विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज -२

 


छत्रपती शिवाजी महाराज -२
--------------------------
निजामशहाच्या अखत्यारीतील पुणे जिल्ह्यातील हिंगणी बेरडी व देऊळगाव पाटीलकीच्या वतनावर बाबाजी भोसले आपल्या मालोजी व विठोजी या दोन पुत्रांसह रहात होते. त्या भागातील लोकांशी तंटा निर्माण झाल्याने ते दौलताबाद पायथ्याशी वेरूळ येथे स्थलांतरित झाले. दोघे बंधू नोकरीसाठी निजाम सरदार सिंदखेडच्या जाधवराव यांच्याकडे बारगीर म्हणून गेले.
जाधवराव यांच्याकडे घरी कार्यक्रम होता. जाधवरावांनी मालोजी यांचा छोटा मुलगा शाहजी यास व आपल्या मुलीला मांडीवर बसवून दोघे अतीशय अनुरूप आहेत असे म्हटले. लगेच मालोजींनी घोषणा केली की जाधवराव यांची कन्या त्यांची सून झाली! संतप्त जाधवरावांनी दोघा भावांना नोकरी वरून काढून टाकले!
एके रात्री मालोजी शेतात राखण करीत असताना त्यांनी एका बिळातून नाग बाहेर आलेला पाहिला. नाग पुरलेल्या खजिन्याची राखण करतात या समजुतीने त्यांनी त्या ठिकाणी खोदले तर त्यांना सोन्याच्या नाण्यांनी भरलेले सात हंडे सापडले! त्यानंतर त्यांनी एक हजार सैनिकांच सशस्त्र घोडदळ तयार केले. ते फलटणच्या निंबाळकर यांना जाऊन मिळाले! नंतर ते निजामशाहीचे सरदार बनले.
आता लखुजी जाधवराव यांनी आपली कन्या जिजाबाईचा शहाजींशी विवाह करून दिला!
मालोजींच्या मृत्यूनंतर विठोजी फौजेचे प्रमुख झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर मालोजींचे ज्येष्ठ पुत्र शहाजी प्रमुख सरदार झाले. (बहुधा १६२३).
मलिक अंबर निजामाचा वजीर होता. त्याच्या मृत्यूनंतर मुलगा फत्तेखान वजीर झाला. निजामशाहान कारस्थानी फत्तेखानाला एप्रिल १६३० मध्ये कैदेत टाकले. त्याचवर्षी दरबारात लखुजी जाधवराव यांना ठार केले! शहाजीराजे यांनी निजामशाही सोडली. निजामशाही, आदिलशाही व मुघल राज्यांच्या सीमा एक मेकींना भिडलेल्या होत्या आणि तिथे बंदोबस्त नव्हता. शहाजींनी तिथेच हल्ले केले. १६३० अखेरीस ते आपल्या मोठ्या मुलासह आणि बंधूसह मुघलांच्या सेवेत दाखल झाले! तिथून ते १६३२ मध्ये विजापूरच्या सेवेत गेले.
फेब्रुवारी १६३२ मध्ये वजीर फत्तेखान याने निजामशहाला ठार करून त्याच्या वारसाला - हुसेन निजामशहा - गादीवर बसवले. १७ जून १६३३ रोजी मुघलांनी दौलताबादवर हल्ला करून जिंकून घेतले व निजामशहाला कैद केले! निजामशाही खिळखिळी झाली. त्यामुळे स्थानिक सुभेदारांनी त्यांच्या ताब्यातील सुभ्यांना 'स्वतंत्र राज्य ' म्हणून घोषित केले! शाहजींनी पुणे ते चाकण, नाशिक, नगर पर्यंतचा मुलुख जिंकून घेतला आणि भरपूर लुटालूट केली. विजापूरच्या सहाय्याने निजामशाह या मुलाला राज्याभिषेक करवून घेतचकला आणि तीन वर्षे राज्यकारभार चालवला. उत्तर कोकण ताब्यात घेतले. मुघलांच्या ताब्यातील बिदर व दौलताबादच्या मुलखावर हल्ले करून पूर्वीच्या निजामशाहीचा २० लाख होनांचा पाव भाग जिंकून घेतला.
सन १६३६ च्या फेब्रुवारीत मुघलांच्या हल्ल्यात सपशेल पराभव झाला आणि ७ किल्ले व निजामशहाला मोगलांच्या ताब्यात देऊन ते विजापूरच्या सेवेत दाखल झाले! आदिलशहाने चाकण पासून इंदापूर ते शिरवळपर्यंतचा भाग शहाजी राजे यांना जहागीर म्हणून दिला होता! त्याचा कारभार दादोजी कोंडदेव यांच्याकडे सोपवला होता. पुढे त्यांनी स्वतःसाठी म्हैसूरचा पठारावर आणि पूर्व कर्नाटकात प्रचंड मालमत्ता उभी केली.
शाहजी राजे आणि जिजाबाईंना दोन पुत्र झाले- संभाजी आणि शिवाजी. (जदुनाथ सरकार यांनी शहाजीराजे व जिजाबाई यांचे लग्नाची तसेच थोरल्या पुत्राची माहितीच दिली नाही! तसेच १६३०च्या सुमारास तुकाई मोहिते यांचेशी दुसरा विवाह केला एवढीच माहिती दिली आहे.)
शहाजीराजे यांचे दुसरे पुत्र पुण्याच्या उत्तरेस जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्मले. जिजाबाईंनी स्थानिक देवता शिवाई देवीला नवस केला होता. म्हणून आपल्या पुत्रावर कृपादृष्टी ठेवण्यासाठी 'शिवाजी' नाव ठेवले. परंतु जन्मतारखेची विश्वासार्ह नोंद नसल्याने १० एप्रिल १६२७ या तारखेला ते स्वीकारतात. (आणखी एका तज्ञांच्या मते हीच तारीख योग्य असल्याचे मला ठाऊक आहे. तसेच १६२३ ते १६३० हा इतिहास देखील फारच त्रोटक आहे.)
दिलीप गायकवाड.
२६-०३-२०२४

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...