बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांनी मराठ्यांच्या राज्यासाठी जी बहुमोल कामगिरी केली. त्यासाठी त्यांना गजेंद्रगड जहागीर देण्यात आली. राजे बहिर्जीच्या कर्तृत्वाचा काळ खऱ्या अर्थाने म्हाळोजींच्या मृत्यूनंतर सुरू होतो. राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास सुरू झाला आणि बहिजींचे स्वतंत्र कर्तृत्वही लक्षात येण्याजोगे सुरू झाले. पन्हाळा ते जिंजी हा सुमारे ५०० मैलांचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेकदा मोगलांच्या फौजा चुकवण्यासाठी अधिक अवघड मार्गातून जावे लागले. वाटेत वेष बदलून काही प्रसंगी पायी प्रवास करणे भाग पडले. डोंगर, जंगले, नद्या, नाले, पाऊसपाणी, यातून वाट काढीत राजाराम महाराज आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी गेले. तेव्हा कोणत्याही प्रसंगी त्यांच्यावर संकट कोसळेल अशी अवस्था होती. पण बरोबर जीवास जीव देणारे सहकारी आणि निवडक मंडळी असल्यामुळे महाराज त्या बिकट प्रवासातून निभावून जिंजीला पोहोचले. त्या निवडक मंडळीत बहिर्जी हिंदूराव यांचा महाराजांना जास्तीत जास्त उपयोग झाला. किंबहुना प्रवासात जे दोन तीन जीवावरचे प्रसंग बेतले, त्यावेळी महाराजांचे संरक्षण बहिर्जीनी आपला जीव धोक्यात घालून केले नसते, तर मराठा राज्याचा सर्व ग्रंथ जिंजीच्या वाटेवरच आटोपला असता..
राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातून जिंजीला जाण्याचे ठरवले. तो प्रदेश म्हणजे, तुंगभद्रा नदीचे खोरे राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांना चांगले परिचित होते. कारण त्याच प्रदेशात गजेंन्द्रगड ही बहिर्जीची जहागीर होती. त्याशिवाय शहाजीराजे यांच्या काळात जी वाटणी झाली त्यात विजयनगर राज्याच्या नजिकची तीस खेडी घोरपड्यांच्या वाट्याला आल्याचाही उल्लेख या पूर्वी केलाच आहे. या तीस खेड्यातच या प्रदेशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून गजेंद्रगडलाही स्थान असले पाहिजे. विजयनगरपासून गजेंद्रगड केवळ तीस मैलांवर आहे..
● पुढच्या जिंजीच्या प्रवासाची तपशीलाने माहिती केशव पंडित याने लिहिलेल्या 'राजाराम चरितम्' या संस्कृत काव्यग्रंथात वाचावयास मिळते :
केशव पंडित विद्वान आणि संस्कृतज्ञ तर होताच, पण तो राजाराम महाराजांबरोबर, पंडितरावांकडे काम करीत होता. नंतर संभाजी महाराजांनी त्याला दानाध्यक्ष केले. राजाराम महाराज रायगडाहून निसटले तेव्हा त्यांच्याबरोबर केशव पंडितही असावा. महाराज पन्हाळ्यावर होते तेव्हा तर तो त्यांना कार्यक्रमाविषयी सल्ला देण्याइतका महत्त्वाचा बनला होता. राजाराम चरितम् या काव्यग्रंथात त्याने प्रवासातील वर्णने तर दिलीच आहेत, पण कोणत्या प्रसंगी कोणी महत्त्वाची कामगिरी केली, याचीही माहिती लिहून ठेवली आहे. प्रत्यक्ष डोळयांनी पाहिलेले आणि स्वतः अनुभवलेले प्रसंग या काव्यात असल्यामुळे त्या काळचे अत्यंत महत्त्वाचे व विश्वासार्ह असे हे इतिहास साधन आहे. त्यातील सर्वच माहिती येथे देण्याची आवश्यकता नाही. प्रवासातील महत्त्वाचे प्रसंग, विशेषतः बहिर्जी हिंदुराव यांच्या संदर्भातील प्रसंग या ठिकाणी दिलेले आहेत..
छत्रपती राजाराम महाराज गोकाक, सोन्दत्तीवरून पुढे गेले. त्या भागातील मोगल अधिकाऱ्यांना महाराजांच्या पलायनाची बातमी लागली. त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग होत आहे याची महाराजांना हेरांकडून बातमी समजली. अशा वेळी' 'थोर घोरपडे घराण्यातील बहिर्जी व मालोजी त्यांच्या मदतीस आले.' 'राजाराम महाराज आपले सैन्य व बहिर्जी यांसह वाटेतील मोठी नदी पार करून पुढे निघाले. पण पुढचा मार्ग आक्रमत असता तो जागजागी मोगल सैन्याने अडवून धरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा मराठा भालाईतांनी शत्रूबरोबर ठिकठिकाणी सामना दिला आणि छत्रपतींच्या जीविताचे रक्षण केले..'
● केशव पंडित पुढे म्हणतो,
'आपले लोक मोगल सैन्याने वेढले आहेत असे शूर बहिर्जी मोगलांच्या वेढ्यातून बाहेर पाहून राजा बहिर्जीला म्हणाला, ' हे पडण्याचा मार्ग दिसत नाही. तू आता मला सहाय्य कर.' तेव्हा त्या साहसी पुरुषाने राजाला खांद्यावर घेऊन पुढचा मार्ग काढला. अशा प्रकारे राजा मोगल सैन्यसागर ओलांडून, तुंगभद्रा नदी ओलांडून बहिर्जीसह पुढे गेला. तुंगभद्रेस त्याने पित्रदेवाचे तर्पण केले. नदी तीरावर बहिर्जीनी राजारामाचा मित्र आणि मंत्री, सैनिक आणि सेनाधिकारी अशा सर्व भूमिका पार पाडल्या..' अशा प्रकारे राजाराम महाराज राजे बहिर्जी आणि इतर मंडळीसह अंबूर (अर्काट जिल्हा) येथे पोहोचले. एका देवालयात त्यांनी मुक्काम केला. तेथे बाजीराव काकडे हा मराठ्यांचा अधिकारी होता. त्याच्याकडे बहिर्जीना वेष पालटून पाठवण्यात आले. बहिर्जीनी काकडे याची भेट घेऊन महाराजांच्या आगमनाची त्याला माहिती सांगितली. प्रथम त्याचा विश्वास बसला नाही. पण बहिर्जीनी युक्तिप्रयुक्तीने त्याला सर्व गोष्टी पटवून दिल्या. नंतर बहिर्जीने काकडे याला बरोबर घेऊन महाराजांची भेट करविली. केशव पंडित या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतो, 'बहिर्जी पुन्हा त्याच्याजवळ (काकडे याच्याजवळ) गेला व म्हणाला, 'महाराज आले आहेत असे माझे हेर सांगत आहेत. तरी तू त्यांच्या तू दर्शनाला नजराण्यासहीत सत्वर चल.' तेव्हा त्याच्या सैन्यातील काही ओळखीच्या लोकांनी महापराक्रमी बहिर्जीला त्याच्या तलवारीवरून व शब्दावरून ओळखले आणि मग ते सर्व प्रेमभराने भेटले..'
वाटेत बिदनूरच्या राज्यातही असाच जिवावरचा प्रसंग आला होता. राजाराम महाराज यांनी आपल्या तीनशे अनुयायांसह बिदनूरच्या राणी चेन्नम्माच्या राज्यात प्रवेश केला. ती बातमी मोगल सेनाधिकाऱ्यांना समजली. त्यांनी राणीकडे विचारणा केली. राणीने राजाराम महाराजांना आश्रय देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने मोगल सेनाधिकाऱ्याला परत पाठवले. पण नंतर मोगलांचा वेढा पडला. आणि मग त्यातून राजे बहिर्जी व मालोजी यांनी महाराजांना मोठ्या साहसी युक्तीने आणि आणि शर्थीने बाहेर काढून नेले. मासीरे आलमगिरी या फारसी इतिहासात एक प्रसंग वर्णन केला आहे..
त्यांत म्हटले आहे : मोगल सेनाधिकाऱ्याने राजाराम महाराज आणि त्यांच्या बरोबरच्या मंडळीवर रात्री छापा घातला. मोठी चकमक उडाली. तीत रूपाजी भोसले याने शत्रूबरोबर हातघाई चालू ठेऊन राजाराम व बहिर्जी घोरपडे यांना पळून जाण्यास संधी उपलब्ध करून दिली. सर्व बाजूंनी मोगली सैन्याचा गराडा पडला असता बहिर्जी राजाराम महाराजांस घेऊन निसटले. याच फारसी ग्रंथात राजे बहिर्जी यांनी छत्रपतींना कसे सुरक्षित ठेवले याची माहिती दिली आहे. त्यात राजाराम महाराज तुंगभद्रेजवळ सुभानगड येथे पोहोचले असता त्यास मोगलांनी वेढले. त्या वेढ्यातून बहिर्जी घोरपड्याने राजारामास खांद्यावर उचलून घेऊन सुरक्षित पार नेले. पण पुढे बहिर्जी व आणखी शंभर इसम पकडले गेले. त्या सर्वांना बादशहाने विजापूरच्या किल्ल्यात ठेविले. तेथून बहिर्जी वगैरे २० असामी निसटून गेले. तेव्हा बाकीच्या ८० लोकांचा बादशहाने शिरच्छेद केला. बहिर्जी आणि त्यांच्याबरोबर विजापूरच्या किल्ल्यातून निसटलेले इतर लोक भिकारी, बैरागी, यात्रेकरू इत्यादींच्या वेषात प्रवास करून लवकरच छत्रपती राजाराम महाराजांला जाऊन मिळाले..
मोगलांच्या कैदेतून सुदैवाने राजे बहिर्जी सुखरूपपणे निसटले. पण बंधू मालोजी निसटू शकले नाहीत. ते नंतर बादशहाच्या हुकूमाने ठार मारले गेले. (मालोजी हे दत्तवाडकर घोरपडे घराण्याचे पूर्वज होत.)
वरील तीन प्रकारच्या इतिहास-साधनांतील वर्णनात काहीशी तपशीलाची भिन्नता दिसली तरी, बहिर्जीच्या साहसी कृत्याबाबत मात्र सर्वांची जवळजवळ एकवाक्यता आहे. राजे बहिर्जीनी बिकट प्रसंगी छत्रपती राजाराम महाराजास पाठकुळीस घेऊन मोगल सैन्याचा भेद केला व संकटातून धाडसाने पुढचा मार्ग काढला. प्रसंगी जीव धोक्यात घालून ते विजापूरच्या किल्ल्यातून प बाहेर पडले व पुन्हा राजाराम महाराजांच्या तुकडीत सामील झाले. त्यांच्या चातुर्यामुळेच राजाराम महाराजांची व बाजी काकडे यांची भेट होऊ शकली. बाजी काकडे त्या भागातील जबरदस्त असामी असल्याने राजाराम महाराज ह सुरक्षितपणे प्रथम वेलोरला आणि नंतर जिंजीला जाऊन पोहोचले. प्रसंगी घोडदौड करून शत्रूला चकवीत तर कधी त्याच्याशी समोरासमोर लढाई करीत, राजाराम महाराज यांनी बहिर्जी घोरपडे व इतर सहाय्यकांच्या मदतीने मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत रोमांचकारक प्रवास पूर्ण केला. ते सुखरूपपणे यशस्वी होण्यासाठी बहिर्जी हिंदूरावांची त्यांना किती बहुमोल मदत झाली हे वरील काही प्रसंगावरून सहज लक्षात येऊ शकते. या प्रसंगामुळेच बहिर्जी घोरपडे यांचे असामान्य शौर्य, निस्सीम स्वराज्यप्रेम आणि साहसी कल्पकता है गुण व्यक्त झाले. या प्रवासात राजाराम महाराज मोगलांच्या हाती लागले असते तर कोणता प्रसंग ओढवला असता याची कल्पनाही करता येत नाही. या पार्श्वभूमीवर तर बहिर्जीच्या पराक्रमाचे वैशिष्ट्य अधिकच लक्षात येते..
केशव पंडिताने जिंजीच्या प्रवास वर्णनात बहिर्जी हिंदुरावांचा जो गौरवपर उल्लेख केला आहे तोही येथे उधृत करण्यासारखा आहे :
सर्वे तुरंगामारुढा: प्रलपंत : परस्परं ततः श्रीरामसेवायै भैरजीकः समागमत्
युतो मल्लजिता भ्रात्रा वरघोरपडान्वयः
भवशाली रूपसिंहः स्वसैन्येय-समन्वितः
(स्थिरबुद्धी राजाराम : पृ.२५)
स्वराज्याचे संरक्षक छत्रपती राजाराम महाराज जिंजीला पोहोचल्याचे समजताच औरंगजेबाने जुल्फिकारखानाबरोबर मोठे लष्कर देऊन जिंजी जिंकण्यासाठी रवाना केले. तो किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन बसला. पण मराठा सैन्याने त्याला सळो की पळो करून सोडले. मोगल सैन्याला जागोजाग अडवून आणि त्याची रसद मारून काढण्याची कामगिरी संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बुबाजी पवार, आटोळे इत्यादींनी पार पाडली. त्यांनी काही वेळा खानाच्या सैन्यावर अचानक हल्ला करून खूपच गोंधळ उडवून दिला. तर काही वेळा समोरासमोर लढाई करून त्याची पिछेहट केली. जिंजीचा लढा सन १६९८ पर्यंत चालला होता. दरम्यानच्या काळात जिंजीचे संरक्षण ज्या सैनाधिकाऱ्यांनी केले त्यात संताजींचे स्थान सर्वश्रेष्ठ होते. त्यांनी गनिमी काव्याने जिंजीच्या भोवतालच्या प्रदेशात धुमाकूळ घातला. छत्रपती राजाराम महाराज
No comments:
Post a Comment