शिवपराक्रमाची गाथा न्यारी,
इतिहास साक्ष देई कांचनबारी ।।
लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
शिवराय म्हंटले की, आपल्या साऱ्यांच्या डोक्यात येते ती म्हणजे 'गनिमी कावा'. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांचा फायदा घेऊन लपून-छपून वार करून शत्रूला बेजार करून अगदी कमीतकमी सैन्यानिशी शत्रूला शिकस्त द्यायची. बऱ्यापैकी लढाया या गनिमिकाव्याने झाल्या, परंतु शिवरायांच्या इतिहासात अशा काही लढाया आहेत जिथे मराठे अगदी समोरासमोर रणांगणात येऊन लढले आणि जिंकले सुद्धा. साल्हेरची लढाई जी बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे. अशीच एक दुसरी लढाई आहे ती म्हणजे “कांचनबारीची लढाई”...
महाराज आता मुल्हेरच्या पायथ्याला आले होते. पायथ्याची पेठ महाराजांनी लुटली. मुल्हेरचा किल्लेदार होता नेकनामदार खान. हा गडी काय गडावरून खाली उतरला नाही कारण त्याला माहित होते की आपण मराठ्यांचा सामना करू शकणार नाही. इकडे औरंगाबादला दक्षिणेचा सुभेदार होता खुद्द औरंगजेबाचा मुलगा 'शह जादा मुअज्जम'. याची महाराजांच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती आणि वेळोवेळी त्याला बातम्या पोहचत होत्या. त्याने बुऱ्हाणपूरला असलेला मातब्बर मोगल सरदार दाऊदखान कुरेशी याला महाराजांचा समाचार घेण्यासाठी पाठवले. प्रचंड सैन्य घेऊन दाऊदखान मुल्हेरच्या दिशेने निघाला. याच्याबरोबर भीमसेन सक्सेना सुद्धा होता कारण तो त्यावेळी दाऊदखानाचा अधिकारी होता. दाऊदखान येतोय ही बातमी मिळताच महाराजांनी मुल्हेरचा तळ उठवला व दक्षिणेच्या वाटेला लागले. मराठ्यांना जर दक्षिणेत जायचे असेल तर सातमाळ कुठेतरी ओलांडावी लागणार हे दाऊदखानाला माहीत होते परंतु नक्की कुठून ओलांडणार याची खात्री करण्यासाठी तो चांदवड (म्हणजे सातमाळेचे पूर्वेचे टोक) येथे आला. बागीखान हा चांदवडचा फौजदार होता. मराठे कांचनबारी किंवा कांचनमंचनच्या घाटाने सातमाळ ओलांडून नाशिककडे जाणार आहेत ही बातमी त्याला समजली आणि त्याने मराठ्यांना कांचनबरीच्या दक्षिणेला रोखायचे असे ठरवले..
युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही फौजांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले..
१६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले. महाराजांकडे दहा हजारांचे घोडदळ होते आणि घोडदळ प्रमुख प्रतापराव गुजरही सोबत होते. महाराजांचे नियोजन असे होते की काही तासात दाऊदखानाचा फडशा पडायचा आणि दिवस मावळेपर्यंत खजिन्याचा दिशेने निघायचे. दाऊदखानाने आपल्या सैन्याचे दोन भाग केले होते. इखलासखान घोडेस्वारांची एक मोठी तुकडी घेऊन कांचन किल्ल्याच्या पायथ्याला आला होता. एका उंचवट्यावर उभे राहून त्याने पाहिले तर मराठे युद्धाच्या तयारीने उभे असल्याचे त्याला दिसले आणि खुद्द शिवाजी महाराज चिलखत घालून , दोन्ही हातात पट्टे चढवून फिरत होते. या युद्धाचे नेतृत्व स्वतः शिवाजी महाराज करत होते..
“कार्तिक शुद्ध चतुर्दशी (१७ ऑक्टोबर १६७०) सुरतेहून फिरोन येता दिंडोरीपासी दाऊदखान व राजश्री यांसी झगडा झाला. हत्ती एक पाडाव झाला. मग कुंजरगडास येऊन राहिले...” सुरत वसूल घेऊन महाराज बागलाणात शिरले. आता बागलाणाला सटाणा तालुका (नाशिक जिल्हा) म्हणतात. बागलाण आणि नाशिक जिल्ह्यातील इतर भाग चांदवड, निफाड, येवले, नांदगाव, नाशिक व दिंडोरी हे तालुके यांना वेगळे करणारी डोंगरांची रांग आहे. याला चांदवड रांग असे म्हणतात. ही रांग चांदवड पासून वणीच्या सप्तशृंगी डोंगरा पर्यंत पसरली आहे. चांदवड हे या रांगेचे पश्चिमेचे टोक आहे. तेथून सप्तश्रृंगीपर्यंत या रांगेतून दक्षिणेकडे येण्याच्या वाटा आहेत. त्यांना घाट अगर नाशिक जिल्ह्यातील भाषेत बारी म्हणतात. चांदवडजवळील बारीतूनच आता चांदवडहून उत्तरेकडे मालेगावला बस जाते. या रांगेचे पश्चिमेचे टोक म्हणून चांदवडला मोगल काळात लष्करी कमीत कमी पंधरा-सोळा मैलांचे आहे. आणि लढाई तर घाटमाथ्यावर झाली. त्यामुळे ही लढाई #कांचनबारीची म्हणायला हवी..!
● सभासदाने या लढाईचे त्रोटक वर्णन दिले आहे ते आपण पाहिले. मोगलांचा अधिकारी भीमसेन या लढाईत हजर होता. त्याचे वर्णन तपशीलवार आहे. तो म्हणतो :
इखलासखान मियाना हा पहाटेच्या सुमारास घाटमाथ्यावर पोहोचला. मराठ्यांचे सैन्य तयार होते. इखलासखानाने आपल्या सैनिकांना तयार राहण्यास सांगितले. त्याच्यापाशी शस्त्रास्त्रांचा साठा असलेले काही उंट होते. त्याचे सैनिक चिलखते वगैरे चढवून तयार होऊ लागले. इखलासखान हा तरुण होता. त्याने सारासार विचार केला नाही. आपल्या बरोबर असलेली थोडी माणसे घेऊन तो शत्रूवर तुटून पडला. मराठ्यांचे सैन्य पंधरा हजारांच्यावर असावे. त्यांच्याशी तो लढू लागला. युद्धाच्या गर्दीत त्याला जखमा लागून तो जमिनीवर कोसळला. तोपर्यंत दाऊदखानाने राय मकरंद खत्री, आपला भाऊ शेख सफी, बुंदेल्यांचा अधिकारी भान आणि संग्रामखान घोरी यांना इखलासखानाच्या मदतीस पाठविले होते. तो स्वतः त्यांच्या मागोमाग पोहोचला. वाटेत उंच जागेवर एक बेचिराख खेडे होते. तेथे दाऊदखानाने आपल्याबरोबरचा हत्ती, निशाण, नगारे ही ठेविली आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी बाकीखान आणि इब्राहीम पन्नी यांना ठेवले. थोड्या वेळाने दाऊदखानाचे बुणगे आणि पिछाडीचे सैन्य तेथे येऊन पोहोचले. भीमसेन या पिछाडीच्या सैन्याबरोबर होता. त्यांना तेथेच थांबण्यास सांगण्यात आले..
मुख्य लढाई मराठ्यांनी इखलासखानावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. आता तीच पाळी संग्रामखान घोरी, त्याची मुले आणि आप्त यांच्यावर आली. भीमसेनाच्या म्हणण्या प्रमाणे या युद्धात मोगलांचे अनेक सैनिक मारले गेले. बुंदेल्यांनी तोफखाना सुरू करून आणि बंदुकी चालवून मराठ्यांना शर्थीने मागे हटविले. तोपर्यंत दाऊदखानही येऊन पोहोचला होता. त्याने जखमी इखलासखानाला रणांगणातून उचलले. भीमसेन म्हणतो, “मराठे आपल्या पद्धतीने लढू लागले. याला बरगीगिरी म्हणतात. मोगल सैन्याच्या भोवती ते चहूकडून घिरट्या घालू लागले आणि हल्ले करू लागले.."
दाऊदखानाचा बक्षी आणि वाकेनवीस मीर अब्दुल्गाबूद याची आणि इतर मोगल सैन्याची ताटातूट झाली. मराठ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मीर अब्दुल्गाबूद याचा एक मुलगा आणि काही सैनिक मारले गेले. स्वतः मीर अब्दुल्गाबूद आणि त्याचा दुसरा मुलगा हे जखमी झाले. बाकीखानाने पालख्या पाठवून जखमी अब्दुल्गाबूद आणि इतर माणसे यांना तळावर आणले. दाऊदखानाचे सैन्य दोन हजाराच्यावर नव्हते. मराठ्यांनी संध्याकाळी पुन्हा एकदा मोगलांवर हल्ला केला. नंतर ते निघून गेले. भीमसेन स्वतः मोगलांचे मोर्चे पाहून खात्री करून घेऊन आला. दुसऱ्या दिवशी मोगल नाशिकला आले. जखमी लोकांना औरंगाबादेस हलविण्यात आले. दाऊदखान महिनाभर नाशकास होता. भीमसेन हा मोगलांचा जय झाला असे समजतो. पण या लढाईत मोगलांचा उद्देश महाराजांची वाट अडविणे हा होता. तो सफल झाला नाहीच. उलट मोगलांची अपरिमित हानीच झाली. महाराज सुरतेची खजिना वसूल घेऊन सुरक्षितपणे निघून गेले..
● छत्रपती शिवरायांच्या कांचनबारी युद्धाचे वर्णन करताना :
सभासद म्हणतो..,
“खासा राजा घोड्यावर बसून, बख्तर घुगी घालून, हाती पट्टे चढवून मालमत्ता घोडी, पाईंचे लोक पुढे रवाना करून आपण दाहा हजार स्वारानिशी सडे सडे राऊत उभे राहिले...” याच उल्लेखावरून युद्धभूमीवर छत्रपति शिवाजी महाराज लढतानाचे हे कल्पनाचित्र गडवाट संस्थेने साकार करू शकले..
हे युद्ध झाले तेव्हा महाराजांचे वय साधारण ४० वर्षांचे असावे. त्यामुळे चित्रं तयार होताना युद्धभूमीवर महाराज कसे दिसत असतील, त्यांचा पेहराव कसा असेल, अंगावर असणारे बख्तर घूगी, चिलखत, दांडपट्टा, शिरस्त्राण यासाठी कवी परमानंद यांनी शिवभारत काव्यातील उंबरखिंड लढाईच्या अध्यायात केलेल्या शिवरायांच्या वर्णनाप्रमाणे आपण या चित्रात दाखवले आहेत. तसेच कांचन मांचन किल्ला परिसर, खुद्द शिवरायांची व मावळ्यांची आक्रमकता, युद्धावेळी हजारो घोड्यांच्या टापांनी उडालेल्या धुळीमुळे दिसणारा परिसर, मराठ्यांच्या पराक्रमापुढे मोगल सैन्याची उडालेली भंबेरी, महाराजांची ढाल बनून त्यांच्यासमवेत लढणारे सेनापती प्रतापराव गुजर व इतर सरदार मंडळी अशा बारीकसारीक गोष्टी आपण या चित्रात दाखवल्या आहेत..
――――――――――――
◆महाराजांची लढाऊ चित्राची संकल्पना :
गडवाट प्रवास सह्याद्रीचा, संस्था.
◆ चित्रकार : प्रदीप पवार.
◆ इतिहासकार : सेतू माधवराव पगडी.
No comments:
Post a Comment