विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज - ४

 


छत्रपती शिवाजी महाराज - ४
--------------------------
शिवाजी महाराजांचा स्वतंत्र राजा म्हणून उदय होण्यापूर्वी या भागातील परिस्थिती विचित्र होती. एक तर मुघल, निजामशाही आणि आदिलशाही यांच्या सीमांचे अखेरच्या टोकाला असलेल्या प्रदेशाला प्रशासकीय व्यवस्थाच नव्हती. त्यामुळे अर्थातच न्याय व्यवस्था नव्हती!
सर्वत्र चोर, लुटारू आणि पुलांनी हैदोस घातला होता. बळी तो कान पिळी अशी परिस्थिती होती. लोक बळाच्या जोरावर मालमत्ता बळकावत असत. तसेच भावांमधील वाटणीचे वादही असत.
शिवाजी महाराज यांनी लोकांना निष्पक्ष न्याय द्यायला सुरुवात केली. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या पंचायतीशी (महाझरशी) सल्लामसलत करण्याची अविस्मरणीय पद्धत सुरू केली! त्यामुळे जनतेचा नैतिक पाठिंबा मिळाला. त्यांच्या खंबीरपणे न्यायाची आणि दुर्बल लोकांच्या बाजूने उभे राहण्याची कीर्ती खेडोपाडी सर्वत्र पसरली! लोक त्यांच्याकडे संरक्षक आणि तारणहार म्हणून म्हणून पहात होते. सोबत तरुणांना सर्वसामान्य सैनिक ते सरदार अशा संधी दिल्या.
मराठा देशमुख आणि पाटील आपल्या वतनांसाठी "करू किंवा मरू" असा निकराचा लढा द्यायला तयार होते. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या एकजुटीची ताकत उभी राहू लागली. ते आपल्या सोबत्यांसह, शिलेदारांसह सर्वत्र फिरत असत आणि हद्दीबाहेर जाऊन गावात छापे मारून तसेच प्रवासातील सरकारी महसूल अधिकारी यांच्यावर छापे मारून लूट जमा करीत असत.
खेलोजी भोसले यांच्या हत्येचे शल्य आणि मुघल व आदिलशहाने शहाजीराजांची जहागीर परस्परच वाटून घेण्यामुळे आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा त्यांचा विचार पक्का झाला होता! ७ मार्च १६४७ साली दादोजी कोंडदेवाच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला सुरुवात केली. अखेरच्या निजामशहाचा हंगामी शासक म्हणून काम करण्याचे अधिकार त्यांच्याकडे होतेच!
आजारपणामुळे १६४६-५६ या काळात विजापूरच्या आदिलशहानेही काही फारसे काम केले नव्हते. शिवरायांनी विजापूरच्या ताब्यातील तोरणा किल्ला युद्ध न करता कावेबाजपणे ताब्यात घेतला होता (१६४६). तिथे त्यांना दोन लाख होनांचा खजिना मिळाला! त्याच्या पूर्वेस पाच मैलांवर राजगड किल्ला व तीन माच्या बांधल्या.
चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, तसेच बारामती आणि इंदापूर येथील अधिकार्यांनी शिवाजी महाराज यांचे अधिपत्य मान्य केले! पुण्यापासून ११ मैलांवर असलेला कोंढाणा किल्ला ही आदिलशहाच्या तिथल्या किल्लेदारास लाच देऊन ताब्यात घेतला!
शिवाजी महाराजांच्या विरोधात आदिलशाही दरबारात तक्रारी गेल्या. परंतु दरबारातील काही मानकरी शिवरायांनी आपल्याकडे वळवले होते आणि त्यांनी शिवरायांची बाजू घेतली!
विजापूरचा मुख्य सेनापती मुस्तफा खान याने २५ जुलै १६४८ मध्ये शहाजी राजे यांची कपटाने अटक करून सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन फौज ही काढून घेतली होती! (कारण ते जिंजीच्या वेढ्यातून बाहेर पडून स्वदेशी जाणार होते!)
विजापूरचे बालंट आपल्यावर येणार हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले होते. त्यामुळे पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात असला पाहिजे असे त्यांच्या लक्षात आले.
महादजी नायकवार उर्फ 'निळकंठराव' तेथील प्रमुख होते. आदिलशाहीच्या अंदाधुंदीमुळे सैनिकांची उपासमार होत होती! महादजींनी हा किल्ला सर केला आणि भोवतालच्या खेड्यांमधूनही त्यांनी जुलुमाने खंडण्या उकळणे सुरू केले. त्यांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र निळोजी निळकंठराव कारभार पाहू लागले. ते हेकेखोर होते. लहान बंधू पिलाजी व शंकराजी यांना वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेतील वाटा देत नव्हते!
शिवरायांनी त्यांना व कुटुंबियांना आश्रय द्यावा म्हणून पत्र दिले धाडून दिले. शहाजीराजे या कुटुंबाचे जुने मित्र होते. पावसाळ्यात शिवाजी महाराज पायथ्याशी असलेल्या खेड्यात आश्रयाला गेले! शंकराजी यांच्याशी मैत्री झाली. त्यांनी निळोजींची हकालपट्टी करावी अशी विनंती केली. ५ ऑक्टोबर १६४८ रोजी महाराज दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंब आणि अंगरक्षकांसह पुरंदर किल्ल्यावर गेले. शंकरोजींच्या मार्गदर्शनानुसार आठ तारखेला रात्री निळोजीच्या महालात शिरून अटक केली आणि फौजेने किल्ला ताब्यात घेतला!
शिवरायांनी मुघल सुभेदार शहजादा मुरादबक्ष याच्याशी संधान बांधून शहाजी राजे यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले! मुरादबक्षनेही ते मान्य करून बादशहाला तसे कळवले! परंतु शहाजहानची आदिलशहावर दबाव आणण्याची संमती नव्हती!
इकडे आदिलशहाने बेंगळुरू आणि कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या दोन फौजा रवाना केल्या. शहाजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी यांनी फरहाद खान आणि तानाजी दुरे यांच्या फौजेला पराभूत केले!
पुरंदरवर हल्ला करण्यासाठी आलेल्या फत्तेखान आणि स्थानिक मराठा नेतृत्त्वाखाली आलेल्या फौजेचीही दाणादाण उडाली! बाळाजी हैबत शिरवळला तळ ठोकून होता. त्याच्यावर शिवाजी महाराजांचे सेनापती कावजी यांनी हल्ला चढवला व त्यांच्या सेनापतीला ठार केले.
आता आदिलशहापुढे शहाजीराजे यांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. ५ में १६४९ रोजी मुहंमदशहाला मुलगा आणि आदिलशाहीला वारस जन्मला होता! १६ में १६४९ रोजी शहाजीराजे यांची सुटका करून दरबारात मानाची वस्त्रे दिली आणि त्यांची जप्त केलेली सर्व मालमत्ता व जहागीर परत केली!
२८-०३-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...