विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज - ३

 


छत्रपती शिवाजी महाराज - ३
--------------------------
१९३६ चे तहानुसार शाहजींनी मुघलांना दिलेल्या सात किल्ल्यात शिवनेरीचा समावेश होता. त्यामुळे त्यांनी मुतालिक दादोजी कोंडदेव यांना सांगितले की -"माझी पत्नी जिजाबाई आणि मुलगा शिवाजी यांना पुण्यात ठेवा. त्याप्रमाणे बहुधा १६३८ मध्ये शिवाजी महाराज पुण्यात आले असावेत. कारण पुण्यात निवासाची उचित व्यवस्था नव्हती. नंतर लाल महाल बांधला. जहागिरीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून दोघांचा उदरनिर्वाह होत होता.
जिजाऊ व शिवबा पुण्यात नवखे. जवळच कोणी नाही. त्यामुळे बालशिवाजी एकांतवासात वाढले. जिजाऊ धार्मिक बनल्या. माय लेकरांचे आत्यंतिक प्रेम निर्माण झाले. बालपणापासून शिवबाला स्वावलंबी होण भाग पडले. त्यामुळे आपल्या कल्पना कोणाच्याही मदतीशिवाय अंमलात आणणे, पुढाकार घेणे, कोणाच्या मदतीशिवाय कार्य करणे या गोष्टी ते आपोआप करू लागले!
रणदुल्लाखान याच्या हाताखाली शहाजी राजे यांना १६३९ च्या बेंगलोर मोहिमेत विजय मिळाला. आदिलशहाने त्यांना नवीन जहागिरीची राजधानी वसविण्यासाठी बेंगलोर दिले. १६४० साली शाहजींना राहण्यासाठी स्थिर ठिकाण मिळाले.
शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी निष्णात शिक्षक नेमले होते. सात वर्षांचे झाले की गरुकडे सोपवून लिपी पूर्ण शिकवली. (शहाजीराजे व त्यांचे मुलांना संस्कृत येत होते.) ते कुस्ती, मुष्टियुद्ध, घोडेस्वारी आणि इतर शिक्षणात पारंगत झाले होते.
राम व पांडवांच्या कथांमधून त्यांच्या मनावर उत्तम संस्कार झाले होते! कुठे ही गेले तरी ते हिंदू मुस्लिम संतांच्या सहवासात जात असत.
शिवाजी महाराज १२ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा विवाह करावा आणि पहिल्या दर्जाच्या सरदाराचा पुत्र म्हणून उचित नियमित तरतूद करावी असे पत्र जिजाबाईंनी पाठविले होते. त्यामुळे त्यांना बेंगळुरूला १६४०-४१ साली बोलावून घेतले होते. बेंगळुरू येथील सर्व मालमत्ता तुका बाईंच्या पुत्राला दिली होती याचा जाब जिजाबाईंनी विचारला होता. त्यानंतर पुण्याची जहागिर (४०,००० होन किंवा १५०००० रुपये) औपचारिकरित्या शहाजींचा कारभारी म्हणून आणि नंतर पूर्ण मुखत्यार म्हणून शिवाजी महाराजांना दिली. तसेच बेंगळुरू येथील सईबाई निंबाळकर यांच्याशी शिवबाचा विवाह ही केला!
आता जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांना पुणे जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी चार विभाग प्रमुख सोबत देऊन पुण्यास पाठविले. दादोजी कोंडदेव जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर मंत्रीमंडळ आणि सार्वजनिक न्यायालयांचा (महाजर) कारभार पाहू लागले. १६४२ मध्ये ही नवीन प्रशासकीय व्यवस्था सुरू झाली तेव्हा शिवाजी महाराजांनी १६ वर्षात पदार्पण केले होते! सन १६४६ मध्ये दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर पुण्याचे जहागिरदार म्हणून ते स्वतंत्रपणे आणि पूर्णत्वाने कारभार पाहू लागले!
सततच्या लढाया आणि दुष्काळ यामुळे पुणे परगणा उजाड बनला होता. लांडगे फार झाले होते. ४०००० होन महसूल असला तरी तो प्रत्यक्ष फार कमी मिळत होता. त्यामुळे आधी लांडगे ठार केले आणि नवीन लागवड करणाऱ्यांना सारा कमी केला-
पहिल्या वर्षी फक्त प्रति बिघा एक रुका (आण्याचा १२ वा भाग.)
दुसर्या वर्षी आण्याचा चौथा भाग आणि तिसरे वर्षी अर्धा आणा.
चौथ्या वर्षी पाऊण आणा, पाचव्या वर्षी चार आणे, सहाव्या वर्षी आठ आणे, सातव्या वर्षी एक रुपया, आठव्या वर्षी पासून पुढे मलिक अंबरच्या जमीन व्यवस्थेप्रमाणे!
एक बिघा = ४३८३ चौरस यार्ड. एक एकर=४८४० चौरस यार्ड.
बारा मावळ - पुण्याच्या पश्चिमेस ९० मैल लांब व १२ ते २४ मैल रुंदीचा डोंगर दर्या खोर्यांनी व घनदाट जंगलांनी भरलेला पट्टा! या जंगलातून बाहेर पडणे कठीण!
उत्तरेकडील भागात कोळी लोक आणि दक्षिणेस मराठे राहतात. (वाचकांनी कृपया सत्यता तपासून सांगावी.)
सामाजिक स्वरूप आदिवासी पद्धतीच किंवा पितृसत्ताक पद्धतीचही नव्हतं! प्रांताचा उपविभाग देशमुखांच्या अखत्यारीत होता. त्यांचे कारभारी ब्राम्हण आणि हिशोब व पत्रव्यवहार चिटणीस व फडणीस हे कायस्थ प्रभू जातीचे असत.
शिवाजी महाराज सतत भेटी देत असल्याने लोकांशी सलगी आणि जिव्हाळा निर्माण झाला होता. याच मुलुखातून शिवाजी महाराजांना निष्णात सैनिक मिळाले! येसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी व सूर्याजी मालुसरे हे त्यात प्रमुख. करीचे जेधे नायक, हिरडस मावळचे बांदल नायक हे सुरूवातीचे निष्ठावान अनुयायी होते! गुंजन मावळचे शिळीमकर नायक व कानद खोऱ्यातील मरळ देशमुख (झुंजारराव) यांचाही समावेश होता.
२७-०३-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...