विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

महान संत सेनापती महादजी शिंदे यांनी भागवत धर्माच्या पंथावर केलेल्या यात्रे बद्दलचे सखोल वृत्त

  महान संत सेनापती महादजी शिंदे यांनी भागवत धर्माच्या पंथावर केलेल्या यात्रे बद्दलचे सखोल वृत्त 

लेखन :

Pramod Karajagi

 

 

भावभक्तीचा अनोखा नजराणा
मित्रांनो, महान संत सेनापती महादजी शिंदे यांनी भागवत धर्माच्या पंथावर केलेल्या यात्रे बद्दलचे सखोल वृत्त आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल किंवा नसेल. ज्या महादजी शिंदे यांनी आयुष्यभर हातात तलवार घेऊन समरांगणें गाजवली ,लढाया केल्या, राजकारणे केली, कवायती फौजेची मुहूर्तमेढ हिंदुस्थानात रोवली, आपली अजिंक्य अशी लष्करी सेना निर्माण केली, त्याच महादजींनी सवड मिळेल तेंव्हा भागवत धर्माची साथसोबत केली. श्रावण महिन्यात भागवताचे पारायण न चुकता करणारे महादजी हिंदुस्थानातील अशा प्रकारचे एकमेवाद्वितीय उदाहरण असेल. ज्या हातात महादजींनी शस्त्र धरले, त्याच हातात धर्मग्रंथांचे शास्त्र सुद्धा धरले,त्याच हातात स्मरणी घेऊन भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण केले व त्याच हातात लेखणी धरून श्रीकृष्णावर लालित्यपूर्ण विविध भाषी साहित्य रचले.महादजींच्या संत सहवासाचा आणि त्यांच्या संत साहित्य संपदेचा आढावा ' भावभक्तीचा नजराणा ' या बॅनरखाली आपण घेणार आहोत.
संतश्रेष्ठ नामदेव महाराज त्यांच्या 'देह जावो अथवा राहो' या अंभगात शेवटी ते म्हणतात ;
" नामा म्हणे केशवराजा I केला पण हा चालवी माझा II "
याच पाऊलावर पाउल टाकीत महादजींनी आयुष्याच्या अखेर पर्यंत भगवान कृष्णाची आर्त स्वरात आळवणी केली. त्यांनी आपल्या काव्य रचनेत मराठी काव्यातील अनेकविध रचनांचा समर्थपणे वापर केला. त्यात आरत्या, ओव्या, अभंग, पाळणे, गुरुस्तुती इत्यादी अनेक प्रकार सहजपणे हाताळले. एव्हढेच नव्हे तर कृष्णाबद्दल भक्तिरसपूर्ण अशी लावणी सुद्धा रचली. या लेखात अशाच एका काव्य प्रकारची ,त्यांनी रचलेल्या अभंगाची तोंडओळख करून घेऊ या.
अभंग:
देवासी भेटोनि, बोलावेसे वाटे! आवडी गोमटे, रूप पाहू !!१!!
बाळपणी मोठ्ठा, लागतसे छंद! आवडी गोविंद, दावा कोणी !!२!!
सारी दर्शनासी, पुसता शिणलो! सत्संग मी नेलो , भाग्य योगे !!३!!
जायचे संगती, पूर्ण लाभ झाला! सद्गुरू भेटला, मायबाप !!४!!
कृपा अनुग्रह, वरदकर होता ! तत्वमसि आत,माझा मी ची !!५!!
जे जे पाहे ते ते, ब्रम्हरूप भासे ! गोविंद हा दिसे, अखंडित !!६!!
धन्य हा सत्संग, धन्य गुरुराणा ! माधव देखणा, यांचे कृपे !!७!!
महादजींची या अभंगातील भाषा अत्यंत सोपी सरळ , लाघवी आणि वाणी रसाळ आहे असे दिसून येते. सामान्यजनाला समजेल, रुचेल,भावेल अशी शब्दरचना आशयाला न सोडता करणे हे त्यांच्या काव्य प्रतिभेचे वैशिष्ट्य म्हंटले पाहिजे. महादजींनी अभंगाची रचना करताना अनेकविध प्रकार हाताळले, त्यामध्ये गुरुस्तुती, अध्यात्म, कृष्णजन्म, गोपाळकाला इत्यादींचा समावेश होतो. अशा अभंगांची एकूण संख्या पंचवीस पेक्षा जास्तच भरेल.
मित्रानो, भावभक्तीच्या नजराण्यातील ही पहिली कडी श्रीकृष्णार्पणवस्तू करून पुढच्या नजराण्यात महादजींच्या अजून एका वेगळ्या काव्य प्रकाराची ओळख करून घेऊ.
_______________________________________________________________________
संदर्भ: महान मराठा सेनानी महादजी शिंदे: ले. प्रमोद करजगी , महादजी शिंदे: लेखक विश्वास दांडेकर , राजकवी महाराज महादजी शिंदे उर्फ पाटीलबाबा आलीजाबहाद्दरकृत कविता:संशोधक व संपादक भास्कर रामचंद्र भालेराव (भगवान श्रीकृष्णाचे चित्र श्री पराग घळसासी यांच्या सौजन्याने)

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...