विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

भावभक्तीचा अनोखा नजराणा : महादजींनी रचलेला ‘गोपाळकाला ’

 


भावभक्तीचा अनोखा नजराणा : महादजींनी रचलेला ‘गोपाळकाला ’
लेखन :

Pramod Karajagi

‘भावभक्तीचा अनोखा नजराणा’ या शृंखलामध्ये महादजी शिंदे यांनी रचलेला अभंग व पाळणा असे काव्य प्रकार या आधीच्या लेखांत पहिले. आज या लेखात महादजींनी रचलेला एक वेगळा काव्य प्रकार पाहू ज्याला ‘गोपाळकाला’ म्हणतात. माझ्या मते हा काव्य प्रकार अभावाने आढळतो. महादजींच्या मनात भगवान श्री कृष्णाचा प्रेमभाव एव्हढा उचंबळून येत असे त्यातून ते साक्षात देवाला आपल्या सोबत भोजनाला निमंत्रण देत आहे असे या काव्यात वर्णन आले आहे. या मध्ये भक्ताचे परमेश्वराबद्दलचे प्रेम, आत्मीयता तर आहेच त्यापेक्षा पुढे जाऊन सख्याला मैत्रीची साद घालावी असा भाव आहे. महादजींच्या इतर काव्याप्रमाणेच या काव्यातील भाषा सोपी आणि मधुर आहे व भावनांना आवाहन करणारी आहे यात शंका नाही.
‘गोपाळकाला ’
उशीर फार जाला, भोजनासी हरी I चला यमुनेतीरी, जेऊ तेथे II१II
आपल्या शिदोऱ्या, आणुनी गोपाळीं Iभोजनाचे काळी,कृष्णापाशी II२II
आपुल्याला अन्नाची,रुची कृष्णाप्रति I प्रीती दाखविती, गोपाळ ते II३II
वडजा वाकुडा, पेंधा हा सुदामा I जेविती घनःश्यामा, सहित ते II४II
पुष्प दळे पत्रे,साली आणि पाषाण I ऐसी पात्रे जाण ,मांडूनिया II ५II
वाढिती शिदोऱ्या,परस्परे गोप I करुनि संकल्प,कृष्णार्पण II ६II
गोपाळ "माधव" बैसले भोजना I देव देवांगना, पाहताती II७II
या काव्यात भक्त आपल्या सुखनिधानाशी, भगवंताशी आपुलकीचा संवाद साधतो असा भाव जाणवतो. "गोपाळकाला" सारख्या काव्यप्रकाराची दुर्मिळता लक्षात घेता हे काव्य म्हणजे महादजींच्या भक्तीची आणि कवित्वशक्तीची साक्ष दिल्या सारखी वाटते. “गोपाळकाला" हे केवळ एक काव्य नाही तर भक्तीचा अविष्कार आहे. यातून महादजींच्या मनातील खोलवर रुजलेले कृष्णप्रेम आणि त्या कृष्णप्रेमातुन उमटणाऱ्या लहरी दिसतात.
महादजींच्या काव्यसंपदेमध्ये अनेक काव्य अलंकाराचे प्रकार आढळतात, त्यापैकी हा एक अनोखा अलंकार देखील श्रीकृष्णार्पणवस्तु !!
_______________________________________________________________________
संदर्भ: महान मराठा सेनानी महादजी शिंदे: ले. प्रमोद करजगी , महादजी शिंदे: लेखक विश्वास दांडेकर , राजकवी महाराज महादजी शिंदे उर्फ पाटीलबाबा आलीजाबहाद्दरकृत कविता:संशोधक व संपादक भास्कर रामचंद्र भालेराव, ऐसा विटेवर देव कोठे: ले.धोंड म. वा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...