विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 May 2024

सरसेनापती संताजी घोरपडेंची खानदेशावर स्वारी

 


सरसेनापती संताजी घोरपडेंची खानदेशावर स्वारी..🚩
बुऱ्हाणपूरच्या मोगल सुभेदारास बांगड्यांचा आहेर..
उत्तर कर्नाटकातून संताजींनी आपल्या फौजेसह थेट औरंगाबाद(छ.संभाजीनगर)च्या दिशेने कूच केले. यावेळी संताजीं जवळ वीस हजार घोडदळाची जंगी फौज होती. औरंगाबाद(छ.संभाजीनगर)च्या प्रदेशात त्याने धुमाकूळ माजवून ठिकठिकाणी लूट केली आणि शत्रूच्या फौजा येण्यापूर्वीच आणखी उत्तरेकडे खानदेशातील धरणगावाकडे कूच केले (जानेवारी १६९५). लवकरच तो धरणगावाहून तापीच्या तीरावरील बुऱ्हाणपूर या सुप्रसिद्ध शहरावर चालून गेला..
उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या महामार्गावरील बुऱ्हाणपूर हे मोगलांचे महत्त्वाचे लष्करी ठिकाण होते. मराठे इतक्या अंतर्गत प्रदेशात घुसतील, असे तेथील अंमलदारांना वाटत नव्हते; पण कोसळलेल्या संकटास सामोरे जाण्यावाचून त्यांना अन्य पर्याय नव्हता. संताजींनी बुऱ्हाणपूरच्या सुभेदाराकडून चौथाईची मागणी केली; पण अशी मागणी मान्य करणे म्हणजे मोगलांची मोठी नामुष्की होती. मोगली सुभेदाराने चौथाई देण्याऐवजी संताजींशी मुकाबला करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो आपल्या सैन्यानिशी संताजीशी लढण्यासाठी शहराबाहेर आला; पण संताजीं समोर त्याचा टिकाव लागला नाही. त्याच्या फौजेचा संताजींनी तत्काळ धुव्वा उडविला. शहराच्या रक्षणासाठी असलेल्या फौजेची अशी वाताहत झाल्यानंतर शहर संताजींच्या ताब्यात आले. संपूर्ण शहराची लूट करण्यात आली. मराठ्यांच्या हाती अमाप पैसा व जवाहर (Money and Jewels) पडले. बुऱ्हाणपूर लुटले गेल्याची बातमी कानावर पडताच बादशहाच्या तळपायाची आग मस्तकास गेली..
● बुऱ्हाणपूरचा पराभव हा सुभेदाराचा नादानपणा आहे, असे त्यास वाटले. तेव्हा अशा नादान सुभेदाराची जाहीर बेइज्जत करण्याच्या उद्देशाने बादशहाने त्याच्याकडे 'बांगड्यांचा आहेर' पाठविल्याचे सुरतकर इंग्रज लिहितात :
"He (the Emperor) hath sent him (the Governor of Burhanpur) some of those rings women wear on their arms for he had more men in the field than Santoo (Santaji).. "
बादशहाने बुऱ्हाणपूरच्या गव्हर्नराकडे बायका हातात घालतात तशा कडी (बांगड्या) पाठवून दिल्या आहेत. कारण संताजीच्या सैन्यापेक्षा अधिक सैन्य त्याच्याजवळ होते. (असे असूनही त्याचा पराभव झाला होता). याच वेळी बादशहाने गाजिउद्दीन खान बहादूर या आपल्या सरदारास खानदेशात जाऊन संताजीस शिक्षा करण्याचा हुकूम फर्माविला; पण गाजिउद्दीन खान देशात जाईपर्यंत मराठे पसार झाले होते..
● सरसेनापती संताजी घोरपडेंच्या स्वारीने सुरतेत घबराट :
बुऱ्हाणपुराहून सुरतेवर हल्ला करून तिची लूट करण्याची संताजींची योजना होती. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही नगरी दोन वेळा लुटून (वसुल) अगणित संपत्ती स्वराज्याच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात आणली होती. त्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी संताजी बुऱ्हाणपूर, सुरत यासारखी नगरे लुटीत होता. संताजींच्या या संभाव्य स्वारीच्या वार्ता सुरतेच्या वेशीवर धडकताच सुरतकरांमध्ये मोठी घबराट पैदा झाली. जो तो आपली धनसंपत्ती सुरक्षित जागी कशी राहील, यासाठी धडपडू लागला..
● युरोपियन वखारवाल्यांनी आपल्या वखारींच्या संरक्षणाची जय्यत तयारी सुरू केली. २० फेब्रुवारी १६९५ रोजी सुरतकर इंग्रज वखारवाले मुंबईकर इंग्रजांना लिहितात :
"(We) have been busy in making the best preparations we could for defence of the factory against Rama Rajah's troops; which have been daily expected by the town people, who are in great hurry, consternation and fright thereupon. They are burrying and securing what they can underground and packing up the rest to be gone on the news of approach (of the Marathas). The Governour hath wrote to Surjeet Cawne (Surjeetkhan) Subha of this province, for more soldiers and to the King (Aurangzeb) likewise.."
(छत्रपती राजाराम महाराजांच्या (मराठ्यांच्या) सैन्याच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून आमच्या वखारीच्या संरक्षणाच्या जय्यत तयारीत आम्ही गुंतलो आहोत. मराठे केव्हाही येतील, अशी सुरतकरांना भीती वाटत असल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. शक्य तेवढी संपत्ती ते जमिनीत गाडून ठेवीत आहेत. मराठे आले की राहिलेले सामान सुमान घेऊन पळ काढायचा असे त्यांनी ठरविले आहे. ठाणेदाराने सुरतेच्या संरक्षणासाठी सैन्याची कुमक पाठविण्यात प्रांताच्या सुभेदारास व बादशहास लिहिले आहे..) याचवेळी आपणाकडे वखारीच्या संरक्षणासाठी जादा तोफा व दारूगोळा पाठवावा, अशी सुरतकर इंग्रजांनी मुंबईकरांकडे विनंती धाडली होती. त्याप्रमाणे मुंबईकरांनी तोफा व दारू गोळ्याची कुमक पाठवूनही दिली. (२८ फेब्रुवारी) पण सुरतकरांच्या सुदैवाने संताजींनी सुरतेवरील आपल्या स्वारीचा बेत बदलला. सुरतेऐवजी नंदुरबार या शहरावर ते घसरले..
● सरसेनापती संताजी घोरपडेंची स्वरारी नंदुरबार शहरास वेढा :
बुऱ्हाणपूर ते सुरत या मार्गावरील नंदुरबार हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. संताजींनी या शहरास वेढा देऊन तेथील फौजदाराकडे चौथाईची मागणी केली. त्याने संताजींची मागणी धुडकावून देऊन शहराच्या संरक्षणाची कडेकोट तयारी चालविली. नवी सैन्यभरती करून त्याने त्यांना शहराच्या संरक्षणाच्या कामगिरीवर नेमले. नंदुरबार संकटात असल्याचे पाहून अहमदाबादेचा सुभेदार सुरजितखान याने एक हजाराचे सैन्य मदतीस पाठविले. आसमंतातील इतर ठाणेदारांनीही कुमक पाठविली. अशा प्रकारे बाहेरून कुमक येताच नंदुरबारच्या फौजदाराने शहराबाहेर पडून मराठ्यांशी सलाबतपूर येथे लढाई दिली. पण फार वेळ रणांगणावर न थांबता तो नंदुरबारकडे लगेच परतला. मराठ्यांनी शहराच्या तटबंदीवर हल्ला चढविला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही..
मराठे काही काल शहराजवळ छावणी करून राहिले. शहरास वेढा देऊन त्यास जेर करावे इतका वेळ त्यांच्या जवळ नव्हता. अन्नधान्य व पाणी यांची टंचाई त्यांना जाणवत होती. अशा परिस्थितीत नंदुरबारला वेढा देणे शहाणपणाचे नाही, हे उमजून ते आसमंतातील मुलूख लुटण्यासाठी पसार झाले. मराठ्यांच्या लष्करी तुकड्यांनी नंदुरबारच्या संताजींच्या नेतृत्वाखाली साताऱ्याकडे परतीच्या प्रवासाचा रस्ता धरला. (मार्च १६९५)..
सरसेनापती संताजी घोरपडे अशा प्रकारे खानदेशात धुमाकूळ घालीत असता शंकराजी नारायण व हणमंतराव निंबाळकर या मराठा सेनानींच्या फौजा (नाशिक बागलाण) भागात मोहीम करीत होत्या. मोगलांचा प्रसिद्ध सरदार मातबरखान हा त्यांचा प्रतिकार करीत होता..
――――――――――――

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...