विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 April 2024

बारामती मधील छत्रपती राजाराम महाराज यांचा महाराष्ट्रातील प्रथम शिलालेख

 





बारामती मधील छत्रपती राजाराम महाराज यांचा महाराष्ट्रातील प्रथम शिलालेख 
 ©अनिल दुधाणे
 
तसेच औरंगजेब बादशहा वडगाव निंबाळकर शाखा नवीन वंशावळ
वडगाव निंबाळकर समाधी लेख
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील (कोऱ्हाळे ) जवळ असलेल्या मौजे वडगाव निंबाळकर गावातील गावाच्या वस्ती बाहेर असलेल्या एका वैयक्तिक निंबाळकर घराण्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या घुमटाच्या समाधी वर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कोरलेला आहे .घुमटाचा आकार भव्य मोठा असून त्यावर चोहो बाजूने नक्षी काम केलेले आहे गाभाऱ्यात शिवपिंडी असून आतमध्ये काही देवकोष्ठ कोरलेली आहेत .शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ३५ ओळीचा पुरवणी सह दोन भागात विभागाला गेला असून शुद्ध मराठी भाषेत आहेत काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.
गावाचे नाव : वडगाव निंबाळकर
ता.बारामती , जि. पुणे
शिलालेख वाचन
शके १६१५ श्रीमुख
नाम संवछरे मार्गेश्वर शु
घ प्रतिपदेस गुमठ समाप्त.
विठोजी राजे निंबाळकर.
मोकादम मौजे वडगाव त्या
ची स्त्री रखमाआवा(बाई) त्या
चे पुत्र संताजीराजे त्या
ची स्त्री गुणाआवा(बाई)
त्याचे पुत्र सिदोजीराजे त्या
ची स्त्री द्वारकाआवा.(बाई) त्या
चे पुत्र येमाजीराजे मो
कदम याच्या स्त्रिया
आनंदीआवा (बाई) व. मिराबा
ई यांनी सीदीजी राजे
यांचा गुमठ बांधीला.
गुमठास पैके रुपये
३८०९ लागले.. या गुम
ठाच्या दीवाबत्ती व बाग
बाग शाहा साठी ईनाम ज
मिन चार चावर मौजे म
जकूर पैकी पाताशाहा आ
लंमपन्हा यांनी करून
दिल्हा आहे.
पुरवणी
माहाराज छत्रपती नी
हि चार चावर दिलही
तरी याथार्थ नामाचे
उपेद्र गुमठास साला
ऊन आपलीअवलाद
आपलाद आप
ले भांव वौशातून निंबा
बाळकर से आसतील त्यां
नी या गुमठाचे चाल
वावे.यास न वृंधिगत
करील त्यास गोहतेचे
व ब्रम्ह हत्येचे लागे.
जी.पी.एस. :१८. ०३ ” ०९ ’ १७ ,७४. ३० ’’९० ’ ४०
शिलालेखाचे स्थान : समाधी गुमाठाच्या दर्शनी बाजूस प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पट्टीवरती डाव्या उजव्या बाजूस वरती आहे .
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : समाधी गुमठ बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : शके १६१५ श्रीमुखनाम संवछरे मार्गेश्वर शुध प्रतिपदा
काळ वर्ष : सतरावे शतक – शनिवार १८ नोव्हेंबर १६९३.
कारकीर्द : छत्रपती राजाराम महाराज ,
व्यक्तिनाम :-विठोजी राजे निंबाळकर, रखमाआवा(बाई), संताजीराजे, गुणाआवा(बाई), सिदोजीराजे, द्वारकाआवा.(बाई), येमाजीराजे, आनंदीआवा (बाई) व. मिराबाई, सीदीजी राजे, पाताशाहा आलंमपन्हा (औरंगजेब ),छत्रपती महाराज (राजाराम महाराज )
ग्रामनाम :- मौजे वडगाव
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे .
अर्थ : शालिवाहन शकाच्या - सके १६१५ श्रीमुखनाम सवत्सरात मार्गेश्वर शुध प्रतिपदेला मौजे वडगाव निंबाळकर गावातील मोकदम पाटील विठोजी राजे निंबाळकर. त्याची स्त्रीम्हणजे पत्नी रखमाआवा(बाई) त्या दोघांचे पुत्र संताजीराजे त्याची स्त्री ( पत्नी) गुणाआवा(बाई)त्या दोघाचे पुत्र सिदोजीराजे त्याची स्त्री( पत्नी) द्वारकाआवा.(बाई) त्यादोघाचे पुत्र येमाजीराजे मोकदम याच्या दोन स्त्रिया आनंदीआवा (बाई) व. मिराबाई यां सर्वांनी मिळून सीदोजी राजेनिंबाळकरांचा गुमठ( समाधी) शनिवार १८ नोव्हेंबर १६९३मध्ये बांधून पूर्ण केला . या गुमठाच्या बांधकामास पैके रुपये एकूण खर्च ३८०९रुपये लागले..या गुमठाच्या देखरेख ,दीवाबत्ती व बागबगीच्या साठी वरील मजकूर म्हणजे निंबाळकर घराणे शाखेतील सर्वाना पाताशाहा आलंमपन्हा म्हणजेच(औरंगजेब बादशाहने ) ह्याने गुमठासाठी ईनाम जमिन चार चावर म्हणजेच ८० एकर जमीन करूनन दिली आहे. यापुढे पुरवणी मध्ये छत्रपती महाराज म्हणजेच( छ .राजाराम महाराज) यांनीही या घुमठास देखरेखी करिता चार चावर म्हणजेच ८० एकर जमीन करून दिली आहे . तरी सार्थ नामाचे उपेंद्र (देव इंद्राच्या भावाप्रमाणे) एकत्र येवून सालाप्रमाणे म्हणजेच दरवर्षी सर्व भाऊ वंशज अवलाद म्हणजेच निंबाळकराच्या मुलांचे वंशज ,तसेच आपलाद म्हणजेच मुलीकडचे वंशज या सर्वांनी मिळून या गुमाठाचेपुढील सर्व विधी कार्य चालवावे .या सर्वांपैकी हे कार्य पुढे न वृद्धिगत न करील म्हणजेच न वाढवील त्यास गोहत्यचे व ब्रम्ह हत्येचे पातक म्हणजेच पाप लागेल असे शिलालेखाच्या शेवटी लिहलेले आहे.
शिलालेखाचे महत्व :- मुळचे उत्तरेकडील असलेले परमार हे घराणे फलटण जवळील निंबळक या गावी येवून राहिले गावावरील नावामुळे पुढे हे घराणे निंबाळकर म्हणून प्रसिद्ध झाले .असून त्यांच्या अनेक शाखा विविध ठिकाणी गेलेल्या दिसतात .फलटण येथील नाईक निंबाळकर,वाठार येथील एक शाखा ,दहीगाव येथे एक शाखा,लेंगरे खानापूर ,भाळवणी सोलापूर ब्रम्ह्गाव ,दौंड या भागात जवळपास २७ शाखा कि ज्या पुढे विस्तारित झाल्येल्या दिसतातकि ज्या पुढे स्वतःस नाईक निंबाळकर ही पदवी लावतात .
बारामती जवळ वडगाव निंबाळकर गावात एक त्यांची एक स्वतंत्र शाखा आली असावी ते स्वतास राजे हे पद लावतात कि जी मुळची उत्तरेकडून आलेली असू शकते .त्यांचा मूळ पुरुष विठोजीराजे व त्या पुढील निंबाळकर कुटुंबाच्या वडगाव शाखेतील ९ लोकांनी एकत्र येवून आपल्या पूर्वजांच्या नावे मोठी रक्कम ३८०९ रुपये खर्च करून सिदोजीराजे निंबाळकर यांचा एवढा मोठा गुमठ बांधावा ही एक विलक्षण गोष्ट आहे .यावरून त्यांची आपल्या पुर्वाजाबद्द्ल ,भक्ती, प्रेम तसेच आदरभाव व्यक्त होतोच पण त्यांच्यातील एकोपा ,परस्पर सहकार्याची चांगली कल्पना येते , आलमगीर बादशहा औरंगजेब हा हिंदुच्या स्मारकासाठी समाध्यासाठी फारशी देणी देत नव्हता.परंतु स्वतः त्याने या स्मारकाच्या दिवा बत्तीसाठी बाग बगिच्या व देखभाली साठी चार चावर जमीन म्हणजेच ८० एकर जमीन निंबाळकर घराणे यांच्या नावे करून देतो ,ही महाराष्ट्रातील पहिलीच शिलालेख स्वरूपातील घटना आहे . याच बरोबर छत्रपती महाराज (छ.राजाराम महाराज ) यांनी सुधा या समाधी साठी ८० एकर जमीन करून दिली आहे .यावरून निंबाळकर घराणे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन किती होते याची कल्पना येते याच बरोबर अवलाद व आफलाद म्हणजेच मुला कडील व मुलीकडील सर्व वंशातील भावांनी एकत्र येवून दरवर्षी एकत्र येवून या घुमठाची विधिवत पूजा करून ती दिवसोदिवस त्याची कीर्ती वाढवावी आणि जो कोणी याची कीर्ती वृद्धिगत न करील म्हणजेच न वाढवील त्यास गोहत्या म्हणजेच गायीला (म्हणजेच ३३ कोटी देवाला) मारल्याचे तसेच ब्रम्ह हत्या म्हणजेच जगातील सर्वात मोठे पाप लागेल असा भीती वाचक शाप दिला आहे .
राजे निंबाळकर घराण्यातील कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा शिलालेख आहे .आपल्या घराण्याची वंशावळ देवून त्यात सर्व पुरुषा बरोबरीने त्यांच्या स्त्रियाची नावे कोरून एका कर्तबगार व्यक्तीचे देवळा सारखे घुमठ स्मारक बांधून धार्मिक व सामाजिक कार्य तसेच शापवचन शिलालेखाच्या स्वरुपात कोरून लोकाच्या नजरेसमोर कायमचे ठेवले हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे.
संक्षेप :- प्रां -प्रांत परगणा ,मार्गेश्वर –मार्गशीष, ,गुमठ –घुमठ ,आवा –बाई ,पैके –पैसे ,चावर –एक चावर म्हणजे २० एकर , आळमपन्हा-आलमपन्हा(औरंगजेब ),दिल्हा –दिले ,उपेंद्र –इंद्राचा लहान भाऊ ,सालाउन- दरवर्षी, अवलाद –मुलाचे वंश ,अफलाद –मुलीचा वंश, वौशातून-वंशातून
संदर्भ -(IE VI -१८९).
निष्कर्ष: छत्रपती महाराज (छ.राजाराम महाराज ) यांनी एखाद्या समाधीच्या बांधकाम व त्याच्या पुढच्या सर्व सोयी सुविधा करिता चार चावर (८० एकर )जमीन करून दिली. आहे.यावरून आपल्या स्वराज्यासाठी कामी आलेल्या सर्व घराण्याच्या पराक्रमी व्यक्तीची छत्रपती घराणे किती काळजी घेत होते हे सिद्ध होते .
आलमगीर बादशहा औरंगजेब हा हिंदुच्या स्मारकासाठी समाध्यासाठी फारशी देणी देत नव्हता.परंतु स्वतः त्याने या स्मारकाच्या दिवा बत्तीसाठी बाग बगिच्या व देखभाली साठी चार चावर जमीन म्हणजेच ८० एकर जमीन निंबाळकर घराणे यांच्या नावे करून देतो ,ही महाराष्ट्रातील पहिलीच शिलालेख स्वरूपातील घटना आहे ..यावरून निंबाळकर घराणे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन किती होते याची कल्पना येते.
आपल्या घराण्याची वंशावळ देवून त्यात सर्व पुरुषा बरोबरीने त्यांच्या स्त्रियाची नावे कोरून एका कर्तबगार व्यक्तीचे देवळा सारखे घुमठ स्मारक बांधून धार्मिक व सामाजिक कार्य तसेच शापवचन शिलालेखाच्या स्वरुपात कोरून लोकाच्या नजरेसमोर कायमचे ठेवले हे राजे निंबाळकर घराण्यातील कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे
निंबाळकर घराणे वंशावळ नवीन सापडलेली.
विठोजी राजे निंबाळकर. पत्नी रखमाआवा(बाई) ---
संताजीराजे त्याची स्त्री ( पत्नी) गुणाआवा(बाई)----
सिदोजीराजे त्याची स्त्री( पत्नी) द्वारकाआवा.(बाई-----
येमाजीराजे दोन स्त्रिया आनंदीआवा (बाई) व. मिराबाई ----
सदर शिलालेख वाचन संशोधन अनिल दुधाणे यांनी केले असून
बारामतीचे विद्या प्रतिष्ठान चे विनोद खटके ,मनोज कुंभार सर
तसेच समाधी कोशकार प्रवीण भोसले सर यांची मोलाची मदत झाली.
©अनिल दुधाणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...