विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2024

*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹* भाग - १.

 


*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹*

भाग - १.

ब्रम्हवर्ताचं भूषण असणार्या गंगा नदीकाठी बागडणारी नानासाहेब, राव साहेब,दादासाहेब ही द्वितिय बाजीराव पेशव्यांची दत्तकपुत्र...आणि त्यांच्या सोबत बागडणारी मनू...हे दृष्य पेशवे रोजच डोळांभरुन पाहत होते.त्यांना कन्या नसल्यामुळे,त्यांचे आश्रित असलेल्या मोरोपंत तांब्यांच्या कन्येला मानस कन्या मानुन आपली लेकीची भूक भागवुन घेतली.कन्येची सर कुळपुत्रांना ही नसते.पण आज ती न दिसल्याने ते थोडे अस्वस्थ झाले.काल संध्याकाळी रावसाहेबांनी तीचा केलेला अपमान की, नानाने मुद्दाम केलेले भांडण याचा तर तीला राग आला नसेल ना?मोरोपंत होम शाळेत दिवसभर धर्मकार्यात मग्न असल्यामुळे ही आईवेगळे पोर आपल्या वाड्यात रुणझुणते,नाचते,बागडते,ती होमशाळेत असेलसे वाटुन सेवकाला तीला आणायला पाठविले आणि आतुरतेने वाट पाहु लागले.
तिला कश्यापाई बोलावले?या फटकळ पोरीने आणखी काय केले या धास्तीने मोरोपंत घाबरुन तीच्या सोबतच आले.आपण आश्रित!आश्रितासारखे वागावे ना? पण ही स्वतःस बाजीरावांची दुहिता अन् नाना,रावसाहेबांची भगिनिच मानुन बसली.कसे आणि काय सांगावे? बाजीराव तीला कन्याच मानत असल्याने तिचं शिक्षण,घोडसवारी,सुर्यनमस्कार, मल्लखांब,कुस्ती,तलवारबाजी हे सर्व पेशव्यांच्या मुलाबरोबरीने शिकत आहे.कसं आवराव?बरं बोलणं अति जहाल.मातृविहिन पोरीस कसं सांभाळाव?दिनपणे तांबे पेशव्यांना म्हणाले,पोरीकडुन कांही आगळीक झाली असल्यास क्षमा करावी.ती फुरंगटुन बाजीरावांजवळ येत म्हणाली, काकासाहेब!आमचे बंधु नुसता हुंदडा घालतात,तालिमीत पण नीट शिकत नाही म्हणुन रागावले तर,आम्हास भटाची पोर म्हणुन चिडवले.हे आमचे आणबंधु... काल हत्तीवर आम्हाला न घेता एकटेच फेरी मारायला गेले.मोरोपंत तिच्या बेलगाम बोलण्यावर ओरडले तर बाजीरावांनी त्यांनाच सुनावले.श्रीमंत! आम्ही आपले आश्रित,दरिद्री,हिने हत्ती साठी हट्ट करावा?हिच्या दैवी कुठला हत्ती? नाही मोरोपंत! नाही..तुम्ही दरीद्री नाही.या कन्येने आपणांस बहुत श्रीमंत केले.हिच्या बुध्दीवादाने आमचेही पुत्र शिकतील,यश मिळवतील.नऊ वर्षाची असुनसुध्दा किती परिपक्व बोलते.हिला जिवापाड सांभाळा.मोरोपंत! ही कुणीतरी थोर होईल.
मनूचा सांभाळ करणारी तानु मावशी पुर्वजांच्या,थोरामोठ्यांच्या पराक्रमाच्या,शौर्याच्या गोष्टी सांगतल्याने मनुचे ज्ञान सर्वांगीन वाढत होते.बाजीराव म्हणाले,तुमची तानुमावशी आमच्याबद्दल काय म्हणतात?ते आपण विचारु नये. आपणास वाईट वाटेल,राग येईल.नाही मनू सांग!आम्ही मन घट्ट करुन ऐकु.त्या म्हणतात,या बाजीरावांनी २० वर्षापुर्वीच आंग्रजांना आत्मसमर्पण करुन स्वतःचं राज्य इंग्रजास .....बाजीराव मनातच बोलत राहिले...इतिहास आम्हास दोष देणारच...शेवटचा पेशवा पळपुटा निघाला...पण आमच्या स्थितीचा विचार कुणीही करणार नाही.बालपणापासुन कोणत्या वातावरणात वाढलो,किती बंधने,अशात पेशवेपद प्राप्त झाल्यावर, तिजोरी खाली,फंदफितूरी,कुणाचा पायपोस कुणाच्या पायी नाही,स्वजनांची साथ नाही,सगळे स्वार्थाने बरबटलेले, इंग्रजांकडे मातब्बर आसामी,मातब्बर फौज,अवघ्यांना पैशाचा मोह,तरी मुठभर सच्च्या लोकांसह जेवढे जमेल तेवढे करायचा आटोकाट प्रयत्न केला,पण तेवढे पुरी पडले नाही. मालकन हात धुवुन मागे लागलेला,माणसे जाया होऊं लागली.खणाखणीस सुरुवात,प्रजेचे अतिशय हाल,प्रजेचे मरण देखवे ना, म्हणुन प्रजेच्या
आत्मसमर्पण करावे लागले.मिळत असलेल्या आठ लक्ष तनख्यामधुन दानधर्म,अडल्या नडल्यास मदत,परिवाराची देखभाल, मुलांचे शिक्षण,जसं जमेल तेवढं करतोय तरी इतिहास आम्हाला गुन्हेगारच समजणार.पैशासाठी मुलुख इंग्रजांच्या घशात घातला असे आरोप आमचे रक्त जळव्यासारखे पितात.

क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...