समय सुचकता, हा एक छत्रपती शिवरायांच्या विचार प्रणालीचा अतिशय महत्वाचा भाग आहे. कोणतीही आखणी करताना मग ती स्वतःच्या जीवनाची असो वा कोणत्यातरी मोठ्या कार्याची असो, योग्यवेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे असते, हे आपणास माहितच आहे. परंतु योग्यवेळी योग्य निर्णय घेणे केव्हा शक्य होते हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आजुबाजूच्या प्रत्येक बाबींवर सुक्ष्म नजर असणे खूप महत्वाचे असते. त्यासाठी विचारांमध्ये समय सुचकता असणे गरजेचे असते. कारण मनुष्य-जीवन हे नशिबावर अवलंबून नसते असे मला वाटते. जीवनाच्या प्रवासामध्ये अनेकवेळा अपयश येऊ शकते, परंतु विचारांची समय-सुचकता जपली तर अपयशाचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. आयुष्यामध्ये प्रत्येक बाबींवर सुक्ष्म लक्ष ठेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास नुकसान कमी होऊ शकते किंवा झालेले नुकसान आपण भरून काढू शकतो, आणि यासाठी विचारांची समय-सुचकता महत्वाची असते..
● सन १६५९-६० :
छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढला हे आपणा सर्वांना माहितच आहे. ही घटना म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातला मैलाचा दगड होता. खूप मोठे यश प्राप्त झाले होते. अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा संपूर्ण नाश केल्यामुळे शिवरायांचा धाक चारीबाजुला बसला होता. शिवरायांनी मनात आणलं असतं तर या घटनेनंतर शिवराय निवांत बसले असते. कारण, अफझलखानाचा नाश करून शिवरायांनी एक प्रकारे आदिलशाहीच्या पाठीचा कणाच मोडला होता, त्याचबरोबर भरपूर खजिनाही हाती लागला होता. अफझलखानाच्या मृत्यूमुळे आदिलशाहीमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होणे हे साहजिकच होते, कारण अफजलखान म्हणजे आदिलशाहीचा हुकमी एक्का होता. पण शिवराय निवांत बसले नाहीत. त्यांनी येथे त्यांच्या विचारांची समय-सुचकता दाखवली कारण तीच योग्य वेळ होती असे काहीतरी करण्याची जेणेकरून आदिलशाहीवर संपूर्ण वचक बसेल. अफजलखानाचा वध केल्यानंतर फक्त दोन महिन्यात शिवरायांनी पन्हाळगड, पावनगड, वसंतगड, रांगणा, खेळणा (विशाळगड) अशा महत्वाच्या किल्ल्यां बरोबर अनेक लहानसहान किल्ले जिंकले आणि आपली ठाणी कृष्णानदीच्या दोन्ही तिरांपासून ते बत्तीस शिराळाच्या गढीपर्यंत बसवुन तिकडील महसूल जमा करण्यासाठी शिवरायांनी आपली लोकं नेमली. लोहा गरम है तबही हातोडा मारो! यालाच आपण समय-सुचकता म्हणतो. शिवरायांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे समय सुचकतेमुळे अद्भूत असे यश शिवरायांनी मिळवले. कदाचित शिवरायांच्या या कौशल्याकडे डोळेझाक केल्यामुळे त्यांच्या अनेक मोहीमा आपणांस चमत्कारिक वाटल्या. ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही करू शकत नाही तीच गोष्ट एखाद्याने केली तर ती आपणास नक्कीच आश्चर्यचकित करते आणि ती आपल्यासाठी चमत्कारिक ठरते. पण तसे काही नसते..
● सन १६६४, सुरतेची स्वारी :
अफजलखान, शाहिस्तेखान, सिद्दी जोहर या सरदारांवर शिवरायांनी विजय मिळवला हे खरे आहे. परंतु त्यांनी जी स्वराज्याची नासाडी आणि केली होती लुट त्यामुळे स्वराज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. यामध्ये अफजलखानाला तर शिवरायांनी मारलाच होता, पण सिद्दी आणि शाहिस्तेखान हे अजुन जिवंत होते. बदला घेण्याच्या विचाराने शिवराय लगेच त्यांच्यावर तुटून पडले नाहीत कारण त्यांच्यापेक्षा महत्वाचे काय तर स्वराज्य होते. शिवरायांनी समय-सुचकता दाखवली आणि स्वराज्याची झालेली लुट भरून काढण्यासाठी सुरत मोहीम आखली. कोणत्यावेळी काय सुचकता. त्याचबरोबर आजुबाजूच्या महत्वाचे आहे याचे निरीक्षण म्हणजे समय परिस्थितीचे बारीक निरीक्षण व गोपनीयताही महत्वाची असते. याचे उदाहरण म्हणजे आपण सुरत वसुलण्यास जात आहोत याची शंका मोगलांना येऊ नये म्हणून, “आपण नाशिकतीर्थास जाऊन तिथून पुढे मोरोपंतांनी घेतलेल्या किल्ल्यांची पाहणी करण्यास जात आहोत” अशी अफवा पसरवली आणि आपल्या योजनेची गोपनीयता कुणालाही कळू दिली नाही. नाहीतर आज "सिक्रेट वही होता है जो सारे गांव को पता हो” अशी परिस्थिती आहे. विचारांची समय सुचकता ठेऊन, आजुबाजूच्या परिस्थितीची सुक्ष्म पाहणी करून योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे. हा कसलाही चमत्कार नव्हता तर तो एक शिवरायांच्या विचारप्रणालीचा भाग होता जो आपण समजुन घेतला पाहिजे..
वरील समय सुचकता हा छत्रपती शिवरायांचा गुण जर पाहिला तर मला असे वाटते की..,
समय सुचकता आणि आणि त्यातून घेतलेले साहसी निर्णय ह्या शिवरायांच्या व्यक्तिमत्वाच्या अतिशय महत्वाच्या बाजू आहेत, ज्यांच्या आधारे शिवरायांनी अनेक मोठ्या मोहीमा इतक्या सोप्या करून टाकल्या की शत्रू सुद्धा चकित झाले. औरंगजेबाला कधी स्वप्नात सुद्धा वाटले नसेल की मोगल साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतेवर शिवराय असा अचानकपणे हल्ला करतील. शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, पन्हाळगडावरून निसटणे, आग्र्याहून सुखरूप स्वराज्यात परत येणे अशा अनेक घटना ज्यांच्याकडे समय सुचकता आणि साहसी निर्णय या शिवरायांच्या गुणांचा आधार घेऊन पाहिले तर आपण या घटनांच्या मुळापर्यंत पोहचून याचा योग्यरित्या अभ्यास करू शकतो जेणेकरून हा कोणताही चमत्कार नसून फक्त आणि फक्त समय सुचकतेतून साधलेले यश आहे याची प्रचिती होईल, असे माझे प्रामाणिक मत आहे..

No comments:
Post a Comment