संताजी
घोरपडे जिंजी मध्ये साधारणपणे एक महिना मुक्कामी होते व दक्षिण कर्नाटकात
मोहीम करण्याच्या इराद्यात होते असे फोर्ट सेंट डेव्हिड येथील नोंदीवरून
लक्षात येते. परंतु दुर्दैवाने ही मोहीम निघालीच नाही. तत्पूर्वीच संताजी
घोरपडे व राजाराम महाराज यांच्या संबंधात १६९६ च्या जून महिन्यातील पहिल्या
आठवड्यात पुन्हा बिघाड झाला. संताजी घोरपडे २०००० सेनेनिशी जिंजी
किल्ल्यातून बाहेर पडले. एखाद्या बंडखोर सेनानी जवळ अशा धामधुमीच्या काळात
इतकी मोठी सेना असणे हे स्वराज्याच्या दृष्टीने प्रचंड मोठे संकट होते. हि
बाब लक्षात घेऊन स्वतः राजाराम महाराज धनाजी जाधवराव, अमृतराव निंबाळकर,
हनुमंतराव घोरपडे इत्यादी सरदारांना घेऊन संताजी घोरपडे यांना रोखण्यासाठी
निघाले. भीमसेन सक्सेना च्या मते धनाजी जाधवराव यांनी संताजी घोरपडे
स्वतंत्र होण्याच्या मार्गावर असल्याचे राजाराम महाराज यांना भासवले व
संताजीस ठार मारण्याचा सल्ला दिला. कल्पनेत इतिहासाला स्थान नसते परंतु
धनाजी व संताजी यांचा स्नेह पहाता भीमसेन सक्सेना याच्या विधानात तथ्य वाटत
नाही.
मराठ्यांच्या
या आपसातील लढाईत राजाराम महाराजांचा पराभव झाला. अमृतराव निंबाळकराला
हत्तीच्या पायी देण्यात आले. धनाजी जाधवरावांना युद्धभूमीतून पलायन करावे
लागले. राजाराम महाराज कैद झाले. इतके होऊन ही संताजी घोरपडे यांनी विजय
उन्मात न दाखवता ते हात जोडून राजाराम महाराजां समोर उभे राहिले व आपल्या
हातून घडलेल्या अपराधा बद्दल क्षमा याचना केली. तसेच आपण जी आज्ञा कराल ती
आज्ञा शिरसंवद्य म्हणून वागू असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी राजाराम
महाराजांना सुखरूप जिंजी मध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली.
या
यादवीचा दोष कोणाला द्यावा हा एक मोठा प्रश्न आहे. संताजी सारखा सेनानी
बंडखोर होऊन निघून जाणे हे स्वराज्यासाठी घातक होते तसेच स्वराज्यासाठी
उद्भवलेला इतका मोठा धोका राजाराम महाराज स्वीकारू शकत नव्हते. राजाराम
महाराज व धनाजी जाधवराव चालून आल्यामुळे संताजी घोरपडे याच्यावर
लढण्याखेरीस दुसरे गत्यंतर नव्हते त्यामुळे युद्ध संपल्यावर तो
महाराष्ट्राकडे निघून गेला. राजाराम महाराजांनी सेनापतीपद त्यांच्याकडून
आधीच काढून घेतलेले होते तसेच संताजींच्या हाताखालील फौज हुजूरात परत
आणण्याबद्दल आपल्या सरदारांना हुकूम दिले. संताजी घोरपडे यांची फौज
दिवसेंदिवस कमी होत गेली.
परंतु
त्यांनी मोगलांशी लढणे थांबवले नाही किंवा औरंगजेबाला जाऊन मिळण्यासारखा
सोपा मार्ग अवलंबिला नाही. जुल्फीकारखाना सोबत संताजी यांची शेवटची लढाई
अर्काट येथे झाली व त्यानंतर संताजी घोरपडे यांचे बळ क्षीण होत गेले व
लढण्याची मानसिकता देखील राहिली नाही. महाराष्ट्राच्या वाटेवर असताना
पेनुकोंड्याच्या आसमंतात बेदारबक्त या शहजादा आजमच्या मुलाशी लढण्याचा
प्रसंग आला परंतु त्याला बगल देऊन संताजी पुढे निघून गेले. राजाराम
महाराजांच्या आज्ञेवरून धनाजी जाधवराव व हनुमंतराव निंबाळकर यांनी संताजी
घोरपडे यांचा पाठलाग केला व महाराष्ट्राच्या सीमेजवळ त्यांनी संताजी घोरपडे
यांना गाठले. अमृतराव निंबाळकर यांच्या मृत्यूमुळे हनुमंतराव निंबाळकर
यांनी संताजी घोरपडे वर त्वेशाने चाल केली. मनोधैर्य खचलेल्या संताजी
घोरपडे यांची ही शेवटची लढाई. या लढाईत त्यांचे बरेचसे सैन्य मारले गेले,
बाजार बुणगे लुटले गेले व फौजही मोडली गेली. काही निवडक विश्वासू लोकांनिशी
असाह्य अवस्थेत संताजी घोरपडे यांनी महादेवाच्या डोंगराचा आश्रय घेतला.
एकीकडे औरंगजेबाच्या आदेशावरून संताजींच्या मागावर असलेला फिरोज जंग व
धनाजी जाधवराव यांनी साताऱ्याच्या भागात संताजी घोरपडे यांची कोंडी केली.
ज्याच्या
नुसत्या नावाने आशिया खंडातील सर्वात मोठा बादशहा औरंगजेब व त्याच्या
सागराप्रमाणे विशाल सेनेच्या उरात धडकी भरत होती तो सह्याद्रीचा सिंह असह्य
व थकलेल्या अवस्थेत महादेवाच्या डोंगराच्या आश्रयाला आला असतानाच
औरंगजेबाच्या आज्ञेने नागोजी माने याने वेळ साधून या तेजोमय सूर्याचा अस्त
केला.
पुस्तक - मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा
लेखक - अमर श्रीरंग साळुंखे
छायाचित्र - राम बाळासाहेब देशमुख
@sarsenapati_santaji_ghorpade
#sarsenapati #santajighorpade #jayshivray #maratha #harharmahadev
No comments:
Post a Comment