भाग 5
सारजा बारजा मंदिर
आता आपण मंदिरात असलेल्या दुसर्या मूर्ती विषयी विचार करूया. सारजा बारजा मंदिरात बारजा देवी म्हणून जी देवी पुजली जाते, ती महिषासुरमर्दिनी आहे. मूर्ती अत्यंत नयनमोहक आहे. या दोन्ही मूर्तींना रंग काम करण्या अगोदर मूळ मूर्ती खूपच सुंदर असतील. देवीने डावा पाय महिषासुराच्या जबड्याजवळ तर उजवा पाय त्याच्या पाठीवर ठेवून त्याला पायाखाली दाबून ठेवला आहे. देवीच्या पायाच्या दाबाने महिषासूर चारी पाय दुमडून जमिनीवर बसला आहे. देवीने दैत्याच्या पाठीवर दिलेला दाब स्पष्टपणे दिसतो.देवीच्या पायाच्या दाबाने दैत्याची पाठ किंचित मध्ये दाबली गेली आहे.
दैत्याच्या पार्श्वभागावर सिंहाने हल्ला चढवला आहे. सिंहाच्या जबड्याची पकड,महिषासुराच्या पार्श्वभागात रुतलेले त्याचे पंजे, पंज्याची नखे, सिंहाने विस्फारलेले नेत्र, त्याच्या चेहऱ्यावरील आक्रमक भाव, सिंहाच्या भीतीने महिषासूरने आत मध्ये दुमडलेली शेपूट, त्याची असहायता दर्शवते. महिषासुरमर्दिनी अष्टभूजा आहे.आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. उजव्या बाजूकडील हातांमध्ये शंख, त्रिशूळ, पानपात्र व खड्ग धारण केले आहे. या पोस्टचे चार भाग आपण वाचले नसतील तर या लिंकला ओपन करून बघू शकता. https://m.facebook.com/story.php...
महिषाच्या मानेत त्रिशूळ अर्धा रोवलेला आहे. त्रिशूळ धारण केलेल्या हात व उजव्या पायाचा दाब व दैत्याच्या पाठीवर दिल्याने देवीच्या मूर्तीला कमनीयता व गतिमानता लाभली आहे.
डाव्या बाजूच्या हातांमध्ये चक्र, पाश, कृपाण ही आयुधे दिसतात तर एका हाताने दैत्याचा केशसंभार कचकून पकडला आहे. अर्ध मानवी व अर्ध महिषाचे रूप धारण केलेल्या दैत्याच्या हाती खड्ग दिसते, पण त्याची दिशा खालच्या बाजूला आहे. म्हणजे त्याने शरणागती पत्करली आहे.
देवीच्या पाठीमागे हंस, मोर, वाघ, मकर, मर्कट, शुक इत्यादी कोरलेले आहेत. मस्तकावरच्या प्रभावळीतील कीर्तिमुख बटबटीत डोळे व लांबलचक जिव्हा यामुळे भेसूर दिसतोय. वरच्या डाव्या बाजूला अजून एक मानवी आकृती दिसते आहे. कदाचित तो भैरव असावा. एकंदरीत मूर्तीकाराने मूर्ती घडवताना आपले सगळे कसब पणाला लावलेले दिसते.
मला आवडलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिल्प कमालीचे गतिमान झाले आहे. सिंहाची आक्रमकता, किर्तीमुखाचा हावरटपणा, वाघ, मकर यांचे विस्फारलेले जबडे, दुर्गेच्या हातातील आयुधांची चपळता यांची गती विलक्षण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्गेच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव ! तिची प्रसन्न विजयी मुद्रा, सात्विकता दर्शवते. भक्तांकडे पाहताना ती विजयवरदायिनी दिसते. प्रत्यक्षात युद्धाचा प्रसंग असला तरी त्यात बीभत्सपणा दिसत नाही. दैत्यमर्दिनी दुर्गा या प्रसंगातही भक्तवत्सल दिसते.
चेहऱ्यावरील नितळता, ग्रीवेची सुंदरता, वक्षस्थळ, कमनीय कटिबंध, हातांची ठेवण हे कसलेल्या मुरब्बी मूर्तिकारांचे कौशल्य आहे. देवीची आभूषणे कमालीची आकर्षक आहेत. हातातील कंकणे व बाजूबंद कानातील कर्णकुंडले, त्यांची हालचाल, गळ्यातील रत्नहार, कमरेची कटी मेखला, दोन्ही पायातील पैंजण, एवढेच नाही तर महिषासुराचे आभूषण देखील मूर्तीकाराने टिपले आहेत.
दुर्गासप्तशती या ग्रंथातील तिसऱ्या अध्यायात महिषासुर वधाचा प्रसंग चितारला आहे. संस्कृत भाषेत या प्रसंगाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे ----
तत: सोSपि पदाSSक्रांत,-स्तया निज मुखात्तत: ।
अर्धनिष्क्रान्त एवासीद्, देव्या वीर्येण
संवृत: ।।
अर्धनिष्क्रान्त एवासौ,युध्यमानौ महासुरः।
तया महासिना देव्या, शिरश्छित्वा निपातितः ।।
ततो हाहाकृतं सर्वं, दैत्य सैन्यं ननाश तत ।
प्रहर्ष च परं जग्मु:, सकला देवतागणा: ।।
अर्थात ,
रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येतसे नर।
देवीने नीज शक्तीने येता अर्धा निरोधिला ।।
तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी ।
मस्तक तोडि दैत्याचे महिषासूरमर्दिनी ।।
हाहाकार रणी झाला दैत्यसेना पळे भये ।
समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती ।।
वरील वर्णनाची हुबेहुब छबी मूर्तीकाराने उभारली आहे.
दुर्गासप्तशतीच्या चौथ्या अध्यायात ध्यान मंत्रामध्ये मार्कंडेय ऋषी लिहितात ,
ओम कालाभ्रा जी कटाक्षे अरिकुलभयदा चंद्रभाळी जियेशी।
शंखा,- चक्रा- कृपाणा- त्रिशूल करधरा धारि नेत्रत्रयाशी ।।
सिंहस्कंधाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करी जे ।
घ्यावी दुर्गा जयाख्या सुर- मुनी भवती सेविती जे ।।
हे सगळे वर्णन बारजा देवीला तंतोतंत लागू पडते. म्हणूनच ही मूर्ती अनन्यसाधारण आहे. मुर्तीकाराने सारजा व बारजा या मूर्ती घडवतांना धार्मिक ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला आहे यात तिळमात्र शंका नाही. या मूर्तींचा निर्माण काळ निश्चित माहिती नसला तरी त्या यादवकालीन असाव्यात हे मात्र खरे !
गढीवर अस्तित्वात असलेल्या सध्याच्या मंदिरातील तीन मूर्ती कोणत्या ? एक सारजाई, दुसरी बारजाई मग तिसऱ्या गाभाऱ्यातील मूर्ती कोणती ? ती आता कुठे आहे ? सारजा मंदिरासमोर ध्वस्त असलेले मंदिर नेमके कोणत्या देवतेचे ? त्यातील मूर्ती कुठे गेल्यात ? बहुळादेवी म्हणून आज गढीवर जी मूर्ती अस्तित्वात आहे ती उत्तर पेशवाई कालखंडातील आहे. मग मूळ बहुळाईची मूर्ती कुठे असावी ?
गढीच्या सर्वात उंच भागावर असलेली स्मृतीशिळा कुणाची ? बहाळ परिसरात आजही प्रत्येक शेतात स्मृतिशीळा आढळतात. त्यांना " वीरांचे ठाणे " म्हटले जाते. युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांची ती समाधीस्थळे आहेत. इथे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. संशोधनाअंती त्या सर्व प्रश्नांची उकल होईलच !
यादव काळात चक्रधर प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर आहे. महानुभाव संप्रदायातील बरीचशी साहित्य निर्मिती या परिसरात झाली. लीळा चरित्रातील चक्रधर प्रभूंच्या अनेक लीळा या परिसरात लिहिल्या गेल्यात.
महदाइसा यांचे माहेर " गुढे " असे सांगितले जाते. त्यांनी लिहिलेला काव्यप्रकार गूढ या परिसरातच लिहिला गेला अशीही माहिती मिळते. वाडे, गुढे, तरवाडे, टेकवाडे या गावांच्या नाम साधर्म्यातही काहीतरी इतिहास असावा. येथून जवळच गिरणाकाठी ऋषीपांथा हे क्षेत्र आहे. (त्याविषयी सविस्तर पोस्ट लवकरच !)
बहाळ रथाचे येथील सारजा बारजा या दोन्ही मुर्तींच्या समोर असलेल्या ओट्यावर अजून काही पितळी मूर्ती दिसतात. त्यासमोर लाकडी खडावाचा जोड पूजेसाठी ठेवलेला आढळतो. याच छताखाली दुसरा गाभारा आहे. त्यात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या चलमूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. त्यांच्याच बाजूला सुंदर अशी श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती दिसते.
ऐतिहासिक दृष्ट्या बहाळ जसे महत्वाचे आहे तसे धार्मिक दृष्ट्या देखील बहाळ गढी परिसर व सारजा बारजा मंदिर खूपच महत्त्वाचे आहे. विशेषतः धुळे जिल्हा, मालेगाव, भडगाव, पारोळा व चाळीसगाव तालुका येथील भाविकांचा येथे नियमित वावर असतो.
आश्विन नवरात्रातील नवमीला देवी मंदिरात हवन होते. त्यासाठी पाच जोडपी निवडली जातात. त्यात मराठा, माळी, तेली या परिवारातून प्रत्येकी एक व न्हावी परिवारातून दोन जोडपी पूजेला बसतात. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा असल्याचे पुजारी गुरव सांगतात. त्यानंतर अश्विनी एकादशीला रथोत्सवाचे आयोजन केले जाते.
खानदेशात रथोत्सवांमध्ये बालाजी महाराजांच्या रथोत्सवाचे आयोजन केले जाते परंतु बहाळ येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या रथोत्सवाचे आयोजन केले जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या उत्सवमूर्तीची रथावर प्रतिष्ठापना केली जाते. रथाचे सारथ्य हनुमानाकडे असते. त्यासाठी हनुमानाची मूर्ती रथावर आरूढ केले केली जाते.
मंदिरासमोरच रथ उभा असतो.येथील रथ परंपरा 1833 पासून सुरू असल्याचे समजते.या रथामुळेच बहाळ रथाचे व बहाळ कसबे असे बहाळचे दोन भाग पडतात. रथाची उंची 30 फुटांपेक्षा अधिक आहे. पूर्वी रथ संपूर्ण पेठ भागात फिरवला जायचा. हळूहळू रस्ते संकुचित होत गेले व रथाचा मार्गही मर्यादित झाला.
रथ उत्सवानंतर वहन उत्सव सुरू होतो. आश्विन पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. येथील वहन विविध देवी-देवतांचे तसेच प्राण्यांचे आहेत. लाकडावर सुंदर कलाकुसर करत वहनांची निर्मिती केली आहे .या उत्सवानिमित्त संपूर्ण गावात चैतन्य व उत्साहाचे वातावरण असते.
रथाच्या अग्रपूजेचे मानकरी, रथ ओढणारे, मोगरी लावणारे, तेलपाणी लावणारे,फुल चढवणारे, दिवटीवाले, मशालवाले ,भजनी मंडळ, आतषबाजीवाले, हे सर्व मानकरी परंपरेने ठरलेले आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत रथोत्सव हा फक्त जागेवरच पाच पावली हलवला जातो. गर्दी टाळण्यासाठी यात्रेचे आयोजन पण केले जात नाही.
या वर्षी शासनाने परवानगी दिली तर विश्वस्तमंडळ रथोत्सवाचे आयोजन करेल. अशी माहिती मिळाली. तेव्हा त्याविषयी सविस्तर लिखाण करता येईल.
एकंदरीत पुरावे लक्षात घेता प्राचीन काळापासून बहाळचे महत्त्व आढळते. उत्तर भारतातून येणारे अनेक राजमार्ग हे बहाळवरून जात असावेत. उत्तरेतील पाटलीपुत्र, विदिशा , कौसंबी, उज्जैन तसेच मराठवाड्यातील पैठण, तेर, धाराशिव, कंधार दक्षिणेकडील नासिक, नालासोपारा, कल्याण, ठाणे , चौल हे व्यापारीमार्ग बहाळ वरून जात असावेत. तसेच पैठण वरून प्रकाशा, भरुच हा मार्ग देखील बहाळ वरून जात असावा.
गिरणा नदीचे संपन्न पात्र, पाण्याची बाराही महिने मुबलकता, सुपीक जमीन, समृद्ध परिसर, वर्षातून दोनदा येणारी पिके, सर्व प्रकारच्या फळपिकांसाठी पोषक वातावरण, त्यामुळे प्राचीन काळापासून मानव इथे रमला नसेल तर नवलच !
हळूहळू त्याने या परिसरात वसाहती स्थापन केल्या आणि एका सभ्य मानवी संस्कृतीचा विकास झाला. उत्खननातून या सभ्य संस्कृतीचे अवशेष सापडले. अजूनही परिसरात उत्खनन झाले तर अज्ञात असलेला इतिहास जगासमोर येईल. या वैभवशाली इतिहासाचे आपण वारसदार आहोत याचा आपणा सर्वांना अभिमान असलाच पाहिजे.
मानवी संस्कृतीच्या अनेक शतकातील जडणघडणीतील महत्वाचा साक्षीदार म्हणजे हा गढी परिसर आहे. त्याविषयी आदर बाळगणे, त्याचे संवर्धन करणे, तरुण पिढीचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक डोळस व सकारात्मक होणे गरजेचे आहे. इतिहासाकडे बघण्याची जिज्ञासा निर्माण झाली तरी खुप काही मिळाले असे म्हणता येईल .
बहाळ येथील ऐतिहासिक गढी वारसा या मालिकेत आतापर्यंत पाच भागापर्यंत लिखाण करण्याची प्रेरणा मला मिळाली. काही संदर्भ मिळत गेले आणि लिहीत गेलो. हे सर्व आई सारजा बारजाईने माझ्याकडून करून घेतले. आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलात, त्यामुळे देखील लिहितांना हुरूप येत गेला. आपणां सर्वांचे खुप खुप आभार !
( संपूर्ण )
© संजीव बावसकर
नगरदेवळे
जळगाव
9975281275
( आपणांस पोष्ट कशी वाटली जरूर कळवा अशीच पाठवा.छेडछाड करू नका.)
No comments:
Post a Comment