यज्ञ समिधास शत शत नमन.
ह्या आशा स्वराज्याच्या शिलेदारांचे स्मरण करून देण्यासाठी व सनवाराला मराठ्यांच्या धारतीर्थांवर, गड कोटांवर, मंदिरात किमान त्यांच्या नावाचा एक तरी दिवा तेवत ठेवण्यासाठीच हा लेखन प्रपंच
जरी का पराभूत झाला रणात |
तरी ना खचावे कधीही मनात ||
कितीही जरी संकटे घेरतील |
स्मरु या उरी शिवसूर्यशील ||
- अभिषेक मंत्र (सौजन्य - लोकजगरण)
धन्यवाद
लेखन सीमा
रोहित शिंदे
संदर्भ
शिवपुत्र छत्रपती राजाराम
तारीख इ दिलखुशा (मराठी अनुवाद-मोगल आणि मराठे)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड १५
कित्ता
टीप -
क्रमांक २ चे चित्र राव दलपत चे असून बाकी इतर चित्र काल्पनिक आहेत.
सर्व चित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत.
लेख वाचून झाल्यास कमेंट मध्ये प्रतिक्रिया कळवाव्यात.
लेख आवडल्यास कृपया शेअर करून आपल्या अज्ञात आशा इतिहासाचा प्रसार करावा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...