विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

महादजी शिंदे

 महादजी शिंदे

 लेखन :

मित्रानो,१२ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे महादजी शिंदे यांची पुण्यतिथीचा दिवस ! याच दिवशी म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे माघ शुद्ध त्रयोदशी ,बुधवारी ,पांच घटिका रात्री महादजींचे पुणे येथील वानवडी ठिकाणी अनपेक्षित निधन झाले. मराठ्यांच्या साम्राज्याचा एक बुरुज कोसळला. सारी रयत आणि सरदार, उमराव, दिल्लीचा मोंगल सम्राट सर्वच हवालदिल झाले. त्यावेळी महादजींचे जवळचे सरदार व सवंगडी त्याची प्रतिक्रिया इतिहासात मिळते. त्यातून महादजींच्याबद्दलचे अतोनात प्रेम, माया आणि आदर ओथंबून दिसून येतो. काही जणांची मराठी भाषा इतकी सुंदर, काव्यमय आणि प्रभावशाली आहे की वाचताना अंगावर शहारे येतात. तसेच त्या समयी मराठ्यांची संपूर्ण हिंदुस्थानभर कशी पकड होती आणि कोणी चुकून जरी डोके वर काढले तर त्याचे पारिपत्य केले जाईल असा आत्मविश्वास या प्रतिक्रियेतून ठासून दिसतो. अशा प्रातिनिधिक,प्रतीकात्मक प्रतिक्रिया आपण येथे बघणार आहोत. त्यापैकी एक आहे ती महादजींचे जीवाभावाचे सहकारी जीवबादादा बक्षी यांची आणि दुसरी महादजींच्या मुत्सद्दी मंडळातील महत्वाचे एक असे गोपाळराव रघुनाथ चिटणीस यांची. लेखाच्या शेवटी इंग्रज इतिहासकार एच. जी.कीन यांनी महादजींच्या बद्दल व्यक्त केलेले मत दिले आहे.
महादजी शिंदे यांचा मृत्यू झाला त्याकाळात पेशव्यांचा वकील देवराव हिंगणे दिल्लीस होता. त्याला पाठवलेल्या ४ मार्च १७९४च्या दिवशी लिहिलेल्या पत्रात जीवबादादा बक्षी याने महादजींनी उत्तरेत ठेवलेल्या बंदोबस्ताचे सार्थ वर्णन केले आहे.
जीवबादादा बक्षी यांची प्रतिक्रिया: आपल्या पत्रात ते म्हणतात की “पाटीलबावास ज्वराची व्यथा दहा दिवस होऊन माघ शुद्ध १३.बुधवारी प्रांतकाळी वायूची भावना झाली. श्रीमंत व मुत्सद्दी डेऱ्यास गेले. उपाय बहुत केले. काही उपयोग न होता रात्रीच्या प्रहरी देवाज्ञा झाली. ईश्वर मोठा अनर्थ केला. त्यांच्या मागे अवसान (धीर) सोडले तर पुरुषधर्मास ठीक नाही आणि लोकही म्हणतील मागे काही दम राहिला नाही. आम्ही येथून कूच करून माघारे देशी जावे तर उत्तर हिंदुस्थानची राजकीय परिस्थिती ठीक नाही.त्यामुळे ४-८ दिवस मुक्काम करून शेखावटच्या दिशेने कूच करून जाऊ. देवजीगौळी,बापूजी मल्हार(शेणवी), बहिरो कान्हेरे हे सरदार शिखांच्या तोंडावर सहारनपूर व पानिपत येथे मजबूत बंदोबस्त ठेवून आहेत. खंडेराव हरी (भालेराव) राजस्थानात देवडीकडे मेवातच्या बंदोबस्तास आहेत. गोपाळरावभाऊ (चिटणीस) दातियाचे गढीस लागले आहेत (वेढा घातला आहे). तेथील जाबसाल (कार्यभाग) उरकून ते आग्र्यास कूच करणार आहेत. दभाई (De Boyan) साहेब अंतर्वेदीत तळ ठेवून आहेत, आग्र्याचा बंदोबस्त बाळोबातात्या पागनीस याजकडे आहे. दिल्लीचा बंदोबस्त शहाजीकडे (शहा निजामुद्दीन) आहे व त्याच्या सोबत तेथे शिंद्यांची कवायती पलटणे आहेत.खंडेराव आप्पाची फौज त्या समयी दिल्लीस पाठवली होती.अंबुजी इंगळे मेवाडच्या बंदोबस्तास आहे. ( अशा प्रकारे कोणत्याही शत्रूने) डोके उचलले तरी त्याचे पारिपत्य होईल, चिंतेची बाब नाही. असा अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता असे शिंद्यांचा सेनापती जीवबा दादा बक्षी याने लिहिले होते. या पत्रावरून येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मराठ्यांची जय्यत तयारी होती असे स्पष्ट दिसते.
मित्रांनो, हिंदुस्थानाचा नकाशा डोळ्यापुढे आणून मराठ्यांची उत्तरेत कशी वज्रमूठ होती याची कल्पना करा.
२. आबा चिटणीस यांची प्रतिक्रिया:”श्रीमंत महाराज कैलासवासी झाले. ईश्वर बहुत अनुचित गोष्ट करून मोठा घात केला. (पाटीलबावा) लक्षावधी मनुष्याचे छत्र होते. एकाएकी हा प्रकार घडेल हे मनीमानसी नव्हते. या दौलतीत कोणत्या गोष्टीची प्रतिकूलता नाही व निभावणार त्याचे (महादजीचे) पुण्य आहे. आपणासारिखे संभावित पुरुष पदरी बाळगले होते व सर्वत्र लौकिक हाच की शिंद्यांच्या पदरी मनुष्ये आहेत तशी कोणाच्याही पदरी नाहीत. तो समय हा आहे. धैर्य धरून ज्यात कोणत्याही गोष्टीची कसर न पडे तसा विचार योजिला पाहिजे.वर्तमान काळातच चित्तास खेद झाला तो पत्री कुठवर लिहिणार. ईश्वर असा प्रभू देऊन सकाळी प्रभुचरणवियोग केला ही गोष्ट अनुचित झाली. ईश्वरेच्छेस उपाय नाही. कोठे युद्ध प्रसंगी असा प्रकार घडता तर सहस्त्रावधी मनुष्य कामास येते. या समयी धैर्यावलभना खेरीज (धैर्य राखण्याशिवाय )चित्त समाधानास दुसरी तोड नाही.”
३.इंग्रज इतिहासकार कीन याने महादजींबद्दल पुढील विचार व्यक्त केले आहेत.
"हा माणूस अपवादात्मक अडचणीच्या काळात अपवादात्मक क्षमता असलेला भारतीय शासक होता. नादिरशहाने दिल्ली पाडण्यापूर्वी जन्मलेला तो लॉर्ड लेकच्या त्याच शाही शहराचा ताबा घेण्याआधी दहा वर्षांच्या आत जगला. म्हणून त्याचे जीवन अराजकतेचा अंधार आणि सुव्यवस्थेची पहाट याच्या दरम्यानच्या वेळेशी अगदी तंतोतंत जुळते, त्याच्या श्रमांनी ते पार करण्यास मदत केली. स्वत: व्यवस्थेचा पुरस्कर्ता,त्याने युद्ध आणि लुटालूटीचा सर्वात वाईट कहर, परिणामी निराशा दूर करण्यासाठी आणि पुनर्स्थापना आणि सुधारणेसाठी समाजाची विस्कटलेले धागे तयार करण्यासाठी जे काही केले ते सारे केले. शहाजहानच्या शंभर वर्षांनंतर, तारेरनियरच्या लिखाणानुसार, गृहयुद्धामुळे देशाचे तुकडे झाले आणि घरगुती गोंधळाच्या प्रत्येक प्रजातीने हाहाकार माजवला. त्याकाळात खलनायकी प्रत्येक प्रकारात प्रचलित होती; सर्व कायदा आणि धर्म पायदळी तुडवले गेले, खाजगी मैत्री आणि संबंध, तसेच समाज आणि सरकार यांचे बंधन तुटले; आणि प्रत्येक व्यक्ती, जणू काही जंगली श्वापदांच्या जंगलात त्याच्या स्वत: च्या हाताच्या ताकदीशिवाय कशावरही अवलंबून राहू शकत नाही. (H.G.Keene यांनी “Madhav Rao Scindia’ या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून)
१२ फेब्रुवारी, या पुण्यतिथीच्या निमित्ताने महादजींच्या उत्तर हिंदुस्थानातील भारलेल्या आणि बहरलेल्या प्रभावाची स्मृती पुन्हा जागृत करू या. आपल्या सर्वांतर्फे मनोभावे त्रिवार अभिवादन !!
_______________________________________________________________________
संदर्भ:Poona Residency Correspondence, letter 289 dated7thApril1794, letter 9,dated 2ndDec.1784,English Records of Maratha History,Sir Yadunath Sarkar,शिंदेशाही इतिहासाची साधने भाग ८, लेखांक ६३,Final French Struggle in India by Col. Malleson रूलर्स ऑफ इंडिया: कीन, पेशवे दफ्तर खंड २२ लेख२३४,शिंदेशाहीची राजकारणे (१७९४ ते १७९४), महान मराठा सेनानी:महादजी शिंदे ले. करजगी प्रमोद

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...