विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज- ६

 


छत्रपती शिवाजी महाराज- ६
--------------------------
शिवरायांनी आपली सर्व पाऊले अत्यंत काळजीपूर्वक उचलली होती. आपणास काय करायचे आहे आणि काय केले पाहिजे हे त्यांनी अचूक ठरविले. त्यानुसार त्यांनी निजाम व आदिलशाही मुलुख आणि किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्य निर्माण केले. खंडण्या उकळून प्रचंड खजिना जमा केला आणि मजबूत किल्ले व फौज उभी केली. मुघलांशी संघर्ष शिताफीने टाळला. कारण १६५३ पासून मुघलांचा दक्षिणेचा सुभेदार शहजादा औरंगजेब हुशार आणि सामर्थ्यशाली होता.
मुहम्मद आदिलशहाच्या मृत्यू नंतर (०४-११-१६५६) औरंगजेबाने विजापूरवर स्वारी करण्याची तयारी सुरू केली. आदिलशहाच्या सरदार व जहागीरदारांना आपल्याकडे वळवण्याचे काम करत होता. अहमदनगर येथे मुल्तफत खान हा मुघल प्रशासक होता. शिवरायांनी त्याला खलिता धाडला - आम्ही मुघलांशी हातमिळवणी करू इच्छितो. "त्याच्याशी संपर्काचा मार्ग खुला ठेवावा!" औरंगजेबाने ही सामोपचाराच्या भाषेत उत्तर देण्यास सांगितले होते.
शिवरायांनी सोनाजीपंत हा वकील मार्च १६५७ मध्ये औरंगजेबाकडे भेटीसाठी पाठवला. तेव्हा त्याने बिदरला वेढा घातला होता. मराठा प्रमुखांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील अशी हमी मुघलांच्या वतीने दिली. त्या मागण्या अशा -
१) विजापूरच्या ताब्यातील सर्व किल्ले आणि त्यांच्या ताब्यातील गावांवरच्या महाराजांचा हक्क मान्य करावा.
२) दाभोळ आणि त्याच्या सभोवतालचा प्रदेश आम्हाकडे असावा.
त्याला औरंगजेबाने २३-०४-१६५७ रोजी उत्तर दिले - महाराजांनी सशस्त्र मदत पाठवून मुघलांना मदत करावी व निष्ठा सिद्ध करावी.
महाराजांनी चतुराईने दूतास सल्लामसलत करण्यासाठी परत बोलावून घेतले आणि तातडीने मुघलांच्या विरोधात युद्ध सुरू केले. मिनाजी भोसले व काशी यांनी राशीन व चांभारगोंदे (श्रीगोंदे) उपविभागातील गावे लुटली. पण किल्ल्यातील पेठ लुटण्याचा प्रयत्न फसला.
शिवरायांनी स्वतः ३० एप्रिल रोजी रात्री जुन्नर शहर लुटून ३,००,००० होऊन, २०० घोडे कपडे आणि दागिने मिळाले.
मग औरंगजेबाने नासिरीखान व इराजखान आणि काही सरदार ३००० घोडदळासह अहमदनगर उपविभागात पाठविले. रावकर्ण यास आपले औरंगाबाद ठाणे सांभाळण्यासाठी सांगितले.
मुल्तफत खानने मिन्हाजींचा पराभव केला व मराठ्यांना हुसकावून लावले.
शाहिस्तेखान आणि रावकर्ण यांच्या फौजा आल्यावर शिवराय जुन्नरमधून निघून नगर जिल्ह्यात जाऊन लुटालूट केली. नासिरीखानाने अतीशय वेगवान चढाई करून मराठा सैन्याला तडाखा दिला. त्यामुळे बरेच मावळे मारले गेले व बाकीचे पळून गेले.
औरंगजेबाने नासिरीखान व इतर अधिकार्यांना लिहिले की - शिवाजीच्या भूमीत घुसून सूड घ्या, लूट करा, गावे जाळा, लोकांना गुलाम बनवा. जे पाटील सरदार शिवाजीला मिळाले असतील त्यांना ठार करा. त्याने चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी करतलबखान जुन्नर, अब्दुल मुनिम नमुना गड व नासिर खान आणि रावकर्ण यांना परांडा जवळ पांडा येथे तैनात केले.
पावसाळ्यात काही करता येत नव्हते. शहाजहान बादशहा आजारी पडला आणि वारस होण्यासाठी मुलांमध्ये युद्धे झाली. विजापूरने मुघलांच्या बरोबर तह केला.
नासिरीखान परत गेला होता. त्यामुळे शिवरायांनी २४ ऑक्टोबर रोजी कल्याण शहर ताब्यात घेतले.
विजापूरकर व मुघल एकत्र आल्यामुळे शिवरायांनी नासिरीखानाशी परत एकदा समेटासाठी बोलणी सुरू केली. खानाच्या सूचनेनुसार मागण्या घेऊन दूत पाठवला. पण समेट झाला नाही. म्हणून शिवरायांनी औरंगजेबाकडे २५ जानेवारी १६५८ रोजी रघुनाथ पंतांना पाठविले. तेव्हा तो दिल्लीला निघाला होता. त्याने सांगितले - तुमचे गुन्हे क्षमा करण्याच्या पात्रतेचे नसले तरी तुम्हाला पश्चात्ताप होत असल्याने क्षमा करीत आहे. जुन्या निजामशाहीतील आमच्या ताब्यात असलेले व सद्या आदिलशाहीतील कोकणातील किल्ले आणि प्रदेश, शाहजींच्या जुन्या जहागिरीतील गावे तुम्हाला दिली. सोनोपंत हे दूत पाठवून तुम्ही मुघल सीमांचे रक्षण केले पाहिजे. तुमच्या एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ५०० स्वारांची फौज आमच्या चाकरीत पाठवावी. सोनोजी आल्यावर तुमच्या मागण्या मान्य करू.
शिवरायांना हमी न देताच औरंगजेब पुढे निघून गेला. आता तो वारसाच्या लढाईत गुंतून पडल्याने दोन वर्षे शिवराय निश्चिंत होते.
३०-०३-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...