क्रूरकर्मा औरंगजेब: भाग २
दख्खन ची घडी बसवताना औरंगझेबाच्या मनात नेहमी बागलाण प्रांत जिंकून घ्यावा अशी इच्छा असायची. बागलाण प्रांत म्हणजे आजचा गुजरात आणि खानदेश यांच्या आतला त्यांना जोडणार दुवा. या प्रांतात राठोड म्हणून राजा होता. सदर प्रांतावर औरंगजेबाने १६३८ मध्ये मोहीम आखली ज्या अंतर्गत त्याने किल्ले साल्हेर आणि मुल्हेर किल्ले घेण्याची योजना केली. सदर प्रांत हा अतिशय खडतर पण तेवढाच शांत, सुंदर, थंड आणि आल्हाददायक असा होता. खुद्द अकबर या प्रांताला आपल्या वर्चस्वाखाली आणि पाहत होता पण त्याला ते शक्य झाले नाही. पुढे जहांगीर आणि शहाजहान यानेही प्रयत्न केले पण बागलाण काही मोगलांच्यां हाती लागत नव्हता. १६३९ मध्ये नाकेबंदी करून बागलाण चा राजा जो स्वतः ला बहरजी म्हणवून घेत असे तो असलेल्या किल्ल्याला वेढा दिला आणि महिनाभराच्या वेढ्यानंतर तो शरण आला आणि औरंगजेबाने बागलाण प्रांत आपल्या वर्चस्वाखाली आणला. इथे विचार करण्याची गोष्ट अशी की सुरुवातीला ज्या राज्यांना औरंगझेब जिंकत असे त्यांना तो मुघल मनसबदार म्हणून आपला मंडलिक करून घेत असे. बहिरजीला पण त्याने ५ हजारी मनसबदार केले आहे परंतु काळानुरूप ही प्रथा त्याने स्वतःच मोडीत काढली जी आपल्याला पुढच्या प्रसंगांमध्ये दिसेलच.
सदर वाचनात एका न ऐकलेल्या मराठा शुराची गोष्टही समोर आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातीलच त्यांचे सख्खे चुलत काका, खेळोजी भोसले यांचाही प्रसंग दस्तेवजात नमूद आहे. खेळोजी भोसले हे थोरले महाराज शहाजी भोसले यांचे चुलत बंधू. बाबाजी राजे भोसले यांचे नातू आणि विठोजी भोसले यांसह द्वितीय चिरंजीव . खेळोजी भोसलेंनी दौलताबादच्या निजामशाही कडून मनसबदारी मिळविली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर शहाजी राजे यांच्या कालखंडात खेळोजी राजे हे नामवंत पराक्रमी सरदार होते. इसवी सन १६२९ च्या सुमारास खेळोजी राजे यांनी परसोजी आणि मालोजी या आपल्या दोन भावांसह निजामशाही सोडली आणि शहाजहान बादशहाच्या मुघलशाहीत जाऊन मिळाले. मुघल बादशाह शहाजहान याने त्यांना मनसबदारी बहाल केली होती. परंतु पुढे दौलताबाद चा किल्ला घेण्यासाठी झालेल्या युध्दात त्यांनी मोगल सोडून आदिलशहाला जाऊन मिळाले. पण पुढे खुद्द आदिलशहाच मुघलांचा मंडलिक झाल्याने त्यांनी हा प्रपंच सोडून भोसल्यांच्या मूळ गावाला म्हणजेच वेरूळ येथे जाऊन त्यांनी आपल्या शौर्याच्या बळावर पुन्हा स्वतःचे सैन्य जमवले आणि यावेळी मुघल आणि आदिलशाह अश्या दोघांचा प्रतिकार करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नांत होते.
खेळोजी भोसल्यांनी सदर दौलताबाद, बालाघाट , नगर आणि धाराशिव, तेर हा पट्टा पिंजून काढायला सुरुवात केली. ही गोष्ट औरंगजेबास कळल्यानंतर त्याने आपला विश्वासू सरदार मलिक हुसेनला सैन्य देऊन श्रीमंत खेळोजी राजेंवर हल्ला करण्यासाठी पाठवले. एकाएकी झालेल्या हल्ल्यामध्ये श्रीमंत खेळोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. तरी देखील इसवी सन १६३९ च्या नोव्हेंबर महिन्यातील १५ तारखेला ते धारातीर्थी पडले.
यावरून २ गोष्टी लक्षात येतात.
१. स्वराज्याची संकल्पना ही शिवाजी महाराजांच्या रक्तातच होती मग ती थोरले महाराज शहाजी राजे असोत किंवा खेळोजी राजें.
२. जेव्हा जेव्हा स्वराज्याची संकल्पना पुढे आली तेव्हा तेव्हा मुघलांनी आणि त्यातल्या त्यात औरगजेबाने त्याचा विरोध केला आहे.
सदरची घटना घडली ते वर्ष म्हणजे १६३९, शिवाजी महाराज तेव्हा फक्त ९ वर्षांचे होते.
क्रमशः
ॲड. वेदांत विनायक कुलकर्णी (मूरुंबेकर)
९२८४९९६५०२
शिवाजीनगर, पुणे
No comments:
Post a Comment