विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज - १५

 


छत्रपती शिवाजी महाराज - १५
----------------------------
सुरतेची दुसऱ्यांदा लूट व बागलाण ते कंधार बऱ्हाणपूर पर्यंत मारलेली धडक यामुळे औरंगजेबाने 28 नोव्हेंबर 1670 रोजी सेनापती महाबत खानाला कुमक पैसा व सुविधा देऊन अमरसिंह चंडावत सारख्या रजपूत सरदारांसह दक्षिणेत पाठवले. नऊ जानेवारी 1671 रोजी त्याने गुजरातचा सुभेदार बहादूर खानाला बादशाही लष्करी तुकडीचे सेनापती पद स्वीकारण्याचा आदेश दिला. तसेच दिलेरखानालाही त्याला सहाय्य करण्याचा आदेश दिला.
मोहब्बत खानाने 3 जानेवारी 1671 रोजी जसवंत सिंगासह बुऱ्हानपूर सोडून तो 10 जानेवारीला औरंगाबाद येथे पोहोचला. शहजादा याच्याशी भेट घेऊन तो फौजेसह चांदोर ला रवाना झाला. तेथील सेनेचे नेतृत्व दाऊदखानाकडे दिलेले होते. 1671 च्या जानेवारीत महाबत खान बहादुरखानाला चांदोर जवळ जाऊन मिळाला आणि त्या दोघांनी मिळून अहिवंत गडाला वेढा दिला. दाऊद खानाने शिवरायांनी नुकताच जिंकलेला हा गड परत जिंकण्यात यश मिळवले. त्यामुळे महाबत खान चिडला व पावसाळ्या चे दिवस घालवण्यासाठी दमन कडे पारनेरला निघून गेला. तो तिथल्या सरदार आणि आम्ही रूम रावांच्या घरी मेजवान्या जोडण्यात आणि नाच गाण्यांच्या मैफलीत दंग होता. त्याच्याकडे अफगाणिस्तान आणि पंजाबच्या 400 नर्तकी होत्या.
महाबत खान दीर्घ काळपर्यंत निष्क्रिय असल्यामुळे बादशहा नाराज होता. म्हणून त्याने बहादूर खान आणि दिलेरखान यांना दख्खन मध्ये पाठवले. ते सुरतेहून बागलाणवर चालून गेले आणि त्यांनी साल्हेरला वेढा दिला. इखलास खान मीयाना, राव अमरसिंग चंडावत व काही अधिकाऱ्यांना वेढ्यावर ठेवून ते अहमदनगर कडे निघून गेले. तिथून पुढे बहादूर खान सुप्याला गेला तर दिलेरखानं 1671 चे डिसेंबर अखेर पुणे ताब्यात घेतले. पुण्यातील नऊ वर्षांवरच्या सर्वांची कत्तल केली.
पुण्यातून मुघलांना हाकलून देण्यासाठी शिवाजी राजे महाड येथे सैन्याची जमवाजमव करत होते. तर प्रतापराव गुजर, आनंदराव आणि पेशवे मोरोपंत यांच्या अधिपत्याखालील मराठा सैन्याने साल्हेरच्या वेढ्यावरील मुघल सैन्यावर जोरदार हल्ला चढवून त्यांची दाना दान उडवून दिली. राव अमरसिंग, अनेक सेनाधिकारी आणि हजारो सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले व इखलास खान, मुहकम सिंग जखमी होऊन 30 मुख्य सेनाधिकार्यांसह पकडले गेले. त्यानंतर मोरोपंतांनी मुल्हेर सर केले. (जानेवारी 1672 अखेर व फेब्रुवारी पहिला आठवडा यादरम्यान. ) दोन्ही किल्ल्यांची व्यवस्था लावून मोरोपंत कोकणात परत गेले. शिवाजी महाराजांनी बहादूर खान व दिलेरखान या दोघांनाही जबरदस्त हानी करून माघार घेण्यास भाग पाडले. एप्रिल मध्ये खैबर अफगाणी लोकांनी बंड केलेले होते त्यामुळे बादशहाला दख्खन मध्ये काही करणे शक्य झाले नाही.
महाबत खान 1672 च्या मे मध्ये दख्खन सोडून दिल्लीला गेला. काही काळानंतर मुअज्जम ही दिल्लीला गेला. या दोघांच्या जागी बहादूर खानाला दख्खनचा मुख्य सेनापती आणि कार्यकारी सुभेदार म्हणून नेमले. त्याने 1673 च्या जानेवारीत या पदांची सूत्रे हाती घेतली आणि 1677 पर्यंत या पदावर काम केले.
5 जून 1672 रोजी मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील फौजेने कोळी राजा विक्रमशाहकडून जवाहर जिंकले व 17 लाखांचा खजिना ताब्यात घेतला. हे ठिकाण सुरतेपासून फक्त शंभर मैलावर आणि नाशिक मुलखाच्या शेजारी आहे. आणखी थोडे पुढे जाऊन मोरोपंतांनी रामनगरवर हल्ला केला असता तेथील स्वमशः राजा आपल्या कुटुंबीयांसह 19 जून सोळाशे बहात्तर रोजी चिखलीत पळून गेला. दिलेरखान फौजेची जमवाजमव करत असल्याचे ऐकल्यानंतर मराठ्यांनी रामनगर पासून झपाट्याने माघार घेतली. आपली फौज वाढवून 15000 फौजेसह जुलै सोळाशे बहात्तरच्या पहिल्या आठवड्यात रामनगर सर केले. जवाहर आणि रामनगर स्वराज्यात सामील झाल्यामुळे मराठ्यांना कल्याण पासून सुरतेला पोहोचण्याचा जवळचा सुरक्षित आणि सोपा मार्ग मिळाला.
जवाहरचा विक्रमशाह आणि धनराज कोळी आता मराठ्यांच्या मुलखात लुटालुट करून मराठ्यांच्या हद्दीतील गावांचे आणि लष्करी मार्गांचा नुकसान करू लागले. या दोघांनाही पकडून ठार केले.
पुढे मोरो त्रिंबक यांनी लखोजी जाधव यांचा पणतू जाधवराव हा नाशिक - त्र्यंबकचा मुघलांचा ठाणेदार होता त्याचा पाडाव केला. वनी दिंडोरी येथील ठाणेदार सिद्धी हलाल याचाही पराभव करून तिथे लूट केली. या दोघांचा बहादूर खानाने अपमान केला त्यामुळे ते दोघेही मराठ्यांना जाऊन मिळाले. इतरही काही सुभेदार मराठ्यांना मिळण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे दिलेरखानाची पाचावर धारण बसली.
याचवेळी तेलंगण आणि वऱ्हाडाकडे लूटमार करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मराठ्यांची एक तुकडी पाठली होती तिला मात्र अपयश आले. रामगिरीच्या परिसरात लूटमार करून मराठे परतीच्या प्रवासात दोन तुकड्या करून एकीने गोवळकोंडाच्या मुलाखात आणि दुसरीने चांद्याच्या मोघली मुलखात शिरले. बहादूर खानाने पहिल्या तुकडीवर दिलेरखानाला पाठवले आणि आपण दुसऱ्या तुकडीचा समाचार घेतला. यावेळी मुघल फौजांनी अतिशय चपळाईने हालचाली केल्यामुळे मराठ्यांना अपयश आले (नोव्हेंबर ते डिसेंबर 1672).
बहादूर खानाने आपला तळ पेडगाव येथे उभारला होता आणि तिथेच त्याने एक किल्ला बांधला व गाव ही बसवले. या किल्ल्याला बहादूरगड असे नाव देण्यास बादशहाने परवानगी दिली. येथून उत्तर पूर्व आणि दक्षिण तसेच पुण्यावर सहजगत्या लक्ष ठेवता येत होते.
वऱ्हाड मोहिमेनंतर शिवरायांना शिवनेरीच्या मोहिमेत मोठे नुकसान सोसावे लागले. मुघलांचा शिवनेरीचा किल्लेदार अब्दुल अजीज खान हा मूळचा धर्मांतरित ब्राह्मण होता. तो औरंगजेबाचा विश्वासू सेवक होता. शिवरायांनी त्याला मराठ्यांकडे किल्ला सुपूर्द करण्यासाठी लाच दिली. त्याने पैसे घेऊन दिलेरखानाकडे गुप्त माहिती पाठवली आणि शिवरायांना किल्ला सर करण्यासाठी सात हजार घोडदळ पाठवण्यास सांगितले. मुघल फौज सावध असल्यामुळे मराठ्यांची फौज दिलेरखान व बहादूर खान यांच्या दबा धरून बसलेल्या फौजेच्या तावडीत सापडली त्यामुळे मोठी हानी होऊन मराठ्यांना परतावे लागले.
तिकडे विजापूर मध्ये 24 नोव्हेंबर 1672 रोजी अली आदिलशहा मरण पावला आणि चार वर्षाच्या सिकंदरला विजापूरचा सुलतान म्हणून राज्याभिषेक केला. आघाडीच्या सरदारांनी राज्याची सत्ता चालवण्याचे ठरले होते. त्यानुसार अब्दुल मोहम्मद हा पूर्वाश्रमीचा वजीर पूर्व प्रांताचा, बहलोल खान पश्चिम भागाचा आणि मुजफ्फर खान कानडी मुलखाचा कारभार पाहणार होता. खवास खान पालक म्हणून आणि मुख्य राजधानीचा कारभार पाहणार होता. मात्र खवासखनाने आपल्या अखत्यारीत असलेले किल्ले सुपूर्द न केल्याने सर्वजण त्याच्या विरोधात गेले आणि अराजक व अस्थैर्य माजले.
शिवाजी महाराजांनी पटकन आपला वकील बाबाजी नाईक याला परत बोलावले. त्यांनी अनाजी पंताच्या नेतृत्वाखाली सामर्थ्यशाली फौज पाठवून पन्हाळ्यावर हल्ला केला. कोंडाजी फर्जंद यांनी अंधाऱ्या रात्री गड चढून फक्त साठ मावळ्यांच्या सहाय्याने पन्हाळा जिंकला. पुढे एक एप्रिलला पाली व 27 जुलैला सातारा जिंकून घेतले.
आता खडबडून जागे झालेल्या विजापूर दरबाराने बहलोल खानाच्या नेतृत्वाखाली पन्हाळा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी फौज पाठवली. सोबत मुघल फौजेला मदत करण्याची विनंती केली. शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर आणि आनंदरावांच्या नेतृत्वाखाली 15000 फौज देऊन बहलोलखानाला त्याचे इतर साथीदार मिळण्याआधीच अतिशय चपळाईने उमराणी येथे गाठून त्याच्या शिबिरावर कब्जा केला. दिवसभराच्या लढाई नंतर दोन्ही फौज अलग झाल्यावर बहलोल खानाने प्रतापरावांना निरोप पाठवला की आम्ही लढाईसाठी आलो नसून फक्त राजाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी शत्रुत्वाचं नाटक करीत आहोत. म्हणून आम्हास सोडून द्यावे. प्रतापरावांनी ते मान्य केले. त्यामुळे शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची चांगलीच कान उघाडणी केली. काही काळातच बहलोल सैन्य सुसज्ज करून कोल्हापूर जवळ आला आणि अनेक चकमकीत मराठ्यांचा पराभव केला व कानडी मुलखातून मराठ्यांना बाहेर काढले.
सन 1674 च्या जानेवारीत शिवाजी महाराजांनी प्रतापरावाला बहलोल खानाच्या विरोधात पाठवले. बहलोल पुन्हा आला आहे तुमचं सैन्य घेऊन जाऊन त्याला नष्ट करा व निर्णायक विजय संपादन करून या. नाहीतर पुन्हा कधीही मला तुमचं तोंड दाखवू नका, असा खलिता प्रतापरावांना पाठवला. प्रतापरावांनी नेसरी येथील दोन टेकड्यांच्या खिंडीत बहलोल खानावर 24 फेब्रुवारी 1674 रोजीजोरदार हल्ला चढवला. केवळ सात वीरांसह केलेल्या या हल्ल्यात सर्वच्या सर्व कामी आले.
यानंतर शिवाजी महाराजांनी आनंदरावांच्या नेतृत्वाखाली बहलोल खानाचा नायनाट करण्यासाठी फौज पाठवली. परंतु दिलेरखान बहलोलखानाच्या मदतीला आल्यामुळे आनंदराव कानडी मुलखात माघार घेऊन बहलोलच्या जहागिरीतील संपगावची पेठ लुटून ती लूट दीड लाख होन किमतीची 3000 बैलांच्या पाठीवर लादून परत फिरले. बहलोल खानाने दोन वेळा त्यांच्यावर हल्ला केला परंतु त्यांनी सुरक्षितपणे दोन्ही हल्ल्यातून ही लूट मराठ्यांच्या मुलाखात आणली.
आठ एप्रिल रोजी शिवरायांनी चिपळूण मध्ये हंसाजी मोहिते यांना सरनोबत म्हणून नेमून हंबीरराव हा किताब दिला. सैनिकांनाही भरपूर धन दौलत वाटली.
जानेवारी 1674 मध्ये मुघल फौजेने दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली कोकणात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्याचा पराभव झाला. शिवाजी महाराजांनी कोकणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आणि जे अवघड रस्ते होते तिथे कडक चौक्या पहारे बसवले. त्यामुळे मुघल फौजेला संभ्रमित होऊन 1000 पठाण गमावून आणि नुकसान शोषून परतावे लागले.
तिकडे खैबर प्रांतातील अफगाणांच्या बंडाचा रिमोट करण्यासाठी औरंगजेबाला 7 एप्रिल रोजी दिल्ली सोडून हसन अब्दुलला जाणे भाग पडले. तसेच पुढच्याच महिन्यात दिलेरखनाला वायव्य सरहद्द प्रांतात जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता दख्खन मध्ये फक्त बहादुर खान एकटाच राहिला होता. शिवाजी महाराजांनी या काळाचा उपयोग आपल्या समारंभ पूर्वक राज्याभिषेकासाठी करून घेतला.
दिलीप गायकवाड.
१६ - ०४ - २०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...