विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 April 2024

छत्रपति संभाजी राजे यांची गोवा स्वारी.


 छत्रपति संभाजी राजे यांची गोवा स्वारी.

लेखन :~ अभाजीत सोनवणे , अमित सुधीर राणे

मराठ्यांविरुद्ध पोर्तुगिजांशी दोस्ती करण्याचा प्रयत्न मोगल बादशहा ने यापूर्वीही केला होता. परंतु १६६७ झाली गोव्याचा व्हाईसरॉय कौंत द साव्हियेत ह्याने तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. पोर्तुगीज व्हाईसरॉय ने संभाजी राज्यांशी असलेला शांततेचा करार भंग होऊ नये म्हणून मोगलांशी मैत्रीचा करार केला नाही. परंतु असे जरी असले तरी, मोगलांना काही सवलती देणे पोर्तुगिजांना भाग पडले. ते जेव्हा संभाजी महाराज्यांना कळले तेव्हा त्यांना पोर्तुगिजांचा राग आला आणि त्यांनी गोव्यावर स्वारी केली.

दिनांक २४ नोव्हेंबर १६८३ रोजी गोव्याच्या व्हाइसरॉयने युद्ध खर्चासाठी ३ लक्ष असुरप्यांची रक्कम गोळा करण्यासाठी, खानदानी वर्ग, पुरोहित (पाद्री) वर्ग आणि प्रजा हयांची एक सभा बोलविली. संभाजी महाराजांचे सैन्य चौल, सां. इश्तेव्हांव (सेंट प्टिपन) बार्देश आणि साष्टी ह्या पोर्तुगीज मुलुखांत शिरल्याने पोर्तुगिजांच्या तोंडचे पाणीच पळाले.

वरील तिन्ही वर्गाच्या लोकांची सभा गोवा शहरांतील किल्ल्यांत राज्याच्या दरबारांत भरली होती. त्या सभेचा जो वृतांत व्हाइसरॉयच्या चिटणीसाने लिहून ठेवला आहे त्याचा सारांश पुढील प्रमाणे आहे:

" आमचा शत्रू संभाजी राजे ह्याचे सैन्य आमच्या प्रदेशांत घुसल्यामुळे सदरहू संभाजी राजे यांच्याशी युद्ध करण्याच्या खर्चासाठी म्हणून ३ लक्ष असुरप्या उभारण्याकरितां व्हिसेरेइ सिन्योर फान्सिस्कु ताव्होरा, कौंट द आल्व्होर
ह्यांनी खानदानी वर्ग (Nobres) पुरोहित वर्ग (Clero) व प्रजा (Dovo) ह्यांची एक सभा गोव्याच्या किल्ल्यांत दरबार हॉलमध्ये दिनांक २४ नोव्हेंबर १६८३रोजी बोलाविली. नामदार व्हाइसरॉय ह्यांनी सभेला माहिती सादर केली की, शत्रू संभाजी याचे सैन्य आमच्या राज्यांत सर्व प्रांतामध्ये घुसले आहे. ह्या सैन्यांत मोठे घोडदळ आणि पायदळ असून उत्तरेस वसई, दमण, चौल आणि
खाली गोवा बेट, सां इश्तेव्हांव, साष्टी, बार्देश वगैरे प्रांतांत या सैन्याने शिरून सगळीकडे लुटालुट सुरू केली आहे. आमचा प्रदेश उजाड असल्याकारणे त्या सैन्याचा प्रतिकार करण्यात आवश्यक असलेले मोठे मनुष्य बळ आमच्यापाशी नाही. मायदेशाहून यायची कुमकही अद्याप आलेली नाही. जे काही मूठभर पोर्तुगीज आणि इतर धर्माचे लोक किल्ले, तटबंद्या आणि खिंडी लडवित
आहेत, त्यांच्या खर्चासाठी आमच्या स्वामीच्या राज्याच्या खजिन्यांत सांप्रत पैसा नाही. तो पैसा उभारण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा त्याचा खल
करण्यासाठी ही सभा बोलविण्यांत आली आहे."

लुईजगों साल्विज द कोता
चिटणीस,

संभाजी महाराजांच्या स्वारीमुळे गोव्यांत एवढी आणीबाणीची परिस्थिति निर्माण झाली, की, व्हाइसरॉयला कैद्यांना मुक्त करून शिपाई म्हणून सरहद्दीवर पाठविणे भाग पडले. कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय राज्याच्या सल्लागार मंडळाच्या दिनांक २६ नोव्हेंबर १६८३ रोजी भरलेल्या बैठकीत घेण्यांत आला.

छत्रपती संभाजी राजांची एकूण कारकीर्द जेमतेम नऊ वर्षांची ! त्यांत त्यांनी पोर्तुगेजांशी लढा देऊन त्यांची #आशियात कधीही झाली नव्हती एवढी फजिती केली, तरुण वयात त्यांना अद्दल घडविली. अनेक विजय संपादन केले. इंग्रजांचा सारखा पाठिंबा मिळत असून सुद्धा सिद्दीला त्यांनी चांगले तोंड दिले आणि इंग्रजांना सतत दमात ठेवले.

छत्रपति संभाजी राजे यांचा पराक्रम, शौर्य आणि त्यांची आरमारी ताकद म्हणजे ही गोवा स्वारी. वरील सर्व वैशिष्ट्य अन भाव आपल्या चित्रात पूर्णपणे उतरून काढून अभिमान वाटावा अस हे पेंटिंग Amit Rane यांच्याकडून इतिहासासाठी अर्पण.

श्री शंभु राज्याभिषेक सोहळा , राजधानी रायगड , २०२३ दरम्यान अमित सुधीर राणे ह्यांच्याकडून या चित्राच अनावरण करण्यात आले.

राजा श्री शंभु छत्रपति जयते. 🚩



No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...