सतराव्या शतकात स्वदेश, स्वधर्म आणि स्वराज्याच्या स्थापनेची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना दिली. त्या प्रेरणेतून असंख्य मराठे रणांगणात उतरले. त्याच काळात उंबरणीच्या युद्धापासून मराठेशाहीतील शिंदे वीरांच्या पराक्रमाची आणि बलिदानाच्या अखंड परंपरेची सुरुवात झाली. पुढे अठराव्या शतकात शिंदे घराण्याने ही परंपरा अधिक तेजस्वी केली. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचा भगवा फडकविण्यात आणि मराठेशाहीचा प्रभाव प्रस्थापित करण्यात शिंदे घराण्याने मोठे योगदान दिले.
उंबरणी आणि चंदगडच्या रणभूमीवर सांडलेले शिंदे वीरांचे रक्त पुढे उज्जैन, नागौर, बुराडी घाट, पानिपत, दिल्ली, गोहद, मथुरा आणि नजीबाबादपर्यंतच्या रणांगणावरही सांडत राहिले. त्या प्रत्येक लढाईत शिंदे वीरांनी आपल्या शौर्य, स्वामिनिष्ठा आणि बलिदानाने मराठेशाहीचा दरारा निर्माण केला.
या अखंड पराक्रमाचे जिवंत प्रतीक म्हणजे कण्हेरखेड येथील १६ खांबी स्मारक. हे स्मारक केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाच्या इतिहासातील शिंदे घराण्याच्या शौर्य, त्याग आणि स्वामिनिष्ठेची साक्ष देणारे वैभव आहे. या समाधी आजही मराठेशाहीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शिंदे वीरांची आठवण करून देतात.
राणोजी शिंदे यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांच्या सामर्थ्याचा भक्कम पाया घातला, तर त्या पायावर वैभवशाली मराठा सत्ता उभी करण्याचे कार्य महादजी शिंदे यांनी केले. पानिपतच्या महाभयंकर संकटानंतर खचलेल्या मराठेशाहीला पुन्हा उभे करून दिल्लीवर मराठ्यांचा प्रभाव प्रस्थापित करणारे महादजी शिंदे हे अठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ मराठा सेनानी आणि मुत्सद्दी ठरले.
नर्मदेपासून यमुनेपर्यंत मराठेशाहीचा दरारा निर्माण करण्यात, उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्यात आणि मुघल बादशहाला मराठ्यांच्या संरक्षणाखाली आणण्यात महादजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पराक्रमामुळे मराठेशाही पुन्हा उत्तरेत उभी राहिली आणि शिंदे घराण्याचे नाव भारतीय इतिहासात अजरामर झाले.
No comments:
Post a Comment