इ.स.१७५२ मध्ये मुराररावांनी बाबप्पा नायडूकडून कोडिकोंडा ताब्यात घेतले. तेथील नाणी ही विविध फनम प्रकारांतील आहेत. या नाण्यांवर सर्पाचे आरेखन दिसून येते. दक्षिण भारतात सर्पदैवताची पूजा रूढ असून, कार्तिकेय देवाशी त्याचा संबंध आहे. त्यालाच सुब्बराय असेही नाव असून, घोरपड्यांनी सोंडूर येथे त्याचे एक देऊळ बांधल्याचे ज्ञात आहे. त्यामुळे त्यांच्या तेथील नाण्यांवर सर्पाचे आरेखन असणे स्वाभाविक आहे. या नाण्यांवर एका बाजूस देवनागरी लिपीत ‘श्रीʼ, ‘श्री नाʼ किंवा ‘श्री षण्मुखʼ असे शब्द असून दुसऱ्या बाजूस सर्पप्रतिमा आहे. याखेरीज कोलार आणि मुलबागल येथूनही फनम प्रकारातील नाणी पाडली असावीत, असा संशोधकांचा तर्क आहे. विशेषत: मुहम्मद शाहच्या नावे कोलार येथून पाडलेला फनम ज्ञात आहे. या शिवाय सोंडूर येथे शाह आलम दुसरा याच्या नावे पाडलेला अर्धा होनही ज्ञात आहे. यावर दोन्ही बाजूस फार्सी भाषेतील मजकूर असून, ‘झर्ब सोन्दूरʼ अर्थात टांकसाळीचे नाव सोंडूर असे नमूद आहे. शाह आलमचे नाव शाह अली गौहर असे नमूद आहे. हे राज्यारूढ होण्याआधीचे नाव असून, फक्त मराठे सत्ताधीशच हे नाव नाण्यांवर वापरीत असत. कालानुक्रम पाहता हे नाणे मुराररावांनी पाडले असावे..
या शिवाय वेंकटगिरी येथूनही मुराराव घोरपड्यांनी नाणी पाडली होती. हे त्यांच्या प्रदेशातील दक्षिणतम ज्ञात टाकसाळीचे शहर असून १७५७ मध्ये मराठ्यांचा याच्याशी प्रथम संपर्क आला. विसाजी कृष्ण बिनीवाले या पेशव्यांच्या सरदाराने तेथील पाळेगाराकडून साडेतीन लाख रुपये खंडणी म्हणून घेतले व त्या सोबतच नेल्लोर, काळहस्ती, सर्वपल्ली, सिधवट या आसपासच्या ठिकाणांहूनही खंडणी गोळा केली. या काळाच्या आसपासच मुराररावांच्या ताब्यात वेंकटगिरी आले असावे, हे उघड आहे. एका समकालीन साधनातील नोंदीनुसार घोरपड्यांना वेंकटगिरीहून दरवर्षी चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळत असे. येथे पाडलेल्या नाण्यांवर एका ‘किले वेंकटगिरीʼ असे स्थलनाम स्पष्टपणे नमूद असून दुसऱ्या बाजूस फणीधर नागाची सुबक आकृती असते. ही नाणी सोने व तांबे या दोन धातूंमध्ये ज्ञात असून फनम व कासू या प्रकारांमधील आहेत..
वेंकटगिरीतील नाणी त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. शिवाय घोरपड्यांप्रमाणे शिवपूर्वकालीन मराठे घराण्याने बदलत्या परिस्थितीप्रमाणे चलनाशी जुळवून घेतल्याचीही थोडीच उदाहरणे पाहावयास मिळतात..
――――――――――――
संदर्भ : हिंदुराव घोरपडे घराण्याचा दक्षिणेतील इतिहास.
No comments:
Post a Comment