विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज - ८

 


छत्रपती शिवाजी महाराज - ८
---------------------------
अफजलखानाचा वध - वारसाच्या दावेदारीतून औरंगजेब उत्तरेत निघून गेला. त्यामुळे आदिलशाही दरबारात बंडखोर सरदारांना वठणीवर आणण्यासाठी मोहीम सुरू केली. शिवाजी महाराजांवर कारवाई करण्यासाठी कोणी तयार नव्हते. अब्दुल्ला भटारी उर्फ अफजल खानाने हे आव्हान स्वीकारले. बडी बेगम साहेबांने खानाला सांगितले होते की," मैत्रीच्या बहाण्याने आणि आदिलशहाकडून त्यांना माफी दिली जाईल असं ढोंग करून शिवाजी महाराजांना पकडून आणावं किंवा ठार माराव."
अफजलखानाने ही दरबारात "मी शिवाला बेड्या घालून जिवंत कैद करून चढ्या घोड्यानिशी घेऊन येतो" अशी वल्गना केली होती.
विजापूर दरबाराने मावळातील सर्व देशमुख आणि सरदारांना अफजलखानाला मिळून शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी मदत करावी असे खलीते धाडले होते. देशमुखीची वाट पहात बसलेल्या खंडोजी खोपडेने आपण शिवाजीला पकडण्यास तयार आहोत असे लेखी संमती पत्र दिले.
सप्टेंबर 1659 मध्ये अफजल खान पहिल्यांदा विठोबाच्या मंदिरात आला आणि तोडफोड केली. नंतर तो फलटण जवळ माळवाडी इथे आला. बजाजी नाईक निंबाळकर या फलटणच्या देशमुख यांना हत्तीच्या पायाखाली देऊन ठार करतो अशी धमकी दिली आणि दोन लाख रुपये खंडणी वसूल केली. आजूबाजूच्या तीर्थस्थळांची विटंबना केली व लोकांकडून ही खंडणी उकळली. सर्व भाग उजाड केला.
शिवाजी महाराज पुण्यासारख्या मैदानी प्रदेशात लढण्याऐवजी जावळी भागात प्रतापगडावर आले. त्यांनी आपले सर्व सैन्य हे जावळी भागात जमा केले.
अफजल खान पूर्वी वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्यानेही डोंगराळ प्रदेशात न जाता शिवाजी महाराजांना कृष्णाजी भास्कर या दुताकरवी निरोप पाठवला की - 'तुमचे वडील माझे खास मित्र असून मला येऊन भेटा. मी तुम्हाला कोकण आणि तुमच्या ताब्यातील किल्ले तुमच्याकडेच रहावेत ही आदिलशहाने खात्री द्यावी म्हणून प्रयत्न करीन. तुम्हाला सरंजाम व रोकड देण्याची ही व्यवस्था करीन.'
शिवाजी महाराजांकडे हेरांमार्फत खडान् खडा खात्रीची माहिती मिळालेली होती. त्यामुळे अफजल खान दगाफटका करणार हे नक्की होते. विजापूरचा वजीर खान मोहम्मद याच्या खुनातही अफजलखानाचा हात होता, किंबहुना तो कट अफजलखानानेच रचलेला होता. तो अत्यंत क्रूर आणि विश्वास घातकी होता. त्याच्यासोबत दहा हजार घोडदळ आणि पायदळ असून ते उत्तम शस्त्रांनी सज्ज होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सर्व प्रकारची दक्षता बाळगून युद्ध करण्याचा निर्धार केला. मोरो त्रिंबक पिंगळे आणि नेताजी पालकर यांच्या लष्कराला कोकण आणि घाटातून बोलावून घेतले. प्रतापगडाच्या आजूबाजूला पाळत ठेवण्यास सांगितले.
शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करचा आदर करून गुप्त भेट घेतली. तसेच सोबत अंताजी गोपीनाथ हे आपले वकील पाठवले आणि सांगितले की सुरक्षिततेची हमी दिली तर राजे अफजल खानाची भेट घेतील. पंताजी गोपीनाथ यांना पाठवण्याचे मुख्य उद्दिष्ट खानाची इत्तंभूत माहिती मिळवणे हा होता. त्यानुसार खानाच्या अधिकाऱ्यांकडून लाच देऊन अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी मिळवली ती म्हणजे -'शिवा अतिशय कावेबाज आणि हुशार असल्यामुळे त्याला खुल्या लढाईत पकडणं शक्य नाही म्हणून भेटीच्या वेळी त्याला पकडण्यात येणार आहे.'
आता शिवाजी महाराजांनी आपण खानाला घाबरत असल्याची बतावणी केली आणि वाईला जाऊन भेटण्यास नकार दिला. तथापि खान त्यांना जवळपास कुठे भेटणार असेल तर आपण भेटू तसेच त्या वेळच्या सुरक्षिततेची वैयक्तिक हमी द्यावी असेही सांगितले. अफजल खानाने हे मान्य केले. मग शिवाजी महाराजांनी वाई ते प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत घनदाट जंगलातून रस्ता तयार केला. खान रडतोंडीच्या घाटातून प्रतापगडाच्या पायथ्याशी पार या गावी एका मैलावर आला. खानाच्या लष्कराने कोयनेच्या काठावर पाण्याची सुविधा पाहून मुक्काम केला.
भेटीचे स्थळ प्रतापगडाच्या बुरुजाखाली होतं आणि तिथून कोयनेच सर्व खोर दिसत होतं. शिवाजी महाराजांनी शामियान्यापर्यंत जाणाऱ्या मार्गावर आपल्या सैनिकांना आड बाजूला सज्ज ठेवलेलं होतं. शाही पाहुण्याला शोभेल असा आलिशान शामियाना उभारला होता.
खानाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशीची भेटीची वेळ ठरवली दहा नोव्हेंबर 1959. भेटीवेळी शिवाजी महाराजांनी जरीचा कुडता आणि त्याच्या आत चिलखत घातलं होतं. डोक्यावरच्या मंदिलाच्या आत लोखंडी शिरस्त्राण होतं. पायात चोळणा होता. त्यानी डाव्या हातात वाघ नखे लपवली होती आणि बाही मध्ये बिचवा लपवलेला होता. जीवा महाला आणि संभाजी कावजी हे फक्त दोन अंगरक्षक सोबत घेऊन महाराज खानाच्या भेटीला निघाले. खान मात्र एक हजार बंदूकधारी सैन्य घेऊन भेटीस निघाला तेव्हा गोपीनाथ यांनी हरकत घेतली आणि शिवाजी महाराजां प्रमाणेच आपणही दोन शरीर रक्षका सह भेटीसाठी जावं असं त्यांनी सुचवलं. त्यानुसार दोन सैनिकांनी घेतलेल्या पालखीत बसवून बसून आणि सय्यद बंडा हा तलवारबाज शरीर रक्षक सोबत घेऊन खान निघाला. शामियाना पाहताच जहागीरदाराच्या मुलाला हे जास्त आहे असा असा शेरा खानाने मारला. त्याला सांगण्यात आले की हे सर्व साहित्य शिवाजी राजांच्या शरणागतीनंतर विजापूरच्या राजवाड्यात पाठवले जाईल. मग तो शांत झाला.
आता शिवाजी महाराजांनी जलद यावे असा निरोप पाठवला. शिवाजी महाराज मंद पावले टाकत पुढे गेले आणि सय्यद बंडाला पाहून थांबले. त्याला शामियाण्याच्या बाहेर थांबायला सांगितले आणि मग शिवाजी महाराज शामियाण्यात गेले. आता शामियाण्यात प्रत्येक बाजूचे चार लोक होते. दोघांच्याही सोबत दोन सशस्त्र अंगरक्षक आणि एक दूत उभे होते. शिवाजी महाराज चौथऱ्यावर चढले आणि त्यांनी अफजल समोर मान झुकून नमस्कार केला.
खानाने कृष्णाजी ला विचारले - हा माणूस शिवाजी आहे का? मग तोच शिवाजी आहे असे समजल्यावर विचारले - तू आमची भूमी उध्वस्त केलीस आणि किल्ले ही का हस्तगत केलेस?
शिवाजी महाराजांनी उत्तर दिले याआधी हा देश आणि किल्ले घुसखोरांच्या व लुटारूंच्या ताब्यात होते. मी लोकांचा तो त्रास दूर केला आणि त्यांना भरभराटीला आणलं. या चांगल्या सेवेच्या बदल्यात मी प्रशंसेस पात्र आहे, खरडपट्टी आणि शिक्षेस पात्र नाही.
अफजल खान बोलला की झालं ते झालं, आता तू मला सगळे किल्ले दे आणि समोर दरबारात हजर हो.
शिवाजी महाराजांनी उत्तर दिले की माझ्या नावाने तसं शाही फर्मान निघालं तर मी आदेशाचे पालन करेन.
कृष्णाजी भास्कर मध्येच बोलला आता तुम्ही खान साहेबांच्या छत्राखाली आला आहात, म्हणून पहिल्यांदा तुमचे गुन्हे माफ करून घ्या आणि नंतर शाही फर्मानाची अपेक्षा बाळगा.
शिवाजी महाराज म्हणाले की, आम्ही दोघे सुलतान साहेबांचे सेवक आहोत. मग खान माझ्या अपराधांना कसे काय क्षमा करू शकतील? पण मी तुमचा सल्लाही नाकारू शकत नाही त्यामुळे मी माझे मस्तक त्यांच्या कुशीत ठेवतो. असं म्हणून त्यांनी खानाला मिठी मारली. खानाने ही मिठी मारण्याचे नाटक करून घट्ट पकडलं आणि कट्यारीचा वार केला. परंतु चिलखत असल्यामुळे तो वार वाया गेला. झटकन शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी त्याचा कोथळा काढला आणि बिचव्याने भोकसले. आता खानाची पकड सुटली. त्याने पोटावर शेला दाबून धरला आणि मस्तकावर जोरदार वार केला परंतु शिरस्त्राण असल्यामुळे शिवाजी महाराज त्यातूनही बचावले. तरीही तो वार इतका भयंकर होता की शिरस्त्राणाचे दोन तुकडे झाले.
कृष्णाजीने लगेच शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार केला परंतु शिवरायांनी तो चुकवला आणि कृष्णाजीचे शिर धडा वेगळे केले.
खान ओरडला -दगा! दगा! खून! धावा! धावा! दोन्ही बाजूचे शरीर रक्षक एकमेकांवर धावले. सय्यद बंडा आपल्या हातातील कट्यारीचा वार करण्यासाठी धावून गेला आणि वार केला. तोपर्यंत जीवा महालाने सय्यद बंडाच्या हातावर वार करून तो तोडला. संभाजी कावजी यांनी जखमी खानाला पालखीतून नेणाऱ्या सैनिकांचे पाय तोडले. त्यामुळे पालखी खाली ठेवताच त्यानी खानाचे शीर तोडले आणि महाराजांकडे घेऊन आले.
शिवाजी महाराज शरीररक्षकासह गडावर गेले आणि तोफांचा आवाज केला आवाज ऐकताच मोरो त्रिंबक आणि नेताजी पालकर यांचे सैन्य शत्रु सैन्यावर तुटून पडलं हजारो मावळ्यांनी विजापूरच्या सैनिकांवर चौफेर हल्ला करून त्यांची दाना दान उडवली. अफजलखानाचा मृत्यू झाल्याचे ऐकून त्यांचे सैनिक व अधिकारी खचून गेले. यात खानाचे तीन हजार सैनिक ठार झाले.
मिळालेली लूट ही प्रचंड होती- तोफा दारुगोळा खजिना व इतर उपयुक्त सामग्री मिळाली. 65 हत्ती 4000 घोडे बाराशे उंट कापडाचे 2000 गठ्ठे आणि रोख दहा लाख रुपये व जडजवाहीर अशी संपत्ती ताब्यात आली.
कैद करण्यात आलेल्या मध्ये वरिष्ठ दर्जाचे सरदार आणि अफजलखानाचे दोन मुलगे तसेच लांबाजी भोसले व झुंजारराव घाटगे हे दोन मराठा सरदार होते.
खानाचा कुटुंब कबीला घेऊन मोठा मुलगा फाजलखान खंडोजी खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनेच्या काठाकाठाने कराड कडे पळून गेले.
खास टिप्स - १) शिवरायांनी या सर्व गोष्टींची आखणी बारीक सारीक तपशील लक्षात ठेऊन केली!
२) शिवरायांच्या हेरांनी खानाची इत्थंभूत माहिती मिळवली होती. परंतु खानाचे सैन्य इतके गाफील होते की आपण चहूबाजूंनी घेरलो आहोत हे त्यांना माहीत नव्हते!
३) भेटीचे ठिकाण असे होते की ते खानाच्या फौजेला दिसू शकत नव्हते. मात्र खानाची फौज दिसत होती. जर फौजेला समजले तर ती येण्याआधी राजे गडावर सुरक्षित जातील असे अंतर ठेवले होते!
४) शिवरायांनी कृष्णाजी भास्कर व अफजलखान यांना दिलेली उत्तरे एखाद्या कसलेल्या मुत्सद्द्याप्रमाणे होती! हे सर्वात महत्वाचे आहे!!!
म्हणून मी सतत सांगत आहे की आपण शिवचरित्र ध्यान पूर्वक अभ्यासून बोध घ्यावा. अजून ही आपण जग जिंकू शकतो!
जय शिवराय.
दिलीप गायकवाड.
०६- ०४-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...