विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज-१४

 


छत्रपती शिवाजी महाराज-१४
--------------------------
जयसिंगाच्या विश्वासू हेरांना देखील शिवाजी महाराजांचा ठाव ठिकाणा पाच नोव्हेंबर 1666 पर्यंत लागला नव्हता. रामसिंगाची मनसब आणि जहागीर काढून घेतली होती. विजापूर जिंकण्याची त्याची महत्त्वाकांक्षाही पुरी झाली नाही. त्यामुळे बादशहा त्याच्यावर नाराज होता. त्याने 1667 च्या मे मध्ये शहजादा मुअज्जम याला दख्खनच्या सुभेदार पदी नियुक्त केले. तो औरंगाबादला आला आणि जयसिंगाला त्याच्या जबाबदारीतून मुक्त केले. अपयशाने खचलेला चिंताग्रस्त जयसिंग खंगत चालला होता. जयसिंग परत राजधानीकडे निघाला असता बुऱ्हानपुरात 28 ऑगस्ट 1667 रोजी त्याचा मृत्यू झाला.(बादशहानेच त्याचा खून करविला अशीही वदंता आहे.)
छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्याची नीट घडी बसवायची होती. त्यामुळे त्यांनी जसवंत सिंग ला मध्यस्थी करण्याची विनंती करून मुघलांशी तह केला - जर तुमच्या मध्यस्थीने मला क्षमा केली तर मी शंभूराजांना शहजाद्यांच्या दिमतीला पाठवून देईन आणि ज्या ठिकाणी आदेश दिला जाईल तिथे माझ्या फौजेसह मनसबदार म्हणून ते जातील.
जसवंत सिंग आणि शहजादा मुअज्जम यांनी बादशहाकडे शिवाजी राजांची शिफारस केली. बादशहाने ही तो प्रस्ताव स्वीकारला तसेच शिवाजी राजांना 'राजा' हा किताब बहाल केला. या तहानुसार संभाजी राजे चार नोव्हेंबर 1667 रोजी औरंगाबाद येथे सुभेदाराच्या दरबारात हजर झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली.
पाच ऑगस्ट 1668 रोजी प्रतापराव आणि निराजी रावजी यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौज औरंगाबादला पाठवली. संभाजी राजांना पुन्हा एकदा पाच हजारी मनसबदारी दिली. एक हत्ती व रत्नजडित तलवार भेट दिली. त्यांना वऱ्हाडची जहागीर दिली. शिवाजी राजे ही 'औरंगजेबाचा जहागीरदार' असल्याचे इंग्लिश लोकांनी म्हटले आहे. शिवाजी अतिशय शांत असून बादशहाच्या आदेशाचा अवमान करत नाही असे इंग्रजांनी नमूद केले आहे.
शिवाजी महाराज 1667 1668 आणि 1669 अशी तीन वर्षे शांत राहिले. ते अत्यंत सुज्ञ पणे नियमांचे संच बनवीत होते आणि त्या आधारावरच त्यांच्या सरकारच्या कार्यपद्धतीचा सखोल व व्यापक पाया घातला. त्यांचे नियम व कार्यपद्धती सर्वांच्या कौतुकाचा व प्रशंसेचा विषय बनले.
शहजाद्याशी शिवाजीराजांची मैत्री औरंगजेबाला खटकत होती. त्यामुळे आपल्या सिंहासनाला धोका पोहोचेल अशी शंका येऊन त्याने शिवाजी राजांना पुन्हा एकदा पकडण्याचा किंवा त्यांच्या मुलाला व सेनापतीला ओलीस म्हणून ठेवण्याचा कट रचला. औरंगजेबाने आपल्या मुलाला प्रतापराव गुजर आणि निराजी पंत यांना अटक करून फौज जप्त करण्याचा आदेश दिला. शहजाद्यापर्यंत हा आदेश येण्याआधीच दरबारातील माणसांकडून त्याला त्याची माहिती मिळाली. त्याने निराजीला सांगून तिथून निसटण्यासाठी मदत केली. शाही आदेश मराठे निसटल्यानंतर एक आठवड्याने आला!
औरंगजेब बादशहाला इराणी लष्कराचा धोका टाळण्यासाठी पंजाब मध्ये मोठं सैन्य पाठवावे लागलं होतं. तसेच 1667 च्या मार्चमध्ये पेशावर मध्ये युसुफझाईने बंद केलेलं होतं. ते निपटून काढण्यासाठी सुमारे वर्षभर आपली सर्व ताकद तिकडे लावावी लागली होती. त्यामुळे औरंगजेबाला आर्थिक कारणामुळे दख्खन मधील फौजेत मोठी कपात करण्याचा हुकूम द्यावा लागला. तसेच संभाजीराजेंना दिलेली वऱ्हाडातील नवीन जहागीर जप्त करण्याचाही हुकूम दिला. याचे कारण शिवाजी राजेंना आग्र्याला येताना शाही खजिन्यातून वाट खर्चासाठी एक लाख रुपये दिले होते ते वसूल करण्यासाठी हा निर्णय घेतला होता.
शिवाजी महाराजांनी आपले लष्कर सुसज्ज केले. मोगलांनी काढून टाकलेली फौज आता त्यांच्याकडे आली आणि ती त्यांनी ठेवून घेतली. तसेच औरंगाबाद येथील प्रतापरावांची फौजही तेथून निष्टून लूटमार करीत परत आले.
11 डिसेंबर 1669 रोजी शिवाजी महाराजांच्या चार मराठा सेनापतींनी शाही सेवा सोडल्याची खबर बादशहाला मिळाली. लगेच दिलेरखानाला गोंड सोडून औरंगाबाद मध्ये जाण्याचा आदेश दिला. तसेच दाऊद खानाला खानदेश मुलखाची संरक्षणाची तजवीज करण्यास आणि शहजाद्याच्या सहाय्यासाठी जावे असेही सांगितले. उत्तरेतील काही अधिकाऱ्यांनाही दख्खन मध्ये पाठवले.
शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहाद्वारे दिलेल्या किल्ल्यांपैकी बहुतांश किल्ले परत ताब्यात घेतले. 4 फेब्रुवारी 70 रोजी उदयभानू कडून कोंढाणा तानाजी मालुसरे तीनशे निवडक मावळ्यांच्या सैन्यासह जिंकला. तानाजी पडले परंतु मराठ्यांनी बाराशे रजपुतांची कत्तल केली. शिवरायांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले आणि कोंढाण्याचे नाव सिंहगड असे ठेवले.
निळोपंतांनी 8 मार्च रोजी पुरंदर जिंकला आणि रजाउद्दीन खान या त्याच्या किल्लेदाराला कैद केले. काही दिवसांनी चांदोर हे गाव लुटून तिथून शाही मालिकेचे एक हत्ती, बारा घोडे आणि 40 हजार रुपयाची लूट मिळवली.
फेब्रुवारी 1670 मध्ये शिवाजी राजांनी माहुली गडावर हल्ला केला परंतु तिथे त्यांना रजपूत मनोहर दास गौर यांच्या पराक्रमामुळे माघार घ्यावी लागली. त्यानंतर महाराजांनी कल्याण भिवंडी वर विजय मिळवून तिथला ठाणेदार ऊस बेगखान्याला ठार केले आणि मुघलांचे चौक्या पहारे उध्वस्त केले. लुदि खान हा कोकणचा फौजदार मराठ्यांबरोबर झाल्या युद्धात जखमी झाला.
नांदेड येथे मुघल फौजदार मराठी आल्याच्या बातमीनच आपलं ठाणे सोडून भयभीत होऊन पळून गेला. दाऊद खान 28 मार्च 1670 रोजी अहमदनगरला आला आणि पारनेर जुन्नर ताब्यात घेतले. एप्रिल मध्ये राजांनी अहमदनगर जुन्नर आणि परांडा यांच्या जवळच्या खेड्यात लूट केली.
माहुली येथे किल्लेदार मनोहर दासाला शिबंदी व सुविधा मिळाल्या नाहीत त्यामुळे त्याने आपले पद सोडले. राजांनी ही संधी साधून 16 जून रोजी माहुलीगड घेतला. तेथील नवीन किल्लेदार अलावधी बॅग आणि त्याच्या 200 लोकांना कापून काढले.
बादशहाच्या आदेशानुसार दिलेरखान मोजमशी भेट घेण्यासाठी 29 मार्च 1670 रोजी नागपूरतून निघाला. तथापि तो सहजाद्याला भेटलाच नाही याउलट त्याने बादशहाकडे तक्रार केली की शहजाद्याने शिवाजीची संगणमत केले असून शाही मुलकाच्या संरक्षणासाठी काही केलेले नाही. शहजादा मौसम आणि जसवंत सिंग यांनी दिलेरखानाने बंड केल्याची तक्रार बादशहाकडे केली.
बादशहाने खाने सामान युक्ती कारखान याला परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दख्खन मध्ये पाठवले. त्याने दुतोंडी व्यवहार केला. त्यामुळे दिलेरखान आणि शहजादा मोजम यांच्यातील तणाव अधिकच वाढला.
दिलेरखानाला अज्ञाधारक बनवावं असा शाही आदेश शहजाद्याला August मध्ये आला. शहजाद्याने दिलेरखानाशी युद्ध करण्यासाठी सैन्य जमा केले. यावेळी दिलेरखान मराठ्यांच्या पाठलागावर होता. शहजादा व जसवंतसिंह शाही आदेशानुसार पाठलाग करत आहेत असे समजताच तिथून तो सैन्यासह माळव्यात पळून गेला. तोपर्यंत सप्टेंबर मध्ये औरंगाबाद येथे परत जाण्यासाठी शाही आदेश आला. तसेच जसवंत सिंग याची नेमणूक बुऱ्हानपूर येथे करण्यात आली. त्यामुळे सहजादा औरंगाबादला टेंबर अखेरीस परत आला.
3 ऑक्टोबर 1670 रोजी शिवाजी महाराजांनी सुरतेची दुसऱ्यांदा लूट केली. तीन दिवसात राजांनी 66 लाखांची लूट नेली. राजे सुरते वरून नाशिक कडे बागलाण मध्ये आले व मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खेड्यांमध्ये त्यांनी लूट केली.
शहजादा मुआज्जमला हे समजताच त्याने दाऊद खानाला बुऱ्हाणपूरहून बोलावून घेतले आणि त्यास मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवून दिले. दाऊद खानाने आपलं अवजड सामान वैजापूरहून औरंगाबादला पाठवलं आणि हलकं सामान घेऊन तो चांदोरला आला. त्याला हेरांकडून राजे मुल्हेर वरून निघाल्याची बातमी समजली होती व ते कांचन मंचन घाटातून पर्वतरांगा ओलांडणार असल्याचे समजले होते. म्हणून तो चांदोरला थांबला. मध्यरात्री त्याला समजले की राजे अर्धी फौज घेऊन पुढे नाशिकला गेले आहेत. दाऊद खानाने लगेच कुच केले. परंतु चंद्र मावळल्यामुळे थोडा गोंधळ उडाला. बहलोलखानाचा मुलगा इखलास खान मियाना आघाडीवर होता. त्याची मराठ्यांच्या सैन्याशी गाठ पडली व तो जखमी झाला. तोपर्यंत दाऊद खान तिथे आला आणि जोरदार लढाई सुरू झाली. संग्राम खान घोरी आणि त्याचे नातेवाईक जखमी झाले व अनेक सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. मी रब्दुल मामूद हा तोफखान्याचा दरोगा व एक मुलगा जखमी झाले आणि त्याचे इतर मुलगी आणि अनेक सैनिक ठार झाले. ही लढाई 17 ऑक्टोबर रोजी दिंडोरी जवळ लढली गेली. त्यानंतर सुमारे एक आठवड्यात नाशिकच्या मुलखातील त्रिंबक गड सर केला. दाऊद खान उरल्या सुरल्या सैनिकांसह सुमारे महिनाभर नाशिक येथे राहिला.
1670 डिसेंबरच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील मराठा फौजेन अहिवंत मार्कंडा बागलांजवळील रवळा आणि जावळा हे किल्ले जिंकून घेतले व खानदेशात लूट केली.
कारंजा या वऱ्हाडातील शहराची संपूर्ण लूट केली ती 4000 बैलांवर आणि गाढवावर लादून नेली. ही लूट कोट्यावधी रुपयाची होती. कारंजा आणि नंदुरबार शेजारच्या गावांमध्ये श्रीमंताकडून मराठ्यांना चौथाई देण्याच्या लेखी हुंड्या घेतल्या. मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील आणखी एक मराठा फौज खानदेश व बागलाण प्रदेशात लूट करत होती. आता या दोन्ही भाऊजा एकत्र येऊन त्यांनी साल्हेर किल्ल्याला वेढा घातला. 5 जानेवारी 1671 रोजी किल्लेदार अतुला खान ठार झाला व किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठ्यांची ही घोडदौड पुढे चालू राहिली आणि मुल्हेर चौरगड हलगड घोडप या किल्ल्यांवर ही छापे टाकले.
1671 मध्ये बुंदेलखंडातील चंपत्राय बुंदेला यांचा मुलगा छत्रसाल शिवाजी राजांच्या भेटीला आला. जयसिंगाच्या शिफारशीवरून तो मुघल फौजेत होता. परंतु गोंड मूलखावरील आक्रमणावेळी त्याला योग्य बक्षीस न मिळाल्यामुळे तो एके दिवशी शिकार करण्याच्या निमित्ताने पत्नीसह बाहेर पडला व आड रस्त्याने महाराष्ट्रात आला. त्याने महाराजांना मोगलांच्या विरोधात लढण्याची इच्छा सांगितली. शिवाजी महाराज त्याला म्हणाले -"हे नामवंत वीरा तुझ्या शत्रूंवर हल्ला कर आणि त्यांचा नायनाट कर. तुझ्या मातृभूमीत राहून तुझ्या जहागिरीवर राज्य कर. तेथून शत्रुत्वाला सुरुवात करणे इस्ट ठरेल. कारण तिथे तुला अनेक निष्ठावान मिळतील. जेव्हा जेव्हा मुघल तुझ्यावर आक्रमण करतील तेव्हा मी तुझ्याशी सक्रिय सहकार्य करून त्यांच्या योजना उधळून लावेन."
अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी छत्रसालाला आदराने वागवून सन्मानाने परत पाठवले.
दिलीप गायकवाड.
१५-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...