विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 April 2024

बहाळ येथील ऐतिहासिक गढी वारसा📜 ✍🏻 भाग - 4 ✍🏻

 






बहाळ येथील ऐतिहासिक गढी वारसा📜
✍🏻 भाग - 4 ✍🏻
सारजा बारजा मंदिर
आता आपण बहाळ पेठ भागातील रथगल्लीमध्ये नव्याने बांधलेल्या सारजा बारजा मंदिराला भेट देणार आहोत. या मंदिराचे निर्माण अलीकडच्या काळातील आहे. पूर्वी येथे लाकडी मंदिर होते. त्याला बालाजी किंवा विठ्ठल मंदिर असेही संबोधले जायचे.येथे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती होत्या. आजही आहेत. गावातील ब्राह्मण पुजाऱ्यांनी येथील मंदिरात सारजा व बारजा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली असे सांगितले जाते.कारण गढीवरील यादवकालीन मंदिराची दुरवस्था पाहता तेथील मूर्ती येथे स्थानांतरित करण्यात आल्या असाव्यात.
पूर्वी येथे एक भुयार पण होते. आतमध्ये लाकडी खांबांवर बांधणी केलेली होती. मध्ये खुप अंधार असल्याने कुणीही जाण्याची हिंमत केली नाही. कालांतराने ते बुजले गेले. बहाळ गावात आजही नवीन बांधकाम करतांना भुयारी मार्ग सापडतात.आज सारजा बारजा मंदिराची पूजाअर्चा गुरव घराण्याकडे आहे. गढी वारसा या संदर्भातील पोस्ट आपण वाचल्या नसतील तर या लिंकला अवश्य भेट द्या.👇🏻
सारजा बारजा ही प्रामुख्याने वाणी, माळी, तेली, कुंभार या परिवारांची ही कुलदेवता आहे. तसेच परिसरातील सर्व समाज बांधवांचे देखील ते श्रद्धास्थान आहे. परंतु वरील परिवार कुठलेही शुभ कार्य सारजा बारजा देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय करत नाही. आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट.वर्षातून एकदा तरी हे परिवार देवीच्या दर्शनाला आल्याशिवाय राहत नाहीत. लग्नकार्यची पहिली पत्रिका ही देवीला अर्पण होते, मगच पत्रिका वाटल्या जातात.
अश्विन व चैत्र नवरात्रामध्ये मंदिर परिसरात खूप वर्दळ असते.(आजकाल कोरोना च्या संदर्भात शासकीय नियमांचे पालन करत मंदिरातील विधी साधेपणे पार पाडले जातात.) काही भाविक अनवाणी पायाने चालत येतात. नवसाला शीघ्र पावणारी देवता म्हणून तिचा लौकिक आहे. म्हणून नवस बोलणे व इच्छापूर्ती नंतर त्याची फेड करणे यासाठी वर्षभर येथे भक्तांचा राबता असतो.
सारजा बारजा या दोन्ही देवींच्या मूर्ती एकाच गाभार्यात आहेत. दोन्ही मूर्ती अत्यंत विलोभनीय आहेत. मूर्तीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ फारच सुंदर आहे. प्रभावळीवर सूर्य व चंद्र प्रतिमा, कमळ पुष्प, विविध पाने फुले आकर्षकरित्या सजवली आहेत. पूर्वी सारजा बारजा या दोन्ही मूर्तींवर शेंदुराचे पट चढल्यामुळे मूळ मूर्तींचे स्वरूप हरवल्यासारखे झाले होते. मंदिरातील पुजाऱ्यांनी पट हटवल्यानंतर मूर्तीचे मूळ रूप बाहेर आले. ते खूपच देखणे आहे. आज मूर्तींना ऑइलपेंटने रंगवले गेले आहे.
सारदा देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. उजव्या हातामध्ये त्रिशूळ व लाडू सदृश्य वस्तू दिसते. कदाचित एखादे फळ पण असू शकेल. डाव्या हातात घंटा व कमलपुष्प धारण केलेले आहे. देवीने पद्मासन घातलेले आहे. ती विंचवावर बसलेली आहे. चेहर्यावरील भाव विलक्षण प्रसन्न आहेत. कानातील कर्णाभूषण, गळ्यातील हार, दंडावरील बाजूबंद, हातातील कंकण, कमरेची मेखला या आभूषणामुळे मूर्ती मोहक दिसते.
देवीच्या हातातील घंटा, लाडूसदृश्य पदार्थ, विंचवाचे वाहन यामुळे काही प्रश्न निर्माण होतात.
आपल्या देशात शक्तीपूजा ज्या संप्रदायात केली जाते त्याला शाक्त संप्रदाय म्हटले जाते.हिंदू धर्मातील तीन प्रमुख संप्रदायात शाक्त संप्रदाय एक महत्वाचा संप्रदाय मानला जातो.काहींच्या मते शाक्त संप्रदाय वैदिक काळापासून प्रचलित आहे.
गुप्तकाळात शाक्त संप्रदाय पूर्वोत्तर भारत तसेच कंबोडिया, जावा, सुमात्रा, मलाया या द्वीप देशातही प्रचलित होता. कालांतराने बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर त्याचा प्रभाव कमी झाला.भारतात शक्तीची मूर्ती स्वरूपात पूजा प्राचीन काळापासून प्रचलित आहे.
इतिहास व मूर्तीशास्त्राच्या अभ्यासिका प्रा. डॉ. माधवी महाके यांनी दिलेल्या माहितीनुसार ओरिसा राज्यातील हिरापूर येथे चौसष्ट योगिनी मंदिर आहे. त्यात योगिनी वीरकुमारी विंचवावर उभी असलेली दाखवली आहे. चौसष्ट योगिनींची मूर्ती स्वरुपात पूजा आपल्याकडे 8 व्या शतकामध्ये सुरू झाली. याच काळामध्ये चौसष्ठ सिद्धी योगिनी मूर्ती स्वरूपात पूजेला सुरुवात झाली.
योगिनी ही शक्ती स्वरूपा मातृरूपे मानली जातात. ही स्त्री शक्तीची पूजा होती. हिरापूर येथील चौसष्ठ योगिनी मूर्ती स्वरूपात आहेत. त्यात चाळिसाव्या रूपामध्ये ही योगिनी आहे. ती चतुर्भुज आहे. तिला अभया किंवा वीरकुमारी असे संबोधले जाते. दुर्दैवाने तिचे हात उद्ध्वस्त झाले असल्याने आयुधांची कल्पना येत नाही.तिचे आसन मात्र विंचू आहे.
दुसऱ्या एका संदर्भानुसार दक्षिण कर्नाटकात चेलम्मा देवी शक्ती रूपात पुजली जाते. चेलम्मा देवीचे वाहन विंचू आहे. तिला विंचवाची देवता असेही म्हटले जाते. भक्तांचे विंचवापासून संरक्षण व्हावे, म्हणूनही कदाचित तिचे वाहन विंचू दाखवलेले असेल.तीसुद्धा चौसष्ठ योगिनी मधील अभया किंवा वीरकुमारीच आहे. तिथे तिला चेलम्मा म्हणून ओळखतात.
महाराष्ट्रामध्ये देखील चौसष्ट योगिनींची उपासना आढळते. त्या संदर्भात एक पौराणिक कथा आढळते. विष्णूच्या सहाव्या अवतारात देवी उत्पत्तीची कथा आढळते. परशुराम हे भारत-भ्रमण करीत असताना चंद्रभागा नदीतटावर एका वटवृक्षाखाली विश्राम करीत होते. ध्यान करीत असतांना त्यांना एका शक्तीचा परिचय झाला. जी गुप्त स्वरूपात होती. व प्रकटीकरणाच्या प्रतीक्षेत होती.
परशुरामांनी आत्मज्ञानाने जाणले. एक चकाकणारी पाषाण शिळा पारसमणि शिळा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये चकाकणाऱ्या स्वरूपात बेसाल्टच्या एका रूपामध्ये होती. परशुरामाने आपल्या तीराने देवीचे दिव्य स्वरूप उकरून काढले. परशुरामाने देवीची प्रतिमा तीर (सारा) ने उकरून काढली म्हणून तिला " सारदा " असे नामाभिधान प्राप्त झाले. अशी माहिती प्रा. डॉ. माधवी महाके यांच्याकडून मिळाली.
ही कथा मला अधिक संयुक्तिक वाटते कारण देवीच्या आरती मध्ये परशुरामाचा उल्लेख आला आहे. दुसऱ्या एका कथेनुसार सतीच्या आत्मबलिदानानंतर तिच्या पार्थिव शरीराचे विष्णूने सुदर्शन चक्राच्या सह्याने 108 तुकडे केले. काही कथांमध्ये 51 असाही उल्लेख येतो. हे ज्या ज्या ठिकाणी विखुरले त्या त्या ठिकाणी पवित्र पूजास्थान शक्तिपीठ निर्माण झाले.
सतीच्या जीभेचा तुकडा जिथे पडला त्या ठिकाणी ती अभया किंवा वीरकुमारी म्हणून शक्ती स्वरूपात प्रकट झाली. तिलाच सिद्धिदा असेही संबोधले जाते. श्रीरुद्रयामलतंत्र या ग्रंथात भवानी सहस्त्रनामावली यामध्ये 277- वीरा, 278-वीरपानमदोत्कटा , 983- वीरभू:, 984 -वीरमाता, 985- वीरसू: ,986 - वीरनंदिनी या क्रमांकावर सहावेळा देवीचा उल्लेख आला आहे.
हिमाचल प्रदेशात कांगडा ज्वालाजी येथे सतीच्या जिभेचा तुकडा पडल्याने अभया, वीरकुमारी किंवा सिद्धीदा हे मुख्य शक्तिपीठ निर्माण झाले. मुख्य शक्तीपीठापर्यंत जाणे त्या काळात सर्वच भाविकांना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी आपापल्या विभागांमध्ये आपल्या उपास्य देवींची स्थापना केली. पाटणादेवी येथील चामुंडा देवी, पाटण शिंदखेडा येथील आशापुरी देवी, म्हसदी येथील पेडकाई देवी, एकविरा देवी इ. याचे उदाहरण आहे.
यादव राजा सिंघनदेव याचा राजज्योतिषी अनंत देव यांच्या पूर्वजांची कुलदेवता सिद्धिदा असावी. हिमाचल प्रदेश सारख्या लांबच्या ठिकाणी वारंवार जाणे शक्य नसल्याने त्याने बहाळला देवीची प्राणप्रतिष्ठा केली असेल. अनंतदेवाच्या अगोदरच्या पिढ्यांमध्ये " सिद्धिदा " या शब्दाचे ' सारदा ' असे नामकरण झाले नसेल कशावरून?या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. कदाचित यात नामसाधर्म्यही असू शकते, परंतु सारदा या शब्दाची व्युत्पत्ती सिद्धीदा पासून झाली हे ग्राह्य धरले तर बहाळचा संबंध आजच्या हिमाचल प्रदेशातील कांगडा या गावाशी होता हे सिद्ध होते.
अनंतदेवाचे पूर्वज कधीकाळी तिथून महाराष्ट्रात आले असावेत, ही शक्यता पण आहे.प्राचीन काळी अनेक घराणी उत्तर भारतातून दक्षिणेकडे आली. कारण मौर्य काळामध्ये ऋषिक, असिक देश म्हणजेच आजचा खानदेश मौर्यांच्या साम्राज्याचा एक हिस्सा होता हे सिद्ध झाले आहे.
आणखी एका व्युत्पत्ती नुसार शारदा या शब्दापासून सारदा असे झाले असावे .परंतु शारदेचे वाहन हंस किंवा मोर आहे. काही ठिकाणी कमळ, सिंह, मेंढा असेही आहे. विंचू मात्र नाही. तिच्या हातातील आयुधे देखील शारदा देवीची नाहीत.
त्यामुळे ती सिद्धीदा पासून सारदा ही व्युत्पत्ती अधिक योग्य वाटते.
( क्रमशः )
पुढील भाग लवकरच !😊
🛑🌾© संजीव बावसकर
नगरदेवळे
जि. जळगाव
9975281275
(आपणांस ही पोस्ट कशी वाटली, जरूर कळवा. छेडछाड न करता अशीच पाठवा.😊)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...