विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज - ५

 


छत्रपती शिवाजी महाराज - ५
---------------------------
पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात घेऊन शिवरायांनी जसे बचावासाठी मोठे पाऊल उचलले तसेच राज्य विस्तार करण्यास दक्षिणेत व पश्चिमेस जायचे तर जावळीचे खोरे आपल्या ताब्यात असणे आवश्यक होते. त्या दिशेने सामोपचाराचे प्रयत्न शिवरायांनी केले. पण अहंकारी मोरेंनी ते साफ धुडकावून लावले.
विजापूरच्या पहिल्या सुलताना कडून सोळाव्या शतकात मोरे नावाच्या मराठा कुटुंबाला जावळीचे राज्य दिले. आठ पिढ्यांपर्यंत भोवतालचे प्रमुख जिंकून घेऊन, खंडण्या उकळून प्रचंड खजिना जमा केला आणि १२००० ची फौज उभी केली! त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता! अखेरचा चंद्रराव गर्विष्ठ, आळशी आणि व्यसनी झाला होता.
शिवाजी महाराजांनी १२५ निष्णात सैनिक त्यांचे सबनीस रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना देऊन चंद्रराव मोरे यास ठार करण्यासाठी जावळीस पाठविले. ते महत्त्वाच्या राजकीय मिषान दूत म्हणून गेले! पहिल्या दिवशी औपचारिक बोलणी करून टेहळणी केली आणि आता बाहेर जायचे मार्ग माहिती करून घेतले.
चंद्रराव असंरक्षितपणे राहतो हे पाहून प्रभूंनी आपली योजना तयार केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी एकांतात भेटीदरम्यान चंद्रराव आणि त्याचा भाऊ सूर्यराव यांच्यावर वार करून झपाट्याने प्रवेशद्वाराच्या बाहेर पडले! घाईघाईने जमलेल्या थोड्या लोकांचा पराभव करून जंगलात लपून रहाण्यासाठी निवडलेल्या जागी गेले.
मोरेच्या हत्येची बातमी मिळताच १५ जानेवारी १६५६ रोजी जावळीवर हल्ला केला. सहा तासातच जावळी ताब्यात घेतली. चंद्ररावाचे संपूर्ण कुटुंब रायरीला गेले होते! फक्त हनुमंत मोरे याने एका खेड्यात आश्रयाला जाऊन प्रतिकार सुरू ठेवला होता. शिवाजी महाराजांनी सेनाधिकारी शंभूजी कावजी यांना त्याचे पारिपत्य करण्यासाठी पाठविले. हनुमंत रावांच्या मुलीच्या सोयरिकीसाठी आल्याची बतावणी करून त्यांना ठार केले!
नव्याने जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावून ३० मार्चला शिवाजी महाराज रायरीस गेले. महाराजांच्या दोन मावळ्यांनी मध्यस्थी करून दोन्ही मुलांना महाराजांना शरण येण्यासाठी उद्युक्त केले. अशा रीतीने एप्रिल १६५६ मध्ये संपूर्ण जावळीचे राज्य स्वराज्यात आले. आता कोल्हापूर आणि कोकणात राज्य विस्तार करणे सुलभ झाले!
पुढे आदिलशहाशी संधान बांधण्याच्या आरोपाखाली मोठा मुलगा कृष्णाजीला मृत्यूदंड दिला. (लहान मुलगा बाजी याने आपली सुटका करून घेतली (२८ऑगष्ट) आणि चंद्रराव किताब धारण करून अंबाजी गोविंदराव मोरे सह मार्च १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंगाला जाऊन मिळाला.
जावळी ताब्यात घेऊन पश्चिमेला दोन मैलांवर प्रतापगड हा नवीन किल्ला बांधला. तिथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मंदिर बांधले. रत्नजडित अलंकार सुशोभित मूर्तीची स्थापना करून तुळजापूर प्रमाणे महोत्सव सुरू केला!
सप्टेंबर १६५६ मध्ये सुपे परगाणाही स्वराज्यात समाविष्ट केला! सावत्र आईचे भाऊ संभाजी मोहिते यांना सुपे परगाण्याचे कामकाज पहाण्यासाठी नेमले होते. हा भाग स्वतंत्र होता. शिवाजी महाराज मैत्रीपूर्ण भेटीवर गेले आणि अचानक हल्ला करून पहारेकरी ताब्यात घेतले. सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. मोहित्यांनी चाकरी करण्यास नकार दिल्यानंतर सर्व कुटुंब व नोकरचाकर शहाजी राजे यांच्याकडे पाठवले!
रोहिडा किल्ला ही महाराजांनी आपल्या स्वराज्यात समाविष्ट केला. तारीख अज्ञात आहे. अशा रीतीने पुरंदर, राजगड तोरणा कोंढाणा रोहिडा हे किल्ले व बारामती, सुपे, इंदापूर हा भाग ताब्यात घेऊन तसेच तिकोना, लोहगड व राजमाची हे किल्ले ही ताब्यात घेऊन स्वराज्य मजबूत केले.
२९-०३-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...