विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 April 2024

सरदार बंडगर

 




सरदार बंडगर
बंडगर हे नावंच शौर्य, पराक्रम व स्वाभिमान या गोष्टींचा निर्देश करते. बहिर्जी बंडगर नावाच्या पराक्रमी पुरूषास शिवाजी राजांनी सरदारकी बहाल केली होती. हा बहिर्जी परगणे महांकाळ कवठे येथील आपली देशमुखी वंशपंरपंरेने चालवत असे. त्याचा मृत्यू कधीचा या बाबत निश्चित विधान करता येत नाही. इ.स. १६९८ च्या सुमाराला राजाराम महाराजांनी बंडगर घराण्यातील ज्या वीर पुरूषांच्या नावे सरंजाम बहाल केला त्यांची नावे; (१) पदाजी, (२) मुधोजी, (३) जावजी, (४) सुभानजी व (५) संताजी अशी होती. पुढे महाराणी ताराबाई यांनी (६) जिवाजी, (७) शिवाजी, (८) मानाजी व (९) होनाजी या बंडगर बंधूनाही स्वतंञ सरंजाम बहाल केला. पदाजी व मुधोजी यांचा खासा सरदार असाही निर्देश झालेला आहे. औरंगजेबाशी सुरू असलेल्या संघर्षाच्या वेळी पदाजी व मुधोजी हे बंधू बहिर्जी घोरपडे हिंदुराव यांच्या दिमतीला असत. पदाजीला 'अमीर-उल-उमराव' तर मुधोजीला 'नुसरतजंगबहाद्दर' असे किताब देण्यात आलेले होते. त्यांच्या नावे देण्यात आलेल्या कित्येक सरंजामपञांत याचा उल्लेख आढळतो. बहुधा हे किताब राजाराम महाराजांनीच त्यांना दिलेले असावेत कारण यापूर्वी बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांचा लहान भाऊ असलेल्या व त्यांच्याच दिमतीला असलेल्या मालोजी घोरपडे यांस अमीर उल उमराव हा किताब होता, पण त्यांचा मृत्यू १६९८ पूर्वीच झालेला होता आणी पदाजी हा त्याचीच जागा चालवत होता असे म्हणता येईल.
मराठेशाहीच्या अत्यंत संघर्षाच्या काळात बंडगर बंधू अत्यंत निष्ठेनं व पराकाष्ठेनं मराठी दौलतीची सेवाचाकरी करत होते. अमीर-उल-उमराव व नुसरतजंगबहाद्दर यांचा अर्थ अनुक्रमे सरदारांतील श्रेष्ठ अथवा सरदारांचा सरदार व लढाईच्या प्रसंगी मदत करणारा पराक्रमी वीरपुरूष असे सांगता येतील. पहिल्या शाहूच्या काळात पदाजी हा शाहूच्या अत्यंत विश्वासू व निष्ठावंत सरदारांपैकी मानला जाई. सरदेशमुखी व नाडगौडकी ही राजाच्या खास अधिकारातील वतने शाहूने काही निवडक सरदार व सेवकांना दिलेली होती. त्यात पदाजी बंडगरचाही समावेश होता. विजापूर प्रांतातील सगर परगण्याची सरदेशमुखी तर आवसे, नळदुर्ग, प्रतापपूर, उदगीर, हवेली मेहकर, काळबरगे इ. दक्षिणेकडील प्रांतातील एकंदरित २३ महालांची नाडगौडकी शाहूने त्यास वंशपरंपरेने करार करून दिली. नाडगौड हा कन्नड शब्द असून नाड अथवा नाडू म्हणजे प्रांत व गौड म्हणजे पाटील या अर्थी आपण त्यास प्रांतपाटील ही म्हणू शकतो.
पदाजीस शाहूने श्री क्षेञ तुळजापूर व मौजे माहुली कर्यात निंबसोड मायणी प्रांत खटाव ही गावे इनाम दिली होती. तुळजापूर येथील श्री भवानी मातेच्या विशेष पूजेचा बहुमानही पदाजीस देण्यात आला होता. पदाजीला विजापूर, परांडे, बालाघाट व सोलापूर या प्रांतातील एकंदरित २३ महाल सरंजामी खर्चासाठी जागीर देण्यात आले. या प्रांतांचे नाडगौड हे वतन ही त्यास वंशपरंपरेने करार करून देण्यात आले. त्याशिवाय परगणे आवसे मधील १५८ गावांची जागीर म्हणून पदाजी, मालोजी बिन मुधोजी व खानाजी बिन जावजी या बंडगरांचे नावे सनद करून देण्यात आली. इ.स. १७२० च्या सुमाराला पदाजी पुञ माणकोजीस स्वतंञ सरंजाम देण्यात आला. पदाजीचा मृत्यू इ.स.वी सन १७२७ ला झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ पुञ माणकोजी यांस 'अमीर-उल-उमराव' तर द्वितीय पुञ खंडेराव यांस 'वजारतमाब' हे किताब देऊन सरंजाम वाटून दिला. तर कनिष्ठ पुञ गोपाळराव यांसही सरदारीची वस्ञे व सरंजाम देण्यात आला. पदाजीचे हे पुञ बापाप्रमाणेच कर्तबगार असावेत असे त्यांच्या एकंदरित कारकीर्दीवरून वाटते.
संदर्भ : शाहू दफ्तर पुराभिलेखागार, पुणे.
सौजन्य : श्री. संतोष पिंगळे (वेध धनगर सरदारांच्या कर्तबगारीचा आणि गौरवांचा)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...