मानसिंगराव कुमठेकर
मिरज
देशिंग ता. कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील हे सती मंदिर. देशिंग हे घोरपडे घराण्याचे सरंजामी गाव. कुकटोळी आणि कोंगनोळी या घराण्याच्या आणखी दोन शाखा. या घोरपडे घराण्यास 'हिंदूराव' अशी पदवी आहे. या घराण्याच्या सन १८४४ मधील मोडी लिपीतील कैफियतीत या घराण्याची साद्यंत हकीकत आली आहे. देशिंग शाखेचे मुळ पुरूष संभाजीराव हे १७३९ साली गजेंद्रगडहून मुधोळास आले. त्यावेळी थोरले शाहू महाराज मिरज किल्ल्याच्या स्वारीवर होते. त्यांची भेट घेण्यासाठी संभाजीराव मिरजेकडे निघाले त्यावेळी शाहू महाराजांचा मुक्काम तासगाव येथे होता. तासगावचा वाडा मोठा होता. तो ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले होते. संभाजीराव घोरपडे त्यांना भेटल्यावर शाहू महाराजांनी तासगावचा वाडा ताब्यात घेण्यासाठी संभाजीराव घोरपडे यांना सांगितले. संभाजीराव घोरपडे यांनी जातीनिशी वाड्याला शिड्या लावून वाडा ताब्यात घेतला आणि वाड्यावर निशाण फडकवले. या कामगिरीने खुश होऊन शाहू महाराजांनी संभाजीराव घोरपडे यांना 300 स्वारांचा मुलुख, पालखी, हत्ती दिला. देशिंग सह नऊ गावे इनाम दिली. याशिवाय जत आणि सांगोला प्रांतातील जकात वसुलीचे अधिकारीही दिले. पुढे मिरज किल्ला ताब्यात आल्यानंतर मिरज किल्ल्याच्या संरक्षणासाठी संभाजीरावांची नेमणुक करण्यात आली. सन 1757 मध्ये नानासाहेब पेशव्यांची स्वारी कर्नाटकात गेली असता त्यांच्याबरोबर संभाजीराव घोरपडे हे स्वारानिशी गेले. यावेळी कडपे येथे एका लढाईत संभाजीराव घोरपडे यांच्या कपाळावर तीर लागला. जखमी अवस्थेतही संभाजीराव घोरपडे यांनी तीर मारणाऱ्या हत्तीवरील सरदारास ठार केले. त्यानंतर घोड्यावर कपाळ टेकून स्वतःच्या हाताने तीर काढला आणि तेथेच गतप्राण झाले. या लढाईचे वर्णन तत्कालीन अन्य कागदपत्रातही आढळते. यामध्येही संभाजीराव घोरपडे ठार झाल्याचे उल्लेख आहेत. संभाजीरावांच्या पत्नी देशिंग येथे सती गेल्या. त्याचेच स्मारक त्यांच्या कुटुंबीयांनी देशिंग येथे करून ठेवले आहे. त्यामध्ये घोड्यावर स्वार अशा स्त्री आणि पुरूषाची सुंदर प्रतिमा आहे. संभाजीराव घोरपडे यांच्या पुढच्या पिढ्यांनी ही कर्नाटकात झालेल्या हैदर आणि टिपू विरोधातल्या लढाईत मोठी मर्दुमकी गाजवल्याचे दिसते. या घराण्याच्या देशिंग, कुकटोळी आणि कोगनोळी अशा तीन शाखा आहेत. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे हे कोगनोळी शाखेचे वंशज आहेत.
©मानसिंगराव कुमठेकर
9405066065
फोटो सौजन्य -प्रा. गौतम काटकर
No comments:
Post a Comment