विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

महादजी शिंदे यांचे समकालीन संतश्रेष्ठ राजयोगी सोहिरोबा आंबिये

 



महादजी शिंदे यांचे समकालीन संतश्रेष्ठ राजयोगी सोहिरोबा आंबिये 
लेखन :
मित्र हो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या संतश्रेष्ठाची ओळख करून घेणार आहोत.'हरी भजना वीण काळ घालवू नको रे' हे भक्तीगीत आपण अनेकदा ऐकलेले असेल.' सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथ कैसी दिवस रात्री, तया वीण नेत्र पाती हालवू नको रे 'अशा या अभंगाच्या अंतिम ओळी आहेत. या संत श्रेष्ठाने त्यांच्या हयातीत पंधरा हजार पेक्षा जास्त काव्य पंक्ती लिहिल्या. या मध्ये ओव्या, अभंग, दोहे असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. आयुष्यातील जवळपास साठपासष्ट वर्षे कोंकणात व्यतीत करून ते उत्तर हिंदुस्थानातील तीर्थयात्रेला बाहेर पडले आणि त्यानंतर ते दक्षिणेत परतले नाहीत. उत्तरेत असताना शिंदे घराण्याची राजधानी ग्वाल्हेर येथे त्यांची महादजी शिंदे यांच्याशी भेट झाली. महादजी शिंदे यांनी प्रभावित होऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले. महादजी शिंदे हे स्वतः भक्तिगीते लिहीत असत, तेव्हा संतकाव्याबद्दल त्यांनी महादजीना मार्गदर्शन केले. उत्तरेत असताना त्यांनी बऱ्याच तीर्थसक्षेत्रांना भेटी दिल्या, कविता रचल्या, भजने गायिली व भक्तजनांना अध्यात्माबद्दल मार्गदर्शन केले. संत सोहिरोबा इतके निःसंग होते की कटाक्षाने त्यांनी आपल्या भोवती शिष्यांचा गोतावळा तयार होऊ दिला नाही. स्वतः प्रसिद्धी परान्मुख राहून एक दिवशी स्वतःच्या निर्वाणासंबंधी काहीही धागेदोरे न ठेवता ते अचानक या जगातून नाहीसे झाले. महादजी शिंदे यांच्या समकालीन असलेल्या अशा या राजयोगी संतश्रेष्ठांची ही संक्षिप्त तोंडओळख!!
पूर्वायुष्य: इसवी सन १७१४ (शके १६३६) मध्ये संत सोहिरोबा आंबिये यांचा जन्म सावंतवाडी संस्थानात बांदे येथे झाला. सोहिरोबांचे मूळ आडनाव संझगिरी. मात्र, सावंतवाडी संस्थानातील पेडणे महालातील पालये गावात हे कुटुंब स्थलांतरित झाले होते.तेथे त्यांना आंबिये हे उपनाव मिळाले. जन्मतःच साक्षात योग्यांची लक्षणे घेऊनच हे अलौकिक बाळ जन्माला आले, त्यांचे नाव ठेवण्यात आले अच्युत. आपल्या नवजात मुलाला एखाद्या दिवंगत पुर्वजाचे नाव ठेवण्याची परंपरा आजही कोकणात प्रचलित आहे असे म्हणतात.या परंपरेप्रमाणे सोहिराबानाथांचे जन्माच्या वेळी नाव अच्युत ठेवण्यात आले. मात्र प्रेमाने त्यांना घरातील ज्येष्ठ मंडळी ‘सोयरू’ अशी हाक मारायचे आणि सोयरू वरून त्यांचे नाव सोहिरोबानाथ झाले. सावंतवाडीस येण्यापूर्वी त्यांची वस्ती गोमंतक मध्ये असावी असे वाटते कारण त्यांचे सर्व सगेसोयरे गोमंतकमध्ये स्थिरावले आहेत. सोहिरोबा हे जातीचे शेणवी ब्राम्हण होते. आंबिये मंडळी या नव्या गावी आली तेव्हा सोहिरोबांची मुंज झालेली होती.त्यांचे वडील कुलकर्णी पदाचे काम करीत असत. त्यांच्या मृत्यूनंतर कुलकर्णी पद त्यांच्याकडे वडिलांकडून वंश परंपरेने चालत आले. पुढे ते बांदा येथे मातोश्रीसह राहू लागले. कुलकर्ण्यांची कामे करीत असताना मात्र परमेश्वराच्या चिंतनाखेरीज त्यांना दुस-या कशात गोडी लागेना.
तत्कालीन समाजावर नाथ संप्रदायाचा मोठा पगडा या भागात होता. सोहिरोबानाथ यांच्यावरही गोरक्षनाथाचा मोठा प्रभाव पडला. सोहिरोबांना गुरूमंत्रही त्यांनीच दिला. त्यांच्या उपलब्ध कवितेत गैबीनाथासंबंधीचे उल्लेख वारंवार आढळतात. मग हा गैबीनाथ कोण प्रश्न समोर येतो. मराठी वाङमयाचा अधिक अभ्यास करताना दोन गैबीनाथ आढळतात. मराठीतील सुप्रसिद्ध कविवर्य कै. बा. भ. बोरकर यांनी याची उकल करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. या दोन गैबीनाथांबपैकी एक गहिनीनाथ आणि दुसरे ज्ञानेश्वरांचे शिष्य सत्यामलनाथांचे शिष्य गैबीनाथ. महाराष्ट्र भाषा भुषण आजगावकर यांच्या मते गोरक्षशिष्य गहिनीनाथ हेच सोयरोबांचे गुरू होते. हिंदू लोक त्यांना गैबीनाथ आणि मुसलमान त्यांना गैबी पीर असे म्हणतात. सोहिरोबानाथांबद्दल अधिक जाणण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा पावला पावलावर आश्चर्याचा धक्का बसतो. इतिहासकारही चकित व्हावेत, असे एक एक दाखले मिळू लागतात. आपले उभे आयुष्य ईश्वर भक्तीत व्यस्त असताना वंशपरंपरागत आपल्याकडे कुळकर्णीचे काम आले आहे. ते नेटाने आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे, याची त्यांना जाणीव होती. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी हे काम सुरू केले आणि वीस वर्ष इमाने-इतबारे चालविल्यानंतर आता पुढे यातच रमणे योग्य नाही, असे समजून त्यांनी या कामांचा राजीनामा दिला. कुलकर्ण्यांची कामे बरीच वर्षे सचोटीने केल्यावर वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांच्या जीवनात वैराग्याचा प्रवेश झाला. काही ग्रंथकारांच्या पुस्तकात नमूद केल्यानुसार त्यांना एक विधवा बहीण, पत्नी आणि दोन मुलगे होते असा संदर्भ सापडतो. त्यांना एक भाऊही होता.
सोहिरोबानाथांचा वैराग्य जीवनातील पदार्पण: सोहिरोबानाथांच्या वैराग्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा वाडी संस्थानाचे प्रमुख खेमसावंत यांच्याकडून सोहिरोबा याना कामानिमित्त बोलावणे आले. तेव्हा सोहिरोबा बांद्याहून सावंतवाडीला जाण्यास निघाले. त्या दिवशी कडक ऊन होते. वाटेत दाट जंगल लागल्यावर दमून ते इन्सुली गावाच्या मेटाच्या खाली विश्रांतीसाठी वडाच्या झाडाखाली ते थांबले. तेव्हा पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांनी सोबत आणलेला एक फणस फोडला आणि त्याचा आहार करावा असा त्यांनी बेत केला. फणसाचा आहार सुरु करणार तेव्हा जंगलातून अचानक 'माय, हमको कुछ देता है?' असा आवाज आला. दाट जंगलात आसपास कोणी नसताना कोणाचा आवाज आला याचा कानोसा घेत असताना तेव्हा स्वरांची जागा आकृतीने घेतली. अचानक समोर एक दिव्य पुरुष येऊन उभा राहीला. तेव्हा सोहिरोबांनी त्या दिव्य पुरुषापुढे आणलेला फणस ठेवला व आपण तृप्त व्हा असे सांगितले. त्या पुरुषाने संपूर्ण फणस खाल्ला व केवळ पांच गरे सोहिरोबाना प्रसादार्थ खाण्यास ठेवले. प्रकट झालेल्या योग्याने ‘मी गहिनीनाथ, गैबीनाथ, तुझे वैराग्य पाहून संतुष्ट झालो. तू यापुढे अच्युत आंबिये नाहीस, तर तू सोहिरोबा झालास. तू ‘सोऽहं’ मंत्राचा जप कर. अमर होशील’ असा आशीर्वाद दिला.सोहिरोबांच्या डोक्यावर आशीर्वाद म्हणून हात ठेवून तो दिव्य पुरुष अदृश्य झाला. त्या घटकेपासून सोहिरोबांच्या वृत्तीत फरक पडू लागला. सावंतवाडीस पोचल्यावर खेमसावंत यांच्या दरबारात त्यांनी आपली लेखणी व कागद त्यांच्या चरणी ठेवून आपल्या कुलकर्णी पदाचा राजीनामा दिला. आणि उरलेले आयुष्य ईशचरणी घालवण्याचा आपला निश्चय त्यांनी खेम सावंतांना सांगितला. त्यानंतर सोहोरोबा आपल्या घरी परतले. ज्या दिव्य पुरुषाने सोहिरोबाना आशीर्वाद दिला त्यांचे नाव 'गोरक्षनाथ' किंवा 'गैबनाथ ' असावे. त्यामुळे सोहिरोबांच्या काव्यात अनेक ठिकाणी यां नावांचा उल्लेख आढळतो. वैराग्य प्राप्त झाल्यावर सोहिरोबा मिळेल तितका वेळ इश चिंतनात व भक्तीपर काव्यरचना करण्यात घालवू लागले. हा गहिनीनाथांचा साक्षात्कार सोहिरोबांच्या जीवनातील परिवर्तनबिंदू ठरला. यावेळी नाथांच्या मुखातून अनेक पदे निर्माण होऊ लागली. पण नाथांनी ती लिहून ठेवली नाही. मात्र, आज जी शेकडोपदे उपलब्ध आहेत ती नाथांच्या भगिनीने लिहून घेतलेली. नाथांच्या सान्निध्यात राहून तोंडावाटे बाहेर पडणारी संतवाणी ती लिहून घेई. पुढे मग गुरुकृपेने आलेला आत्मानुभव शब्दबद्ध होऊन गीतबद्ध होऊ लागला.
सोहिरोबाच्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे या कविता त्यांनी स्वहस्ते लिहिलेल्या नाहीत. कारण त्यांनी आपले धनी सावंतवाडी संस्थानाचे राजे खेमसावंतांच्या चरणी आपलाही लेखणी एकदा ठेवली ती नंतर परत हातात धरली नाही. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच कविता त्यांच्या बहिणीने लिहून घेतल्या. त्यामुळे सोहिरोबाच्या कविता जिवंत ठेवण्यात त्यांच्या बहिणीचा मोठा हात आहे. त्याकाळात गरिबीमुळे लिहिण्यास कागद मिळत नसे. तेव्हा त्या बहिणीने काही कविता झाडांच्या पानावर उतरून ठेवल्या. परंतु एके दिवशी एकदा या उभयतांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आईस ती घरातील निरुपयोगी रद्दी आहे वाटून त्यांनी त्या पाणी तापविण्याच्या बंबात घालून जाळून टाकल्या. सोहिरोबांच्या कविता तशा कमी प्रमाणात आढळतात त्यामागचे अजून एक कारण म्हणजे त्यांची आयुष्यातील भटकी राहणी. नाथ संप्रदायाच्या परंपरेला धरून ते एके ठिकाणी फार दिवस रहात नसत.त्यामुळे त्यांच्या कविता जपून ठेवणार कोण व कश्या? अशा रीतीने बरीच वर्षे सावंतवाडी प्रांती सोहिरोबांचा मुक्काम राहिला, नंतर वयाच्या साठाव्या वर्षी शके १६९६ मध्ये आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन त्यांनी तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने उत्तर भारतात जाण्यास प्रस्थान ठेवले.
उत्तर हिंदुस्थानातील भ्रमंती: उत्तर भारतातील हिंदूंची प्रसिद्ध अशी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचा त्यांचा मानस होता. त्यावेळची कथा अशी सांगतात की सोहिरोबांचे संसारातील प्रेम अजिबात उडाले होते. त्यांच्या एका सुनेला आपल्या सासऱ्याबद्दल अपार प्रेम व अभिमान होता. ज्या दिवशी सोहिरोबा उत्तरेत जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी सुनेला 'आता आम्ही येतो ' असा निरोप दिला. तेव्हा त्या सुनेला समजले की बाबा आता काही परत येणार नाहीत. कारण भटक्या वृत्तीला अनुसरून ते नेहमी बाहेर जाताना घरच्यांचा निरोप देत वा घेत नसत. या वेळी मात्र आपले सासरे घरातून कायमचे सोडून चालले याची जाणीव झाल्यावर सुनेला खूप दुःख होऊन डोळ्यातील अश्रू थांबेनात. आपल्या चार पांच वर्षाच्या मरणोन्मुख मुलाकडे आता कोण बघणार या जाणिवेने ती आणखी रडू लागली. तेव्हा सोहिरोबांनी वडीलकीच्या नात्याने तिची समजूत काढली. त्यावेळी सोहिरोबांनी देवाची करून भाकली. देवाला सांगितले की मी या पूर्वी तुझ्याकडे काहीच मागितले नाही. आता माझ्या या नातवाला तू बरे कर. तरच मला इथून तुझ्या दर्शनाला निघता येईल. असे बोलून त्यांनी त्या लहान मुलाच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि काय आश्चर्य, काही वेळातच तो नातू बरा झाला. मगच त्यांनी तेथून पाय घराबाहेर टाकला.
आंबोली घाटातून नाथ करवीर क्षेत्री आले. पुढे पंढरपूर गाठले, पांडुरंगाच्या दर्शनाने नाथांना आत्मानंदाचे भरते आले. तेव्हा ‘आनंद नाचे श्रीरंग’ हे नाथांच्या मुखावाटे बाहेर पडते. तेथून ते सुरतेला गेले. तेथे त्यांनी मठाची स्थापना केली. अबूच्या पहाडावर त्यांनी तपस्या केली. पुढे ते उज्जयनीला गेले. तेथे सर्वत्र त्यांचे नाव दुमदुमू लागले.
नंतर सोहिरोबा महाराज उज्जैन, दिल्ली, प्रयाग, काशी वगैरे ठिकाणी पाच एक वर्षे भटकत राहिले व शके १७०१ मध्ये ग्वाल्हेरला पोचले. त्या सुमारास ग्वाल्हेर महादजी शिंद्यांच्या अधिपत्याखाली होते. त्यांच्याकडे सावंतवाडीजवळील केरी गावातील जीवबा बल्लाळ (उर्फ जीवबादादा बक्षी) मुख्य सेनापतीचे काम बघत होते. सेनापती व प्रमुख सल्लागार या नात्याने त्यांचे महादजीच्या दरबारात चांगलेच वजन होते. सोहिरोबा हे सुद्धा गोमंतकातील सावंतवाडीचे, त्यामुळे त्यांच्या आगमनाची वार्ता मिळताच जीवबादादा त्यांना भेटायला गेले. जीवबादादांनी त्यांना सन्मानपूर्वक घरी आणले व त्यांचा यथोचित सत्कार वगैरे केला. जीवबादादांच्या घरी कोणी प्रख्यात साधुपुरुष आला आहे व तो कविता करतो ही बातमी महादजीना समजली. तेव्हा त्यांनी सोहिरोबाना आपल्या दरबारात येण्याचे आमंत्रण दिले. सोहिरोबा याना घेऊन जीवबादादा निघाले तेव्हा वाटेत जीवबादादांनी सोहिरोबाना सुचविले की महादजीना सुद्धा कविता करण्याचा शौक आहे, तेव्हा त्यांनी कविता दाखवल्या तर त्यांना आपण चांगला अभिप्राय द्यावा. त्यावेळेस सोहिरोबा म्हणाले की कविता चांगली असेल तरच तसे सांगतो.
महादजी शिंदे यांच्या भेटीचा प्रसंग:सोहिरोबा हे महादजीच्या दरबारात पोचल्यावर महादजींनी पुढे येऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना उच्चासनावर बसविले. त्यांचा योग्य असा आदरसत्कार केला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर महादजींनी आपण देखील भक्तीपूर्ण कविता करतो आणि त्या बघून महाराजांनी अभिप्राय द्यावा अशी विनंती केली. अशा प्रकारे शिंद्यानी आपल्या कवितांची वही सोहिरोबाना विनयपूर्वक दाखवली. त्या वहीत कविता सोहिरोबांनी नजरेखालून घातल्या व ते म्हणाले," या प्रासादिक नाहीत. ज्या कविता सच्चीदानंद परमेश्वराला सोडून असतात, त्या मी वाचत नाही." असे म्हणून सोहिरोबानी वही खाली ठेवली.अशा वेळी दरबारात शांतता पसरली. सर्व दरबारासमोर आपला अवमान शिंद्यांना सहन झाला नाही. पण नि:स्पृह नाथांना त्याची भीती वाटली नाही. उलट समोरच्या त्या तबकावर लाथ मारून ते म्हणाले. ‘‘अवधूत, न ही गरज तेरी हम बेपर्वा फकिरी । सोना चांदी हमको नही चाहिए,अलखभुवनके वासी’’ तेव्हा महादजी नरमले. महादजीना राग आला असेल असे वाटून त्यांना उद्देशून सोहिरोबा म्हणॆ की तुमच्या मनासारखे बोलून तुम्हाला खुश करण्यासाठी मी आलेलो नाही. तुम्हाला कसे भगवंताने ऐश्वर्य दिले आहे तसेच मलाही वेगळ्या प्रकारचे ऐश्वर्य दिले आहे. या अर्थाचे एक पद सोहिरोबा तेथेच उस्फुर्तपणे रचले व दरबारांत म्हणून दाखविले. तसेच त्यांनी शिंद्यांना बराच उपदेश केला.
पाटीलबावा सोहिरोबानाथसारख्या निस्पृह व निःसंग साधूचे दर्शनाने मोहित होऊन त्यांना दरबारात गादीवर कायम थांबण्याचा आग्रह करू लागले. सोहिरोबानाथ यांनी काही वेळ थांबून आणखीन काही पदे सांगून त्यांनी जमलेल्या सर्वाना उपदेश केला. त्यावेळी महादजी सहित दरबारातील सर्व पुरुषांना या सत्पुरुषाची महिती कळून आली. सर्वानी त्यांना पुन्हा वंदन केले. महादजींनी या प्रसंगी मोत्यांनी भरलेले तबक सोहिरोबाना अर्पित केले. परंतु सोहिरोबाना त्याचा अजिबात मोह नव्हता. मोत्यांनी भरलेली थाळी तिथेच सोडून ते जावयास निघाले. पाटीलबावा व जीवबादादा त्यांना पोचवण्यास दारापर्यंत गेले.पाटीलबावांचा ईश्वर भक्तीकडे मुळातच ओढा होता, तो पुढे आणखीन वाढला. ते सदैव हातात नामस्मरणि बाळगू लागले. सोहिरोबांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले.
मठाची स्थापना व महानिर्वाण : पुढे सोहिरोबा ग्वाल्हेरहून निघाले व देश पर्यटन करीत शेवटी उज्जैन येथे एक मठ बांधून राहू लागले. तेथे त्यांनी दहा एक वर्षे वास्तव्य केले. तेथे त्यांचा शिष्य गोतावळा सुद्धा बऱ्यापैकी जमला होता. पुढे शके १७११ मध्ये एके दिवशी सोहिरोबा आपल्या शिष्य मंडळी वा कोणाला ही न कळवता निघून गेले. ते कुठे गेले याचा कोणाशी पत्ता लागला नाही. त्या वेळी त्यांचे वय ७५/८० वर्षे असावे. त्यांचे दोन मुलगे उज्जैनीत राहिले व तेथेच मृत्यू पावले. अशा प्रकारे या अवलिया महात्म्याचा अंत झाला.
संत सोहिरोबा यांची साहित्य संपदा: त्यांनी ५ ओविबद्ध ग्रंथांची रचना केली. त्यांची नांवे या प्रमाणे: १. अक्षयबोध २. महदनुभेश्वरी ३. पूर्णाक्षरी ४. अद्वयानंद आणि ५. सिद्धांतसंहिता . याशिवाय त्यांनी चितसुखानंद नावाचा ग्रंथ लिहिला असे म्हणतात. सोहिरोबांची गीते प्रामुख्याने भक्तिपर, उपदेशपर व वेदान्तावर आधारित आहेत. मराठी व उत्तर भारतीय भाषांतील मिळून त्यांच्या गीतांची संख्या अदमासे ४००० होईल.त्यांना संगीताचे चांगले अंग असल्याने बहुतांशी गीते ही रागरागिणीवर आधारित आहेत. याच प्रमाणे त्यांनी सोहिरोबाची बखर नावाचा एक ग्रंथ लिहिला असे म्हणतात.
संत सोहिरोबा यांनी लिहिलेल्या ओव्यांचा गोषवारा खाली दिला आहे.
ग्रंथाचे नाव, लिखाणाचे वर्ष, ग्रंथात हाताळला विषय व ओव्यांची संख्या त्याच अनुक्रमाने पुढे दिलेली आहे. १. अक्षयबोध, १६७१, परमार्थ , ४८०, २. महदनुभेश्वरी ,१६७२, वेदांत, ९०२, ३. पूर्णाक्षरी, १६७३, साधूची लक्षणे, ५००, ४. अद्वयानंद, १६७५, वेदांत, १०००, ५. सिद्धांतसंहिता, १६७८, संहिता, २०५९.
सोहिरोबा हे केवळ टाळ कुटणारे साधू पुरुष नव्हते. ते ध्यानाला बसत, तेव्हा तीन चार दिवस त्यांची ध्यानावस्था कायम असे. ते उदासीन, निस्पृह व स्पष्टवक्ते होते. त्यांच्या कवितेत शिव, राम , कृष्ण तसेच विठ्ठल यांची स्तुती आढळते.
त्यांची भाषा सोपी सुटसुटीत होती व समोरच्याला समजणारी होती. त्यांचा भर स्वानुभवावर आधारित असे. सोहिरोबांचे साहित्य मराठी जरी असले तरी त्यांच्या भाषेत मालवण, वेंगुर्ला, गोमंतक येथील भाषेचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी अनेक अभंग, सवाया(?), सेली (?) व श्लोक लिहिले आहेत.ओढग्रस्त स्थितीत सोहिरोबांनी इतकी प्रचंड साधना कशी केली असेल याचा अचंबा वाटतो!
सोहिरोबांचे मराठी, हिंदी, संस्कृत आणि कोकणी या चारही भाषांवर असाधारण प्रभुत्व होते. त्यांच्यावर ज्ञानेश्वरीचाही मोठा पगडा होता. त्यांच्या हिंदी कविताही अभ्यासताना तिच्यातील प्रसाद आणि लय विस्मयचकित करणारी आहे. सिद्धांत संहिता हा त्यांचा मूळ ग्रंथ संस्कृत आहे आणि तोही काव्यात्मक आहे. या सुत्रात्मक ग्रंथावर त्यांनी ओवी भाष्य लिहिले आहे. त्यात त्यांचा पूर्वसुरीचा सिद्धांत ग्रंथाचा गाढा अभ्यास दिसतो. त्यांच्या रचना वाचताना वेद, उपनिषदे, षड्दर्शने, ब्रह्मसुत्रे, भगवत्गीता, संस्कृत धर्म ग्रंथ, प्राकृत काव्ये, पुराणे यांचा त्यांनी बारकाई अभ्यास केला असावा असे वाटते. सोहिरोबांची बहुसंख्य पदे राग व तालातली आहेत. त्यातले काही राग जितके अन्वट आहेत, तितकेच काही ताल बिकट लयीतले आहेत. कविवर्य बा. भ. बोरकर यांनी सोहिरोबानाथांच्या सर्व पदसंख्यांचा अभ्यास करताना नव्या पिढीसमोर ते अधिकाधिक पोहोचायला हवेत म्हणून मोठे प्रयत्न केले होते.
सोहिरोबांची ही पदे जात्याच श्राव्य आहेत. उजैनचा मठ बांधून होण्यापूर्वी सोहिरोबांचा मुक्काम तेथील एका धर्मशाळेत होता. दिवसा त्यांचा बहुतेक वेळ समाधी अवस्थेत जाई. तुकाराम महाराजांचा निस्पृह बाणा, एकनाथ महाराजांची निर्वता आणि ज्ञानोबारायांचे योगानुभव याचे अद्वैत दर्शन सोहिरोबांच्या चरित्रातून होते असे त्यांच्या चरित्रकारांनी म्हंटले आहे.
महादजींनी नाथांना उज्जयिनी क्षेत्रात क्षिप्रा नदीच्या तिरावर एक मठही बांधून दिला. तेथे नाथांच्या मुखातून हिंदी काव्यही निर्माण झाले. त्यांच्या साहित्यसंपदेवर नजर टाकताना लक्षात येते. अवघ्या तीन, साडेतीन वर्षाच्या कालावधीत निर्माण झालेले साहित्य आपल्या हाती येते आहे. उर्वरित तालातील साहित्य कुठे गेले असावे? ते हातात आले असते तर मराठी साहित्यसृष्टीत एक चमत्कार झाला असता. तरीही जे साहित्य उपलब्ध आहे, तेही थोडेथोडके नाही. हा साहित्य ठेवा लक्षात घेता त्यांची १६ हजारांच्या घरात ओवीसंख्या जाते. वाचासिद्धी प्राप्त झालेल्या या नाथांची ग्रंथ संपत्ती ही चाळीशीच्या आतील आहे.
सोहिरोबानाथांची एक प्रसिद्ध रचना
हरिभजनाविण काळ घालवू नको रे ।।१।।
दोरीच्या सापा भिवुनी भवा।
भेटी नाही जिवा-शिवा।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।।२।।
विवेकाची ठरेल ओल।
ऐसे की बोलावे बोल।
आपुल्या मते उगीच चिखल
कालवू नको रे।।३।।
संत संगतीने उमज आणुनि मनी पुरते समज।
अनुभवावीण मान हलवू नको रे।।४।।
सोहिरा म्हणे ज्ञानज्योती।
तेथे कैचि दिवस-राती।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे।।५।।
शके १७१४ म्हणजे सन १७९२ च्या चैत्र शुद्ध नवमीला सोहिरोबा एका एकी अदृश्य झाले. ते कुठे गेले याचा कुणालाच थांगपत्ता नाही. रात्री झोपलेले त्यांना सर्वानी पाहिले, सकाळी बिछान्यावर ते दिसले नाहीत.मात्र त्यांच्या बिछान्यावर एक पद सापडले. तोच त्यांचा अंतीम निर्वाण लेख !. त्यात त्यांनी लिहिले होते.
दिसणे ते सरले। अवघे प्राक्तन हे मुरले ।।
आलो नाही गेलो नाही ।
मध्ये दिसणे हे भ्रांती ।
जागृत होता स्वप्नची हरपिले ।
कर्पूर न्याये जग हरले ।।
दिसणे हाची जन्म योगीया ।
ना दिसणे हा मृत्यू म्हणा।।
गैबीप्रसादे गैबीची झाले ।
आपण आपणामधी लपले।
मच्छिंद्र गोरख जालंदर हे ।
न्याया आले स्वरुपी।।
जाता जाता गमन ग्राम ते ।
समुळ कोठे ना गमले ।
म्हणे सोहिरा सतराचवदा ।
मधुमासाच्या नवम दिनी।।
सगुण स्वरुपी निर्गुण ठेले ।
अनुभव हरले स्वरूप कळे।
संत सोहिरोबा आंबिये यांचे पद्यात्मक चरित्र देखील उपलब्ध आहे असे महादेव सगम यांनी म्हंटलेले आहे. (“भक्तमंजिरी” अप्रकाशित ग्रंथ, ९४व्या अध्याय, ओव्या ६४ ते १२०) या संतांची स्मृती म्हणून संत सोहिरोबांचा त्रिशतकी जन्मोत्सव गोवा सरकारने काही वर्षांपूर्वी थाटात साजरा केला होता. "अनुभवाविण मान डोलवु नको रे" असा व्यावहारिक उपदेश देणाऱ्या या योगीराजाला शतशः नमन !!!
_____________________________________________________________________________
संदर्भ:जीवबादादा बक्षी:न.व्यं.राजाध्यक्ष, दैनिक प्रहार २९डिसेंबर२०१४, राजयोगी सोहिरोबा आंबिये:महादेव झिलु सगम, सोहिरोबा आंबियेकृत पदसंग्रह: भगवंत बाळकृष्ण पै रायकर , संकलन:प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...