विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 6 August 2026

दि.६ ऑगस्ट १७६० रोजी श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील दिवाणखान्याचे चांदीचे छत फोडले..!!"

 "


दि.६ ऑगस्ट १७६० रोजी श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील दिवाणखान्याचे चांदीचे छत फोडले..!!"

दि.२ ऑगस्ट १७६० रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला अब्दालीच्या सैन्याकडून जिंकून घेतला. दिल्ली हाती पण दिल्लीत मराठ्यांना फारशी रसद मिळाली नाही, त्यामुळे रसदेच्या अभावी फौजेचे हाल सुरू झाले. अब्दालीच्या फौजेने अंतर्वेदीतील मुलुख व्यापला असल्याने दिल्ली शहरात धान्याचा व घासदाण्याचा पुरवठा होईना, मराठ्यांच्या सैन्यास उपवास पडू लागले.
दिल्लीच्या मुक्कामांत अडीच-तीन लाख रूपये बुंदेल्यांकडून मिळाले. पण त्यानी फारसा फरक पडला नाही. त्यामुळे फौजेचा थकलेला पगार देण्यासाठी नाणी पाडण्याकरिता चांदी उपलब्ध व्हावी म्हणून भाऊसाहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील दिवाण-इ-खास महालाचे चांदीचे छत फोडण्याचे ठरवले. त्या छतास बोटभर जाडीचा चांदीचा पत्रा असून वर सोन्याचे काम केलेले होते.
दि.६ ऑगस्ट १७६० रोजी भाऊसाहेबांनी ते छत फोडले आणि त्या चांदीतून ९ लाख रुपये उपलब्ध केले. पण त्यावरही नजीबाने उगा कांगावेखोरपणा करून 'सदाशिवरावभाऊने शाही तख्तास फोडून त्याची अप्रतिष्ठा केली' वगैरे कोल्हेकुई चालू केली. पण वास्तविक पूर्ण छत भाऊसाहेबांनी फोडले नसून त्या छताचा काही भाग या आधीच वझीर गाझिउद्दीनखानाने काढला होता. नंतर बाकी असलेले छत नाईलाजाने भाऊसाहेबांना तोडावे लागले. ह्या ९ लाखापैकी काही रुपये भाऊसाहेबांनी सरदारांस दिले, बाकी फौजेस वाटले तेणेकरुन पुढे सुमारे एक महिना गुजराण झाली.
त्यावेळेस मराठ्यांना भासलेल्या आर्थिक चणचणीचे दुर्दैवी वर्तमान पुढच्या काळात म्हणजे सप्टेंबर १७६० मध्ये भाऊसाहेबांनी पाठवलेल्या एका पत्रात दिसून येते, त्यात भाऊसाहेब म्हणतात - 'पातशाही किल्ल्यांत दिवाणखान्यास रुप्याचें छत होते, त्यास वजिराने पूर्वीच थोडकेसे काढले होते, बाकी आम्ही काढले त्याचे नऊ लक्ष रुपये निघाले, त्यामुळें महिनाभर स्थित राहिली. सावकार व लोक सर्व तरते बुडते पाहतात. दिल्लीच्या किल्ल्याचा खर्च, पातशहाच्या जातीचा (फौजेचा) खर्च, त्यांचा शागीर्दपेशा वगेरे खर्च वाढले. पुढे फौज ठेवावी लागते त्याचाही विचार लिहून पाठवावा.'
काळकर्ते शिवरामपंत परांजपे हे या घटनेचा राजकीय अर्थ अगदी चपखलपणे मांडताना म्हणतात - 'बिहार, ओरिसा, लाहोर, अयोध्या, गुजराथ, वऱ्हाड, विजापूर, गोवळकोंडा आणि दौलताबाद या सर्व ठिकाणच्या हिंदु प्रजेला जखडून टाकण्यासाठी गुलामागिरीच्या शृंखला येथेच घडविल्या जात होत्या. अखंड भारतातील लोकांची अंतःकरणे चावून चावून रात्री झोप येऊ न देणारे, साप आणि विंचू याच वारुळातून बाहेर पडत होते. असे हे तख्त म्हणजे मोगलाई सत्तेची मूर्तिमंत प्रतिमा होती. तीच्यावर आघात करून भाऊसाहेबांनी महम्मद गझनी, तैमुरलंग, नादिरशहा, अब्दाली.. अशी वाढत जाणारी माळ तोडून टाकली आणि दिल्लीचे तख्तच नव्हे तर हिंदुस्थानच्या गुलामगिरीच डोकेच फोडून टाकले..'
© स्वराज्यसेवक
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ :
१) मराठी रियासत : पेशवा बाळाजीराव नानासाहेब
[स.१७४९-१७६१] - गोविंद सखाराम सरदेसाई
२) पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक
३) महाराष्ट्राचा इतिहास : मराठा कालखंड (भाग २) : १७०७ ते १८१८ - वि. गो. खोबरेकर
४) काळातील निवडक निबंध : भाग ४ - शिवराम महादेव परांजपे
५) दिनविशेष - प्रल्हाद नरहर जोशी
६) ऐतिहासिक पोवाडे : भाग १ - यशवंत नरसिंह केळकर

No comments:

Post a Comment

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...