विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज -(१)-

 


छत्रपती शिवाजी महाराज -(१)- 
लेखन : जदुनाथ सरकार.
संकलन :दिलीप गायकवाड
---------------------------------------------
२३ जानेवारी रोजी जदुनाथ सरकार यांचे छत्रपती शिवाजी महाराज, काळ आणि कर्तृत्व हे पुस्तक घेतले होते. पण ज्ञानेश्वरी समजून घेण्यात बराच काळ गेला. मराठा आणि शेतकरी संघटन उभे करण्यासाठी पायपीट ही खूपच झाली. मराठा भामट्यामागे पळाला आणि शेतकरी निवडणूक संपल्यावर विचार करतील. त्यामुळे आधी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. आता उसंत मिळाली आहे तर हा ऐतिहासिक ग्रंथ तरी पूर्ण वाचून घेतो. नंतर परत एकदा ज्ञानेश्वरी घ्यायचीच आहे!
सुरूवातीलाच भूमी आणि लोक या प्रकरणात फारच उपयुक्त माहिती दिली आहे!
घाटाला समांतर असलेल्या प्रदेशाला "डांग किंवा मावळ" म्हटलं जातं.
पूर्व आणि पश्चिम असे नैसर्गिक अलगीकरण झाले आहे. डोंगर रांगांच्या प्रदेशाजवळ कुठल्याही आक्रमणाला खीळ बसत होती. त्यामुळे लोकांना शांतता आणि सुरक्षितता लाभत होती! याउलट समृद्ध पठारी प्रदेशांमध्ये क्रांतीची आणि लुटालुटीची दृश्य नित्याची झाली होती!
बळकट स्नायुंच्या आणि नीडर हृदयाच्या या लोकांना केंद्रीय पठारी प्रदेशातील बलाढ्य हुकूमशाही सल्तनतीच्या लष्करात वरिष्ठ पदांवर काम करून मोठी बक्षिसी मिळत होती! ते दुसर्या राज्यात सुद्धा सैनिक म्हणून जात आणि तिथे दिलेल्या जहागिरीतच स्थायिक होत! ही माहिती भारतभर मराठा समाज का विखुरला आहे याचे कारण देते.
डोंगराळ प्रदेश आणि दुष्काळ यामुळे लोकांना फक्त दैनंदिन आयुष्याच्या प्राथमिक गरजांसाठी आनंदाचा पदोपदी त्याग करावा लागत होता. त्यामुळे ऐष आराम आणि रसिकतेसाठी जागाच नव्हती! सौंदर्यांभिरुची आणि सफाईदार शिष्टाचार शक्य नव्हते! त्यामुळे उत्तरेकडील लोकांना दक्षिणेकडील योद्धे अचानक धनप्राप्ती झालेले गर्विष्ठ, पैशामुळे उद्धट झालेले, रुबाबदारपणा आणि शिष्टाचार यांचा अभाव असलेले वाटले! गंमत म्हणजे आजही हीच परिस्थिती आहे!
मराठ्यांचे गुणधर्म - या वातावरणामुळे स्वावलंबीपणा, धैर्य, शौर्य, चपळपणा, चिकाटी, दीर्धोद्योगीपणा, अत्यंत साधेपणा, रांगडा स्पष्टवक्तेपणा, सामाजिक समतेची जाणीव आणि परिणामी माणसाला माणूस म्हणून बघत त्याची प्रतिष्ठा जपण या गुणांची जडणघडण झाली होती. दुर्दैवाने आज यातील बहुतांश सद्गुण मराठ्यांनी टाकून दिले आहेत!
धर्मगुरू - पवित्र पारंपरिक ज्ञानाच्या क्षेत्रात ब्राह्मणांनी त्यांची मक्तेदारी जपली होती! आध्यात्मिक अभिजात उच्चस्तरीय वर्ग म्हणून ते इतर समाजापासून अलिप्त रहात होते! परंतु जोरदार भक्तिचळवळीचा उदय झाला आणि देवासमोर सगळे समान मानले जाऊ लागले! पंढरपूर हे त्या चळवळीचे केंद्र होते!
पंधराव्या व सोळाव्या शतकात दख्खन मध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या. त्या ब्राम्हणी परंपरावादी नव्हत्या.त्या कर्मकांड, विविध रुढी, समारंभ आणि जन्म यांवर आधारित वर्ग निहाय भेदभाव या विरोधात होत्या. त्या सगळ्यांच्या प्रमुखपदी संत आणि प्रेषित, कवी आणि तत्वज्ञ होते!
(टीप: मी १२ वर्षांपासून सांगत आहे - "संघटित व्हाल तर वाचाल! नाही तर भिकारी व वेठबिगार बनाल!" खरे ठरले आहे?)
मराठा सैनिक आणि शेतकरी:- मराठा आणि कुणबी या दोन जाती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा कणा होत्या!
मराठी भाषा बोलणार्या सर्व लोकांची जात मराठा नसते. त्यामुळे मराठी बोलणारे लोक म्हणजे मराठा असा अर्थ प्रतीत होत नाही.
सन १०११ मध्ये मुंबई प्रांतात ५०००००० मराठा व २५००००० कुणबी होते! मराठा हा एक शूर, निर्भीड, मर्दानी आणि बुद्धीमान वंश आहे! (आता तर ही बुद्धीमत्ता पार लयाला गेली आणि तिसऱ्यांदा बोगस आरक्षण घेऊन चक्क गुलाल उधळून लोकांना नाचायला लावले!)
मराठ्यांच्या गुणवैशिष्ट्यातील दोष - त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य, सांघिक काम करण्याची चैतन्यशील प्रवृत्ती, साधनांच आणि सहकार्यांच व्यवस्थापन करण्याची खुबी, दूरदृष्टी आणि अँग्लो -सॅक्सन वंशाप्रमाणे स्वतःच्या इतर अवगुणांची भरपाई करणारे व्यवहारज्ञान ह्या गोष्टी कमी प्रमाणात होत्या!
(टीप - माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी जे पराक्रम गाजवले ते अपवाद वगळता वरील विधान खरे आहे!)
यावरून सर्वांना बोध घेता येईल.
जय शिवराय.
दिलीप गायकवाड.
२३-०३-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...