विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश आणि म्हाळोजी घोरपडे

 छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश आणि म्हाळोजी घोरपडे

लेखन :सचिन पोखरकर



छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश आणि म्हाळोजी घोरपडे एका लष्करी तुकडीसह खेळण्याहून निघून १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वरी गेले..
● संगमेश्वरी घडलेल्या प्रसंगाचे वर्णन पुढील प्रमाणे :
कोकणात शिर्के यांनी स्वराज्याविरुद्ध केलेला उठाव मोडून काढणे हा संभाजीराजेंच्या मोहिमेचा एक महत्त्वाचा हेतू होता. शिर्क्याने मोगलांकडे मदतीची याचना केली होती. औरंगजेबाला ही एक चांगली पर्वणीच वाटली. त्याने शेख निजामाबरोबर फौज देऊन शिर्क्याच्या मदतीसाठी त्याला कोकणात पाठविले. मोगलांचे सैन्य प्रभावळी प्रांतात उतरले. शेख निजाम फितुरांच्या मार्गदर्शनाने काहीशा आडवाटेने संगमेश्वराच्या जवळ येऊन पोहोचला. तो इतक्या जलदगतीने तेथे पोहोचेल अशी कदाचित संभाजी महाराजांना अपेक्षा नसावी. शिवाय, शेख निजामाने आघाडीला फक्त पाच-सातशे शिपाई पाठवले होते. तेवढ्या सैन्याचा समाचार घेण्याइतके सैनिक म्हाळोजी घोरपडे यांच्या लष्करी तुकडीत होते. शेख निजामाची आघाडीची तुकडी परतवून लावण्यासाठी संभाजी महाराजांनी स्वतः स्वार होऊन संगमेश्वरापासून मैल दीड मैल अंतरावर त्या तुकडीवर हल्ला केला. पण तेवढ्यात शेख निजामाने मागे ठेवलेले मोठे सैन्य अचानक तेथे येऊन धडकले. तो प्रसंग अतिशय आणीबाणीचा होता..
मोगलांचे सैन्य म्हाळोजींच्या सैन्यापेक्षा कितीतरी पट मोठे होते. तरी पण म्हाळोजींनी मोठ्या निकराने सामना चालू ठेवला. कवी कलश जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला. मराठे सैनिक मारले जाऊ लागले. अनेकांचा धीर सुटला आणि ते माघार घेऊन पळू लागले. संभाजी महाराजांनाही लढाईचे चिन्ह योग्य दिसले नाही. ते घोड्यावरून उतरले, जलदगतीने निसटून संगमेश्वरी पोहोचले व आपल्या मुक्कामाच्या वाड्यातील तळघरात जाऊन बसले. पण त्यांना त्या वाड्यात जाताना शेख निजामाच्या मुलाने पाहिले असावे. त्याने वाड्याला वेढा दिला आणि संभाजी महाराजांना शोधून काढून वाड्यातून पकडून बाहेर आणले. तेथे मोठी झटापट झाली. म्हाळोजींनी छत्रपतींना संरक्षण देण्यासाठी पराक्रमाची पराकाष्ठा केली आणि शेवटी त्यांनी संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी आपला देह अर्पण केला. असे सांगतात की संभाजी महाराजापुढे म्हाळोजी उभे राहून लढत असताना शत्रूच्या तलवारींचा वार त्यांच्यावर पडला आणि ते जागीच मृत्यू पावले. पण त्यामुळे शत्रूच्या वारापासून संभाजी महाराज सुरक्षित राहू शकले. जणू म्हाळोजींनी छत्रपतींना वाचवण्यासाठी आपल्या देहाची ढाल करून पुढे घरली व शत्रूचे वार झेलले..
शेख निजामाने संभाजी महाराजांना पकडल्या नंतर स्वाभाविकच मराठे सैनिक वाट फुटेल तिकडे निघून गेले. त्यांची संख्या फारच थोडी होती. शेख निजामानेही संभाजी महाराज हाती लागल्यामुळे त्यांच्या इतर लोकांचा पाठलाग करण्यात वेळ गमावला नाही. तेवढ्यात बहिर्जी, संताजी, मालोजी हे घोरपडे बंधू, खंडो बल्लाळ आणि इतर मंडळी सुरक्षितपणे तेथून निसटू शकली. कैफियतीत म्हटले आहे, 'संभाजी महाराज रायगडच्या बाजूने घाईने निघाले. त्यांच्या बरोबर म्हाळोजी घोरपडे सरनोबत हेही होते. म्हाळोजींबरोबर पाच सहाशे लोक होते. त्यांनी संगमेश्वरी मोगली फौजेशी लढा दिला. त्यात त्याचे अडीचशे लोक मारले गेले. म्हाळोजी बाबा ठार झाले. बाकी पळाले.' आणखी एका बखरीत म्हटले आहे, 'संगमेश्वरी राजश्रीस मोगलांनी घेरले तेव्हा जे काय होते ते तेथे राहिले. एकाकी घोड्यावर बसून आप्पा (खंडो बल्लाळ), घोरपडे बगैरे निघाले त्याज बरोबर निघून रायगडास आले..
छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाची सूडबुद्धी तीव्र बनली नसती तरच आश्चर्य. त्याने 'महाराजांना अत्यंत अपमानित करून थोडे दिवस कैदेत ठेवले आणि नंतर क्रूरपणे छळ करून त्यांना ठार केले. 'या दुर्दैवी घटने बद्दल फारसी इतिहासकार म्हणतो, 'सारांश, वधास योग्य असलेल्या त्या माणसांना (संभाजीराजे आणि त्यांचे साथीदार) फजीत करून, विटंबना करून आणि त्यांचा तऱ्हेतऱ्हेने छळ करून बादशहापाशी आणले. कैदेतील प्रत्येक दिवस म्हणजे मरणच ठरले. म्हणून ते दोघे दृष्ट (संभाजीमहाराज आणि कवी कलश) अद्वातद्वा आणि असभ्य शब्द उच्चारू लागले..'
● म्हाळोजींचे वीरमरण :
बादशहाने अशी आज्ञा केली की प्रथम त्या दुष्टांच्या जीभा उपटून काढून त्यांच्या असभ्य बोलण्याची त्यांना शिक्षा देण्यात यावी. त्यानंतर त्यांचे डोळे काढण्यात यावेत. त्यानंतर त्यांना त्यांच्या दहा अकरा साथीदारांसह अनन्वित छळ करून ठार मारण्यात आले. संभाजी आणि कवी कलश यांच्या शरीरात पेंढा भरण्यात आला. दख्खनमधील प्रसिद्ध अशा सर्व शहरांतून आणि गावांतून ती प्रेते नगारे, कर्णे आणि शिंगे इत्यादी वाद्यांच्या गजरात मिरवण्यात आली. औरंगजेबाने दृष्टपणाने केलेल्या त्या अमानुष कृत्यामुळे मराठे पेटून उठले आणि पुढे सतरा वर्षे त्यांनी औरंगजेबाशी निकराने सामना दिला. शेवटी औरंगजेब मराठ्याना जिंकू शकला नाहीच; उलट अत्यंत निराशेते विकल मनःस्थितीत वयाच्या ९० व्या वर्षी मरण पावला. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या सतरा वर्षात ज्या मराठा शूर पुरुषांनी मोगलांची दाणादाण उडवली आणि आपले स्वत्व राखले, स्वातंत्र्य युद्ध नेटाने चालू ठेवले, त्यात घोरपडे बंधूंचा प्रथमस्थानी उल्लेख करावा लागेल..
म्हाळोजी घोरपड्यांच्या आयुष्याचा शेवट काहीसा अनपेक्षित पणे झाला. पण फार मोठ्या उदात्त कामासाठी ते लढता लढता मृत्यू पावले. आणि त्यातच त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले. गुत्तीच्या हिंदूराव घोरपडे घराण्याचे मूळ पुरुष बहिर्जी आणि त्यांचे बंधू संताजी व मालोजी यांची आपल्या पित्याच्या अशा मृत्यूपासून स्वराज्य रक्षणाची प्रेरणा अधिक प्रखर झाली. आणि मराठ्यांच्या इतिहासात हे घराणे अग्रभागी चमकू शकले. म्हाळोजींना युद्धभूमीवर मृत्यू आला हे त्यांच्या आयुष्याच्या हेतूशी सुसंगत असेच घडले. त्यावेळी त्यांचे वय सुमारे ६५ वर्षांचे असावे. महाराज शहाजीराजे, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या तिघांबरोबर म्हाळोजींनी आपली कामगिरी बजावली. त्यांची ही तीन पिढ्यांबरोबरीची कामगिरी अनन्यसाधारण मानावी लागेल..
रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी असे अनेक प्रसंग लक्षात घेऊनच घोरपड्यांच्या कामगिरीचे अतिशय समर्पक वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, 'मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचे श्रेय जरी भोसले घराण्याकडे जात असले तरी त्यांचे भाऊबंद जे घोरपडे यांचाही राज्यस्थापनेच्या घटनेत तेवढाच समान भाग होता. शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी आणि नंतरही घोरपडे घराण्यातील पुरुषांनी जी कामगिरी केली तीही इतिहासाने मान्य केली पाहिजे..'
महाराष्ट्राला आज ज्या महान् यशस्वी घटनेचा अभिमान वाटतो ती घटना म्हणजे औरंगजेबाविरुद्ध सतत सतरा वर्षे दिलेली प्रखर लढत. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर आणि त्यांच्या नीचपणे केलेल्या हत्येनंतर औरंगजेबाशी झालेल्या प्रदीर्घ लढायांत घोरपड्यांनी यशस्वीपणे अद्वितीय कर्तृत्व गाजवले. औरंगजेबाविरुद्ध तो फार मोठा राष्ट्रीय संघर्ष होता आणि त्याचे मुख्य श्रेय घोरपड्यांना द्यावे लागते..
घोरपड्यांचे सैन्य (मुख्यतः बहिर्जी आणि संताजी यांचे सैन्य) हे विजेसारख्या चपळ हालचाली करण्यात प्रसिद्ध होते. या सैन्याने सतत आठ वर्षे जवळ जवळ आठशे मैलांच्या क्षेत्रात, म्हणजे दख्खन आणि कारोमंडलचा किनारा यांच्या दरम्यान दौड केली. जागरुकपणे लष्करी हालचाली केल्या. बहिर्जी आणि संताजी यांच्या अशा लष्करी हालचालींनी निर्माण केलेला इतिहास यापुढे दिलेला आहे. (पुढील पोस्ट द्वारे लिहिलं 'सचिन पोखरकर', गडवाटकरी)..
――――――――――――
संदर्भ : हिंदुराव घोरपडे. (घराण्याचा दक्षिणेतील इतिहास : स.मा.गर्गे).

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...