इष्टुर फाकडा, गुप्तहेराच्या भूमिकेत
लेखन :
मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासात इष्टुर फाकडा याचे नांव आपण सर्वांनी
वाचले असेलच. जानेवारी १७७९ मध्ये इंग्रज व मराठे यांची वडगांव मावळ येथे
झालेल्या लढाईत याने चांगली मर्दुमकी दाखवली होती. त्याने दाखवलेल्या
शौर्याबद्दल मराठ्यांनी त्याला मराठेशाहीतील दुर्मिळ अशी ‘फाकडा’ पदवी बहाल
केली होती. मराठे आपल्या शत्रूच्या शूरपणाचे सुद्धा खुल्या दिलाने कौतुक
करीत असत त्याचे हे एक जिवंत जागते उदाहरण होय. या इंग्रज सेनापतीचे खरे
नांव जेम्स स्टुअर्ट होते ,त्याचे देशी अपभ्रंशित नामकरण झालेले होते
‘इष्टुर’.हा स्टुअर्ट केवळ शूर होता असे नाही तर या लढाईच्या पूर्वी त्याने
आपला हरहुन्नरीपणा दाखवत एका गुप्तहेराचे सुद्धां काम केले होते हे
आपल्याला अज्ञात असेल. त्याची ही अनोखी कहाणी!
इष्टुर
फाकडाची गुप्त मोहीम:स्टुअर्ट हा इंग्रज पायदळाचा सर्वात शूर सेनापती होता,
त्याच्या अनुभवावर आणि हुशारीवर मराठ्यांच्यावरील मोहिमेची संपूर्ण मदार
अवलंबून होती. त्याने मराठयांच्या मुलुखात म्हणजे पुण्यापर्यंत शिरून
मराठ्यांची लढाईची व शस्त्र सज्जतेची तयारीची माहिती काढण्याची जबाबदारी
उचलली होती. त्याने आपणहून दाखवलेल्या तयारीचे सर्वच इंग्रजांनी मनापासून
कौतुक केले कारण त्याने ही अवघड आणि वेळ प्रसंगी जिवावर बेतणाऱ्या मोहिमेची
जबाबदारी स्वीकारली होती.
मोहिमेची तयारी:स्टुअर्टने ऑकटोबर १७७८ मध्ये या मोहिमेची तयारी सुरु
केली आणि आपले खरे रूप बदलून एका पोर्तुगीझ धर्मगुरूचा वेष धारण केला. आपण
एक निष्णात डॉक्टर आहोत असे भासवून मराठ्यांच्या प्रदेशात पुण्यापर्यंत
प्रवेश मिळवला. उत्तर मराठेशाहीच्या त्या काळात डॉक्टर आणि ख्रिस्ती
धर्मगुरू (पाद्री) यांचा अभिनिवेश एकच असावा.
कटकारस्थान: मॉस्टिन हा त्यावेळेस पेशव्यांच्या दरबारात इंग्रज वकील होता.
लेविस नामक ईस्ट इंडिया कंपनीतील एक नोकर त्यावेळी आजारी होता,
रुग्णशय्येस खिळलेला होता आणि मॉस्टिन च्या घरी अंथरुणावर पडून होता.
त्याला औषधोपचार करण्याचा बहाणा स्टुअर्टने केला होता. या काळात राघोबादादा
इंग्रजांच्या आश्रयास होता. राघोबादादा याला इंग्रजांनी आश्रय दिल्यामुळे
मराठ्यांना राग येणे साहजिकच होते. चिडलेल्या मराठ्यांनी आपल्या दरबारातील
इंग्रज वकील मॉस्टिन याला स्वगृहात कैदेत ठेवले होते.
मोहिमेचे फलित:स्टुअर्टला या मोहिमेत म्हणावे तसे यश आले नाही, कारण
म्हणजे स्टुअर्टचे राघोबादादाशी असलेले सख्य! स्टुअर्ट राघोबादादाचा
काळजीवाहू अधिकारी (ADC) होता. कदाचित मराठ्यांना त्याची कल्पना आधीच आली
होती. मराठ्यांना आपल्या खऱ्या रूपाचा संशय होऊन आपले बिंग बाहेर पडेल
म्हणून स्टुअर्टला घाईमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला. स्टुअर्ट याची
वेळीच कल्पना आल्याने मराठ्यांच्या राज्यातून गुपचूप त्याने काढता पाय
घेतला.
स्टुअर्टचा अहवाल: मराठ्यांच्या राज्यात जाऊन आल्यावर तो मुंबईला परतला
आणि त्याने आपला अहवाल वरिष्ठांना सादर केला. पुण्याला कूच करायला कोणता
मार्ग घ्यावा, त्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, कोणत्या जागी कठीण चढाई आहे,
कुठले खडक फोडावे लागतील याची साद्यन्त माहिती त्याने पुरवली.
इंग्रजांची तयारी: घाटातील कठीण मार्ग साफ करून मार्ग तयार करणे हे मोठ्या
कष्टाचे व खर्चिक काम होते. पण त्याचा कोणताही परिणाम इंग्रजांवर झाला
नव्हता. मराठ्यांच्यावर हल्ला करून पुणे जिंकून घेणे व राघोबाला गादीवर
बसवणे व त्यापायी भरपूर पैसे वसूल करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.पैशाच्या
लोभाने त्यांच्या तोंडाला पाणीसुटले असल्याने त्यांचा उत्साह दांडगा होता.
तशात राघोबाने त्यांना पूर्णतः मदत करण्याचे कबूल केले होते आणि पुणे
जिंकून घेणे अगदीच सोपे असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते.
पाचशे ते सहाशे दांडगे बैल, तितकेच रेडे आणि मोठ्या संख्येने हमाल व गडी
इंग्रजांनी सुरतेहून मुंबईला मागवले होते. त्यांचा उपयोग केवळ सामान वाहून
नेण्यासाठी नाही तर वाटेत येणारे दगड/खडक फोडण्यासाठी सुद्धा होणार होता.
तळेगांव
वडगावच्या पर्यंतच्या दुर्धर प्रवासाचे व लढाईचे सविस्तर वर्णन या ग्रंथात
पुढे आलेले आहे. या लेखाचा विस्तार सीमित राहावा म्हणून ते येथे देणे शक्य
नाही.
स्टुअर्टचा मृत्यू: महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या
फौजेची इंग्रजांशी गाठ वडगांव मावळ येथे पडली. या लढाईत इंग्रजांचा सपशेल
पराभव केला. कॅप्टन स्टुअर्ट याने या लढाईतआपले शौर्य दाखवले परंतु या
लढाईत तोफेचा गोळा लागून तो ठार झाला. मराठ्यांच्या सेनेने इंग्रजांचा
केलेला हा साफ पराभव इतका मानहानीकारक होता की त्यांच्या फौजेतील
अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल होऊन त्यांना नोकरीतून बडतर्फ केले गेले.
सारांश:या लढाईत भाग घेण्यापूर्वी कॅप्टन स्टुअर्ट याने स्व हिम्मतीने
गुप्तहेराची भूमिका सुद्धा परिणामकारक वठवली होती हे विशेष. हिंदुस्थानच्या
इतिहासामध्ये अशी उदाहरणे विरळच म्हंटली पाहिजेत. ही नवी माहिती फ्रेंच
रेकॉर्ड ऑफ मराठा हिस्टरी मध्ये मिळाली ती इतिहासप्रेमींसाठी पेश केली !!
_______________________________________________________________________
संदर्भ: French Records relating to Maratha History (Part 1 &
2),Dr.V.G.Hatalkar; मराठी रियासत:सरदेसाई गोविंद सखाराम, महान मराठा
सेनानी:महादजी शिंदे
संकलन व लेखन:प्रमोद करजगी
वडगांव मावळच्या लढाईत ब्रिटिश फौजेचा शरण आलेला फार्मर नावाचा अधिकारी
No comments:
Post a Comment