विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 May 2024

गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’

 

स्वराज्याची निर्मिती आणि विस्तार करताना शिवबांना अनेक विर मावळ्यांची, सवंगडयाची साथ लाभली असे साथीदार की ज्यांनी स्वराज्यासाठी त्याग, निष्ठा, समर्पण ही त्रिसूत्री आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक च बनवली होती. अशाच अनेक विरांनी इतिहास घडवला. त्यापैकी महराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखणारा

गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’..🙏
🚩लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत गुप्तहेर खात्याचे महत्वपूर्ण आणि मोलाचे काम असे या शिवाय हे गुप्तहेर खाते प्रत्येक किल्ल्यावर व प्रत्येक सुभ्यावर हि कार्यरत असे ते खाते आपल्या बातमीदाराव्दारे तेथील आधिकारी आणि कामकाजाबद्दलची माहिती शिवरायांपर्यंत देत असे..
या गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’ होते आणि ते इतिहासाला माहिती आहेतच पण त्यांच्या व्यतिरिक्त रावजी, सुंदरजी, कर्माजी, विश्वास मोसेखोरे आणि विश्वास दिघे असे पाच गुप्तहेर होते परंतु शिवरायांच्या या गुप्तहेर खात्यातील एवढ्याच लोकांची नावे माहिती आहेत पण यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती अजूनही इतिहासात आढळत नाही ती माहिती गुप्त आहे आणि हे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे यशच आहे कारण महाराजांच्या सैन्यात असणार्यांना गुप्तहेरांची माहिती कळू शकली नाही ती गनिमींना कशी समजणार..
सुरवात होते, १६४२ पासून शिवबांनी नुकतेच पुण्यात आपले राज्य वाढवण्यास सुरुवात केलीली असते. जिजाऊसाहेब राज्यकारभार पाहत असतात. त्याच सुमारास एक रामोशी समाजातील दौलतराव नावाचा मुलगा फक्त शिवाजी महाराजांना पाहता यावे या इच्छेने चौदा, पंधरा लांडगे मारून त्यांच्या शेपट्या कापून लाल महालात पोहचतो. प्रथम भेटीतच आई जिजाऊ साहेब त्याची पारख करतात. त्याचे कौतुक करतात. तुम्हाला सोबत म्हणून एक अनमोल रत्न गवसल्याचे शिवबांना सांगतात. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून राजे त्याला गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतात. कान्होजी जेधे सारखे गुरु मिळताच रामोशी दौलतरावाची एका गुप्तहेर संघटना प्रमुखात रूपांतर होते की खुद्द शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा ही उपमा त्यांना शोभून दिसते..
इथुन पुढे वाटचाल सुरू होते, दौलतराव ते बहिर्जी नाईक या प्रवासाची. स्वराज्याच्या कार्यासाठी बहिर्जी नुसते इस्लाम धर्म स्विकारत नाही तर रहिम बाबा होउन कुणालाही शंका येणार नाही इतका अंगात भिनवून घेतात. हृदयात मात्र अखंड शिवज्योत तेवत असते. परिवाराचा त्याग करतात गरोदर पत्नीची काळजी ईश्वरावर सोपवतात. स्वराज्यासाठी स्वतः ला संपूर्ण समर्पित करत असतांनाच आपल्या सारखे तिन हजार बहिर्जी घडविण्याचे कार्य करतात. एक एक अस्सल हिरा शोधुन काढतात. त्या काळातील गुप्तहेर संघटनेची बांधणी, जागोजागी निर्माण केलेली गुप्तस्थळे, शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रत्येक हेराला दिले जाणारे शिक्षण हे वाचुन अचंबित होतो. हेरखात्यात स्त्रीयांचा समावेश पाहुन स्त्री शक्तीची जाणीव होते. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नसताना एक शिस्तबद्ध सघंटना कशी उभी राहते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बहिर्जी नाईक यांची गुप्तहेर संघटना होय..!
महाराजांच्या हेर यंत्रणेचा विचार केला तर प्रामुख्याने नाव पुढे येते ते बहिर्जी नाईक यांचे. सुरतेची मोहीम व जालनापूराच्या लूट मोहिमेनंतर पट्टागडाकडे प्रयाण, या दोन्ही ठिकाणी बहिर्जी नाईकांचे उल्लेख कागदपत्रात आले आहेत. त्यामुळे बहिर्जी नाईक ही ऐतिहासिक व्यक्ती होती याची खात्री पटते. सुरतेच्या मोहिमेबाबत (दुसरी वसुली) बहिर्जी नाईकांनी सुरतला गुप्तपणे भेट देऊन तेथील पूर्वपाहणी केली होती असे सभासद बखरीत म्हटले आहे. महाराजांच्या कार्याची व्याप्ती लक्षात घेता त्यांचे हेर खाते हे एका व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून असणार नाही हे निश्चित. त्यामुळे त्यांचे हेर खाते ही एक वेगळी यंत्रणा असून बहिर्जी हे त्यातील प्रमुख व्यक्ती असतील असे वाटते. सुरतेच्या पूर्वपाहणीतही त्यांच्या बरोबर अन्य व्यक्तीही सहाय्यक म्हणून असतील. दोन्ही मोहिमांच्या जाण्या-येण्याचे मार्ग ठरविण्यात बहिजींचा मोठा वाटा असावा असे वाटते. अर्थात अंतिम निर्णय महाराज स्वतःच घेत असतील. बहिर्जी स्वतः रामोशी समाजाचे होते. त्यामुळे भिल्ल, कोळी, रामोशी इत्यादी डोंगर-दऱ्यात, अरण्यात राहणाऱ्या जमातींशी विशेषतः त्यांच्या प्रमुखांशी बहिजींचे चांगले संबंध (contacts) असतील. किंबहुना त्यांनी ते प्रयत्नपूर्वक जोपासले असतील असे वाटते. महाराष्ट्रात पठारी प्रदेश व कोकण किनारपट्टी यांना जोडणाऱ्या अनेक घाटवाटा आहेत. या वाटांचेही ते चांगले जाणकार असले पाहिजेत. दोन्ही वेळेला जाताना महाराजांची फौज जव्हार व रामनगरच्या कोळी राज्यातून गेली होती. येथील राजांशी बोलणी करून त्यांची मदत मिळविण्याचे मोलाचे काम बहिजींनी केले असावे. परत येताना मात्र या राज्यांमधून कमीत कमी प्रवास करावा लागेल याची दक्षता घेण्यात आली आहे..
थेवेनो (Thevenot) या परदेशी प्रवाशाने असे म्हटले आहे की महाराज स्वतः फकिराच्या वेषात सुरतेला गेले होते व त्यांनी तेथील माहिती काढली होती. ही अर्थातच अविश्वसनीय गोष्ट आहे. याचा असा अर्थ घेता येईल की बहिर्जी व त्यांच्या बरोबरची मंडळी वेगवेगळ्या वेषात मोहिमेपूर्वी सुरतेत वावरली असावीत..
अत्यंत गुप्तपणे विश्वासाने आणि अचूक कामगिरी करणाऱ्या शिवरायांच्या गुप्तहेर खात्यास आणि या खात्यातील प्रत्येक हेरास आणि बातमीदारास मानाचा मुजरा..
――――――――――――
🎨 ओंकार जगताप 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...