विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 April 2024

*आशीर्वाद सेनापतींचे,सार्थक आयुष्याचे*

 
















*आशीर्वाद सेनापतींचे,सार्थक आयुष्याचे*
*अद्वितीय सेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या कर्तबगार पत्नी द्वारकाबाईसाहेब यांच्या समाधीस्थळांचे जीर्णोद्धार कार्य*
(लेख व फोटो - प्रवीण भोसले)
'सेनापती संताजी घोरपडे'. हे नाव माहिती नसलेला मराठी शिवस्वराज्यभक्त, इतिहासभक्त शोधूनही सापडणार नाही.याला कारणीभूत आहे सेनापती संताजीरावांचा अद्वितीय, अजब,अलौकिक पराक्रम. मराठ्यांच्या इतिहासातील यांची कर्तबगारी, दाहक शौर्य, अफाट पराक्रम, वेगवान हालचाली,अजेय लष्करी डावपेच आणि शत्रूंना गर्भगळीत करणारी यांची दहशत केवळ अतुलनीय आहेत.
घोरपडे हे मूळचे भोसले.यांचे आणि शिवछत्रपतींचे पूर्वज एकच आहेत.१४६९ साली बहामनी सल्तनतीमधे कर्णसिंह भोसले यांनी घोरपडीच्या सहाय्याने विशाळगड जिंकल्यामुळे भोसलेंच्या या शाखेला घोरपडे हे आडनाव पडले.हे कर्णसिंह म्हणजे शुभकृष्णसिंह भोसले यांचे सख्खे बंधू आणि या शुभकृष्णसिंहांच्या वंशात महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मले.
१ फेब्रुवारी १६८९ ला छत्रपती शंभूराजे औरंगजेबाच्या हाती सापडले.यावेळी झालेल्या लढाईत शंभूराजांना वाचविताना संताजीरावांचे पिता सरनौबत म्हाळोजीबाबा घोरपडे धारातीर्थी पडले.११ मार्चला औरंगजेबाने शंभूराजांची आत्यंतिक यातना देऊन हत्या केली.'ते वर्षी कुल(सर्व) गड मोगलांनी घेतले.' महाराष्ट्र मोगलांनी व्यापला.छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून निसटून दूर तामिळनाडूमधील जिंजीच्या आश्रयाला जायला निघाले.या सर्व घटनांनी मोगली परचक्राच्या भयाण अंधारात मराठी स्वराज्य घुसमटले. महाराष्ट्र जणू गलितगात्र होऊन दिग्मूढ झाला. स्वराज्य घोर संकटात सापडले .अशावेळी खुद्द छत्रपती शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या संताजी घोरपडेंनी एक अजब,अतुलनीय पराक्रम केला.ही घटना म्हणजे तुळापुरच्या लाखोंच्या मोगली छावणीत घुसून थेट औरंगजेबालाच यमसदनी धाडायला घातलेला आत्यंतिक धाडसी छापा. अगदी शायिस्तेखानावरील शिवरायांच्या छाप्याचीच पुनरावृत्ती.यावेळी संताजीरावांसोबत होते त्यांचे दोन बंधू बहिर्जी व मालोजी, विठोजी चव्हाण आणि २००० मराठे सैनिक. या अकल्पित हल्ल्याने हादरलेला औरंगजेब आपला तंबू सोडून पिशाबखान्यात (मुतारी/शौचालय)अथवा दुसरीकडे पळाल्याने वाचला.संतप्त संताजीराव आणि सहकाऱ्यांनी थेट शाही तंबूच जमीनदोस्त केला आणि तंबूवरील दोन सोन्याचे कळस अर्थात 'मोगली साम्राज्याची इज्जत' कापून जसे घुसले तसेच झपाट्याने छावणीबाहेर पडले.या अभूतपूर्व धाडसाने छत्रपती राजाराम महाराजांनी सेनापतीपद संताजीरावांना बहाल केले.थेट औरंगजेबालाच मारण्यासाठी लाखो मोगलांच्या गराड्यातील त्याच्या शाही तंबूत केवळ २००० सैनिक घेऊन घुसलेले संताजीराव हे एकमेव वीर! यामुळे सेनापती संताजी घोरपडे हे नाव आता मराठ्यांच्या ह्रदयात विराजमान झाले तर मोगलांच्या मेंदूत काट्यासारखे रुतून बसले.
इथून सुरू झालेला सेनापती संताजीरावांचा झंझावात पुढील आठ वर्षे मोगलांना मराठी तलवारीच्या दहशतीखाली आणणारा ठरला.हा सर्व इतिहास इथे नमूद करीत नाही. पण घोडा पाणी पीत नसेल तर मोगल सैनिक त्याला विचारायचे "तुला काय पाण्यात संताजी-धनाजी दिसतात काय?" शत्रूच्या घोड्यांनादेखील अशी दहशत होती संताजीराव आणि धनाजीराव यांची.धनाजीराव म्हणजे धनाजी जाधवराव.
याकाळात औरंगजेबाच्या आणि त्याच्या सरदारांच्या छावणीचा थरकाप उडविणारे शब्द तीनच होते; "मरहट्टे आ गए।"
कवी दु.आ.तिवारींचे शब्द हेच सांगतात
" वाजल्या कुठे जरी टापा,धुरळ्याची दिसता छाया.
छावणीत गोंधळ व्हावा,संताजी आया,आया !
शस्त्रांची शुध्द नाही, धडपडती ढाला घ्याया
रक्ताने शरीरे लाल
झोपेने डोळे लाल
जीवाचे होती हाल
शत्रूला ऐशी जाची,घोडदौड संताजीची."
क्रूर कर्मे करणाऱ्या बलाढय़ मोगलांनी सेनापती संताजीरावांना "सैतान" म्हणावं यातच सर्व सार येतं.आपल्या पराक्रमाने मराठ्यांची होऊ पाहणारी हार थोपवून,बाजी पलटवून औरंगजेबासह सर्व मोगलांनाच मराठ्यांच्या दहशतीखाली आणणारे हे सेनापती. यांचं कर्तृत्व वर्णन करायला इतिहासकारांना शब्द अपुरे पडतात.आणि अशा या महापराक्रमी सेनापतींच्या आणि त्याच्या कर्तबगार पत्नींच्या समाधीस्थळ जीर्णोद्धाराची, एकोणीस वर्षापूर्वीची, हकीकत आज तुमच्यासमोर ठेवत आहे.
सांगलीचे शिवभक्त श्री. नाना यादव यांच्यामुळे माझी प्रा.सुरेश गायकवाड (वनस्पती व प्राणीशास्त्र तज्ञ) यांच्याशी ओळख झाली. निसर्गशास्त्रातले हे माझे गुरू.गायकवाड सरांचे मित्र दानोळी (ता.शिराळा,जि.कोल्हापूर) येथील खर्डीकर सरकार. आणि खर्डेकर सरकारांचे स्नेही सेनापती कापशी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत सेनापती राणोजीराजे घोरपडे सरकार(सेनापती संताजीरावांचे थेट १३ वे वंशज व विद्यमान सेनापती).दोन्ही सरकार शिकारीचे शौकीन.मीपण प्राणी,पक्षी shoot करायचो,पण कैमेऱ्याने.दिवसा,रात्री आणि पहाटे मला आणि नानांना घनदाट, अनवट जंगल अनुभवता आले ते राजेसाहेबांमुळे.यातून राजेसाहेबांशी आपुलकीचे नाते निर्माण झाले. सेनापती कापशी येथील सेनापती संताजीरावांचा आणि त्यांच्या पत्नी द्वारकाबाईसाहेब यांच्या समाधीचे दर्शन झाले. हे साल होते १९९८.
सेनापती संताजीरावांची १६९७ साली दग्याने केली गेलेली हत्या आपणा सर्वांना माहिती आहे. मराठ्यांच्या इतिहासातील हा मनाला अत्यंत यातना देणारा विषय आहे.त्यावर अनेक इतिहासकारांचे लिखाण उपलब्ध आहे. पण सेनापती संताजीरावांच्या समाधीस्थळांविषयीची माहिती फारशी प्रचलित, प्रसिद्ध नाही.
इथंच सेनापती संताजीरावांच्या समाध्यांविषयी माहिती मी नमूद करतो.जिथे मारेकऱ्यांनी संताजीराव सकाळी ओढ्याकाठी पूजेत मग्न असताना त्यांची हत्या केली व शीर कापून नेले त्या कण्हेर इस्लामपूर गावी संताजीरावांच्या धडाचा अग्नीसंस्कार तिथेच संताजीरावांबरोबर असलेल्या त्यांच्या मोजक्या सैनिकांनी ग्रामस्थांच्या मदतीने केला अशी स्थानिक परंपरागत माहिती उपलब्ध आहे. तिथल्या ओढ्याकाठी असलेली समाधी सेनापतींच्या धडाची समाधी मानली जाते व त्या चौकाला सेनापती संताजी घोरपडे चौक असेच नाव आहे.
संताजीरावांचे शीर मारेकरी आपल्या घोड्याच्या तोबऱ्यात ठेवून घेऊन निघाले. (तोबरा म्हणजे घोड्याच्या गळ्यात अडकवायची बादली.यात घोड्याचे खाद्य ठेवले जाते.भूक लागेल तेव्हा घोडं स्वतःच या तोबऱ्यात तोंड घालून खाद्य खातं.) हे शीर अनवधानाने कारखेल (म्हसवडजवळ) गावच्या माळावर पडले. संताजीरावांच्या मागावर असलेल्या एका मोगल सैन्यतुकडीने हे शीर औरंगजेबाकडे माचणूरच्या छावणीत नेले.हिंदू धर्मशास्त्रानुसार जिथे शीर प्रत्यक्ष जमिनीवर पडते,ते मृत्यूस्थान मानले जाते. त्यामुळे कारखेलच्या माळावर संताजीरावांची आणखी एक समाधी आहे.संताजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी द्वारकाबाईसाहेबांनी कापशी गावी कायमस्वरूपी वास्तव्य केले.ह्यांनी घोरपडे घराण्यावर आलेल्या या भयानक परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला.संताजीरावांचे पुत्र राणोजीराव आणि पिराजीराव यांनी द्वारकाबाईसाहेबांच्या भक्कम आधाराने पुढे आपल्या पराक्रमी पित्याचा वारसा तश्याच शौर्याने चालविला. संताजीरावांच्या अस्थी द्वारकाबाईसाहेब यांनी जपून ठेवल्या होत्या.स्थिरस्थावर होताच कुरुंदवाड येथील कृष्णा - पंचगंगा संगमावर संताजीरावांच्या अस्थीचे विधीवत विसर्जन करण्यात आले. येथे विस्तीर्ण असा घोरपडे घाट व सुब्रम्हणेश्वराचे मंदिर घोरपडे घराण्याकडून बांधण्यात आले.इथे असलेली संताजीरावांची समाधी या अस्थीविसर्जनाच्या प्रसंगामुळे बांधण्यात आली.
संताजीरावांचा अस्थीकलश आत ठेऊन बांधलेली टुमदार दगडी समाधी आहे ती सेनापती कापशीमधे.( ता.कागल,जि.कोल्हापूर).
आत अस्थी असल्याने ही संताजीरावांची मुख्य समाधी आहे.द्वारकाबाईसाहेबांनी आपल्या पराक्रमी पतीची ही अस्थीकलशासह असलेली समाधी कापशीमधे बांधून समाधीची नित्यपूजा चालू केली.द्वारकाबाईसाहेबांच्या निधनानंतर सेनापती संताजीरावांच्या समाधीच्या शेजारीच उजवीकडे द्वारकाबाईसाहेबांचे दगडी वृंदावन बांधण्यात आले.त्यांच्या कर्तबगारीमुळे कापशीकर सेनापती घोरपडे घराणे पुन्हा उर्जितावस्थेत आले असल्याने त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव तेव्हापासूनच पाच दिवस चालतो.या दोन्ही समाध्या आजतागायत नित्यनेमाने पूजल्या जातात.
या समाधीवर सागवानी सुरुदार खांब आणि महिरपीच्या कमानींनी सजलेला मंडप (कौलारु छत)बांधण्यात आला होता.राजेसाहेब (श्रीमंत सेनापती राणोजीराजे) आणि आईसाहेब (राजेसाहेबांच्या पत्नी) यांनी सव्वादोनशे वर्षापूर्वीचा हा मंडप थोड्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याने १९९५ साली उतरवून पुन्हा नीट करून उभारण्याचे ठरवले. मंडप उतरविण्यात आला व द्वारकाबाईसाहेब यांच्या समाधीसाठी तत्काळ स्वतंत्र खोली बांधण्यात आली.
ह्यानंतर जुना मंडप पुन्हा होता तसा उभारण्याचे काम राजेसाहेबांनी हाती घेतले. आईसाहेबांनी स्वतः लक्ष घालून काम करून घ्यायचा निश्चय केला.कामासाठी कंत्राटदार नेमण्यात आला.त्याने काम चालू केले आणि लगेचच त्याला वेडाचा झटका येऊन तो मनोरूग्ण झाला. काम बंद पडले.काही काळाने दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला.त्याने काम चालू केले आणि लगेचच त्याच्या मोटरसायकलचा अपघात होऊन त्याला एक पाय कायमचा गमवावा लागला. काम पुन्हा बंद पडले.आईसाहेबांनी आता स्वतःच कामगार ठरवून काम हाती घेतले.पण इतक्या विचित्र अडचणी येऊ लागल्या की काम सुरुच होईना.
आता मात्र राजेसाहेब व आईसाहेबांना वेगळीच शंका येऊ लागली.अध्यात्मिक गुरूंचा,देवरूषांचा आणि अशा क्षेत्रातील काहींचा सल्ला घेण्यात आला.यातून शेवटी असा निष्कर्ष काढण्यात आला की "संताजीबाबा (सेनापती संताजी घोरपडे) हे अत्यंत कडाक्याचे उग्र दैवत आहे.त्यांच्या मनात आल्याशिवाय आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय हे काम होणार नाही. जो काम करायचा प्रयत्न करेल त्याचे काही ना काही वाईट होणार. त्याला शिक्षा मिळणार."
तीनवेळा वाईट अनुभव आलेलाच होता. त्यामुळे यावर विश्वास ठेवून राजेसाहेब व आईसाहेबांनी ठरवले की,"केवळ आपले हे काम व्हावे म्हणून इतरांचे आयुष्य धोक्यात घालायचे नाही. आपले काम जेव्हा आणि ज्यांच्याकडून व्हायचे असेल तेव्हा होईल.आपण आता या फंदात न पडलेले बरे.उगाच विषाची परिक्षा बघायला नको."
मी व नाना यादव २००२ पर्यंत राजेसाहेबांच्या घनिष्ट परिचयाचे झालो होतो.नानांचा इतिहासाविषयीचा अध्यात्मिक दृष्टीकोन आणि माझ्या किल्ले, मराठ्यांची समाधीस्थळे या विषयात चालू असलेला अभ्यासाबद्ल राजेसाहेब अत्यंत कौतुक करीत. नेमका याचाच फायदा घेऊन आम्ही दोघांनी एकदा थोडे बिचकतच सेनापती संताजीराव व द्वारकाबाईसाहेब यांच्या समाध्यांच्या अवस्थेचा विषय काढला.यावेळी राजेसाहेबांनी त्यांनी समाधीचे कार्य हाती घेतल्यावर आलेले ,वर उल्लेखलेले,वाईट अनुभव सांगितले आणि याचमुळे समाधीस्थळे नीट करता आली नाहीत याचे दु:खही बोलून दाखवले.
यावेळची समाधीस्थळांची अवस्था सांगतो.द्वारकाबाईसाहेबांच्या समाधीला तीन बाजूंनी भिंती घालून स्लैब टाकलेला होता.दर्शनी बाजू मोकळीच होती.पूर्वीच्या मंडपातील दगडी फरशी काही ठिकाणी उखडली होती आणि सांध्यात फटी पडल्या होत्या.मंडप पूर्णपणे उतरवून मंडपाचे खांब कमानी व इतर साहित्य वाड्यात नेऊन ठेवले होते.सेनापती संताजीरावांची समाधी मोकळ्यावरच होती.या समाधीचे छत गळत होते.वरचा कोबा फुटला होता.दगडी भिंतीत ठिकठिकाणी दर्जा निघून गेल्याने फटी पडल्या होत्या.त्यामुळे अंतर्भागात ओल येत होती.काही झुडपे आवारात फोफावली होती.आवाराला कुंपण नसल्याने समाधीला ठेवलेला नैवैद्य खायला सोकावलेल्या कुत्री, शेळ्या अशा जनावरांचा मुक्त वावर इथे चालायचा. राजेसाहेबांच्या मनात जीर्णोद्धार करायचा असूनही आलेल्या अनुभवामुळे आणि वर सांगितलेल्या धास्तीमुळे समाध्या १९९८ पासून याच परिस्थितीत होत्या.
सर्व हकीकत राजेसाहेबांनी सांगताच मी आणि नाना कोड्यात पडलो.आमच्या मनात समाधी जीर्णोद्धार झालाच पाहिजे ही ठाम भावना होती.नाना दैवी बाबींवर विश्वास असलेले तर मी स्वतःला अनुभव आल्याशिवाय विश्वास न ठेवणारा! पण शेवटी "काय व्हायचे ते होऊदे पण आपण हे काम करायचेच " असा निश्चय आम्ही दोघांनी केला.
पुढच्या कापशी भेटीत आम्ही राजेसाहेब व आईसाहेबांना "आम्हाला हे काम करायचे आहे" असे सांगताच आईसाहेबांनी विरोध केला. त्या म्हणाल्या " तुम्ही दोघेही आमच्या घराण्याशी आता चांगले परिचित झाला आहात. पूर्वी समाधीचे काम करू पाहणाऱ्यांची काय अवस्था झाली हे मी पाहिले आहे. तुम्हा दोघांना या धोक्यात मी घालू शकत नाही."
पण आम्ही आता जणू हट्टच धरला."आमचे काय होईल याची पूर्ण जबाबदारी आमची.तुम्ही फक्त परवानगी द्यावी." आमच्या मनात एक खात्री होती "जर देव असेलच तर या कडक आणि उग्र देवाला आमची शुध्द श्रध्दा आणि भक्तीभाव निश्चित कळेल आणि हे काम आपल्याकडून होणार."अखेर आईसाहेबांनी परवानगी दिली. पण एक अट घातली,"कामाचे साहित्य व मजुरीचा सर्व खर्च
आम्ही करु.ते आमचे कर्तव्य आहे.तुम्ही दोघांनी प्रत्यक्ष जागेवर काम करून घ्यायचे."
आम्ही तत्काळ कामाला लागलो.खांबांचे दगडी तळखडे,खांब,कमानी,कौलाखालील लाकडी कैच्या (Truss), दगडी फरशी, समाधीचे एकूण आवार याची मोजमापे घेऊन नकाशा तयार केला.पूर्वी काढलेले सर्व साहित्य वापरुनच हे काम करायचे होते.त्यामुळेच त्याचे अस्सलपण, जुनेपण जपले जाणार होते.वाड्यात ठेवलेल्या खांबकमानी,कैच्या नीट मजबूत करून घेतल्या आणि राजेसाहेबांच्या हस्ते समाधीपूजन करून, नारळ वाढवून कामाला सुरुवात केली.
झाडीझुडपे मुळापासून उकरुन काढून परिसर पूर्ण स्वच्छ केला गेला.वीट बांधकामात तळखड्यासह आणि कमानींसह खांब फिट केले गेले.वरच्या कैच्या बसवून त्यावर कौले घालण्यात आली.दगडी फरशीची डागडुजी करण्यात आली.गिलावा करण्यात आला.द्वारकाबाईसाहेबांच्या समाधीची डागडुजी करून समोरची राहिलेली भिंत खांबकमानीसह उभी झाली. सेनापती संताजीरावांच्या समाधीवरील छताची गळती काढून वर भगव्या ध्वजासाठी पाईप बसविण्यात आला.दगडी भिंतीच्या फटी पूर्ण बंद करण्यात आल्या.ह्या दगडी भिंतीना आधुनिक काळात लावण्यात आलेला रंग निघता निघेना.मग दगडी रंगात या भिंती रंगवायचे ठरवले गेले. संपूर्ण आवाराला कंपाउंड घालण्यात आले. अडीच फुटाच्या दगडी बांधकामावर तीन फुटाची जाळी बसवून गेटही बसवले गेले.गेटला कुलूप असणे गरजेचेच होते.मात्र काही कारणाने दर्शनाला आलेल्या व्यक्तीला किल्ली उपलब्ध झाली नाही तर किमान बाहेरून तरी दर्शन घेता यावे यासाठीच कंपाउंडच्या वरच्या भागात जाळी बसविलेली आहे.
हे सर्व पूर्ण व्हायला आठनऊ महिने लागले.कारण मी व नाना रहायला सांगलीत होतो.तिथून कापशी ११० कि.मी.दूर आहे.बहुतांशी कामगार आम्ही सांगलीतूनच नेले.कापशी तसे थोडे आडबाजूचे गाव. बांधकाम साहित्य २५ कि.मी.वर असलेल्या निपाणीतून आणावे लागायचे.आमच्या सतत सांगली - कापशी- निपाणी फेऱ्या चालू असायच्या.पण बांधकामात नेहमी येणाऱ्या अटळ अडचणींशिवाय इतर कुठलीही अडचण हे काम करताना आली नाही. बघताबघता २००२ च्या अखेरीस हे जीर्णोद्धार कार्य निर्विघ्नपणे पार पडले.
होणारच नाही असे वाटणारे काम मूर्त आणि पूर्त स्वरूपात समोर दिसू लागले.राजेसाहेब आणि आईसाहेब अत्यंत आनंदित झाले.तत्काळ शुभदिवस पाहून समाधीपूजन करून नवा भगवा ध्वज लावण्यात आला.महाप्रसाद करण्यात आला.सर्व ग्रामस्थ आणि परिचित लोकांना बोलाऊन हा सोहळा करण्यात आला. सेनापती संताजीराव आणि द्वारकाबाईसाहेब घोरपडे यांची समाधीस्थळे आता लोकांना नीट अवस्थेत दिसू लागली.
महाप्रसादानंतरची सर्व कामे आटोपून आम्ही दोघे निरोप घेण्यासाठी वाड्यावर गेलो.निघताना आईसाहेब पाचशे रुपयांचे पूर्ण बंडल हाती घेऊन मला म्हणाल्या "प्रवीण, न होणारे काम केलेत तुम्ही दोघांनी. दिवसाआड सांगलीहून कापशीला फेऱ्या मारल्यात.स्वतः कामावर थांबून काम करून घेतलेत. तुम्हालाही खर्च झालेलाच आहे. मी ही जी रक्कम देत आहे ती घ्यावीच लागेल."आपोआप माझे हात जोडले गेले आणि म्हणालो "आईसाहेब फक्त आशीर्वाद द्या. अशा पवित्र कामाबद्दल रक्कम घेतली तर घोरपडे घराण्याच्या माझ्यावरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर असलेल्या उपकारातून काही अंशीतरी उतराई व्हायचे माझे पुण्य,श्रेय हिरावले जाईल.तरीही काही देणारच असाल तर टॉवेल -टोपीचा आहेर द्यावा.मी पैसे घेणारच नाही."
आईसाहेबांना माझी भावना पूर्ण कळली.टॉवेलटोपीसह पोशाखाची वस्त्रे स्वीकारली आणि अत्यंत समाधानाने मी व नाना सांगलीकडे निघालो. नाना म्हणाले " परिक्षेत पास झालास." मी म्हणालो " देव असतो का नाही हे मला अजून माहिती नाही. पण जर असेलच तर त्याला स्वार्थी हेतूने केलेलं काम आणि निखळ भक्तीनं केलेलं काम यातला फरक निश्चित कळत असणार. तुमच्या दृष्टीने पाहिले तर यामुळेच काम पूर्ण झाले असंही म्हणता येईल."
देव,दैववाद, नियती,कर्मफळ यावर विश्वास ठेवायचा का नाही हा ज्याचा-त्याचा वैयक्तीक निर्णय असतो.यावरील विश्वासामुळेच काम पूर्ण होईपर्यंत राजेसाहेब आणि आईसाहेबांच्या जीवाला आम्हाला काहीतरी होईल या विचारानं चैन पडत नव्हती. पण मी मात्र बिनधास्त होतो.हे काम पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे आणि आपली भावना पवित्र असल्याने आपण यशस्वी होणार यावर मात्र माझा ठाम विश्वास होता.यापलीकडे कुठलाही विचार करण्याची मला गरजच नव्हती.कोणत्याही प्रकारचा दैवी म्हणता येईल असा त्रास मला झाला नाही. उलट हे कार्य झाल्यानंतर अनेक चांगल्या घटना माझ्या बाबतीत घडल्या.हा दैवी खेळ का निव्वळ योगायोग हे मात्र मला अजूनही कळालेले नाही.
महाराष्ट्रात जन्माला येऊन प्रत्यक्ष सेनापती संताजी घोरपडे व त्यांच्या कर्तबगार पत्नी द्वारकाबाईसाहेब यांच्या समाधीस्थळांच्या जीर्णोद्धाराच्या पवित्र आणि अत्यंत दुर्लभ कार्यात आपले योगदान अर्पण करायची सुवर्णसंधी मला मिळाली.सेनापती संताजी घोरपडेंच्या थेट वंशजांकडून,विद्यमान सेनापतींकडून मला या कामापोटी भरभरून आशीर्वाद मिळाले. कुणाही मराठी माणसाला,शिवस्वराज्यभक्ताला, "आपल्या आयुष्याचे सार्थक झाले "असे मानायला अजून काय लागते?
प्रवीण भोसले
(लेखक - मराठ्यांची धारातीर्थे)
* फोटोखालील माहिती ओळी वाचाव्यात.
* तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
* माहिती आवडली तर पोस्ट
शेअर करावी.
* आपापल्या परिसरातील स्वराज्यवीरांची समाधीस्थळे जीर्णोद्धारीत करण्यासाठी ही माहिती शिवभक्तांना उपयुक्त, प्रेरणा देणारी ठरली तर या पोस्टचा मूळ हेतू सफल होईल.
* श्री.नाना यादव - 9923682093
* प्रवीण भोसले - 9422619791

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...