महादजींनी रचलेला पाळणा
लेखन :Pramod Karajagi
Pramod Karajagi
मित्रानो, भावभक्तीचा नजराणा यातील गेल्या भागात महादजींनी रचलेल्या एका अभंगाचा आस्वाद घेतला. अभंग म्हणजे भगवान कृष्णाच्या भक्तीची अत्यंत सुंदर अभिव्यक्ती आहे. महादजींच्या या अभंगात जीवनातील आव्हानांवर मात करून मोक्षप्राप्तीसाठी देव मदत करेल असा विश्वासही व्यक्त होतो.
‘भावभक्तीचा नजराणा’ या पुष्पहारातील दुसरे पुष्प आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णावरील“पाळणा “होय. पाळणा हे मराठी साहित्यातील एक गीतात्मक काव्यप्रकार आहे. हे लहान मुलांना झोपवण्यासाठी गायल्या जाणाऱ्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाळणा काव्य प्रामुख्याने आई आणि बाळ यांच्यातील एक अदृश्य नात्याचे गेय प्रतीक आहे. यात बालकावरील प्रेम, माया, विश्वास आणि अंतरंगातून वाहणारी अतूट आत्मीयता दर्शविली जाते.काही पाळणा काव्यांमध्ये विनोद आणि गंमत देखील असते. संत साहित्यामध्ये अभंग किंवा ओव्या ज्या मुबलक प्रमाणात आढळतात त्यामानाने पाळणा हा काव्य प्रकार कमीच आढळतो. तथापि महादजींनी मराठी काव्यातील पाळणा प्रकार देखील सहजपणे हाताळलेला दिसतो.
महादजींनी रचलेला पाळणा खाली दिला आहे:
चला चला तुम्ही नंद ग्रहाप्रती चला,यशोदे उदरी पुत्र जन्मला,परम हर्ष पावला रे II
सकळ मिळुनी तुम्ही दधि नवनीत घट भरुनी पाहू मुला रे I
मंगल द्रव्ये घेऊनि वाद्ये गजर करू बहू भला रे II१II
नंदा गणी ते गोप येऊनि मिळविती दधि हलादिला रे I
आंगी परस्पर चिन्हित करिता वरद पाणि उमटला रे II२II
हर्षित अवनी मंगल दावीत वासर अति शोभला रे I
वैकुंठ केवळ गोकुळ भासत "माधव" शिशु प्रगटला रे II३II
येथे नोंद घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे शेवटच्या पंक्तीमधील "माधव" हा शब्द महादजी अशा अर्थाने वापरला आहे. महादजींच्या इतर अनेक कवनातून स्वतःचा त्यांनी माधव असा उल्लेख केलेला आहे.
पाळणा काव्याची भाषा सोपी आणि रसाळ असते कारण यात लहान मुलांना समजण्यास सोपे शब्द आणि वाक्यरचना वापरली जाते.अनेकदा यात लाडके शब्द आणि बोलीभाषा वापरली जाते. या काव्य प्रकारचे अजून एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे यातील लय आणि गेयता होय.
महादजी शिंदे यांनी अनेक पाळणे रचले, त्यापैकी त्यांनी लिहिलेल्या एका 'पाळणा' या काव्यप्रकारामधील सुरुवातीचे शब्द असे आहेत :
जो जो जो जो दे नीज बाळा ,सुंदर तू घननीळा !
बाह्य वृत्ती ते गोपाळा , अंबरी लावी डोळा !!
मित्रांनो, पुढील भावभक्तीच्या नजराण्यात महादजी शिंद्यांशी संबंधित एका आगळ्या काव्य प्रकाराची ओळख करून घेऊ या. हा लेख कृष्णार्पणवस्तु !!
संदर्भ: महादजी शिंदे यांचा अस्सल पत्रव्यवहार,भाग २, पत्रक्रमांक १८०, जीवबादादांचे चरित्रलेखक: न. व्यं. राजाध्यक्ष, राजकवी महाराज महादजी शिंदे उर्फ पाटीलबाबा आली जाबहाद्दर कृत कविता:संशोधक व संपादक भास्कर रामचंद्र भालेराव, अलिजाबहादूर महादजी शिंदे यांचे चरित्रलेखक: विष्णू रघुनाथ नातू ,महादजी शिंदे याजकडील राजकारणे खंड ३, महान मराठा सेनानी:महादजी शिंदे ले.प्रमोद करजगी
कर्नाटकातील मुगेहळ्ळी येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरातील कृष्णाच्या पाळण्याचे तेराव्या शतकातील रेखीव शिल्प
No comments:
Post a Comment