२८ डिसेंबर १६५९ .
प्रतापगडावर अफझलखानाचा प्रचंड पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी जराही उसंत न घेता आदिलशहाचा पन्हाळा किल्ला जिंकला व थेट मिरज कोल्हापूर पर्यंत धडक दिली .
अफझलखानाबरोबर स्वराज्यावर चालून आलेले व कसाबसा आपला जीव वाचवून पळून आलेले सैन्य नुकतेच विजापूरमधे परतत होते ... तोच महाराजांनी पन्हाळा जिंकल्याची व आता ते थेट विजापूरवर हल्ला करणार असल्याची बातमी विजापूरात थडकली .
आदिलशहाने ताबडतोब विजापूरहून आपला सरदार रूस्तुमेजान व अफझलखानाचा मुलगा फाजलखान या दोघांना दहा हजार सैन्यासह कोल्हापूरकडे रवाना केले . त्यांच्या सोबत मलिक इतबार , सादात खान , फतेखान , मुल्ला हय , सर्जेराव घाटगे , घोरपडे हे सरदार आपल्या सैन्यासह सामील झाले .
महाराज या वेळेस पन्हाळ्यावर होते . त्यांच्या सोबत प्रतापगडच्या रणसंग्रामातील वीर नेताजी पालकर व गोदाजी जगताप तसेच सिधोजी पवार , भिमाजी वाघ , हिरोजी इंगळे , जाधव , महाडिक , तुपे हजर होते . तसेच अफझलखानाच्या सैन्यातील सिद्दी हिलाल , पांढरे व खराटे हे सरदारही महाराजांना सामील झाले होते .
दोन्ही सैन्य कोल्हापूर जवळ समोरा समोर आले .
महाराज स्वतः रणांगणावर सेनेचे नेतृत्व करत होते . त्यांच्या शेजारी नेताजी पालकर , गोदाजी जगताप व त्यांचे सहकारी आज्ञेची वाट पहात उभे होते ... आणि ठरले ...
सिधोजी पवारांनी सादतखानाशी लढायचे , महाडिकांनी फतेखानावर चढाई करायची , इंगळेंनी मलिक इतबारला गाठायचे , नाईकजी पांढरे व खराटे यादोघांनी शत्रूच्या उजवीकडून हल्ला करायचा तर जाधवराव व सिद्दी हिलाल यादोघांनी शत्रूच्या डावीकडून हल्ला करायचा .
महापराक्रमी गोदाजी जगतापांना मात्र सर्जेराव घाटगे व सरदार घोरपडे या दोघांना घेरून त्यांच्याशी लढण्याची कामगिरी देण्यात आली !
महाराजांनी इशारा केला आणि राजांच्या सेनेने शत्रूवर चढाई केली . आघाडीला स्वतः राजे घोड्यावर स्वार होते !
महाराजांनी थेट रूस्तुमेजानावर चढाई केली .
गोदाजी जगतापांनी घाटगे व घोरपडे या दोन सरदारांना घेरून हल्ला केला तर नेताजींनी फाजलखानाचा वेध घेतला !
महाराजांचे सर्व सहकारी त्यांच्या सावजावर तुटून पडले . मराठ्यांनी चहूबाजूने आदिलशाही सेनेला घेरले .
गोदाजी व नेताजींची तलवार वीजेच्या चपळाईने फिरत होती !
मराठ्यांचा मार आदिलशाही सेनेला सोसवेना . मराठ्यांच्या वादळापुढे आदिलशाही सेना मागे मागे सरकू लागली व सरते शेवटी त्यांनी विजापूरकडे धूम ठोकली . आदिलाशाही सेनेचा प्रचंड पराभव झाला ! महाराजांना मोठा विजय मिळाला !
आज २८ डिसेंबर २०२२ रोजी कोल्हापूरच्या या लढाईचा ३६३ वा विजय दिन आहे !
स्वराज्यस्थापनेत सुरवाती पासूनच शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले त्यांचे बालमित्र गोदाजी जगताप यांनी या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली !
१० ऑगस्ट १६४८ रोजी पुरंदर किल्ल्यावर झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईत मुसेखानाचा वध करून महापराक्रमी गोदाजीराजे जगतापांनी पराक्रम गाजवला होता .
यानंतरही सिद्दी जौहरचा पन्हाळा वेढा तसेच लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला आणि अशाच अनेक प्रसंगी महापराक्रमी गोदाजीराजे जगतापांचे स्वराज्यासाठी मोठे योगदान राहिले आहे !
जय शिवराय ! जय गोदाजी राजे !
-अजयकुमार जगताप, पुणे.
No comments:
Post a Comment