विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

घोरपडे बंधूंनी आखलेली तुळापूरची मोहीम पहिले यश व मोगल छावणीवर हल्ला...

 

घोरपडे बंधूंनी आखलेली तुळापूरची मोहीम पहिले यश व मोगल छावणीवर हल्ला...

लेखन :सचिन pokharkar
त्यावेळी औरंगजेबाची लष्करी छावणी तुळापूर येथे होती. त्या छावणीवर छापा घालण्याची साहसी मोहीम घोरपडे बंधूंनी आखली. त्यांच्याबरोबर विठोजी चव्हाणही होते. दोन हजार निवडक घोडेस्वार बरोबर घेऊन संताजी आणि बहिर्जी आपल्या सहकाऱ्यांसह पन्हाळ्याहून तुळापूरकडे निघाले. औरंगजेबाच्या छावणीनजीक मध्यरात्री पोहोचले. त्यांनी अगदी निवडक आणि विश्वासू धाडसी सहकाऱ्यांना बरोबर घेतले. छावणीच्या भोवती चौकी पहारे होते. पण आपण शिर्के व मोहिते या मोगल सरदारांच्या सैन्यांपैकी आहोत, असे सांगून घोरपडे बंधूंनी छावणीतील चौकी पहारे ओलांडले. त्यांनी डेऱ्याचे तणाव तोडले. डेऱ्याचे सोन्याचे कळसही काढून घेतले आणि मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लुटालूट सुरू केली. या अचानक प्रसंगामुळे गोटाच्या आसपास खूपच गोंधळ उडाला. त्या गोंधळलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन घोरपडे बंधू आपल्या सहकाऱ्यांसह मोगल छावणीतून बाहेर पडले आणि सिंहगड नजीक डोंगराळ भागात जाऊन पोहोचले. तेथून तसेच ते तडफेने रायगडच्या बाजूला वळले. त्या किल्ल्याला एतेकादखान वेढा घालून बसला होता. त्यावरही घोरपडे बंधूंनी हल्ला चढवला. मोगलांचे पाच हत्ती आणि काही शस्त्रास्त्रे व सामान घेऊन घोरपडे बंधू अतिशय वेगाने पन्हाळ्याला जाऊन पोहोचले. (करवीर छत्रपती घराण्याच्या इतिहासाची साधने भाग १, पृ. ३-४)..
वरील प्रसंगाचा उल्लेख घोरपडे घराण्याला मिळालेल्या सनदा पत्रात अत्यंत गौरवपूर्ण भाषेत केलेला आहे. तिघे बंधू आपली फौज तीन हजार घेऊन बादशहाचा मुक्काम तुळापुरी फौजेनिशी असता निघाले ते तिसरे रोजी जाऊन, रात्री छापा घालून डेऱ्याचे तणाव तोडून, शर्त मर्द केली. यांनी आपले वडील मारल्याचा सूड उगवावा म्हणून द्वेष धरून फौज जमावानिशी बादशहाचा तुळापूरवर जाऊन बहुत दस-नस करून बादशहाचा मोड करून डेऱ्याचे सोन्याचे कळस, शिक्के कट्यार पाडाव करून राजाराम महाराज यांजकडे विशाळगडी आणिले.' (विशाळगड ऐवजी पन्हाळगड असे हवे) घोरपडे बंधूंनी मोगल बादशाहा औरंगजेबाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून आणणे म्हणजे त्यावेळच्या परिस्थितीत तरी साहसी कृत्याचा उच्चांकच म्हणावा लागेल पण तो उच्चांक घोरपडे बंधूंनी यशस्वीपणे गाठला आणि ते सर्वजण सुखरूपपणे पन्हाळ्यावर जाऊन पोहोचले. राजाराम महाराजांनी त्यांचा मोठा गौरव केला. ज्या ठिकाणी औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे संभाजी महाराजांची हत्या केली त्याच ठिकाणी त्या क्रूर बादशहाच्या तंबूचे कळस कापले जावेत ही घटना जेवढी शौर्याची तेवढीच नाट्यपूर्ण वाटावी अशी होती. घोरपडे बंधूंनी प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात उडी घेऊन ते साहस केले. सहाजिकच त्यांच्या या शौर्यावर मराठा फौजेचा मोगलांच्या सैन्यात भीतीयुक्त दरारा उत्पन्न झाला आणि त्याच्याबरोबर संभाजीराजेंच्या मृत्युमुळे मराठा सैन्याला जी एक प्रकारे मरगळ आली होती तीही घोरपडे बंधूंच्या तुळापूर मोहिमेने नाहिशी होण्यास मदत झाली, संभाजी महाराजांच्या मृत्यूने मराठा समाजावर भीतीचे आणि निराशेचे सावट पसरलेले होते. राजाराम महाराजांच्या सुरक्षितते विषयी खात्री वाटावी अशी परिस्थिती निर्माण झालेली नव्हती. रायगडावर अडकून पडलेल्या छत्रपतींच्या परिवाराचे भवितव्य धोक्याचे झाले होते. अशा अत्यंत अंधःकारमय परिस्थितीत घोरपडे बंधूंच्या साहसी कृत्यामुळे मराठ्यांच्या मनात एक नवाच विश्वास उत्पन्न झाला असल्यास आश्चर्य नाही. या घटनेनंतर राजाराम महाराज जिंजीहून परत महाराष्ट्रात परत येईपर्यंतच्या सुमारे आठ-नऊ वर्षाच्या काळात ज्या लष्करी झटापटी झाल्या त्याची जणू नांदीच ठरावी अशी तुळापुरची यशस्वी मोहीम होती. तिच्या मुळे मराठा सैन्यात आत्मविश्वास तर वाढलाच पण पुढच्या काळात स्वराज्य सुरक्षित राहील याविषयी खात्रीही वाटू लागली. या सर्व अनुकूल मनःस्थितीचे श्रेय घोरपडे बंधूनाच द्यावे लागल..
◆हिंदुराव घोरपडे आणि परंपरा :
'राजाराम महाराज यांनी या कामगिरीबद्दल घोरपडे बंधूंना मानाचे किताब दिले. त्यात बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांना ममलकत मदार हा किताब मिळाला. त्याशिवाय सेनापती संताजीरावांना सेनापती व मालोजीरावांना अमीर उल् उमराव व विठोजीराव चव्हाण यास हिंमतबहाद्दर हे किताब मिळाले..
(बेल्लारी डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर) 'हिंदुराव' या बहुमानाच्या किताबाबद्दल आणि तो बहिर्जीकडेच का कायम राहिला यासंबंधी मुंबई सेक्रेटरीएट मधील कागदपत्रात असलेली माहिती पुढे यथास्थळी अधिक तपशीलाने दिली आहे. त्या कागदपत्रांचे संपादन करणाऱ्या जॉर्ज फोरेस्टच्या मते, 'हा किताब फार प्राचीन असून, तो बहिर्जीच्या वडील शाखेकडे चालत आला. या माहिती वरून असे म्हणता येईल की, 'हिंदुराव' हा किताब घोरपडे घराण्याकडे पूर्वापार चालत आला होता. तोच राजाराम महाराजांनी बहिर्जीना पुन्हा बहाल केला. वंशपरंपरेने चालत येणारे मानसन्मान वडील घराण्याकडे चालत रहाण्याची जुनीच प्रथा आहे. त्यावरून बहिर्जीची शाखा वडील होती, हाही एक निष्कर्ष वरील कागदपत्रावरून काढता येईल. (सचिन पोखरकर, गडवाटकरी).
संदर्भ : सेनापती घोरपडे घराण्याचा इतिहास : स.मा.गर्गे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...