इतिहासाच्या पानात हरवलेले ‘मराठा सरदार नारोजी त्रिंबक’ यांच्या रक्तरंजित पराक्रम सांगणारा कोथळीगड पेठचा किल्ला..
लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या पेठच्या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते..
औरंगजेबाने सह्याद्रीला धडक दिली आणि सह्याद्रीच्या पाठीवर असलेले गडकोट जिंकण्यासाठी मोघली सरदारांना आज्ञा दिली. ताज्या दमाच्या मुघली सैन्याने मराठ्यांच्या किल्ल्यांना वेढे घातले आणि दमदमे रचून तटाबुरुजांवर तोफगोळ्याचा मारा करू लागले. पण मुघली बादशाह आणि त्याच्या सरदारांचा लवकरच भ्रमनिरास झाला. मराठ्यांनी असा काही प्रतिकार केला की सर्वच आघाड्यांवर मुघल पाठ दाखवून पळून गेले..
साधारण १६८४ च्या शेवटास पेठचा किल्ला घेण्यासाठी मुघली सरदार अब्दुलकादर प्रचंड दारूगोळ्या सहित येऊन वेढा घालून बसला होता, त्याला माणकोजी पांढरे या फितुराची सुद्धा साथ मिळाली. अब्दुल कादरला जुन्नरहून अब्दुलखान दारुगोळा आणि रसद पुरवीत असे. ही माहिती जेव्हा मराठ्यांना मिळाली तेव्हा नारोजी त्रिंबक या शूर मराठा सरदाराने आपल्या तुकडीसह त्याची वाट अडवून धरली. गनिमी काव्याचा उपयोग करून नारोजी त्रिंबकने अब्दुल्खानला हैराण करून सोडले. पण मराठ्यांच्या दुर्दैवाने एका लढाईत नारोजी त्रिंबक आणि त्यांचे अनेक मराठे धारातीर्थी पडले. अब्दुलखानाने नारोजीचे शिर कापून आसपासच्या गावात फिरविले आणि या शूर मराठ्यांची विटंबना केली..
अखेर अब्दुल कादरने किल्ल्यावर जोरदार हल्ला चढविला पण त्याचा हा हल्ला मराठ्यांनी परतवून लाविला आणि त्याला त्याच्या छावणीत पिटाळून लाविला. पण या धावपळीचा फायदा उठवीत माणकोजी पांढरेच्या सैन्यातील काही मावळे किल्ल्यात घुसले आणि त्यांनी लगेच कापाकापी करण्यास सुरुवात केली. मोघली सैनिकांनी अखेरीस पेठचा किल्ला काबीज केला..
● या युद्धात नारोजी त्रिंबकने गनिमी काव्याचा उपयोग केला, गनिमी काव्याच्या तंत्र्याबाबत थोडक्यात माहिती :
सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांची गनिमी कावा यशस्वी होण्यासाठी मोलाची साथ मिळाली लष्करी सामर्थ्य कमी असताना यशस्वी होण्याचा मार्ग गनिमी काव्याचे तंत्र सांगते प्रतिकूल परिस्थितीत स्वाभिमानाने जगण्याचा मंत्रच हे तंत्र देते. राज्याच्या संरक्षणासाठी लष्करी व्यवस्था निर्माण झाल्या पासून गनिमी कावा अस्तित्वात आहे..
――――――――――――
Ram Deshmukh
No comments:
Post a Comment