विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज - १३

 


छत्रपती शिवाजी महाराज - १३
-----------------------------
नजर कैद व आग्र्याहून अभूतपूर्व आगमन -
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल दरबाराचे रितीरिवाज मोठ्या त्वेषाने व संतापाने पायदळी तुडविले होते. त्यामुळे औरंगजेबाची खूप नाचक्की झाली होती. त्यांनी जयसिंगाला सुद्धा सोडले नव्हते. भरीस भर म्हणून वजीर शाहिस्तेखानाची बहीण आणि बादशहाची बहीण जहाॅंआरा शिवाजीचा सूड घ्यावा म्हणून औरंगजेबाच्या पाठी लागल्या होत्या. कारण शिवाजीने शाहिस्तेखानाची पूर्ती बेअब्रू केली होती आणि जहाॅंआराला भेटी दाखल मिळालेले सुरत शहर लुटले होते. त्यामुळे शिवाजीला ठार तरी करावे किंवा नजर कैदेत ठेवावे असे निश्चित झाले होते. म्हणून औरंगजेबाने शिवाजी महाराजांना राडंदाज खानाच्या घरी हलवण्याचा हुकूम दिला.
रामसिंग मुख्य कोषाध्यक्ष मोहम्मद अमीन खान कडे गेला. त्याने सांगितले की-' बादशहान शिवाजीला ठार करायचं ठरवलं आहे पण माझ्या वडिलांनी शपथेवर त्याच्या सुरक्षिततेची हमी घेतली आहे म्हणूनच शिवाजी इथे आलेला आहे. त्यामुळे बादशहाने आधी मला ठार करावे आणि त्यानंतरच शिवाजीच काय करायचं ते ठरवावं.
औरंगजेबाने रामसिंगाच्या याचनेचा विचार करून सांगितले की - 'राम सिंघाने शिवाजी राजांच्या वर्तनाची आणि पळून जाणार नाही किंवा खोडसाळपणा करणार नाही याची हमी देणारा सुरक्षा नामा लिहून द्यावा; थोडक्यात जामीन रहावे.' राम शिंगाने ती गोष्ट लगेच केली आणि औरंगजेबाने लगेच हुकूम काढला-"रामसिंगान शिवाजी बरोबर अफगाणिस्तानात जावं आणि व आफ्रिकन बंडखोरांशी लढा द्यावा." राडंदाज खानाला फौजेचे नेतृत्व दिले होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांना वाटेतच ठार करण्याचा कट होता.
औरंगजेब जयसिंगाला दुखावू इच्छित नव्हता. त्यामुळे त्याने जयसिंगा साठी खलीता पाठवून त्यांनी शिवाजी महाराजांना कोणती वचन दिली होती ते विचारले. हे उत्तर येईपर्यंत काही आठवडे जाणार होते. शिवाजी महाराजांनी त्याचा अचूक फायदा उठवला आणि नजर कैदेतून निष्टून जाण्याची योजना आखली. त्यांनी औरंगजेबाच्या मंत्र्यांना आपली बाजू लावून धरण्यासाठी लाच दिली. 20 मे रोजी जाफरखानाने शिवाजी महाराजांची याचिका बादशहा समोर हजर केली. तीत महाराजांनी आपल्या आधीच्या गुन्ह्यांबद्दल माफी मागितली होती आणि त्यांचा जीव वाचवावा अशी विनंती केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांना काबुलला पाठविण्याचा आदेश मागे घेतला.
29 मे रोजी शिवाजी महाराजांची आणखी एक याचिका मुख्य कोषाध्यक्ष बक्षी याने बादशहा पुढे सादर केली. राजांनी आधी घेतलेले त्यांचे सर्व किल्ले परत दिले आणि त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली तर दोन कोटी रुपयांची खंडणी देण्याचे वचन दिले होते. तसेच बादशहाच्या बाजून विजापूरशी लढा देण्याचाही वचन दिलेलं होतं.
आता शिवाजी महाराजांच्या निवासाभोवतीचा पहारा आणखी कडक केला. बाहेरच्या बाजूने सिद्धी फौलाद या आग्र्याच्या प्रमुख फौजदारांने तोफान सह मोठ दल तैनात केलेलं होतं. निवासाच्या आतील सुरक्षा रामसिंग यांच्या रजपूत अनुयायांकडे होती. ते राजांच्या तंबू भोवती गस्त घालत होते. आता शिवाजी राजे खरेच कैदी झाले होते त्यामुळे ते निराश झाले आणि युवराज संभाजी ना छातीशी कवटाळून विलाप केला.
शिवरायांनी आता आपल्या बुद्धीचातुर्याने निष्टून जाण्याचा बेत आखला. त्यांनी रामसिंगाला बादशहाला दिलेला सुरक्षानामा रद्द करायला लावला. त्यानंतर 7 जून रोजी आपल्या सोबत आलेले सर्व अधिकारी आणि सैन्य व सुरक्षारक्षकांना घरी परत पाठवून दिल. अर्थातच औरंगजेबाला हरकत घेण्याचे काही कारणच नव्हते. त्यांनी आता औरंगजेबाकडे संन्यास घेण्याची परवानगी मागितली आणि बनारस ला जाऊन धार्मिक संन्यासी म्हणून राहण्याची परवानगी मागितली. औरंगजेबाने उत्तर दिले की- "त्याला फकीर होऊन अलाहाबादच्या किल्ल्यात राहू देत. तेथील माझा सुभेदार त्याची चांगली काळजी घेईल." यात तीन महिने उलटले.
आता जयसिंगाचेही उत्तर आले होते. पुरंदरच्या तहातील कलमांची आठवण करून त्याने सांगितलं की त्या पलीकडे कुठलीही वचन दिलेली नाहीत. तसेच त्याने शिवाजी राजांचे जीवित सुरक्षित राखण्यासाठी आणि त्याच्या मुलांना दिलेल्या वचनाचा भंग होऊ नये याची काळजी घेण्यासाठी रामसिंगाला सतत खलीत्यामार्फत कळविले होते. औरंगजेब स्वतःच दख्खनच्या मोहिमेवर निघणार होता आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना रामसिंगाच्या देखरेखी खाली राज कैदी म्हणून आग्र्यातच ठेवायचे होते. हे जयसिंगाला नको होते. तथापि त्याने रामसिंगाला कळवले की -"शिवाजी राजाला तिथे योग्य प्रकारे ठेवण्यात यावे - (धाक द पटशा, अपमान व कैद्यासारखी वागणूक देऊ नये). बादशहा दख्खन मध्ये पोहोचल्यानंतर त्याला आग्र्याहून तिथे बोलावून घेतलं जाईल याची हमी दिली पाहिजे. त्याच्या मुलाला बादशहाकडे ठेवून घ्यावे."
शिवाजी महाराजांनी आता आजारी असल्याचे नाटक केले. त्यांनी रोज संध्याकाळी ब्राह्मण साधू संत फकीर तसेच दरबारी लोकांना मिठाई वाटण्यास सुरुवात केली. ही मिठाई मोठ मोठ्या पेट्याऱ्यातून जात असे. पेटार्यांची नित्य तपासणी होत असे. नंतर मात्र तपासणी न करताच पेटारे पुढे पाठवू लागले. 19 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी अशी बातमी पसरवली की राजे अतिशय आजारी आहेत आणि त्यांना कोणीही त्रास देऊ नये. शिवाजी महाराजांचा सावत्र बंधू हिरोजी फर्जंद महाराजांसारखाच दिसत होता. हिरोजी पलंगावर झोपला आणि बाहेरच्या बाजूला त्याचा फक्त उजवा हात ठेवला. त्या हातात त्याने महाराजांचे सोन्याचे कडे घातलेले होते. आता शिवाजी राजे आणि पुत्र संभाजी पेटार्यांमध्ये बसले व सूर्यास्ताच्या थोडेसे आधी सुरक्षितपणे पेटारे शहराच्या बाहेर गेले. (शुक्रवार असल्याने सुरक्षेत ही ढिलाई असणार!) पेटारे वाहनारांना तिथून परत पाठवून दिले. शिवाजी राजे व संभाजी पुढे आग्र्यापासूनच्या सहा महिलांवरच्या गावात गेले. तिथे निराजी रावजी दत्ता त्रिंबक व राघो मित्रा वाट पाहत थांबले होते. या सर्वांनी संन्याशाप्रमाणे अंगाला राग फसली आणि ते झपाट्याने मथुरेच्या दिशेने निघाले. इतर लोकांनी घरी जाण्यासाठी वेगळा मार्ग अनुसरला.
इकडे हिरोजी फर्जंद दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत महाराजांच्या पलंगावर झोपून राहिला. एक सेवक पायरीवर बसून त्यांचे पाय दाबत असल्याचं पहारेकऱ्यांना दिसून येत असे. सकाळी आठ वाजता हिरोजी फर्जंद शांतपणे सेवकाबरोबर बाहेर पडले. त्यांनी पहारेकऱ्यांना सूचना दिली की थोडा आवाज कमी करा राजे आजारी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता तिथे कोणी येत जात ही नव्हते. त्यामुळे पहारेकऱ्यांना संशय आला. सकाळी दहा वाजता पहारेकरी महाराजांच्या कक्षात गेले तर तिथे कोणीच नव्हते! ते धावतच फौलाद खानाकडे गेले. त्याने ती गोष्ट बादशहाच्या कानावर घातली आणि ती काळी जादू असल्याचे सांगितले. तो म्हणाला -"राजा त्याच्या स्वतःच्या महालात होता. आम्ही तिथे जात होतो. परंतु तो अचानकच गायब झाला. तो आकाशात उडून गेला असावा किंवा जमिनीच्या पोटात गडप झाला असावा. त्याने नेमकी काय युक्ती योजली ते कळत नाही."
औरंगजेबाने आता तातडीने सर्वत्र शोध सुरू केला होता. राजांचे अनुयायी जिथे कुठे सापडले तिथून त्यांना पकडून नेले. पकडलेल्या काही ब्राह्मणांनी छळाला घाबरून आपला मालक रामसिंगाशी संगनमत करून शिवाजी पळून गेल्याचे सांगितले. रामसिंगाच्या दरबारात येण्यावर बंदी घातली व त्याचा हुद्दा काढून घेऊन वेतन बंद केले.
धूर्त शिवाजी राजांनी सुटका करून घेऊन 14 तास उलटले होते. त्यांच्या पाठलागासाठी पाठवलेल्या सर्वांना चकवा देऊन ते विरुद्ध दिशेने मथुरेचा मार्ग निवडून पूर्वेला अलाहाबाद नंतर बुंदेलखंड गोंडवन गोवळकोंडा अशी मजल दरमजल करत ते (नोव्हेंबर 1666 मध्ये?) राजगडावर पोहोचले.
आग्र्यातून निघाल्यानंतर मथुरेत पोहोचायला सहा तास लागले. मथुरेत येताच थकव्यामुळे संभाजीना पुढे चालणे अशक्य झाले. मोरो त्रिंबक पेशवा यांचे तिघे मेहुणे मथुरेत रहात होते. निराजी त्यांना ओळखत होता. त्याने त्यांना राजांच्या सुटकेची व गंभीर परिस्थितीची माहिती दिली. शंभुराजेंना त्यांच्याजवळ ठेवून घेण्याची विनंती केली. त्यांनीही मोठ्या धाडसाने ती स्वीकारली. जोपर्यंत शिवाजी राजे दख्खन ला पोहोचून पत्र लिहिणार नाहीत तोपर्यंत संभाजीला स्वतःजवळ ठेवून घेणे त्यांनी कबूल केलं.
मथुरेत येताच शिवाजी राजांनी दाढी मिशा काढल्या व अंगाला राख पासून संन्याशाचा वेश घेतला. अत्यंत चपळ व वेषांतर करण्यात पटाईत जासूदां सोबत शिवाजी महाराज रात्रीच्या अंधारात दिल्लीकडे गेले. शिवाजी राजांनी अनुयायांच्या झोळीत सोन्याची नाणी जडजवाहिर भरले होते. त्यांच्या जोड्यांमध्ये आणि सेवकांच्या पोशाखात मेणात दडवलेला हिरा व कित्येक माणिक ठेवले होते. या धनाच्या वापर त्यांना प्रवासामध्ये अनेक ठिकाणी करावा लागला. त्याचे बरेच खरे खोटे किस्से इतिहासामध्ये नमूद केले आहेत.
शिवाजी महाराजांच्या घरी आल्यानंतरचे वर्णन दत्ताजी वाकणीस यांनी केले आहे- ते राजगडाच्या प्रवेशद्वारापाशी आले. त्यांच्या आई जिजाबाई यांचे तिथे वास्तव्य होते. राजांनी त्यांचे दर्शन मिळावे अशी विनंती केली ती सुरक्षारक्षकांनी जिजाबाईंना कळविली - किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ काही अनोळखी बैरागी आले आहेत आणि ते आपली भेट घेऊ इच्छितात. जिजाबाईंनी त्यांना आत घेऊन येण्याचा आदेश दिला. ज्यावेळी त्यांना समोर आणण्यात आलं त्यावेळी निराजी पंतांनी बैराग्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांना आशीर्वाद दिला परंतु शिवाजी राजे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी स्वतःला जिजाबाईंच्या पायावर झोकून दिले. त्या आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी ओळखले नाही. आता शिवाजी राजांनी आपले मस्त जिजाऊंच्या मांडीवर ठेवले आणि डोक्यावरची टोपी काढली. त्याबरोबर जिजाऊंना त्यांच्या मस्तकावरची खूण दिसली आणि शिवाजी राजांना ओळखले. त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळून धरले.
राजगडावर परतल्यानंतर शिवाजीराजांनी आपला पुत्र संभाजी याचा वाटेत मृत्यू झाल्याचं खोटं वृत्त पसरवलं आणि संभाजीराजांच्या नावाने मृत्यूनंतरचे काही विधी पार पाडले. मुघल अधिकाऱ्यांच्या मनातील संशय नाहीसा झाल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी मथुरेतील ब्राह्मणाकडे आपल्या मुलाला परत पाठवून देण्यासाठी पत्र पाठवले. संभाजी राजांचे काळजी घेणारे तिन्ही बंधू आपल्या संपूर्ण कुटुंबासह महाराष्ट्रात आले. संभाजींनाही ब्राह्मणाच्या मुलाच्या वेशांत सोबत आणले. वाटेत एका चौकीवरच्या मुघल अधिकाऱ्याला संभाजी त्यांच्या जातीचे अथवा कुटुंबातील नसल्याचा संशय आला. मग त्यांनी संभाजी सोबत एका ताटात जेवून त्या अधिकाऱ्याचा संशय दूर केला. शिवाजी महाराजांनी कृष्णाजी, काशीराव आणि भिसाजी या तिन्ही बंधूना 'विश्वासराव' असं बिरुद व एक लाख सुवर्ण मोहरा दिल्या. तसेच त्यांच्यासाठी वार्षिक दहा हजार होनांची तरतूद केली. त्याचप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या सुटकेच्या वेळी निष्ठेने कामगिरी केलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनाही अशाच प्रकारे बक्षीसे दिली.
दिलीप गायकवाड.
१४-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...