विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2024

साडेतीन शहाणेः महाराष्ट्राच्या इतिहासातील साडेतीन शहाणे भाग १ सखारामपंत बोकील

 

साडेतीन शहाणेः महाराष्ट्राच्या इतिहासातील साडेतीन शहाणे 

भाग १ :

सखारामपंत बोकील

लेखन :

  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

    पेशवाईमध्ये चार असामान्य व्यक्तिमत्त्वांनी आपली छाप त्या काळावर उमटवली. त्यांना साडेतीन शहाणे असं नाव मिळालं. या चार जणांमध्ये सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस यांचा समावेश होतो.

    बोकील, चोरघडे आणि विठ्ठल सुंदर हे मुत्सद्दी तर होतेच पण ते योद्धेही होते त्यामुळे त्यांना पूर्ण शहाणे म्हणत. तर नाना फडणवीस हे फक्त मुत्सद्दी असल्यामुळे त्यांना अर्धे शहाणे म्हटले जाते.

    अर्धे शहाणे असं नानांना म्हटलं असलं तरी पेशवाईतील एका मोठ्या काळावर त्यांचा पगडा होता. अनेक महत्त्वाचे निर्णय, घडामोडी केवळ त्यांच्या निर्णयांमुळे झाल्या. त्यात भरपूर चांगल्या-वाईट घटनांचा समावेश आहे.

     

    1. सखारामपंत बोकील

    सखारामपंत बोकील यांचा सखारामबापू बोकील किंवा बापू अशा नावाने इतिहासात उल्लेख आढळतो. त्यांचे नाव सखाराम भगवंत बोकील असे होते. त्यांचा जन्म 1716 आणि मृत्यू 1781 साली झाला. त्यामुळे पेशवाईचा एक प्रदीर्घ काळ त्यांना पाहायला मिळाला होता.

     नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर बारभाईंचा उदय झाला. याला बारभाईंचे कारस्थान, कारभार असेही म्हटले जाते. बारभाईंनी रघुनाथराव पेशव्यांच्याऐवजी नारायणराव पेशव्यांच्या वंशजाबरोबर कारभार करण्याचा निश्चय केला होता. या बारभाईंमध्ये सखारामपंत बोकील यांना महत्त्वाचे स्थान होते.

     

    छ. शिवाजी महाराजांतर्फे अफजलखानाकडे शिष्टाई करणारे गोपीनाथपंत बोकील हे सखारामपंतांचे पूर्वज होते. (छ. शिवाजी महाराजांनी अफजलखानाला गाफील ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले होते. त्यात महाराजांतर्फे अफजलखानाला हे संदेश सांगण्याचं काम गोपीनाथपंतांनी केले होते.)

    मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, सखारामबापूचा चुलतभाऊ महादजी यमाजी छ. संभाजी महाराजांच्या सेवेत होता. रायगडच्या पाडावानंतर तो छ. शाहूंबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होता. पुढे शाहूंनी त्यास हिंवरे गाव व कुलकर्णी वतन करून दिले. त्यास पुत्रसंतती नव्हती म्हणून बापूचा जेष्ठ भाऊ निंबाजीस ते वतन वारसाहक्काने मिळाले. बापूचा उल्लेख शनिवारवाडयाच्या बांधकामप्रसंगी (1732) मिळतो. सुरूवातीस सखारामबापू महादजीपंत पुरंदरे याच्याकडे कारकून व शिलेदार होता. बाळाजी बाजीरावाने त्यास 1746 मध्ये सदाशिवरावभाऊंबरोबर कर्नाटकच्या स्वारीवर पाठविले. या स्वारीत त्याने भरपूर धनदौलत जमवून छ. शाहूंचे कर्ज फेडले. पुढे रघुनाथरावांबरोबर गुजरात (1754) व उत्तर हिंदुस्थान (1758) अशा दोन स्वाऱ्यांत त्याने भाग घेतला.

     

    रघुनाथरावांचे कारभारी

    रघुनाथरावांबरोबर केलेल्या कार्यामुळे पेशव्यांनी त्यांची रघुनाथरावांचा कारभारी म्हणून नियुक्ती केली. रघुनाथराव पेशवे आपला सर्व कारभार सखारामबापूंच्याच सल्ल्याने करत होते.

    पानिपतच्या युद्धानंतर माधवराव पेशवे 1761 साली पेशवे झाले. परंतु त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत निजामाला तोंड द्यावे लागले. निजामाने पुण्याच्या दिशेने आगेकूच केल्यानंतर माधवरावांनी निजामाच्या प्रदेशात हल्ला करून मोठी आगेकूच केली. निजामाला अगदी कोंडीत पकडल्यावर मात्र रघुनाथरावांनी एकदम निर्णय बदलला. निजामाचा पूर्ण बीमोड करण्याऐवजी त्याला स्वराज्याचा 27 लाखांचा भाग तोडून दिला. हा पूर्ण बीमोड न करण्याचा सल्ला सखारामबापूंनी दिला होता असं संगितलं जातं.

     

    राक्षसभुवनची लढाई

    27 लाखांचा मुलूख मिळाला असला तरीही निजामाने नागपूरच्या जानोजी भोसल्यांच्या मदतीने पुण्यावर हल्ला केला आणि मोठी नासधूस केली. त्यानंतर पेशवा होण्यासाठी रघुनाथरावांनी प्रयत्न केले त्यामध्ये सखारामपंत बोकीलांचा मोठा वाटा होता. रघुनाथराव आणि माधवराव यांच्यामध्ये आळेगाव येथे लढाई झाली. यात माधवरावांचा पराभव झाला व दोघांमध्ये तह झाला.

     निजामाने थेट पुण्यावर हल्ला केला असल्यामुळे आता त्याचे खरे रुप रघुनाथरावास कळाले होते. नागपूरकर भोसल्यांनाही आपली चूक समजली आणि ते ही निजामाविरुद्ध सज्ज झाले. त्यानंतर या सर्वांनी राक्षसभुवन येथे निजामाचा पराभव केला.

     

    आळेगावच्या लढाईनंतर वरचढ ठरलेल्या रघुनाथरावांनी गोपाळराव पटवर्धनांची जहागिरी जप्त करुन ती सखारामबापूंना दिली. ( संदर्भः मराठी विश्वकोश)

    नारायणरावांची हत्या

    माधवरावांनंतर नारायणराव पेशवे अत्यंत अल्पवयात पेशवेपदी आले होते. पण रघुनाथरावांनी कट करुन गारद्यांकरवी त्यांची हत्या घडवून आणली. या हत्येनंतर पेशवाईला एक निराळीच कलाटणी मिळाली. पेशवाईत बारभाईंचा उदय झाला. 

     

    रघुनाथरावांनी नारायणराव पेशव्यांना 'ध'रण्याचा कट रचला. नारायणरावांना धरण्याचा रघुनाथराव, सखारामबापू, मोरोबा फडणीस यांनी निश्चय केल्याचं इतिहासअभ्यासक अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या 'पुण्याचे पेशवे' या पुस्तकात लिहिलं आहे.

    नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर काय झाले याचा वृत्तांत इतिहासअभ्यासक अ. रा. कुलकर्णी यांनी लिहिला आहे. ते लिहितात या हत्येनंतर पुण्याहून मिरजेस पाठवलेल्या एका पत्रात म्हटले आहे, "सखारामबापू काल दोन प्रहरी पळून गेले. पर्वतीजवळ माणसास आढळले. बायकामुले घरातच आहेत. चार कोस गेला. मागती विचार केला न कळे. फिरोन रात्री घरास आले."

     

    बारभाई

    नारायणरावांच्या हत्येनंतर मात्र रघुनाथरावांना सखारामबापूंनी वरवर आपला पाठिंबा आहे असं भासवलं आणि नारायणरावांना न्याय मिळण्यासाठी बारभाईंमध्ये सहभागी झाले. रघुनाथरावांच्या पक्षाऐवजी आपण नारायणरावांच्या वंशजाबरोबर राहायचे असं या बारभाईंनी ठरवलं. बारभाईंमध्ये शिंदे, होळकरांसह, त्रिंबकजी पेठे, हरिपंत फडके यांचाही समावेश होता.

    नारायणरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांनी कर्नाटक मोहीम आखली होती. त्या मोहिमेतून सखारामबापूंनी स्वतःची सुटका करुन पुणे गाठलं होतं. 

     

    नारायणराव पेशव्यांच्या हत्येवेळी त्यांची पत्नी गंगाबाई गरोदर होती. त्यांना झालेल्या मुलाला म्हणजे सवाई माधवरांवाना पेशवाईची वस्त्रं देऊन त्यांच्यानावे हे बारभाई कारभार पाहू लागले. त्या बारभाईत सखारामबापू अग्रेसर होते.

    सवाई माधवरावांच्या काळात रघुनाथरावांना पेशवाईपासून लांब राहावे लागले होते. त्यांना पुन्हा पुण्यात घेऊन यावे यासाठी मोरोबादादा फडणीसांनी इंग्रजांकडे प्रयत्न केले होते. त्यातही सखारामबापूंचा समावेश होता.

    इंग्रज व रघुनाथराव यांजबरोबर बारभाईंनी वडगावचा तह केला. तेव्हा बापूचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला, तेव्हा नानांनी त्यांना कैदेत टाकले. रायगडावर कैदेत असतानाच सखारामबापूंचा मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास सर्व कारभार नाना फडणवीसांकडे एकवटला.






No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...