विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 August 2026

कण्हेरेश्वर मंदिर कण्हेरखेड..









 कण्हेरेश्वर मंदिर कण्हेरखेड..

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड हे मराठा इतिहासातील एक महत्त्वाचे गाव आहे. छत्रपतींच्या घराण्याशी सोयरसंबंध लाभलेली ही भूमी, तसेच उत्तर हिंदुस्थानात मराठा सत्तेचा दरारा निर्माण करणारे श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांचे जन्मगाव म्हणून कण्हेरखेडची ओळख आहे. गावात आजही अनेक ऐतिहासिक वाडे,छत्री स्मारक आणि प्राचीन वास्तू मराठेशाहीच्या वैभवाची साक्ष देत उभ्या आहेत.
या ऐतिहासिक गावाचे ग्रामदेवता म्हणजे श्री कण्हेरेश्वर. या प्राचीन शिवमंदिरावरूनच गावाला कण्हेरखेड हे नाव पडल्याचे सांगितले जाते. अनेक शतकांपासून हे मंदिर गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे केंद्र राहिले आहे.
कण्हेरेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन असून त्याचा जीर्णोद्धार श्रीमंत सुभेदार राणोजी शिंदे यांनी केला. मंदिराभोवती पूर्वी चार भक्कम दगडी बुरुज आणि तटबंदी होती. आज त्यांपैकी तीन बुरुज आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. यावरून या मंदिराचे ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या असलेले महत्त्व सहज लक्षात येते.
मंदिरावरील दगडी कोरीव नक्षीकाम, चार मजबूत दगडी खांबांवर उभा असलेला गाभारा आणि प्रवेशद्वारावरील शरभाचे शिल्प तत्कालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. गाभाऱ्यात भगवान महादेवांची शिवपिंड असून त्यावर फणीधारी नाग विराजमान आहे. हे मंदिर अत्यंत जागृत मानले जाते आणि आजही गावकरी मोठ्या श्रद्धेने कण्हेरेश्वराची पूजा-अर्चा करतात.
मंदिर परिसरात अनेक प्राचीन मूर्ती, वीरगळ आणि ऐतिहासिक शिल्पे पाहायला मिळतात. गावकरी ज्यांना आपल्या मूळ पुरुषाचे स्मारक मानतात, त्या शिल्पावर नाग, चंद्र आणि सूर्य यांची सुंदर कोरीव चिन्हे आहेत. या पुरातन शिल्पांचा अभ्यास झाला, तर इतिहासाची अनेक नवी दालने उघडू शकतात.
कण्हेरेश्वर मंदिराबरोबरच गावात मारुती, विठ्ठल-रुक्मिणी, जानुबाई, खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा आणि संत तुकाराम महाराज यांची प्राचीन मंदिरे आहेत. यांपैकी काही मंदिरांवर शिंदे घराण्याचे शेषचिन्ह कोरलेले दिसते. कण्हेरेश्वर आणि जानुबाई मंदिरांचा जीर्णोद्धार राजमाता विजयाराजे शिंदे यांनी केला.

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...