छत्रपतींच्या सिंहासनाची रचना
(भाग तिसरा = मयुरासन अर्थात तख्त-ए-ताऊस)
शिवाजी
महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते सामान्य रयतेसाठी आणि ऐश्वर्याचा
दिखाव न करता ते वाढीस नेलं ही. स्वराज्याच्या गड किल्ल्यांची बांधणी जर
पाहिली तर ती सामरीक दृष्ट्या वैभवशाली दिसून येतील आणि त्यामध्ये
संपत्तीचा आणि आर्थिक संपन्नतेचा कोठेही लवलेश दिसून येणार नाही. असे
असताना महाराजांनी सिंहासन बनविता 32 मण सोन्याचे म्हणजेच इतके मौल्यवान का
बनविले असेल. हे सिंहासन बनवितांना त्यांच्या मनात काय विचार असतील,
त्याबद्दल माझे विचार आणि संकलन मी या भागात आपल्या समोर मांडणार आहे.
जेष्ठ इतिहासकार यदुनाथ सरकार महाराजांच्या सिंहासना बद्दल आपले मत व्यक्त करीत असताना नमूद करतात, “बत्तीस मण (सोने) म्हणजे चौदा
लक्ष रुपयांचे सोनेंच (तत्कालीन रुपयात) झाले. रत्नांची किमंत त्या
शिवाय, हे सिंहासन तयार करीत असतांना दिल्लेचे मयुर सिंहासन शिवाजीच्या
दृष्टीपुढे असावे.” इथे यदुनाथ सरकार यांना म्हणावयाचे आहे
की, शिवाजी महाराजांनी आपले सिंहासन बनवित असताना दिल्लीच्या बादशहाचे
मयुरासन आपल्या चित्तात ठेवले असेल. मयुरासन म्हणजेच इतिहास प्रसिध्द
“तख्त-ए-ताऊस” होय. आपल्याला जर स्वराजाच्या सिंहासनाचे ऐश्वर्य
अभ्यासायचे असेल तर आपणास मुगलांच्या मयुरासनाबद्दल माहिती घेणे
क्रमप्राप्त आहे. मोगलांचे हे मयुरासन हे हिंदु पध्दतीने तयार केलेले असे
तख्त होते. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई नमूद करतात, “धर्म संबंधांत शहाजहानचा स्वभाव मुळीच आग्रही नव्हता आरंभी त्याचा कल मुसलमानी धर्माकडे विशेष होता. अकबराने सुरु केलेले सौरवर्ष
त्याने बदलून चांद्रवर्ष सुरु केले. आरंभी क्रिस्ती लोकास त्याने छळिले,
परंतु शेवटी अकबराप्रमाणें त्याच्या कृत्यांत हिंदु आचारविचाराची छटा
दिसूं लागली. त्याने प्राचीन हिंदु (रितीरिवाजाने) राजाप्रमाणे मयुरासन
नावाचे सिंहासन तयार करुवून ते उपयोगांत आणिले.”
हे
मयुरासन शहाजहाने हिंदु रितीरिवाजा प्रमाणे म्हणजेच शास्त्रानुसार बनविले
असले, तरी ते शेवटी होते पृथ्वीपती मोगलांच्या ऐश्वर्याचे, सार्वभौम
अधिकाराचे, सत्तेचे आणि सामित्वाचे प्रतिक. म्हणूनच मोगलांचे ऐश्वर्याचे
वर्णन सांगतांना रियासतकार शहाजहानच्या राज्यव्यवस्थेविषयी ओवेनचा
अभिप्राय पुढील प्रमाणे नमूद करतात, “शहाजहानच्या कारकिर्दीत मोगल
बादशाही भरभराटीचा कळस झाला. बादशाहीच्या जुन्या प्रांतात शहाजहानच्या
वेळेस जी शांतता, सुव्यवस्था व भरभराट वास करीत होती तशी तेथे पूर्वी कधी
नव्हती. राजपुतान्यातील मांडलिक राजे बादशहाचे हुकूम झेलण्यास ह्या
वेळेच्या इतके पूर्वी कधी तप्तर नव्हते. दरबाराचा थाट, बादशाही सत्ता,
संपत्ति व सन्मान ह्यामध्ये शहाजहानची बरोबरी करणारा दुसरा मोगल बादशहा
झाला नाही. शहाजहानच्या वेळेस मोगल बादशाही लौकीक सर्व पृथ्वीवर पसरला
होता, तसा पूवी कधी नव्हता.”
अकबरापासून
बादशहाच्या जव्हेरखान्यात पुष्कळ रत्नसंचय झाला होता. शहाजहानचे मनात आले
की, हे रत्न लोकांच्या नजरेस पडण्याची सोय नसली तर ती नुसती बाळगून
त्याचा उपयोग तरी काय ? असे म्हणून त्याने सर्व रत्ने आपणापुढे आणवून
त्यापैकी सुमारे 86 लाख किमतीची चांगली रत्ने निवडून काडली, आणि 1 लक्ष
तोळे सोने (तत्कालीन किमंत 14 लाख रुपये) खरेदी करुन कसबी सोनार कामावर
बसविले. आणि बेबादलखान याच्या देखरेखीखाली नवीन मयुरासन तयार करविले. ते
काम सात वर्ष चालले. त्याची लांबी सव्वातीन यार्ड, रुंदी अडीच यार्ड व
उंची पाच यार्ड होती. ह्या सिंहासनात ती सर्व रत्ने गोवून देण्यात आली.
त्यास द्वादश कोन व तितकेच खांब होते. वर एक लहानसे झाड करवून प्रत्येक
खांबाच्या शिखरावर दोन-दोन मोर बसविलेले होते. एवढ्याच वरुन त्यास
मयूरासन नाव पडले ते मयुरावर बसविलेले नव्हते. वर जाण्यास तीन रत्नखचित
पाय-या असून, अकरा बाजू कठडें बसवून बंद केलेल्या होत्या. बारावी बाजू
प्रवेशाची असून उघडी होती. आंतल्या बाजूस एक पारशी कविंची कवने कोरविलेली
होती. ह्या सिंहासनास लागलेल्या साहित्याची किमंत एक कोट रुपये असून,
त्याशिवाय मजुरीचा खर्च काय झाला असेल तो निराळा. दिनांक 12 मार्च 1635 ला
रोजी ह्या मयुरसिंहासनावर शहाजहानने प्रथम आरोहण केल्याची नोंद आहे.
“Is the Figure of the biggest Pearl that ever I saw in the Court of the Great Mogul. It hangs about the artificial Peacocks neck that adorns his great Throne.- Tavernier
टैवर्नियर
हा फ्रान्सचा हिरे व्यापारी होता. तो जेव्हा भारत भेटीवर होता, तेव्हा
त्याने मयुरासन पाहिले आणि त्याच्यातिल काही हि-यांचे स्केच काढलेली आहेत.
त्यातीलच हे चित्र.
बादशहाचे
जव्हाहीरखान्यात 5 कोटीचा ऐवज होता, व सुमारे 2 कोटींचे जवाहीर राजपुत्र व
इतर मंडळी यांच्याकडे होते. 5 कोटी पैकी 2 कोटींचा ऐवजाचे दागिने
बादशहाच्या अंगावर नेहमी घालावयाचे होते. शहाजहानच्या मंत्र जपण्याच्या
दोन माळा होत्या, त्यांचीही किमंत सुमारे 20 लाख रुपये होती. इतक्या
दौलतीचा स्वामी शहाजहान अन् त्याचे सिंहासन त्याच प्रमाणे असेणे अपेक्षितच
होते. आणि म्हणूनच या ऐश्वर्याला अनुसरुनच मयुरासन बनविले होते.
तत्कालीन सोन्याचा व रत्नांचा भाव पाहता आजच्या घडीला मयुरासनाचे मुल्य
काढणे फार कठिण अशी बाब आहे. फार कठिण का ते या सिंहासनाच आणखीण एक
वैशिष्ट्य सांगितल्यावर आपल्या लक्ष्यात येईल. मयुरासनाला ज्या ज्या
रत्नांनी शोभा आणली होती, त्यातीलच एक मुख्य घटक होता “कोहिनूर” हिरा!!
होय कोहिनूर हिरा.. कोहिनूर हिरा बसविलेले रत्नजडित सोन्याचे मयूरासन हे
भारताच्या ऐतिहासिक वैभवाचे द्योतक होते. परंतू 1739 इराणच्या नादिर शहाने
जेव्हा दिल्लीवर स्वारी केली, तेव्हा त्याने दिल्ली लूटताना हे मयूरासन
ही लुटून नेलं. अशी अख्यायिका आहे की, नादिर शहाचे लक्ष या हि-याच्या
प्रकाशावर पडले तेव्हा त्याच्या मुखातून ‘कुह-ए-नूर’ (प्रकाशाचा पर्वत) हे
शब्द बाहेर पडले व त्याने या हि-याचे नांव कोहिनूर ठेवले. या
मयूरासनाच्या लूटीचे मराठ्यांच्या इतिहासा फार गंभीर परिणाम झालेत. ते कसे
व कोणते याची चर्चा मी माझ्या पुस्तकातून करणार आहेच. या लेखाच्या
दरम्यान केल्यास ‘छत्रपतींच्या सिंहासनाची रचना’ या विषयास उचीत न्याय देता येणार नाही. असो.
असे
होते शहाजहानचे मयूरासन एकूण 1 लक्ष तोळे सोने वापरुन केलेले सिंहासन आणि
महाराजांचे होते 32 मण सोन्याचे सिंहासन. मग हे मण, तोळे, शेर यांचा काय
संबंध आहे. कारण इंटरनेट चाळल्यावर तुम्हचा नक्कीच गोंधळ होईल, की
महाराजांचे सिंहासन नेमकं किती किलो वजनाच होत 144 किलो. कि 1280 किलो.
आणि तसेच इतके सोने असतिल का स्वराज्यात याचीही नेमकी माहिती कोठे मिळेल
याबाबत आपण पुढील लेखात पाहू..
लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार
(क्रमशः)
No comments:
Post a Comment