सवाई माधवराव हे नारायणराव पेशवे यांचे पुत्र,थोरल्या माधवरावांचे पुतणे आणि नानासाहेब पेशव्यांचे नातू होय. नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर जन्मलेल्या सवाई माधवराव पेशव्याचे लालन पालन नाना फडणवीसांनी आपल्या कडक निगराणीखाली केले होते. एक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणून सवाई माधवरावास तयार करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले होते.
सवाई माधवराव यांचा प्रथम विवाह १० फेब्रुवारी १७८३ रोजी केतकी बिवली तालुका अंजनवेल प्रांत रत्नागिरी येथील रहिवाशी असलेल्या केशव नाईक कृष्णाजी भैरव थत्ते यांच्या राधा नावाच्या धाकट्या कन्येबरोबर पुण्यात पर्वतीवर शाही थाटात पार पडला. विवाह समयी वराचे वय ९ वर्षांचे होते तर वधु सहा वर्षांची होती. विवाह लवकर करण्यासाठी पार्वतीबाई (सदाशिवराव भाऊंची पत्नी) आणि सगुणाबाई (थोरल्या बाजीरावांच्या जनार्दन नावाच्या मुलाची पत्नी) नाना फडणीसांच्या मागे लागल्या होत्या. इंग्रज आणि मराठे यांच्यातील प्रदीर्घ संघर्ष १७ मे १७८२ रोजी झालेल्या सालबाईच्या तहाने काहीसा मिटल्याने नाना फडणीसांना फुरसत मिळून त्यांनी सवाई माधवरावांच्या विवाहात लक्ष घातले. विवाहाच्या लग्नपत्रिका डिसेंबर महिन्यात रवाना करण्यात आल्या होत्या. लग्नाच्या निमित्ताने राज्यातले प्रमुख लोक, सरदार व शेजारी प्रांतातील राजे रजवाडे. संस्थानिक या सर्वांस पुण्यास आणून, सर्व संमतीने सालबाईचा तह पक्का (ratify) करावा तसेच सवाई माधवरावाच्या पेशवेपदावर सर्वमान्यतेची मोहर उठवून घ्यावी हाही नानांचा अंतःस्थ हेतू होता. हा हेतू त्यांनी सवाई माधवरावांचा विवाह शाही थाटात पार पडून सिद्धीस नेला. विवाहाच्या प्रत्येक समारंभाची आखणी, तपशील आणि अंमलबजावणी नानांनी इतक्या बारकाईने केली होती. गो.स.सरदेसाई याबाबत म्हणतात कि, नानाने केलेली व्यवस्था हल्लीच्या सुधारलेल्या पाश्चात्य व्यवस्थेसहि हार जाणार नाही..आमंत्रणे नानांच्या नावाने काढली असून मसुदा असा होता...श्री राजश्री रावसाहेब यांचे लग्नाचा निश्चय माघ शु.९ स जाहला आहे.तरी आपण सहपरिवारे लग्न समारंभास येण्याचे करावे..महादजी शिंदे माळव्यातील स्थिती ठीक नसल्याने आले नाही. अहिल्याबाई होळकरांस नानांनी आग्रहाचे आमंत्रण देताना लिहिले होते कि...तुम्हांसारखी मनुष्ये श्रीमंतांचे पदरी,दानधर्म तपश्चर्या करणारी, त्यामुळेच हा शुभ दिवस प्राप्त झाला. सांप्रत तुम्ही वडील.अगत्य प्रसंगास यावे... नानांचे आमंत्रण बहुदा उशिराने पोहचले असावे. नानांच्या विनंतीस नकार देताना अहिल्याबाइनी म्हटले कि..पूर्व सूचना असती तर फौजेचा वगैरे सरंजाम केला असता.आता तिथ समीप आली. एकले थोड्या लोकांनिशी जाणे वडिलांच्या स्वरूपास योग्य कि काय! तेथे तुकोजीबाबा आहेत तेच आम्ही आहो. शुभकार्य सिद्धीस न्यावे.
अहिल्याबाइं प्रमाणेच महादजी शिंदे,मुधोजी भोसले व फत्तेसिंग गायकवाड सवाई माधवरावांच्या विवाहास आले नाहीत. निजाम अलीने आपला मुलगा पोलादगंज यास पाठविले होते पण तो लग्न होऊन गेल्या नंतर पुण्याला पोहचला. धाकटे छत्रपती शाहू महाराज तसेच सर्व सरदार, होळकर, रास्ते, पटवर्धन, पाटणकर, घोरपडे वगैरे सर्व सरदार आले होते. ह्या सर्वांच्या अनुमतीने नानांनी सालबाईचा तह इंग्रजांकडून कायम करविला. राघोबा दादा त्यावेळी सुरतेस इंग्रजांकडे होते, आले नाही. सवाई माधवरावांची नाशिक इथे राहणारी आजी गोपिकाबाई पण नातवाच्या लग्नाला आल्या नाहीत.
श्रीराम साठे लिखित पेशवे ह्या ग्रंथात सवाई माधवरावांचा विवाह कसा थाटामाटात, शाही अंदाजात पार पडला याचे वर्णन अशा प्रकारे केले आहे..हा विवाह म्हणजे जणू काही राजपुत्राचाच विवाह आहे असे नानांनी साऱ्या भरतखंडातील राजेरजवाडे, निजाम्पुत्र सिकंदर जहान व नवाब शर्फुल उमरा, टिपू सुलतान, पेशव्यांचे प्रथम दर्जाचे सरदार, दरकदार, सावकार, मुत्सद्दी व राजकारण धुरिणांना पेशवाईचे वैभव आणि दरारा दाखविण्यासाठी केलेला जणू राजसूय यज्ञच होता. वधू मंडपाची व्यवस्था रघुजी आंग्रे आणि हरिपंत तात्या फडके यांच्याकडे, तर समस्त पटवर्धन मंडळींकडे पाणी पुरवठ्याचे काम सोपविले होते. पंगतीत तूप वाढण्याच्या कामावर पुण्यातील सोनारांची नियुक्ती केली होती, शाही पंक्तीसाठी १५०० चांदीची ताटे व ताटाच्या बाजूला मंद उजेडासाठी हातभर उंचीच्या १२०० चांदीच्या समया खास बनवून घेतल्या होत्या.
पंगतीत खाशांसाठी रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, रुपयाची उदबत्तीची घरे, केशराचे गंध व कस्तुरी मिश्रित अक्षता होत्या. सवाई माधवराव पर्वतीवर विवाह स्थळी निघाले त्यावेळी बरोबर वाजंत्र्यांचे २०० ताफे,सोन्याचे गंडे पट्टे व भरगच्च झुली घातलेले ५ हजार घोडे व त्यावरील स्वार बंदुकीचे बार उडवीत होते.घोडेस्वारांपुढे १० हजार पायदळ, ५० ते १०० हत्ती, माधवराव विनायक हत्तीवर रुप्याच्या अंबारीत, त्यांच्या मागे दागिने व भरजरी वस्त्रानी नटलेल्या वऱ्हाडणी चालत होत्या. त्यांच्यामागे भिक्षुक, शास्त्री, पुराणिक ,मुत्सद्दी, शेठ, सावकार व उंटावर १००-२०० नौबती होत्या. पुणेकर नागरिक माधवरावांवर सोन्या-रुपयाची फुले उधळीत होते.
रमाबाईची वरात वाजत गाजत तावदानी रोषणाई, आकाशमंडळ तारांगण, चादरी दारूकाम, नारळीची झाडे, प्रभाचमक, कैचीची झाडे, बादलगर्ज, पाणकोंबडी, हातनळे वगैरे शोभेच्या दारूकामात न्हाऊन निघाली होती. पुढे जवळजवळ दीड महिना लग्न समारंभ सोहळा पुण्यात चालला होता.
टिपू सुलतानाने आहेर म्हणून लुगडे आणि माधवरावांना शिरपेच पाठवला होता. धाकट्या छत्रपती शाहू महाराजांनी रमाबाईंना हिरेजडीत कंकणे आणि सवाई माधवरावांना हिऱ्यांचा हार आहेर दिला. अहिल्याबाई होळकरांनी आहेर म्हणून १८८ मोठ्या मोत्यांची माळ, १ जरी पैठणी, वधुवरांस २ पोशाख, नवरत्नांचा शिरपेच, पाचूंचा तुरा, काही जवाहीर तर वधूस ५ बादली वस्त्रे, हिरे जडित जवाहीरांची सरी,जडावाचा चाफेकळी हार दिला.
विवाहानंतर १०-११ महिन्यांनी सवाई माधवराव आणि रमाबाई आजेसासू गोपिकाबाईनच्या पाया पडण्यासाठी नाशिकला गेल्या होत्या. उतसाहाच्या भरात केलेल्या ह्या शाही विवाहामुळे पुणे दरबारचा खजिना चांगलाच रिकामा झाला होता.त्यावर इलाज म्हणून कारभाऱ्यानी त्वरित मराठी राज्यातील सर्व सरदारांवर ‘ लग्नपट्टी ‘
कर बसवून वसुली सुरु केली. अहिल्याबाई होळकरांनी ह्यास विरोध केला होता.
सप्टेंबर १७९२ मध्ये पुण्यात अचानक महामारीची साथ सुरु झाली.त्यावेळी पंधरा वर्षे वय असलेल्या रमाबाईंस पण ह्या साथीची लागण झाली. सर्व वैद्यकीय इलाज करूनही त्यांना आराम पडला नाही. अखेर ३१ जानेवारी १७९३ रोजी त्यांचे माहेरी निधन झाले.
सवाई माधवरावांचा द्वितीय विवाह—रमाबाईंच्या जानेवारी १७९३ मध्ये निधन झाल्यावर नानांनी पेशव्यांना संसारसुख मिळावे म्हणून त्यांच्या द्वितीय विवाहासाठी कोकणातील गणेशपंत गोखले यांची मुलगी यशोदा हिची निवड केली.हा विवाह पुणे इथे ६ मार्च १७९३ रोजी झाला.ह्या लग्नाचा समारंभही पहिल्या सारखाच थाटामाटात झाला.महाद्जींच्या उपस्थितीमुळे त्यास आणखीन रंगत आली होती. यशोदाबाई पेश्विनबाई म्हणून जेव्हा शनिवारवाड्यात आल्या त्यावेळी पेशवे घराण्यातील आनंदीबाई आणि गोदुबाई ह्या दोनच खाशा स्त्रिया हयात होत्या.पेशवे घराण्यातील जवळजवळ सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींचे मृत्यू झाल्याने पेशवे पती पत्नींना सख्या नात्यातले असे कुणी उरले नव्हते.सल्लामसलत आणि घराण्याच्या रीतीभाती यांची माहिती करून देणारी नाना फडणीस हिच एकमेव एकटी त्यावेळी शनिवार वाड्यात होती. नानांचा भीती, आदरयुक्त धाक माधवराव-यशोदाबाईवर होता.
सवाई माधवरावांच्या द्वितीय विवाहास उपस्थित राहण्याची निजाम अलींची खूप इच्छा होती. त्याने नानांना कळविले कि...पहिल्या लग्नास आम्ही स्वतः हजार राहवे अशी फार इच्छा होती. पण कित्येक विघ्ने उत्पन्न झाल्यामुळे आम्हांस येत आले नाही; पुत्रास पाठविले पण ते येऊन दाखल होण्यापूर्वीच लग्न सोहळा उरकून गेला.तरी आता पुन्हा लग्न होई, त्यास आम्ही अवश्य येणार.आम्हीच येऊन लग्न लावू....हे पत्र नानांना मिळण्यापूर्वी तीन दिवस आधी सवाई माधवरावांचा द्वितीय विवाह होऊन गेला होता. त्यामुळे माधवरावांच्या विवाहास हजर राहण्याची निजामाची इच्छा इछाच राहिली. हे कळल्यावर निजामाने पुन्हा कळविले कि आमची इच्छा अपुरीच राहिली, ती पूर्ण होण्यासाठी आता तिसरे लग्न पंढरपुरास करा,आम्ही तिथे येऊन लग्नाची सिद्धता करतो. आम्ही आता वृद्ध झालो. एकवार आपणास डोळ्यांनी पाहवे असा फार हेतू आहे. हे पत्र पाठवून निजाम आली एप्रिल १७९३ मध्ये फौजेसह हैद्राबाद सोडून बिदर येथे आला. नानांनी निजाम अलीस कळविले कि लग्न होऊन गेले. आता पुन्हा तिसरी बायको करण्याची आमची इच्छा नाही. शिवाय हल्ली दुष्काळामुळे मुलुखात खूप महागाई असून आपण फौजबंद आल्यास उगाच हाल होतील, तरी तूर्त आमचे भेटीस येण्याचा बेत रहित करावा. इतके कळवून नानांनी मराठी फौजा जमविण्यास सुरुवात केली. महादजी पुण्यात असल्यामुळे निजामाने कुठलेही दुस्साहस केले नाही.
संदर्भ:मराठी रियासत - गो.स.सरदेसाई खंड सहा आणि सात
२-पेशवे-ले.श्रीराम साठ्ये
- प्रकाश लोणकर.
No comments:
Post a Comment